दोन हजार वर्षांची दिवाळी (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

प्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद केवळ आपणच घेऊन थांबणं योग्य होणार नाही. व्यक्तिगत पातळीवरचा आपला अंधकार तर आपण दूर करायला हवाच; पण समाजमनातलाही अंधकार संपवून "तमसो मा ज्योतिर्गमय' असा प्रवास करणं अत्यावश्‍यक आहे. उद्यापासून दिवाळीचं आनंदपर्व सुरू होत आहे, ते औचित्य साधून आपण हा संकल्प करू या...

जवळपास प्रत्येकाच्या मनात दिवाळीविषयीच्या काही ना काही आठवणी असतातच; पण हा उत्सव नक्की कधी सुरू झाला, त्याची नेमकी माहिती आपल्याला नसते. आपण आपल्या आजोबांना विचारलं तर त्यांनाही त्यांच्या लहानपणापासूनची दिवाळी साजरी करण्याची आठवण येईल. त्यांनी त्यांच्या आजोबांना विचारलं असतं तर त्यांनाही दिवाळीची आठवण लहानपणापासूनची असेल; परंतु दिवाळीची सुरवात नेमकी कधी झाली याची माहिती त्यांनाही असण्याची शक्‍यता तशी कमीच.
इतिहासकारांच्या मते, इसवीसनापूर्वी लिहिल्या गेलेल्या उपनिषदांमध्ये दिवाळीचा उल्लेख आहे. स्कंदपुराणातही दिवाळीचा उल्लेख आहे. म्हणजे दिवाळी ही किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याला मिळालेली "देणगी' आहे!

इसवीसन 500 ते 1000 या काळात झालेल्या काव्यनिर्मितीत दिवाळीचा उल्लेख आहे. राष्ट्रकूट साम्राज्यातल्या ताम्रपटावर दीपोत्सवाची नोंद आहे. एक हजार वर्षांपूर्वी पश्‍चिम आशियातल्या अरब व पर्शिया या देशांतून भारतात प्रवास करणाऱ्या विद्वानांनी दिवाळीबद्दल, दीपोत्सवाबद्दल लिहिलं आहे. हे सगळे पुरावे दिवाळी दोन हजार वर्षांपूर्वी केवळ सुरू झाल्याचंच नव्हे, तर ती नियमितपणे साजरी करण्यात येत असल्याचं सिद्ध करतात.

गमतीची गोष्ट म्हणजे, गेली दोन हजार वर्षं या दीपोत्सवाचं मूलभूत स्वरूप कायम राहिलं आहे. दीप प्रज्वलित करणं, मिष्टान्न खाणं व आनंद व्यक्त करणं. काही तपशील कालानुसार बदलले असतीलही; परंतु दिवाळीचा उत्सव हा प्रकाश व हर्ष साजरा करण्याचा आहे, हे सूत्र मात्र कायम राहिलेलं आहे.

दिवाळीचं खरं माहात्म्य म्हणजे सांस्कृतिक भावनांनी राजकारणाचा केलेला पराभव! गेल्या दोन हजार वर्षांत अनेक राज्ये-साम्राज्ये होऊन गेली. मुघल आले, ब्रिटिश आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षं आधी देशात सुमारे 550 ते 600 राज्ये अथवा संस्थानं होती. दोन हजार वर्षं भारताचं राजकीय विघटन-ऐक्‍य-विघटन असं चक्र अनेकदा फिरलं; परंतु दिवाळीनं मात्र उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत व पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत सगळ्या प्रदेशांतल्या, विविध मातृभाषा असलेल्या, निरनिराळ्या जाती-पंथांच्या कोट्यवधी लोकांना अंतःकरणानं एक केलं.
भारतातल्या विविध राज्यांत जशा राज्यांच्या सीमा न मानता नद्या वाहत राहिल्या, साहित्य प्रसृत झालं, काव्य मुखोद्गत झालं, त्याचप्रमाणे दिवाळीनंदेखील राजे-महाराजांनी आखलेल्या सीमांकडं दुर्लक्ष करून समस्त भारतीय लोकसमूहांना आपल्या प्रकाशामालांनी एकत्र गुंफून टाकलं.

गेल्या दोन हजार वर्षांत भारतात दारिद्य्र, दुष्काळ, अत्याचार अशी अनेक संकटं आली. सध्या दुष्काळाचा धोका त्या तुलनेत कमी झाला आहे; परंतु दारिद्य्र, विषमता, निरपराध्यांवर अत्याचार यांचं सावट आहेच. तरीही दिवाळी गेली दोन हजार वर्षं श्रीमंत व गरीब अशा सगळ्याच स्तरांतल्या लोकांना सुखावत आली आहे व सध्याही सर्व स्तरांतल्या लोकांना ती आनंद देते.

दिवाळी हा केवळ सण नाही तर राजकीय व आर्थिक सीमा ओलांडून सांस्कृतिक ऐक्‍य निर्माण करू शकणारी शक्ती आहे, तसंच ते आपल्या इतिहासातल्या उज्ज्वल घटना-घडामोडींचं, प्रक्रियांचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. सध्या तर दिवाळी जगातल्या इतर देशांतही साजरी केली जाते. आफ्रिकेतल्या गिनी देशातले दोसू कोमारा, जर्मनी व स्वित्झर्लंडच्या सीमेवर राहणारे फ्रॅंक रीकर, चीनमधले शास्त्रज्ञ शाओफेंग जिमा असे जगभरातले अनेक लोक मला दिवाळीच्या शुभेच्छा पाठवतात.

जी दिवाळी, जी दीपमाला गेली दोन हजार वर्षं आपलं मन आनंदी व प्रकाशित करते ती दीपमाला पुढची दोन हजार वर्षंदेखील आपलं सांस्कृतिक व वैचारिक ऐक्‍य अबाधित ठेवेल याबद्दल संदेह असू नये. पुढच्या दोन हजार वर्षांत मानवाचं वास्तव्य इतर ग्रहांवर प्रस्थापित झालेलं असेल; त्यामुळे अजून दोन हजार वर्षांनी दिवाळी हा सण आपल्या सूर्यमालेतल्या व सूर्यमालेपलीकडच्या अनेक ग्रहांवरही साजरा केला जाईल, असं मानायला काही हरकत नसावी!

मात्र, मानवाचं अस्तित्व अजून दोन हजार वर्षं; किंबहुना आजपासून दोनशे वर्षदेखील टिकेल का याबद्दल साशंकता निर्माण व्हावी, अशी स्थिती आहे. भारतीय उपखंडात जशी दिवाळी व इतर सांस्कृतिक प्रतीकं लोकांना एकत्र आणतात, तशीच "शिननियान हावो' पूर्व आशियात, "नवरूझ' पश्‍चिम आशियात, "ख्रिसमस' व "ईस्टर' पाश्‍चिमात्य देशांत आणि "रमझान' हे सण-उत्सव मुस्लिम देशांत लोकांना एकत्र आणतात. शिवाय, आता दुबईत आणि इंडोनेशियातही दिवाळी आणि ख्रिसमस, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये ईद, चीनमध्ये दिवाळी, ख्रिसमस आणि ईद या सणांचा-उत्सवांचा आनंद लोक घेऊ लागले आहेत. काहीशे वर्षांनी अंतराळात मनुष्यवस्ती झाल्यावर सगळेच मानव सगळ्याच सांस्कृतिक सणांमधून आनंद उपभोगतील, अशीही कल्पना करायला हरकत नसावी.

दुर्दैवानं असं "हर्षवर्धनयुग' साकार करण्यासाठी मानवी मन तयार नाही, असं अनेकदा वाटतं. महत्त्वाकांक्षी राजकारणी व त्यांचे संकुचित भावनांनी अंध झालेले अनुयायी हे नैसर्गिकपणे वाहणाऱ्या नद्यांना अडवणं कर्तव्य समजतात व हजारो वर्षं वाहत असलेल्या सांस्कृतिक प्रवाहाकडं दुर्लक्ष करून समाजाचा धर्म, जात, पंथ यांच्यात विभागणी करून आपलं पद कायम ठेवणं हे भूषण समजतात. असे राजकारणी व त्यांचे सतत वाढणारे अनुयायी यांना इतिहासाचं भान नसतं, संस्कृतीचं भान नसतं, निसर्गाचे भान नसतं. असे राजकारणी अहंकारात बुडालेले असतात. त्यांचे अनुयायी अंधकारात बुडालेले असतात. असले राजकारणी आणि अनुयायी एकत्र येऊन हाहाकार माजवण्याचा धोका असतो व अनंतकालापासून चाललेला प्रकाशाचा प्रवास अंधकारात संपण्याचं भय असतं.

जगाच्या सध्याच्या वाटचालीकडं पाहिलं तर केवळ प्रकाशाकडून प्रकाशाकडं जाणाऱ्या दिवाळीच्या प्रवाहाचा आनंद घेऊन थांबणं योग्य होणार नाही. आपण आपला व्यक्तिगत व समाजमनातलाही अंधकार संपवून संपूर्णपणे "तमसो मा ज्योतिर्गमय' असा प्रवास करणं अत्यावश्‍यक आहे.

दोन हजार वर्षं सतत दिवाळीची, दीपोत्सवाची भेट आपल्याला देऊन आपले पूर्वज आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात? स्वार्थीपणानं आखलेल्या राजकीय सीमा ओलांडण्याची क्षमता भारतीय संस्कृतीत आहे व अंधारात दीप प्रज्वलित करून प्रकाशाची निर्मिती करणं मानवाला शक्‍य आहे.

पृथ्वीवर, तसंच अंतराळात जेव्हा येणाऱ्या दोन हजार वर्षांत मनुष्यवस्ती प्रस्थापित होईल तेव्हा हाच संदेश आपल्याला विश्वभर पसरवायचा आहे! अर्थात या सर्व गोष्टींचा विचार करण्यास वेळ लागेल. उद्यापासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. आता काही दिवस आयुष्यातल्या सर्व अडचणी, दुःखं, विघ्नं, मतभेद बाजूला ठेवून केवळ आनंद साजरी करण्याची ही वेळ आहे. आता फक्त एवढाच विचार मनात आणायचा ः
""चॉंद-तारों से चलना है आगे
आसमानों से बढना है आगे

तेव्हा, सर्व वाचकांना हॅपी दिवाळी! भरपूर एंजॉय करा व आपली चुकून भेट झालीच तर मला फराळाला नक्की बोलवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com