दोन टोकं आणि भारत (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 24 मार्च 2019

जगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळं मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. दुसरीकडं भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय राजकारणही मध्यममार्गी आहे. भारतात टोकाचं राजकारण नाही हे चांगलं आहे; पण त्याच्यामागचं कारण मात्र विचित्र आहे.

जगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळं मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. दुसरीकडं भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय राजकारणही मध्यममार्गी आहे. भारतात टोकाचं राजकारण नाही हे चांगलं आहे; पण त्याच्यामागचं कारण मात्र विचित्र आहे.

अमेरिकेतले दोन नेते जगप्रसिद्ध आहेत, एक आहेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांच्याबद्दल भारतीय माध्यमांत दररोज काही ना काही वाचायला मिळतं. दुसऱ्या आहेत अलेक्‍झांड्रिया ओकासिया- कोर्टेझ. त्यांच्याबद्दल भारतीय वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही; परंतु संपूर्ण जग त्यांच्याकडं उत्सुकतेनं पाहत आहे. अमेरिकेच्या संसदेत तीस वर्षांत पदार्पण करण्याच्या आधीच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या अमेरिकेच्या इतिहासातल्या त्या पहिल्या नेत्या आहेत.
ट्रम्प आणि ओकासिया- कोर्टेझ यांची मतं परस्परविरोधी आहेच. ट्रम्प यांनी श्रीमंतांना करसवलती दिल्या आहेत. ओकासिया- कोर्टेझ या एक कोटी डॉलरच्या वर उत्पन्न असलेल्या लोकांवर सत्तर टक्के कर लादू इच्छितात. ट्रम्प हे मानवाच्या सवयींमुळे हवामानावर दुष्परिणाम होऊ शकत नाही, असं मानतात. ते "ग्लोबल वॉर्मिंग' या सिद्धांताच्या विरोधात आहेत. ओकासिया- कोर्टेझ या पर्यावरणावर आधारित "हरीत अर्थनीती' आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ट्रम्प निर्वासितांच्या विरोधात आहेत. ओकासिया- कोर्टेझ या निर्वासितांवर निर्बंध असू नयेत म्हणून प्रयत्नशील आहेत. ट्रम्प हे दहशतवादाविरुद्ध मोठ्या आवाजात वल्गना करतात. प्रत्यक्षात धार्मिक दहशतवादास खतपाणी देणाऱ्या सौदी आणि आमिराती राजवटींना ते जवळ घेऊन कुरवाळतात. त्यांना रशिया, उत्तर कोरिया, इतर हुकूमशहांबद्दल प्रेम वाटतं. ओकासिया- कोर्टेझ या दहशतवादाच्या प्रामाणिक विरोधात आहेत आणि त्यांचं लोकशाहीवर प्रेम आहे.

गंमतीची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि अलेक्‍झांड्रिया ओकासिया- कोर्टेझ हे दोन्ही नेते अमेरिकेतल्या कामगार आणि गरीब लोकांच्या वस्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता वेगवेगळ्या राज्यांत आहे; पण संबंधित विभागांतले गरीब लोक त्यांच्यावर प्रेम करतात. याशिवाय अतिश्रीमंत लोकांना ट्रम्प आवडतात. याचा परिणाम असा, की टोकाच्या उजव्या आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण लोकांना आकर्षित करत आहे आणि मध्यममार्गी व मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे.

ब्रिटनमध्येही तीच स्थिती आहे. हुजूर पक्षातल्या पंतप्रधान थेरेसा मे, बोरिस जॉन्सन अशा नेत्यांनी उजव्या विचारसरणीचं राजकारण टोकास नेऊन ठेवलं आहे, त्याचा परिणाम ब्रेक्‍झिटमध्ये झाला आहे. याउलट मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बीन हे टोकाच्या डाव्या विचारसरणीचे आहेत. त्यांना ब्रिटनमधली अण्वस्त्रं काढून टाकायची आहेत आणि संरक्षणावरचा खर्च कमी करून तो गरिबांसाठी वापरायचा आहे. त्यांच्याच पक्षाच्या मध्यममार्गी खासदारांना त्यांची टोकाची धोरणं पसंत नाहीत. परंतु, सर्वसामान्य लोकांत त्यांना मोठा पाठिंबा असल्यानं ते मजूर पक्षाचे नेते म्हणून टिकून आहेत. फ्रान्समध्ये मध्यममार्गी इमॅन्युएल मॅकरॉन यांची लोकप्रियता घसरल्यामुळे आणि जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मर्केल यांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्यामुळे येत्या काही वर्षांत फ्रान्स आणि जर्मनीदेखील टोकाच्या ध्रुवीकरणात अडकण्याची शक्‍यता आहे.

दक्षिण अमेरिका खंडातही तीच स्थिती आहे. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो हे लष्करी शक्तीचं पूजन करतात. त्यांना श्रीमंत लोक आवडतात. त्यांचा पर्यावरण संतुलनावर विश्‍वास नाही. ते महिलांबद्दल अर्वाच्च भाषा वापरतात; पण ते खूप लोकप्रिय आहेत आणि विशेष म्हणजे महिलांचाही त्यांना मोठा पाठिंबा आहे. याविरुद्ध बाजूच्या उरुग्वेचे अध्यक्ष ताबारे वासकेझ व त्या आधीचे अध्यक्ष होसे मुहिका हे गरिबांचे कैवारी आहेत. होसे मुहिका तर अध्यक्ष असताना एका शेतात राहत होते आणि आपल्या पगाराचा ऐंशी टक्के हिस्सा गरिबांना वाटत होते. ते अजूनही 25 वर्षं जुनी असलेली गाडी वापरतात. वासकेझ आणि मुहिकादेखील प्रचंड लोकप्रिय आहेत.
बोलिव्हियाचे अध्यक्ष इवो मोरोलेस हे गरीब शेतकरी कुटुंबातून वर आले. त्यांनी सत्तेत आल्यावर अमेरिकेला विरोध करून गरिबांची उन्नती करणारी धोरणं अवलंबली. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या देशाची आर्थिक भरभराट होत आहे. दक्षिण अमेरिका खंडात श्रीमंतांचे वाली आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे बोलसोनारो आणि गरिबांचे कैवारी आणि समानतेचे प्रवर्तक ताबारे वासकेझ, होसे मुहिका, इवो मोरोलेस एकाच वेळेस विभिन्न विभागांतील गरिबांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. परिणामी, पाश्‍चिमात्य देशाप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडातही मध्यमवर्गीय राजकारणास फारसा वाव राहिला नाही.

जगाच्या अनेक भागांत टोकाचं राजकारण पसरत आहे आणि वेगानं ध्रुवीकरण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय राजकारणही मध्यममार्गी आहे. भारतात टोकाचं राजकारण नाही, हे खूप चांगलं आहे; पण त्यामागचं कारण विचित्र आहे.

भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस आणि प्रमुख प्रादेशिक पक्ष यांच्यातले मतभेद वरवरचे आहेत. ते काही खोल सैद्धांतिक मतभेद नाहीत. आपण विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षास विरोध करायचा आणि स्वतः सत्तेत आल्यावर थोड्याफार फरकानं तीच धोरणं अंमलात आणायची हा भारतीय राजकारणी लोकांचा गुणधर्म आहे.
कॉंग्रेस पक्ष सत्तेत होता, तेव्हा भाजपनं आधार, मनरेगा, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) या धोरणांचा विरोध केला. सत्तेत आल्यावर तीच धोरणं राबवली. विरोधी पक्षात असताना भाजपनं कॉंग्रेसच्या काश्‍मीर धोरणांवर टीका केली. सत्तेत आल्यावर फुटिरतावादी असलेल्या जम्मू-काश्‍मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर चूल मांडली. कॉंग्रेसचे नेते हिंदुत्ववादी राजकारणाविरुद्ध असल्याचा आभास निर्माण करतात; परंतु निवडणुका जवळ आल्यावर हिंदू देवळांमध्ये जाऊन अभिषेक करतात आणि जिथं निवडून येतात, त्या मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांत गौरक्षणास प्राधान्य देतात. भाजपचे नेते मुस्लिमविरोधात असल्याचा आभास करतात; परंतु सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिरातीच्या राजघराण्यांशी अतिशय घनिष्ट संबंध ठेवतात. "सौदिया' या हवाई कंपनींवर सवलतींचा वर्षाव करतात आणि महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांत सौदी आणि आमिराती कुटुंबांची मोठी गुंतवणूक घेऊन त्यांना भारतात बैठक मारून बसण्यास प्रोत्साहन देतात. भाजपचे नेते "लवजिहाद'विरुद्ध त्रागा करतात; पण त्यांच्याच एका मोठ्या नेत्याची पुतणी मुस्लिम समाजातल्या आपल्या मित्राशी विवाह करते, तेव्हा सर्व नेते सोहळ्यास उपस्थित राहतात.

कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल यांचे नेते भाजपवर टीका करतात; पण भाजप सत्तेत आल्यावर तिथं प्रवेश करून मोठी पदं स्वीकारतात. भाजपचे माजी मंत्री कॉंग्रेसबरोबर सहकार्य करतात. मे 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपला गरज वाटली आणि समजा त्यांनी उपपंतप्रधान पद देऊ केलं, तर जवळजवळ सर्वच पक्षांचे नेते तयार होतील. तसंच समजा कॉंग्रेसनं पाठिंबा दिला, तर फायदा होत असल्यास अनेक जण तिथं वळतील.

मात्र, अलेक्‍झांड्रिया ओकासिया- कोर्डेझ या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये उपाध्यक्ष कधीच बनणार नाहीत. सैद्धांतिक राजकारणात आणि स्वार्थाच्या राजकारणात हाच फरक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sundeep waslekar write india usa politics article in saptarang