राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं... (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 2 जून 2019

राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे.

राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे.

अलीकडंच झालेल्या निवडणुकांबाबतची उत्सुकता अगदी निकालाच्या दिवसापर्यंत शिगेला पोचली होती. काही महिने प्रसारमाध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये, गप्पांमध्ये निवडणुका हाच प्रमुख विषय होता. हे निवडणुकांच्या काळात समजण्यासारखंही आहे; परंतु आता निवडणुका संपल्यामुळे आपली ऊर्जा आपण राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळवली पाहिजे.

आपण अनेकदा राजकारणाचा अतिरेक करतो. "इस्रो'नं कामगिरी केली व एकाच वेळी 100 पेक्षा अधिक उपग्रह अवकाशात पाठवले तर ती बातमी केवळ एक दिवस झळकते. भारतानं जगातली सर्वात मोठी न्यूट्रिनो प्रयोगशाळा बांधण्यास सुरवात केली, ही बातमी एका वर्षापूर्वी वृत्तपत्रांच्या आतल्या पानावर आली होती. पुढं या महत्त्वाच्या प्रयोगाचं काय झालं याबद्दल आपल्याला काहीही उत्सुकता नसल्याचं दिसतं.

गेल्या पाच-सहा महिन्यांत जगात अनेक घटना घडल्या. मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवावर बर्फाचे मोठे साठे दिसले. चीननं चंद्राच्या पृथ्वीपासून दूर असलेल्या भागात रॉकेट उतरवलं. आयबीएम या कंपनीनं जगातला पहिला "क्वांटम कॉम्प्युटर' बनवला. शनी या ग्रहावरचा दिवस किती कालावधीचा असतो ते प्रथमच समजलं. पृथ्वीवरचे 10 तास 33 मिनिटं व 38 सेकंद हा शनी या ग्रहावरचा एक दिवस असतो.
चीनमध्ये शास्त्रज्ञांनी पाच माकडांची "जिवंत प्रत' (क्‍लोनिंग) बनवली. म्हणजे कृत्रिमरीत्या निर्माण केलेली ही माकडं एका जिवंत माकडाच्या पेशींसारखी
घडण असलेली आहेत. चीनमध्येच एका शास्त्रज्ञानं दोन जुळ्या मुलींचा जन्म होण्याआधी आईच्या गर्भात शस्त्रक्रिया करून त्यांची पेशीरचना बदलली. पृथ्वीवरचा सर्वात पुरातन खडक चंद्रावर सापडला. प्लास्टिकपासून तेल तयार करण्याचा शोध अमेरिकेत लागला.

मी वर उल्लेख केलेल्या घटना केवळ जानेवारी 2019 या एका महिन्यात घडलेल्या आहेत. जर मी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अशा गेल्या चार महिन्यांतल्या महत्त्वाच्या जागतिक घटनांची यादी बनवण्याचं ठरवलं तर मला अजून कदाचित चार लेख त्यासाठी लिहावे लागतील!

मानवाच्या आयुष्यावर व सृष्टीवर मूलभूत व दूरगामी परिणाम करणाऱ्या घटना सतत घडत असताना भारतात मात्र त्याविषयी आपण अंधारात आहोत. आपलं सारं लक्ष केवळ राजकीय स्पर्धा, नेते, निवडणुका यांवरच पूर्णपणे केंद्रित झालेलं दिसतं.
रोज रात्री नऊ वाजता कुठला राजकीय नेता काय म्हणाला यावर मोठी चर्चासत्रं माध्यमांमध्ये आयोजिण्यात येतात; परंतु सामाजिक, आर्थिक, विज्ञान आदी क्षेत्रांतल्या महत्त्वाच्या घडामोडींची आपल्याला माहिती नसते. सरकारी निर्णयांपेक्षा सरकारमधल्या प्रमुख व्यक्तींच्या राजकीय स्वरूपाच्या उद्गारांवर आपली जास्त चर्चा होते. आपल्या राजकारणाच्या "अत्युत्साही आवडी'मुळे आपलं राष्ट्रकारणाकडं दुर्लक्ष होतं.

आपण जर राष्ट्रकारणावर लक्ष केंद्रित केलं तर महत्त्वाच्या प्रश्‍नांवर राजकीय स्पर्धेचा काही परिणाम होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात येईल.
आर्थिक संरचना करण्यासाठी कोणती दिशा शोधली पाहिजे,
हा आपला महत्त्वाचा प्रश्‍न आहे. बेरोजगारांसाठी अर्थपूर्ण काम निर्माण करणं हे आपलं सर्वोच्च प्राधान्य असायला हवं. त्यासाठी उत्पादन वाढवायचं असेल तर पर्यावरणाचं नुकसान कसं टाळता येईल हे पाहायला हवं. रोजगार व पर्यावरण यांचा समतोल राखायचा असेल तर उत्पादकता वाढवली पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रामधले तोट्यातले प्रकल्प नफ्यात आणले पाहिजेत अथवा त्यांची विक्री करून तिथं काम करणाऱ्या कामगारांची सोय केली पाहिजे.

अशा तऱ्हेनं रोजगार, पर्यावरण, संरक्षण, उत्पादकतेत वाढ, हवामानबदलाचा किमान परिणाम अशी सर्व उद्दिष्टं साध्य करायची असतील तर सर्व प्रकारच्या, सर्व विचारसरणींच्या अर्थतज्ज्ञांनी एकत्र विचारविनिमय करून सरकारला नवीन मार्ग सुचवण्याची गरज आहे. याचा राजकीय माध्यमांशी काहीही संबंध नाही.
जगात विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांत रोज एक या वेगानं नवीन शोध लागत आहेत. यात अमेरिका व चीन अग्रस्थानी आहेत. गेल्या अडीच हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर विज्ञान व तंत्रज्ञान यातलं संशोधन व नावीन्य हेच कोणत्याही देशाला आर्थिकदृष्ट्या पुढं नेण्यात सर्वात महत्त्वाचं असतं हे स्पष्ट होतं. भारत अवकाश संशोधनात जगातल्या पहिल्या सहा-सात राष्ट्रांमध्ये आहे; परंतु बाकी विज्ञानक्षेत्रात आपली प्रगती यथातथाच आहे. आपल्याला जर देश भक्कम व महान बनवायचा असेल तर भारत विज्ञान व तंत्रज्ञानात कशी प्रगती करेल यासंबंधी निर्णय घेतले पाहिजेत. त्यासंबंधीची सामग्री गोळा केली पाहिजे व प्रयत्न केले पाहिजेत. याचा राजकारणाशी काही संबंध नाही.

देशातली स्वच्छता, आरोग्य, शिक्षणाचा दर्जा, निसर्गाची जपणूक, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व या सर्व गोष्टी राष्ट्रनिर्मितीशी संबंधित आहेत. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.

जगभरातल्या सर्व देशांत राजकारण व राष्ट्रकारण यातला फरक नेत्यांना व नागरिकांना समजतो. अमेरिकेला जेव्हा एखाद्या कठीण व वादग्रस्त विषयावर जागतिक मत आपल्या बाजूनं वळवायचं असतं तेव्हा तिथलं सरकार विरोधी पक्षनेत्यांकडं महत्त्वाची जबाबदारी जाणीवपूर्वक देतं. युरोपमधील बहुतेक देशांत महत्त्वाच्या प्रश्‍नांची उकल करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येते. आपल्याकडंही माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी राष्ट्रासाठी महत्त्वाची धोरणं आखण्यासाठी, ती पुढं नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते ज्योती बसू यांचं सहकार्य अनेकदा मागितलं होतं. पंतप्रधानपदी असताना वाजपेयी यांनीही डाव्या विचारसरणीचे जॉर्ज फर्नांडिस यांना संरक्षणमंत्री केलं होतं व कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशीही सौहार्दाचे संबंध ठेवले होते. राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीतदेखील आहे.

नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे, तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sundeep waslekar write Indian Democracy article in saptarang