पराभव आणि पराक्रम (संदीप वासलेकर)

sundeep waslekar writes on importance of positive attitude
sundeep waslekar writes on importance of positive attitude

‘पराक्रमा’नं ‘पराभवा’ला उत्तर देण्याआधी मी त्याला अडवलं आणि दोघांना म्हणालो: ‘‘अरे, तुम्ही फारच गंभीर झालात आणि मला कंटाळाही आणलात! जा, आपापल्या घरी जा. एखादी व्यंग्यकथा वाचा आणि मन हलकं करा. एंजॉय करा. हॅपी न्यू इयर!’’

माझे दोन मित्र आहेत. त्यांची खरी नावं वेगळी आहेत; पण एकाला मी ‘पराभव’ म्हणतो, तर दुसऱ्याला मी ‘पराक्रम’ म्हणतो. ते नवीन वर्षाच्या निमित्तानं माझ्याकडं हमखास येतात व मनसोक्त गप्पा मारतात.

काल त्यांना मी म्हणालो ः ‘‘आता लवकरच वर्ष २०१९ येईल. वर्षं कशी पुढं सरकतात कळत नाही. वर्षांसारखी दशकं, शतकं व सहस्रकंही सरकतात; पण काळाचा प्रवास सुरूच असतो.’’

पराभव म्हणाला ः ‘‘खरं आहे. बरं आहे माझा जन्म सहस्र वर्षांपूर्वी झाला नाही. त्या वेळी गझनीच्या महंमदानं भारताची वाईट दशा केली होती. सन १००० ते १०२५ या काळात अनेक हल्ले केले गेले. सुरवातीची अनेक वर्षं सध्याचं पाकिस्तान व आपलं काश्‍मीर इथं तो हल्ले करत असे; पण सन १०१९ च्या दरम्यान तो पूर्ण चेकाळला. कनोज, ग्वाल्हेर करत करत काही वर्षांनी त्यानं सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. आताही इतिहास वाचला की खूप राग येतो.’’

पराक्रम म्हणाला ः ‘‘अहो, एक हजार वर्षांपूर्वी भारतात किती आत्मसन्मान होता. दक्षिणेत चेर, चोल आणि पांड्य ही जगातल्या अनेक दीर्घायुषी राजघराण्यांपैकी अशी तीन राजघराणी उदयाला आली. जपानसारखा एखाद्‌-दुसरा अपवाद सोडला तर जगाच्या पाठीवर एवढं यश कोणत्याही राजवटीला मिळालं नाही. चेर घराणं सुमारे १४०० वर्षं, चोल घराणं १६०० वर्षं, तर पांड्य घराणं २००० वर्षं चाललं. या काळात रोमन, अरबी, चिनी साम्राज्यं उदयाला आली व अस्तही पावली. रोमन साम्राज्य पाचशे वर्षं टिकलं. अरबी साम्राज्यही ५००-६०० वर्षं टिकलं; पण चेर, चोल, पांड्य ही साम्राज्यं १२०० ते २००० वर्षं टिकली. विशेषतः १०१९ च्या दरम्यान तर चोल साम्राज्य मालदिव, मलेशिया, इंडोनेशिया इथंही पसरत गेलं. मी जेव्हा एक हजार वर्षांपूर्वीच्या भारताचा विचार करतो तेव्हा मला राजेंद्र चोल आठवतात व प्रेरणा मिळते.’’

मी म्हणालो ः ‘‘अरे बाबांनो, तुम्ही मागचा कशाला विचार करता? झालं गेलं इतिहासजमा झालं. आता पुढं पाहा.’’

पराभव म्हणाला ः ‘‘बरोबर आहे. आपण पुढचा विचार केला पाहिजे. २०१९ पासून २०२९ पर्यंत आपण भारत कसा निर्माण करू हे पाहिलं पाहिजे; पण काय करता राव? कुणाला कर्जमाफी हवी आहे, कुणाला भ्रष्टाचार हवा आहे, कुणाला हिंसाचार हवा आहे...एकूणच पुढची दहा वर्षं खूप कठीण आहेत.’’

पराक्रम म्हणाला ः ‘‘बरोबर आहे. आपण पुढचा विचार नक्कीच केला पाहिजे. तीन दाक्षिणात्य साम्राज्यं १२०० ते २००० वर्षं टिकली. आपण किमान एक हजार वर्षांचा विचार केला पाहिजे. सन ३०१९ पर्यंत सातत्यानं भारत हे एक जगातलं शाश्‍वत मूल्यं, संशोधन व ज्ञान यांवर आधारित असं राष्ट्र म्हणून जगानं मानावं यासाठी आत्ताच भक्कम पायाभरणी केली पाहिजे. अजून १०० वर्षांत मानवी वस्ती अंतराळात पसरेल. सन ३०१९ मध्ये भारताचा विस्तार सूर्यमालिकेपलीकडं होईल, हे लक्षात ठेवून पावलं उचलली पाहिजेत. सन १९६० च्या दशकात भारतानं अंतराळविज्ञानात प्रवेश केला. सन १९७० पासून ते आत्तापर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी अंतराळविश्वातल्या प्रगतीसाठी प्रोत्साहन दिलं. परिणामी, अंतराळात भ्रमण करू शकणारी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी जी राष्ट्रं पृथ्वीवर आहेत, त्यात भारत आहे. ज्यांनी हे साध्य केलं त्या सर्वांचं कौतुक करून आपण पुढची पावलं उचलली पाहिजेत. अर्थात सन २११९ पर्यंत काही उद्दाम नेते जगात प्रबळ झाले तर अणुयुद्ध होऊन जग संपुष्टात येईल, म्हणून ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ या तत्त्वाचा प्रसार केला पाहिजे व शेतकरी, कामगार, उद्योगपती व व्यावसायिक यांना विश्‍वासात घेऊन अर्थव्यवस्था बळकट बनवली पाहिजे. हे सर्व करताना सन ३०१९ हे ध्येय असायला हवं.’’

‘‘अरे बाबांनो, तुम्ही मागचा कशाला विचार करता? झालं गेलं इतिहासजमा झालं. आता पुढं पाहा.’’

मी वैतागून म्हणालो ः ‘‘बाबांनो, अरे तुम्हाला नवीन वर्षासाठी गप्पा मारायला बोलावलं तर तुम्ही हे १०१९ आणि ३०१९ काय सुरू केलंत! आपण २०१९ पुरताच विचार करू या.’’

पराभव म्हणालाः ‘‘सन २०१९ मध्ये दहशतवादी आले तर? पाकिस्ताननं छुपा हल्ला केला तर आणि चीननं त्याला मदत केली तर? म्हणजे आपण प्रत्युत्तर देऊ, त्यासाठी आपण प्रखर राष्ट्रभक्तीची शपथ नवीन वर्षाच्या निमित्तानं घेतली पाहिजे व प्रत्येकाला राष्ट्रप्रेम शिकवून लढाईसाठी तयार केलं पाहिजे.’’

पराक्रम म्हणाला ः ‘‘मला वाटतं, सन २०१९ मध्ये खरा प्रश्‍न आहे तो म्हणजे, उमुआमुआचा भाऊ आला तर तो कसा असेल हा! सन २०१७ च्या अखेरीस शास्त्रज्ञांना सूर्यमालिकेत प्रचंड वेगानं म्हणजे एका तासाला दोन लाख किलोमीटरच्या गतीनं फिरणारा एक सिलिंडर दिसला. तो ज्या वेगानं आला त्याच वेगानं नाहीसाही झाला. सन २०१८ मध्ये त्याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला व मानवाच्या इतिहासात प्रथमच विश्वातल्या दुसऱ्या शक्तीनं आपलं निरीक्षण करण्यासाठी पाठवलेला संगणक म्हणजे तो सिलिंडर होता असा संशय निर्माण झाला. शास्त्रज्ञांनी त्याचं नाव उमुआमुआ असं ठेवलं. जर सन २०१९ मध्ये उमुआमुआ अथवा त्याचा भाऊ आला व आपल्या सूर्यमालिकेत येऊन स्थिरावला तर तो कसा वागेल यावर सृष्टीच्या अस्तित्वासंबंधी मूलभूत प्रश्‍न उत्पन्न होतील. अमेरिकी, चिनी, रशियन, पाकिस्तानी, भारतीय असे फरक सर्व मानव विसरतील आणि परकीय संस्कृतीशी कसं वागायचं ते एकत्र येऊन ठरवतील. अर्थात उमुआमुआ पुन्हा आला नाही तरी उत्सुकता कायम राहीलच.’’

पराभव म्हणाला ः ‘‘अरे बाप रे! जर उमुआमुआनं आपल्यावर आक्रमण केलं तर?’’

पराक्रम म्हणाला ः ‘‘तिरस्कार, मत्सर, द्वेष, राग हे पृथ्वीवरचे दोष आहेत म्हणून आक्रमण, युद्ध, भांडणं आपल्या रक्तात भिनली आहेत; परंतु, विश्‍वात इतर कुठं संस्कृती असेल तर कदाचित ती सहकार्य, प्रेम, विश्‍वास या मूल्यांवर आधारित असू शकेल. तसं असेल तर ती आपल्यावर आक्रमणाचा विचार करणार नाही.’’

पराभव म्हणाला ः ‘‘असं कधी असतं का? आपण २०१९ मध्ये केवळ पाकिस्तान व चीनच नव्हे तर उमुआमुआवरही हल्ला करण्यासाठी तयारी केली पाहिजे आणि कुणीच हल्ला केला नाही तर आपापसात भांडून स्वतःचा विजय कसा होईल, याचं नियोजन केलं पाहिजे.’’

‘पराक्रमा’नं ‘पराभवा’ला उत्तर देण्याआधी मी त्याला अडवलं आणि दोघांनाही म्हणालो ः ‘‘अरे, तुम्ही फारच गंभीर झालात आणि मला कंटाळा आणला. जा, आपापल्या घरी जा. एखादी व्यंग्यकथा वाचा आणि मन हलकं करा. एंजॉय करा. हॅपी न्यू इयर!’’

‘तिरस्कार, मत्सर, द्वेष, राग हे पृथ्वीवरचे दोष आहेत म्हणून आक्रमण, युद्ध, भांडणं आपल्या रक्तात भिनली आहेत'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com