भारत ही सांस्कृतिक संकल्पना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Bhagwat
भारत ही सांस्कृतिक संकल्पना!

भारत ही सांस्कृतिक संकल्पना!

- सुनील आंबेकर ambekarsunil@gmail.com

हजारो वर्षांचा इतिहास असलेली सांस्कृतिक भूमी म्हणजे भारत. संपूर्ण इतिहासाच्या क्रमामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे एक सूत्र सातत्याने प्रवाहमान आहे. आपल्या राष्ट्राच्या एकात्मतेचे मुख्य सूत्र आपल्या संस्कृतीवर आधारित आहे. भारताकडे जोपर्यंत भारतीय दृष्टीने आपण पाहत नाही, तोपर्यंत एकात्मतेची सूत्रं समजणं कठीण आहे. आपल्या राष्ट्राच्या विकासाचा एक वेगळा क्रम आहे आणि हा पश्चिम राष्ट्रांच्या विकासापेक्षा वेगळा असू शकतो, हे सर्वांत प्रथम ध्यानात घेतलं पाहिजे. अन्यथा, पश्चिमेतली राष्ट्रं ज्या पद्धतीने बनली आणि आजही त्यांच्या जशा धारणा आहेत, त्या आधारावर आपण जर भारताकडे पाहिलं, तर आपल्या समजण्यामध्ये निश्चितच घोळ होऊ शकतो. एक तर पश्चिमेतील अधिकांश देश हे जगाच्या इतिहासाच्या पटलावर भिन्न व नवीन आहेत आणि ‘नेशन’ या संकल्पनेचा विकाससुद्धा तुलनेने नवीन आहे. काहींनी एका भाषेच्या आधारावर आपलं राष्ट्र विकसित केलं आहे. फ्रेंच बोलणाऱ्यांचा फ्रान्स असेल, जर्मन बोलणाऱ्यांचा जर्मनी असेल, किंवा अशा पद्धतीने असे अनेक देश आपल्याला जगामध्ये दिसतात, किंवा त्यांनी आपल्या वंशाची एक धारणा करून त्या आधारावरदेखील देशाची रचना केली. आपल्या मत संप्रदायांच्या उपप्रकारांवर आधारित त्यांनी आपली राष्ट्रं बनवली. उदाहरणार्थ - रोमन कॅथलिक असतील किंवा प्रॉटेस्टंट असतील. एक भाषा आणि एक प्रकारचे लोक म्हणजे एकसारखे असणं, ‘युनिफॉर्म’ असणं, ही त्यांची राष्ट्र या संकल्पनेमागची एक अट आहे; आणि त्याशिवाय त्यांच्यापेक्षा वेगळे लोक त्या राष्ट्रांच्या बाहेरचे लोक आहेत. या संकल्पनेच्या आधारावर अनेक राष्ट्रं तयार झालेली आपल्याला दिसतात.

भारत राष्ट्र म्हणून विकसित होताना अगदी वेदकाळापासून राष्ट्र आराधनेला पुष्कळ महत्त्व दिलेलं आहे आणि राष्ट्र या कल्पनेचा आधार आपली संस्कृती आहे, त्यामुळे तिच्या विकासावर भर आहे. हिंदुत्वातलं तत्त्व म्हणजे आपल्यातलं एकत्व. आपापसांतल्या परस्पर समानतेचा शोध घेत एकमेकांना जोडत जायचं आणि अशा सगळ्यांनी मिळून एकत्र राहण्याचा जो संकल्प आणि अनुभवण्याचा भाग म्हणजे राष्ट्र आहे. आपण दिसायला वेगळे असू शकतो, आपण खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये वरकरणी कितीही वेगळे असलो, तरी आपल्यातली एकत्वाची जी अनुभूती आहे, त्या मजबूत आधारावर आपण एकत्र यायचं आणि मग आपण आराधना करायची एकत्र राहण्याची आणि अशा आधारावर आपलं समर्थ राष्ट्र उभं करायचं. या संकल्पना वेदांच्या उद्‌घोषामध्येदेखील आहेत आणि त्यामध्ये त्याला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. याच आधारावर पुढच्या राष्ट्राची कल्पना अनेक हजारो वर्षांमध्ये विकसित होत गेलेली आहे आणि त्यामध्ये विविधतेचा उत्सव आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतांतल्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांचे पोशाख, त्यांची खाण्या-पिण्याची पद्धती आणि स्वाभाविकपणे त्यांच्या क्रमबद्ध पद्धतीने विकसित होत गेलेल्या अनंत भाषा या सगळ्यांचा समन्वय होऊन, सामूहिकपणाने समंजसपणे एकत्वाच्या भावनेने आपण राहू शकतो, याचं एकमेव उदाहरण जगामध्ये हे भारत राष्ट्र आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत जेव्हा असं म्हणतात की, भारताच्या एकात्मतेचा आधार आपली संस्कृती आहे, भारत एक सांस्कृतिक राष्ट्र आहे, आमची राष्ट्राची कल्पना सांस्कृतिक आहे, तेव्हा त्याचा अर्थ या अवधारणांशी जोडलेला असतो. त्यामुळे विविध प्रकारच्या पूजापद्धती व अनेक प्रकारची विविधता यांचा सातत्याने सामंजस्याने विकास होतो आणि त्यांचं सहअस्तित्व एकाच राष्ट्रामध्ये शक्य होतं, त्याचंच नाव भारत आहे. भागवत त्याचा उल्लेख करतात तेव्हा त्याचा संदर्भ याच्याशी असतो. जे संप्रदाय भारतात विकसित झाले, त्यांच्या पूजापद्धती, त्यांची प्रतीकंदेखील वेगवेगळी असू शकतात; परंतु या सर्व सत्य आहेत त्या सगळ्या मार्गांनी ईश्वरापर्यंत पोहोचता येतं. त्यामुळे या सगळ्या पद्धतींचा सन्मान झाला पाहिजे व स्वाभाविकपणे त्या एकाच देशात राहू शकतात, एकाच परिवारामध्येदेखील अशा प्रकारच्या विविध अवधारणा राहू शकतात आणि त्यामुळे विविधता ही सामंजस्याने राहू शकते, याचं उदाहरण म्हणजे भारत राष्ट्र आहे. भारताचा परिचय या संस्कृतीशी जोडलेला आहे. समुद्र आणि हिमालय यांच्या सीमांमधील भारतभूमीतील लोकांनी या अवधारणांच्या आधारावर हजारो वर्षं जी साधना केली आणि राष्ट्र म्हणून आपला विकास झाला, या विकासाचा जो क्रम आहे, हा एक स्वतंत्र अध्ययनाचा विषय आहे.

फक्त राजकीय आधारावर एकत्र आलेले पॉलिटिकल स्टेट अथवा पॉलिटिकल नेशन व यांच्या नेशन-स्टेट कल्पनांवर जेव्हा लोक भारताकडे बघतात, तेव्हा त्यांना एकात्म भारतामध्येदेखील अनेक राष्ट्रं दिसू लागतात. चष्मा बदलला की बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलते आणि अज्ञानापोटी या राष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याला आपले पूर्वज व पूर्वेतिहास बदलता येत नाही, त्याच्याशी आपलं नातं अतूट असतं. क्रमाने चाललेलं राष्ट्र इतिहासातल्या प्रेरणादायक गोष्टींकडून शिकत असतं, झालेल्या चुका सुधारून आपले वर्तमानामधील दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असतं. राष्ट्राच्या या धारणांमुळे, लोकांना आपलं मानल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेमभाव उत्पन्न होतो व त्यांच्यासाठी समर्पण करण्याची वृत्ती तयार होते आणि ती राष्ट्रसाधना असते. त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा किंवा इतिहासाचा विसर पडतो तेव्हा मग संभ्रम तयार होतात. एखाद्या विस्मृतीमधून जेव्हा एखादी पूजापद्धती बदलली म्हणून आपलं राष्ट्र बदललं व आपले पूर्वज बदलले, इतिहास बदलला असा जेव्हा भ्रम होतो, तेव्हा मग वेगळ्या राष्ट्राच्या कल्पना तयार होतात. यापुढे या गोष्टीला टाळायचं असेल, तर या संस्कृतीचं पुनर्जागरण आवश्यक आहे. कारण विसरलेल्या माणसाला संभ्रम निर्माण होतो आणि त्यावर उपाय हाच असतो की, त्याच्या जुन्या स्मृतींना जागृत करणं व संभ्रम दूर होणं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच कार्य सातत्याने करीत आहे.

आपल्या राष्ट्रीय सांस्कृतिक राष्ट्राची आठवण काढणं याचा अर्थ त्याचा उद्देश राजकीय सत्तेचा विस्तार नाही. आज जी भारतभूमी आहे, त्याचे पूर्णतः संरक्षण, संवर्धन, त्याची समृद्धी आणि आपल्या पूर्वजांनी जोपासले त्याहीपेक्षा उच्चकोटीचे आदर्श निर्माण करणं, हे आज आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे; आणि या राष्ट्रीय कर्तव्याची आठवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे पूजनीय सरसंघचालक त्यांच्या सगळ्या उद्बोधनामधून संपूर्ण समाजासमोर पुन्हा पुन्हा ठेवत असतात.

स्वाभाविकपणे आपल्या पूर्वेतिहासामध्येसुद्धा राजकीय व्यवस्था व प्रशासनिक व्यवस्था अनेक वेळा वेगवेगळ्या राहिलेल्या आहेत, त्यांचे वेगवेगळे कितीतरी प्रकार आपण इतिहासाच्या क्रमामध्ये बघू शकतो. भारताचा शेजारी देशांशी सांस्कृतिकदृष्टीने हजारो वर्षांचा जुना संबंध आहे. त्यामुळे जेव्हा या सांस्कृतिक संबंधांची जाण ठेवून संबंध बनवले जातात, तेव्हा ते दूरवर जातात, परस्परहित जोपासण्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. जेव्हा फक्त अल्पकाळातल्या राजकीय घडामोडींवर आधारित संबंध आपण ठेवतो, तेव्हा ते संबंध अल्पकालावधीतच संकटामध्ये येण्याची शक्यता राहते. उदाहरणार्थ - चीनशी आपले संबंध जवळ जवळ दोन-अडीच हजार वर्षांचे आहेत आणि त्या सगळ्या संबंधांमधल्या अतिशय सुखद आठवणी आहेत. परंतु, आपल्यामधील सगळ्या संबंधांची ठेव जर चीन, तिथलं कम्युनिस्ट शासन, भारतावरचं आक्रमण व केवळ गेल्या ७० वर्षांच्या इतिहासावरच आधारित ठेवणार असेल, तर नक्कीच त्याची मर्यादाच राहणार आहे.

परंतु आपण संस्कृतीच्या आधारावर जेव्हा संबंध विकसित करू तेव्हा आपण वर्तमानातल्या परस्पर संबंधांची मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकू. हीच गोष्ट आपल्या सगळ्या शेजारी देशांना लागू पडते आणि त्यामुळे त्यामध्ये वेगळं काय आहे, हे शोधण्यापेक्षा एकतेच्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याकडे आपण लक्ष देणं म्हणजे सांस्कृतिक एकात्मतेला विकसित, विस्तारित करणं आहे. त्याचा अर्थ राजकीय रचना कशा असतील? जेव्हा संबंध सांस्कृतिक एक असतात, सामंजस्याचे असतात, तेव्हा एकमेकांना पूरक अशाच राजकीय व्यवस्थासुद्धा उत्पन्न हातात. स्वतंत्र राहूनसुद्धा एकमेकांना पूरक अशा राजकीय व्यवस्था उत्पन्न केल्या जाऊ शकतात. त्यामुळे या एक सांस्कृतिक वारशाचा उल्लेख जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केला जातो, तेव्हा त्याचा अर्थ पुढल्या काळामध्ये एक शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आपल्या सहअस्तित्वाची ती उभारणी करण्याचा प्रयत्न आहे, असं समजायला पाहिजे.

मुस्लिम नावावर राष्ट्र बनवण्याच्या गोष्टी करतात, तसं असतं तर सगळी मुस्लिम राष्ट्रं एकत्र राहिली असती, परंतु जगामध्ये तर सगळ्या मुस्लिम राष्ट्रांची आपसामध्ये भांडणं चालली आहेत, कधी इराण-इराकचं युद्ध होतं, कधी अफगाणिस्तानचं होतं. आपण जर गेल्या वर्षातल्या महायुद्धांमध्ये बघितलं, तर त्या महायुद्धांमध्ये सगळी ख्रिश्चन राष्ट्रं एकमेकांच्या पुढे उभी ठाकलेली आहेत. पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात आणि आता अगदी युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललेलं आहे. त्यामुळे कुणी वेगळ्या पूजापद्धती करायला लागलं म्हणजे त्यांचं वेगळं राष्ट्र झालं, ही कल्पना वास्तवापासून खूप दूर आहे आणि तो अनाठायी अट्टाहास आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या सांस्कृतिक एकतेच्या आधारावर एक बंधुभाव उत्पन्न होणं. बंधुभाव जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा आपण एकमेकांचे हितसंबंध परस्पर सुरक्षित ठेवून, एकमेकांचा द्वेष न करता जगू शकतो, हाच भारताचा संदेश हजारो वर्षांपासून जगाकरिता होता, त्याकरिता भारताचं जीवन त्या आदर्शांपर्यंत घेऊन जाणं आणि पुन्हा एकदा भारताला त्या सांस्कृतिक आधारावर एक आदर्श राष्ट्र म्हणून उभं करणं, या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती आणि गेली ९७ वर्षं त्याच एका पवित्र उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करत आहे.

(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख आहेत.)

Web Title: Sunil Ambekar Writes India Cultural Concept Mohan Bhagwat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top