छाया-प्रकाशाचा अद्‍भुत खेळ!

पुढल्या काळात एक प्रतिभावंत दिग्दर्शक अशी ज्यांची ख्याती झाली, त्या ऋत्विक घटक यांनी ‘मधुमती’ची कथा-पटकथा लिहिली होती.
actress madhumati
actress madhumatisakal
Summary

पुढल्या काळात एक प्रतिभावंत दिग्दर्शक अशी ज्यांची ख्याती झाली, त्या ऋत्विक घटक यांनी ‘मधुमती’ची कथा-पटकथा लिहिली होती.

हिंदी चित्रपटांमधल्या व्यावसायिक (मेनस्ट्रीम) आणि कलात्मक (आर्ट फिल्म) या दोन प्रवाहांचा सुवर्णमध्य साधून निर्मळ व आशयघन चित्रपटांची परंपरा निर्माण करणाऱ्‍या दिग्दर्शकांचे आद्यप्रणेते म्हणून बिमल रॉय यांचं नाव घेतलं तर चुकीचं ठरणार नाही. निर्माता आणि दिग्दर्शक या दोन आघाड्यांवर कार्यरत राहिलेल्या बिमल रॉय यांच्या कारकीर्दीवर ओझरता कटाक्ष टाकला तरी हे कळून येईल. त्याबरोबरच हेही लक्षात येईल की, ‘दो बिघा ज़मीन’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’ आणि ‘बंदिनी’ या बिमलदांच्या पाच श्रेष्ठ कलाकृती आहेत; आणि या पाचांपैकी कोणताही एक त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवला जाऊ शकतो, एवढ्या तोलामोलाचे ते आहेत. हाच क्रम समोर ठेवला तर ‘मधुमती’ हा बिमलदांच्या कारकीर्दीचा ‘मध्यबिंदू’ ठरतो.

बिमल रॉय यांच्या संस्थेला चांगली प्रतिष्ठा लाभली असली, तरी कंपनीची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. यातून मार्ग काढण्यासाठी एका ‘धंदेवाईक’ नव्हे, पण धंद्याची गणितं सांभाळणाऱ्या चित्रपटाची गरज त्यांना होती. याच गरजेतून साकारला ‘मधुमती’ (१९५८) हा व्यावसायिक आणि कलात्मक हाताळणीचा सुवर्णमध्य साधणारा अजरामर चित्रपट.

पुढल्या काळात एक प्रतिभावंत दिग्दर्शक अशी ज्यांची ख्याती झाली, त्या ऋत्विक घटक यांनी ‘मधुमती’ची कथा-पटकथा लिहिली होती. प्रचंड व्यावसायिक यश मिळवून देईल अशा चित्रपटाची गरज बिमल रॉय यांनी घटक यांच्यापाशी बोलून दाखविली, तेव्हा घटक यांनी त्यांना ‘मधुमती’ची कथाकल्पना ऐकविली. बिमलदांना ती आवडली. गमतीचा भाग असा की, ही कथा पुनर्जन्मावर आधारित होती आणि ती पडद्यावर आणू पाहणारे बिमलदा हे विचाराने ‘सोशालिस्ट’, तर ती लिहिणारे ऋत्विक घटक पक्के मार्क्सवादी होते, तरीदेखील पुनर्जन्मासारख्या विषयाने त्यांना मोहात पाडलं, कारण दोघांनाही असलेली पैशांची निकड!

पुनर्जन्म या विषयावर आजवर अनेक चित्रपट तयार झाले; परंतु ‘मधुमती’सारखी सर्वांगसुंदरता त्यातल्या फार थोड्या कलाकृतींना लाभली, हे निर्विवाद सत्य आहे. खरं सांगायचं तर, पुनर्जन्म ही केवळ ‘थीम’ होती. बिमलदांनी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं ते निसर्गाने वेढलेलं पहाडी सौंदर्य, रानफुलासारखं टवटवीत संगीत आणि दृश्य परिणामातून उलगडलेला छायाप्रकाशाचा अद्‍भुत खेळ! यासाठी त्यांच्या दिमतीला होती रूपवती वैजयंतीमाला आणि अभिनयसम्राट दिलीप कुमार ही जोडी; गीतकार शैलेंद्र व संगीतकार सलील चौधरी, संवादलेखक राजेंद्रसिंह बेदी आणि छायालेखक दिलीप गुप्ता.

चित्रपटाची सुरुवात वादळी पावसाच्या दृश्याने होते. पत्नीला आणायला निघालेला अभियंता देवेंद्र (दिलीप कुमार) आणि त्याचा डॉक्टर मित्र (तरुण बोस) हे मोटारीने प्रवास करत असतात. अंधाऱ्या रात्री घाटात दरड कोसळल्याने त्यांचा मार्ग बंद होतो. रस्ता मोकळा होईपर्यंत हे दोघे जवळच्याच एका जुनाट हवेलीपाशी जातात. तिथला रखवालदार त्यांना रात्रीपुरता आश्रय देतो. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर देवेंद्रला चित्रविचित्र भास होऊ लागतात. या हवेलीत आपण पूर्वी कधीतरी येऊन गेलो आहोत, असं त्याला जाणवत राहतं. दिवाणखान्यातल्या भिंतीवर लावलेलं पोर्ट्रेट आपणच रंगवलं असल्याचं त्याला आठवतं; पण हे कसं शक्य आहे? रखवालदाराच्या म्हणण्यानुसार हे पोर्ट्रेट तिथला अखेरचा जमीनदार उग्रनारायण याचं असून, तो तर खूप वर्षांपूर्वी मरण पावलेला असतो. पण देवेंद्रला सारं काही आठवतं आणि उलगडते त्याच्या पूर्वजन्माची कहाणी...

देवेंद्र हा पूर्वजन्मातला आनंद. जमीनदाराच्या टिंबर इस्टेटचा मॅनेजर म्हणून या भागात नोकरीला आलेला. उग्रनारायण ऊर्फ राजासाहब एरवी शहरी वातावरणात, भोगविलासात रमलेला अन् अधूनमधून या ठिकाणी येणारा, जुलमी वृत्तीचा जमीनदार असतो. एक कुशल चित्रकार असलेल्या आनंदला हा परिसर, इथला हिरवागार निसर्ग, इथली माणसं आवडतात. याच भागातल्या मधुमती (वैजयंतीमाला) या पहाडी आदिवासी तरुणीला पाहून तो मोहित होतो नि तिच्या प्रेमात पडतो. मधुमतीलाही तो आवडतो. त्यांची प्रीत बहरत असतानाच उग्रनारायणची दृष्ट या प्रेमाला लागते. रूपवान मधुमतीला वश करण्याचे प्रयत्न उग्रनारायण करतो. ते फोल ठरल्यानंतर आनंदला कामाच्या बहाण्याने तो परगावी पाठवून देतो आणि आनंदचा अपघात झाल्याची खबर पोचवत मधुमतीला कपटाने हवेलीत बोलावून घेतो. मधुमती हवेलीत पोचते तेव्हा उग्रनारायणचा डाव तिच्या लक्षात येतो. पळून जाण्याचे तिचे प्रयत्न फोल ठरतात. मात्र, उग्रनारायणच्या वासनेची शिकार होण्यापेक्षा हवेलीच्या छतावरून उडी मारून जीव देणं ती पसंत करते.

गावाहून परत आल्यानंतर मधुमतीचा ठावठिकाणा न लागल्याने आनंद सैरभैर होतो, तिच्या विरहात वेडापिसा होतो. आपल्या माघारी तिला फसवून हवेलीवर नेण्यात आलं, एवढीच माहिती त्याला मिळते. तो हवेलीवर जातो; पण राजासाहबची माणसं मारहाण करून त्याला हाकलून देतात. रानोमाळ हिंडत असताना आनंदला अचानक मधुमती दिसते; पण ती मधुमती नसते, तर तिच्यासारखीच दिसणारी, माधवी नावाची नृत्यांगना असते, कुटुंबीयांसह सहलीला आलेली. आनंद तिच्या नि पोलिसांच्या मदतीने एक डाव आखतो. माधवीला मधुमतीचा ‘प्रेतात्मा’ बनवून उग्रनारायणपुढे न्यायचं आणि त्याच्याकडून सत्य वदवून घ्यायचं, हा तो डाव. आनंदची कहाणी समजल्यानंतर माधवी त्याला मदत करायला तयार होते. आनंद उग्रनारायणकडे जाऊन त्याची क्षमा मागण्याचं नाटक करतो. ‘‘मला गावी जाण्यासाठी थोडे पैसे हवेत, पण भीक नको, मी आपलं एक पोर्ट्रेट बनवून देईन, त्याबदल्यात पैसे द्या,’’ अशी गळ तो घालतो. उग्रनारायण संमती देतो.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आनंद उग्रनारायणच्या हवेलीवर जातो. त्याचं पोर्ट्रेट बनवायला घेतो. पोलिस बाहेर दबा धरून असतात. पावसाचा जोर वाढतो. आनंद चित्र काढताना उग्रनारायणला बोलण्यात गुंतवून ठेवण्याचा, काल्पनिक भयकथा सांगून घाबरवण्याचा प्रयत्न करतो. त्याने उग्रनारायण बेचैन होतो. घड्याळात आठचे टोल वाजतात. उग्रनारायणची बेचैनी वाढत जाते. बाहेर पावलांचा आवाज येतो. नजर बाहेर जाताच त्याला ‘मधुमती’ दिसते. मधुमतीचं भूत बघून त्याची बोबडी वळते. ती त्याला विचारते, ‘‘सांग, त्या रात्री मला फसवून हवेलीवर आणल्यानंतर काय घडलं?’’ घाबरलेला उग्रनारायण घडघडा बोलत आपल्या अपराधाची कबुली देतो. आपल्या वासनेची शिकार होण्याआधीच तिने हवेलीच्या छतावरून उडी मारून जीव दिला आणि नोकरांकरवी आपण तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली, हा घटनाक्रम तो कथन करतो. त्याच क्षणी पोलिस आत येतात आणि उग्रनारायणच्या कबुलीजबाबाच्या आधारे त्याला अटक करून नेतात.

उग्रनारायणला पकडण्यात मदत केल्याबद्दल माधवीचे आभार मानत असतानाच आनंदच्या मनाला शंका चाटून जाते, राजासाहबने मधुमतीला कपटाने हवेलीवर आणल्याचं आपण माधवीला सांगितलंच नव्हतं, मग हे तिला कसं कळलं? तो कोड्यात पडलेला असतानाच बाहेरून ‘खरी माधवी’ येते. मोटार बंद पडल्याने तिला पोचायला उशीर झालेला असतो. ही जर माधवी आहे, तर मघाशी उग्रनारायणला पकडून देणारी ‘ती’ कोण? हुबेहूब मधुमतीसारखी दिसणारी? माधवीचं आगमन होताक्षणी ‘ती’ अंतर्धान पावते. आनंद तिचा माग काढत वर जातो, ती त्याला साद देत असते, ‘मैं तो कब से खडी इस पार, ये अंखियाँ थक गयी पंथ निहार.... आजा रे परदेसी...’ त्या आवाजाच्या दिशेने आनंद चालत जातो आणि मधुमतीप्रमाणे तोही हवेलीच्या छतावरून पडून मरण पावतो...

हवेलीत आश्रय घेण्यासाठी आलेल्या आनंदला पूर्वजन्मातली ही सारी कहाणी आठवते. सकाळी आकाश निरभ्र होतं. आनंद स्टेशनवर जाऊन पत्नी राधाची भेट घेतो. ही राधा ही हुबेहूब मधुमतीसारखी दिसणारी, म्हणजेच पूर्वजन्मातली त्याची जोडीदार!

विश्वास असो वा नसो; पुनर्जन्माच्या कहाणीचा भल्याभल्यांना कसा मोह पडतो, याचं हे उत्तम उदाहरण! अर्थात, कथा नेहमीची असूनही ती सादर कशी केली जाते, यावर चित्रपटाची गुणवत्ता ठरत असते. या चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगात ठरल्याप्रमाणे माधवी येते आणि तिला पाहून घाबरलेला उग्रनारायण गुन्ह्याची कबुली देतो, एवढा साधासरळ शेवट दाखवला असता, तर त्यात वेगळेपण दिसलं नसतं. पण, माधवीला ऐनवेळी पोहोचायला उशीर होणं, तिच्याऐवजी मधुमतीचा प्रेतात्माच त्या ठिकाणी अवतरणं, हा खरंतर जबरदस्त ‘चकवा’ होता; आणि हेच ‘मधुमती’चं वेगळेपण होतं. (शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’च्या शेवटात लेखिका-दिग्दर्शिका फराह खानने हीच कल्पना उचलली होती.)

‘आजा रे परदेसी...’ ही गूढ साद जिवंत करणारं अप्रतिम छायाचित्रण, वैजयंतीमालाच्या नृत्यकौशल्याने खुललेली ‘जुलमी संग आंख लडी’, ‘घडी घडी मोरा दिल’, ‘चढ गयो पापी बिचुवा’ ही आणि ‘दिल तडप तडप के’, ‘टूटे हुवे ख्वाबों ने’सारखी गाणी, दिलीप कुमारचा प्रत्ययकारी अभिनय यांनी ‘मधुमती’ हा झपाटून सोडणारा अनुभव ठरला. त्या वर्षीचे तब्बल नऊ फिल्मफेअर पुरस्कार या कलाकृतीने पटकावले. खरंच, ‘मधुमती’ पडद्यावर पाहणं म्हणजे स्वतःला रिचार्ज करून घेणं!

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार व हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com