मेरे साजन है उस पार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Nutan
मेरे साजन है उस पार...

मेरे साजन है उस पार...

काळ ब्रिटिश राजवटीचा. देशाच्या कुठल्याशा भागातला एक मोठा तुरुंग. तिथं महिला कैद्यांच्या विभागात अन्य कैद्यांप्रमाणे शिक्षा भोगणारी कल्याणी (नूतन). शांत, सोशिक, रूपवान, सुस्वभावी, सेवाभावी अशी. संसर्गजन्य आजाराने अत्यवस्थ असलेल्या एका महिलेची शुश्रूषा करायला अन्य कुणी धजावत नसताना ते काम स्वतःहून स्वीकारणारी कल्याणी. तिच्या परोपकारी वृत्तीने भारावलेला तरुण डॉक्टर देवेंद्र (धर्मेंद्र) तिच्यावर भाळतो; पण ती त्याला प्रतिसाद देत नाही. ‘‘माझा पूर्वेतिहास चांगला नाही, मी खुनाच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगते आहे. माझ्या आयुष्याची काळी छाया तुमच्या उज्ज्वल भविष्यावर पडू नये, असं मला वाटतं.’’ सौम्य शब्दांत ती सांगते. देवेंद्रने देऊ केलेली खास वागणूक व सवलतीसुद्धा ती नाकारते. कल्याणीचा नकार आणि या दोघांच्या कथित संबंधांविषयी तुरुंगात सुरू असलेली कुजबूज, या पार्श्वभूमीवर देवेंद्र तुरुंगातली नोकरी सोडून गावी परत जातो. जेलर महेशचंद्र (तरुण बोस) यांना या दोघांविषयी आस्था असते. कल्याणीची लवकर सुटका व्हावी आणि तिचं देवेंद्रशी लग्न व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा असते. ते कल्याणीसमोर हा प्रस्ताव ठेवत तिचा पूर्वेतिहास जाणून घेतात. आपल्या नकारामागचं कारण देताना ती त्यांच्यासमोर आपली कहाणी उलगडते...

एका छोट्याशा गावातल्या सुखी कुटुंबात राहणारी कल्याणी ही अतिशय गोड, लाघवी मुलगी असते. आई देवाघरी गेल्यानंतर थोरला भाऊ आणि वडील या दोघांनी तिचा सांभाळ केलेला. समाजकार्य करणारा तिचा भाऊ पुरात बुडून मरण पावतो.

आता तिला आधार उरतो केवळ वडिलांचा. वडील सदाशिवबाबू (राजा परांजपे) पोस्टमास्तरकी सांभाळत धार्मिक प्रवचनं देणारे. याच गावात स्वातंत्र्य चळवळीतला एक क्रांतिकारक विकास (अशोक कुमार) याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं असतं. ओळख आणि सहवासातून विकास व कल्याणी यांचं प्रेम जुळतं. कल्याणीच्या वडिलांची या दोघांच्या लग्नाला संमती असते. मात्र, पोलिसांनी विकासला दुसऱ्‍या गावी हलविण्याचा निर्णय घेतल्याने दोघांची ताटातूट होते. बराच काळ लोटूनही विकासचा निरोप न आल्याने कल्याणी चिंतेत पडते. काही दिवसांनी तिला कळतं की, विकासची कधीच सुटका झाली असून, त्याचं लग्नही झालंय. निराश झालेली कल्याणी आपल्या नि वडिलांच्या बदनामीच्या भीतीपोटी रातोरात घर सोडून जाते.

दुसऱ्‍या गावी जाऊन एका इस्पितळात दाई म्हणून कामाला लागते. तिथं एका विक्षिप्त आणि हिस्टेरियाग्रस्त महिलेची शुश्रूषा करण्याची जबाबदारी ती स्वीकारते; पण या महिलेच्या रोजच्या वागण्याने ती कमालीची त्रासून जाते. त्यातच एकदा या स्त्रीला भेटायला तिचा नवरा येतो तेव्हा त्याला पाहून कल्याणीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण, तो असतो विकास, एकेकाळचा तिचा प्रियकर ! कल्याणी त्याच्यासमोर जायचं टाळते. विकास परत जातो; पण त्या स्त्रीचा आरडाओरडा सुरूच असतो. सहनशीलतेचा अंत झालेल्या अवस्थेत कल्याणी चहामध्ये विष कालवून त्या महिलेची हत्या करते. पोलिस तपासावेळी तिथं आलेला विकास कल्याणीला पाहून हादरतो. त्या स्त्रीने आत्महत्या केली की तिचा खून झाला, या पेचात पोलिस असताना कल्याणी पुढं होत आपणच खून केल्याची कबुली देते. मानसिक संतुलन ढळल्याने तिच्या हातून हे कृत्य घडल्याचं निष्पन्न झाल्याने तिला केवळ आठ वर्षांची शिक्षा होते...

कल्याणीची कहाणी ऐकून जेलर सुन्न होतात. चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर ते तिची सुटका करवून घेतात आणि देवेंद्रशी लग्न करण्यासाठी तिला राजी करतात. एवढंच नव्हे, तर देवेंद्रच्या गावी महिला वॉर्डनसोबत तिला पाठविण्याची व्यवस्थाही करतात. जेलर महेशचंद्र व इतर महिला कैद्यांचा निरोप घेऊन कल्याणी देवेंद्रच्या गावी जायला निघते. सुरुवातीचा प्रवास बोटीने करून पुढं रेल्वेने जायचं असतं. गाडी पहाटे येणार असल्याने रात्र एका ठिकाणी काढायची असते. तिथल्या झोपडीवजा जागेत कल्याणी थांबते. एका बाजूला बोटीचा धक्का तर दुसऱ्‍या बाजूला रेल्वे स्टेशन. अचानक तिला जाणवतं, पलीकडे कुणी आजारी माणूस खोकल्याने प्रचंड बेजार झालाय. कल्याणी तिथं जाऊन त्याला सावरू पाहते अन् तिला धक्काच बसतो, कारण तो असतो विकास. त्याही अवस्थेत ती त्याच्याजवळचं औषध काढून त्याला देते. विकासला तात्पुरता आराम मिळतो. त्याला पहाटेच्या बोटीने दुसऱ्‍या दिशेला जायचं असतं. दोघांच्या वाटा वेगळ्या ! रात्र जागून काढताना विकासच्या सहकाऱ्‍याशी झालेल्या चर्चेत कल्याणीला त्याच्याविषयी वेगळी माहिती समजते. देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या विकासला स्वतःचं खासगी आयुष्य नसतंच. तुरुंगातून सुटल्यानंतर तो लग्न करतो; पण तेही स्वतःसाठी नव्हे तर पक्षाच्या आदेशाखातर.

ब्रिटिश सरकारच्या सेवेतल्या एका बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीशी विकासने लग्न करावं, जेणेकरून पोलिसांच्या गुप्त हालचालींची माहिती विकासच्या पत्नीमार्फत मिळू शकेल, असा पक्षाचा डाव असतो. कल्याणीला लग्नाचं वचन दिलेलं असूनही विकासला तो आदेश पाळावा लागतो. देशासाठी व्यक्तिगत सुखावर तो पाणी सोडतो. कायम आजारी असलेली आपली पत्नी विक्षिप्त व संशयी असल्याचं विकासला कळतं; पण ते त्याने स्वीकारलेलं असतं. आपल्याला कोणत्या परिस्थितीत लग्न करावं लागलं हे तो कल्याणीला कळवतो; पण त्याचं पत्र तिच्यापर्यंत पोचत नाही. खुनाच्या घटनेनंतर झालेली ओझरती भेट सोडता पुन्हा कधी या दोघांची गाठ पडत नाही. खरंतर परिस्थितीनेच त्या दोघांना या वळणावर पुन्हा एकत्र आणलेलं असतं. ‘‘मला तुझी क्षमा मागता यावी यासाठीच कदाचित नशिबाने आपली पुनर्भेट घडविली असावी. तुझ्या आयुष्यात मी केवळ संकटंच निर्माण केली, याची खंत माझ्या मनात राहील. शक्य असेल तर मला क्षमा कर. आजवर देवाला मी काही मागितलं नाही; पण आता जिवंत असेतोवर एकच प्रार्थना करेन की, तू कायम सुखी रहावीस.’’ विकासच्या त्या कबुलीजबाबावर, ‘‘जाऊ दे, जुन्या गोष्टी उगाळून काय उपयोग...’’ एवढंच उत्तर देऊन कल्याणी त्याचं नि स्वतःचं समाधान करू पाहते. पण, अंतर्यामी ती खिन्न असते.

पहाटे निघायची तयारी होते तसा विकास बोटीवर चढतो. कल्याणीची रेल्वेही त्याच वेळी येते. ती अनिच्छेनेच गाडीत चढते, पण तिचं मन तिला मागे खेचत असतं. शेवटी मनाचा निर्धार करून ती गाडीतून उतरते आणि बोटीच्या दिशेने धावत सुटते. मागून तिची साथीदार सुशीला हाक मारत असते, ‘‘कल्याणी, तिकडं धावू नकोस, आपला रस्ता तो नाही...’’ पण कल्याणी निग्रहाने सांगते, ‘‘नाही, माझा रस्ता हाच आहे...’’ किनाऱ्यापासून विलग होणाऱ्‍या बोटीवर ती जीव धोक्यात घालून चढत जाते. वर थांबलेल्या विकासच्या पायावर डोकं टेकवत ती समर्पण करते. तिला उठवत तो तिचा स्वीकार करतो...

‘दाहक परी संजीवक’ अशा ‘बंदिनी’ (१९६३) या चित्रपटाची ही गोष्ट. ब्रिटिश राजवटीत तुरुंग अधीक्षक म्हणून काम केलेले बंगाली लेखक चारुचंद्र चक्रवर्ती ऊर्फ ‘जरासंध’ यांनी निवृत्तीनंतर कारागृहातल्या अनुभवांवर आधारित काही कथा लिहिल्या. त्यांपैकीच ‘तमसी’ या गाजलेल्या कथेवर बिमल रॉय यांनी ‘बंदिनी’ची निर्मिती केली. या विलक्षण कथेला ‘बिमलस्पर्श’ झाल्याने एक नितांतसुंदर कलाकृती साकार झाली. त्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच ‘फिल्मफेअर’च्या तब्बल सहा पुरस्कारांवर ‘बंदिनी’ची नाममुद्रा उमटली. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दिग्दर्शन (बिमल रॉय), कथा (जरासंध), छायाचित्रण (कमल बोस), ध्वनिलेखन (दिनशा बिलिमोरिया) आणि अर्थातच अभिनय (नूतन) या पुरस्कारांचा समावेश होता. (‘ओ रे मांझी..’, ‘मोरा गोरा अंग लई ले’, ‘ओ जानेवाले हो सके तो’, ‘अब के बरस भेज’, ‘ओ पंछी प्यारे’ अशी एकाहून एक सरस गाणी देणाऱ्‍या सचिनदेव बर्मन यांना मात्र पुरस्काराने हुलकावणी दिली.)

चित्रपटाच्या अखेरीस कल्याणीने केलेली जोडीदाराची निवड प्रेक्षकांना खटकली नाही. मात्र, हा शेवट बदला, नूतन अशोककुमारला नव्हे तर धर्मेंद्रला निवडते, असा शेवट करा, असा दबाव चित्रपट प्रदर्शित होण्याआधी फायनान्सर आणि वितरकांनी बिमल रॉय यांच्यावर आणला होता. पण त्याला बळी न पडता मूळ कथेतला शेवट कायम ठेवल्याबद्दल बिमल रॉय व त्यांच्या सहकाऱ्‍यांना धन्यवाद द्यायला हवेत. अन्यथा, एका चांगल्या कथेचं मातेरं झालं असतं. ‘कल्याणी’ ही नूतनच्या कारकीर्दीतली श्रेष्ठ भूमिका आहे, हे विधान खूप तोकडं ठरेल. खरंतर ही नूतनची ‘सर्वश्रेष्ठ भूमिका’ आहे, असंच म्हणायला हवं!

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार व हिंदी मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Sunil Deshpande Writes Actress Nutan Movie Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top