ऐसी भी बातें होती हैं...

‘अनुपमा फूलों की, पंछियों की भाषा समझती थी। मगर इन्सानों के बीच हर कदम उसे रुकावट महसूस होती थी। क्यों की असल रुकावट बाहर नही; उसके अंदर, उसके मन में थी.... आखिर वो दिन आया, जब अनुपमा अपने ही बुने हुए जाल से बाहर निकली...’
Sharmila Tagore
Sharmila TagoreSakal
Summary

‘अनुपमा फूलों की, पंछियों की भाषा समझती थी। मगर इन्सानों के बीच हर कदम उसे रुकावट महसूस होती थी। क्यों की असल रुकावट बाहर नही; उसके अंदर, उसके मन में थी.... आखिर वो दिन आया, जब अनुपमा अपने ही बुने हुए जाल से बाहर निकली...’

‘अनुपमा फूलों की, पंछियों की भाषा समझती थी। मगर इन्सानों के बीच हर कदम उसे रुकावट महसूस होती थी। क्यों की असल रुकावट बाहर नही; उसके अंदर, उसके मन में थी.... आखिर वो दिन आया, जब अनुपमा अपने ही बुने हुए जाल से बाहर निकली...’

लेखक अशोकच्या (धर्मेंद्र) मनात साकारलेल्या कथानायिकेचं हे रूप; थोडंसं काल्पनिक आणि बरंच वास्तवाला भिडणारं. वास्तवात दिसलेल्या धूसर रूपाला तो कल्पनेचे रंग चढवतो आणि नवल म्हणजे, हेच काल्पनिक रंग वास्तवातल्या नायिकेत उतरतात. त्याला प्रत्यक्षात भेटलेली नायिका असते ‘उमा’ आणि कल्पनेतली नायिका असते ‘अनुपमा’.

उमा आणि अनुपमा यांच्यातला फरक खूप मोठा असतो. हे अंतर दूर करताना घडणारा प्रवास म्हणजे, दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांची ‘अनुपमा’ ही कलाकृती. कृष्णधवल चित्रपटांचा काळ अस्ताला जाण्याआधी झळकलेल्या या चित्रपटानं तरल, हळव्या मनाच्या प्रेक्षकांवर केलेलं गारुड अजूनही कायम आहे.

आईविना वाढलेल्या उमा (शर्मिला टागोर) या अभागी मुलीची कहाणी हा चित्रपट सांगतो. उमाचे वडील मोहन शर्मा (तरुण बोस) हे एका कंपनीचे मालक. वयाची चाळिशी उलटल्यानंतर त्यांचं लग्न होतं. मात्र अरुणाच्या (सुरेखा पंडित) रूपाने एक सुस्वरूप, लाघवी, गोड गळ्याची पत्नी त्यांना लाभते. अरुणाच्या प्रेमात ते आकंठ बुडून जातात आणि एरवी कठोर भासणारा त्यांचा नूर पत्नीचा विषय निघाला की प्रसन्न चेहरा धारण करतो. वेळेच्या आधी त्यांचं घरी पोचणं, घरी आल्यावरही सतत पत्नीच्या सहवासात राहणं यात दोघांचा काळ सुखात जात असतो. संसाराच्या वेलीवर एक नाजूक फूल उमलतानाच दुर्दैवाने वेल करपून जातो. प्रसूतीच्या गुंतागुंतीदरम्यान नवजात मुलगी वाचते, मात्र सुरेखाचा मृत्यू ओढवतो. मोहनबाबूंवर जणू वज्राघात होतो, त्यांची जगण्याची इच्छाच संपते, ते पोटच्या मुलीचा दुस्वास करू लागतात.

‘जन्मताक्षणी आईचा घास घेणारी ही अवलक्षणी, अपशकुनी मुलगी’ त्यांना नजरेसमोरही नकोशी होते. छोट्या उमाचा सांभाळ करण्याची जबाबदारी ते सरला (दुलारी) या दाईवर सोपवतात आणि स्वतः उत्तरोत्तर एकलकोंडे, तुसडे होत जातात. पूर्वी वेळेआधीच घरी येणारे मोहनबाबू आता रात्री उशिरापर्यंत कामात बुडून जात असतात. बेचैनी दूर करण्यासाठी मद्यपानाचा आधार घेऊ लागतात. याच वातावरणात उमा मोठी होते. मात्र, तिचं दुर्दैव संपत नाही. कारणाशिवाय वडिलांसमोर येण्याची तिला जणू बंदीच असते. वडिलांना नुसता चहा नेऊन दिला तरी ‘ तू का आणलास चहा, सरला कुठं गेली?’ असा ओरडा करून ते घर डोक्यावर घेणार. वापराविना धूळ खात पडलेल्या पियानोवर कधी उमाने सूर छेडलेच तर कौतुकाऐवजी तिला शिव्याच खाव्या लागणार. कारण हा पियानो तिच्या आईचा आवडता असल्याने इतर कोणास त्याला हात लावण्याची परवानगी नसते.

अतिमद्यपानामुळे मोहनबाबूंची प्रकृती बिघडते, हृदयविकार बळावतो. व्यसनावर अंकुश ठेवण्याबरोबरच हवापालटासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा सल्ला त्यांना दिला जातो, त्यामुळे सरला आणि उमासह ते महाबळेश्वरला जातात. एका जवळच्या मित्राकडे त्यांचा मुक्काम असतो. दरम्यान, याच काळात तिथं आलेल्या अशोक (धर्मेंद्र) या तरुणाची मोहनबाबूंशी गाठ पडते. आदर्शवादी विचाराचा अशोक आपल्या आईच्या उपचारासाठी आलेला असतो. त्याच्या नजरेला उमा येते. फुलापानांत रमणारी, अबोल स्वभावाची उमा अशोकला प्रभावित करून जाते. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी तो फिरायला बाहेर पडतो, तेव्हा निसर्गाच्या कुशीत एकटीच गात फिरणारी उमा त्याला दिसते, ‘कुछ दिल ने कहा... कुछ भी नही.... कुछ दिल ने सुना... कुछ भी नही... ऐसी भी बातें होती हैं... ऐसे भी बातें होती हैं....’ स्वतः लेखक असलेला, कवितेवर प्रेम करणारा अशोक तिचं गाणं ऐकून प्रभावित होतो.

‘कलियों से कोई पूछता, हंसती हैं वो या रोती हैं...’ या तिच्या गाण्यातल्या ओळी त्याला अस्वस्थ करून जातात. मुंबईला परत आल्यानंतर अशोकची आई (दुर्गा खोटे) मोहनबाबूंच्या कुटुंबाची ओळख वाढवण्याचा प्रयत्न करते. वस्तुतः मोहनबाबूंना अशोकच्या कुटुंबाविषयी अजिबात आस्था नसते. कॉलेजमधली नोकरी सोडून कमी वेतनावर शाळेत शिकवण्याचा ध्यास घेणाऱ्‍या, सामान्य परिस्थितीत जगणाऱ्‍या अशोकबद्दल त्यांना तिटकाराच असतो. याउलट परदेशात शिकून आलेल्या अरुणशी (देवेन वर्मा) उमाचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा असते. पण, अरुणला दुसरी मुलगी आवडल्याने मोहनबाबूंची निराशा होते. दरम्यान, उमाशी परिचय वाढल्यानंतर अशोकला ती आवडू लागते. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतर त्याच्या मनात एका कादंबरीचं बीज रुजतं. ही संकल्पित कादंबरी असते ‘अनुपमा’! उमाला समोर ठेवून कल्पिलेली. अशोकच्या सहवासात उमाचं व्यक्तिमत्त्व खुलून निघतं, ती मोकळेपणाने इतरांशी बोलू लागते, तिचा आत्मविश्वास वाढू लागतो.

उमाचा पूर्वनियोजित वर अरुण आणि त्याची प्रेयसी अनिता (शशिकला) या दोघांनाही उमाचं लग्न अशोकशी व्हावं असं वाटत असतं. पण, मोहनबाबूंसमोर त्यांचं काहीएक चालत नसतं. उमाचे वडील तिच्यासाठी वेगळं स्थळ शोधून आणतात, त्या लोकांना उमा पसंत पडते. हा मुलगा उमासाठी योग्य नाही हे माहीत असूनही मोहनबाबू हे लग्न निश्चित करतात.

इकडे अशोक त्याची ‘अनुपमा’ कादंबरी लिहून पूर्ण करतो. पहिल्या प्रतीवर उमाचं नाव लिहून तिला ती कादंबरी भेट देतो. घरी आल्यावर उमा कादंबरी वाचायला घेते. एका ठिकाणी त्याने लिहिलेलं असतं, ‘अनुपमाला फुलांची, पक्ष्यांची भाषा कळत होती; मात्र माणसांमध्ये तिची घुसमट होत असे. पण, ही घुसमट बाहेरच्या लोकांमुळे नव्हती, तर तिच्या मनात होती... हळूहळू तिच्या आशा आणि निराशा यांचा रंग एकमेकांत मिसळला गेला. एके दिवशी एक अपरिचित तिच्याजवळ आला, त्याने पापण्यांच्या टोकांनी दरवाजा ठोठावला. त्याचं नाव होतं ‘प्रेम’. त्यानंतर तिच्या मनात एकच प्रश्न भुंग्यासारखा भुणभुण करू लागला, ‘अनुपमा, तू का अशी बावरतेस? ही द्विधावस्था कशासाठी? तुझ्या मनाची तूच राणी आहेस अनुपमा!’ ...शेवटी तो दिवस उगवला, जेव्हा स्वतःच विणलेल्या जाळ्यातून अनुपमा बाहेर पडली. तिने पाहिलं, सकाळचा सूर्य किरणांचे बाहू पसरून तिच्या स्वागतासाठी उभा आहे. तिचं अंतर्मन एकच ग्वाही देत होतं, ‘मी जाणार.. मी जाणार...’

कादंबरी संपवून अनुपमा दिवा मालवते. खिडकीचा पडदा सारून बाहेर बघते. समोर सहस्ररश्मी सूर्य तिचं स्वागत करत असतो... अनुपमा मोहरून उठते. एका आगळ्या निर्धाराने तिचं मन खंबीर झालेलं असतं. अशोक मात्र प्रेमभंगाचं दुःख पदरी घेऊन आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतो. घरात उमाच्या लग्नाची लगबग सुरू असते. वरपक्षाकडून पाठविण्यात आलेला ‘शगून’ घरी पोचतो. सरलाच्या सहनशीलतेचा आता अंत होतो. अधिकार नसतानाही ती मोहनबाबूंना विनवणी करते, ‘बाबूजी, हे लग्न मोडून टाका. शगून माघारी पाठवा. हा शगून नव्हे, आपल्या लेकीच्या मरणाचा संदेश आहे. उमा केवळ तुमचीच नव्हे, माझीदेखील मुलगी आहे. जन्म दिला नसला, तरी तिच्या जन्मापासून मी तिचा सांभाळ केलाय. तिचा बळी जाताना मी पाहू शकत नाही....’ मोहनबाबू स्तब्ध होऊन बघत राहतात.

पाठोपाठ उमा त्यांच्यापाशी येते. ‘बोल, तुलाही काही सांगायचंय का?’ ते रागाने विचारतात. या वेळी प्रथमच न घाबरता, शांतपणे उमा त्यांना सांगते, ‘होय बाबा, मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलेय. मी हे घर कायमचं सोडून जातेय.’ मोहनबाबू सुन्न होतात. अखेर त्यांना तिला आशीर्वाद द्यावा लागतो.

घराचा निरोप घेऊन उमा अशोकचं घर गाठते; पण तो गावी जाण्यासाठी घर सोडून स्टेशनवर गेलेला असतो. एका परिचिताच्या मदतीने ती स्टेशन गाठते. अशोकला निरोप द्यायला अनिता व अरुण आलेले असतात. गाडी सुटायला काही क्षण उरले असताना उमा पोचते. तिच्या अनपेक्षित येण्याने अशोकसह सारे सुखावतात. ती डब्यात चढून अशोकजवळ बसते. गाडी सुटते. फलाटावर त्या दोघांना निरोप देणाऱ्‍यांमध्ये असतात अरुण, अनिता, तिला स्टेशनवर जाण्यात मदत करणारे अंकल मोझेस, सरला... आणि हो, दूर खांबाआड दडून अश्रू ढाळत उमाचा निरोप घेणारे मोहनबाबू! आयुष्यभर दुस्वास करूनही तिच्यासाठी आसवं गाळणाऱ्‍या तिच्या वडिलांचं हे रूप चकित करणारं असतं. इथंच चित्रपट संपतो.

हृषीदांनी टिपलेले अनेक हळुवार प्रसंग, निरागस उमाच्या भूमिकेतला शर्मिला टागोरचा लोभसवाणा आविष्कार (समीपदृश्यांमध्ये तिच्या कोरीव भुवया खटकतात ते सोडा), पित्याच्या भूमिकेतल्या तरुण बोसचा मनाला भिडणारा अभिनय, जयवंत पाठारे यांचं अप्रतिम कृष्णधवल छायाचित्रण आणि संगीतकार हेमंत कुमार व गीतकार कैफी आझमी या दोघांची अत्युत्तम कामगिरी (‘कुछ दिल ने कहा’बरोबरच ‘धीरे धीरे मचल’ ही लताची, ‘भीगी भीगी फिजा’ व ‘क्यूं मुझे इतनी खुशी’ ही आशाची आणि स्वतः हेमंतदांनी गायलेलं ‘या दिल की सुनो’) या साऱ्‍या गुणांमुळे ‘अनुपमा’ आजही ताजा वाटतो. देवेन वर्मा आणि शशिकला यांचं लांबवत नेलेलं उपकथानक (विशेषतः शशिकलाने बोलताना लावलेला टिपेचा सूर) काही वेळा कंटाळवाणं ठरलं तरी शेवटी आठवणीत राहतात त्या जमेच्या बाजू.

हृषीदांनी ही कलाकृती आपले गुरू बिमलदा यांना अर्पण केली, ती बिमलदांच्या निधनानंतर काही दिवसांनीच ‘अनुपमा’ प्रदर्शित झाला म्हणून, की बिमलदांनी बनवलेल्या ‘सुजाता’ची दाट छाया ‘अनुपमा’वर होती म्हणून? एक मात्र खरं, की ‘सुजाता’ (१९५९) आणि ‘अनुपमा’ (१९६६) यांच्यात अनेक साम्यस्थळं होती. दोन्ही नायिका बुजलेल्या, दबलेल्या आहेत, त्या मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. नायकांच्या पुढाकाराने त्यांचा अंतरात्मा जागा होतो. दोन्ही चित्रपटांत नायिकेचा पिता तरुण बोसने रंगवला होता आणि दोन्हीकडे शशिकलाच्या वाट्याला खट्याळ, बडबड्या मुलीची भूमिका आली होती. असो.

शेवटचा रेल्वे स्टेशनवरचा प्रसंग नेहमीच्या पठडीतला असला तरी चटका लावणारा ठरतो, यात शंका नाही. ताटातूट होणाऱ्‍या जीवांना एकत्र आणण्यात सिनेमातल्या रेल्वेगाड्यांनी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (आठवा ‘मधुमती’, ‘परिचय’, ‘मासूम’ इ.) अर्थात, काही कलाकृतींमध्ये रेल्वे स्थानकांनी वियोगही घडवला आहे. ‘तीसरी कसम’ हे यासंदर्भात ठळकपणे आठवणारं नाव. याखेरीज आणखीही एक नाव आहे; पण त्याचा उलगडा पुन्हा कधीतरी.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार व हिंदी -मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com