सावरणाराच अनोळखी होतो तेव्हा...

चित्रपटाचा शेवट हा अनेक अर्थांनी मनात विचारांचं मोहोळं निर्माण करत असतो. चित्रपटाच्या शेवटाबद्दल प्रत्येकाची मतं असतात.
sridevi
sridevisakal
Summary

चित्रपटाचा शेवट हा अनेक अर्थांनी मनात विचारांचं मोहोळं निर्माण करत असतो. चित्रपटाच्या शेवटाबद्दल प्रत्येकाची मतं असतात.

चित्रपटाचा शेवट हा अनेक अर्थांनी मनात विचारांचं मोहोळं निर्माण करत असतो. चित्रपटाच्या शेवटाबद्दल प्रत्येकाची मतं असतात. कलाकृतीचा शेवट हा एखाद्या निष्कर्षापर्यंत नेतो किंवा नव्या प्रश्‍नांना जन्मही देतो. अशा `क्लायमॅक्स’बद्दल चर्चा करणारं सदर...

नियतीचा खेळ कोणाकोणाची कशा परिस्थितीत गाठ घालून देईल आणि कधी त्यांना वेगळं करेल, हे सांगता येत नाही. ध्यानीमनी नसताना दोन भिन्न परिस्थितींतल्या व्यक्ती एकमेकांना भेटाव्यात, त्यांना परस्परांचा लळा लागावा आणि एकेदिवशी तेवढ्याच अनपेक्षितपणे नियतीनं त्या दोघांना भिन्न दिशांना भिरकावून द्यावं, असा हा खेळ.

बालू महेंद्र या प्रख्यात दिग्दर्शकाचा ‘सदमा’ हा १९८३ मधला चित्रपट नियतीच्या अशाच खेळाचं दर्शन घडवतो. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत छायाचित्रकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि संकलक अशी चौफेर कामगिरी केलेल्या बालू महेंद्र (१९३९-२०१४) यांचा ‘सदमा’ हा पहिला हिंदी चित्रपट. बालू यांनीच बनवलेल्या ‘मुंदरम पिराई’ (१९८२) या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक. मूळ चित्रपट एवढा गाजला, की हिंदी निर्माते रोमू एन. सिप्पी यांनी तो हिंदीत आणण्याची कामगिरी खुद्द बालूंवरच सोपवली.

समुद्रकिनाऱ्यावर पिकनिकला आलेल्या स्नेहलता या तरुणीच्या मोटारीला अपघात होतो. ती स्वतः कार चालवत असताना हा अपघात होतो. शारीरिक जखमा झाल्या नसल्या, तरी त्या जबर मानसिक आघातामुळे तिची स्मृती अंशतः हरपते. म्हणजे तिची आठवणींची मर्यादा तिच्या वयाच्या सहा-सात वर्षांपर्यंत जाऊन ठेपते. वैद्यकीय भाषेत ‘अॅम्नेशिया’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या आजारात रुग्णाला त्याच्या आयुष्यातल्या विशिष्ट टप्प्यापर्यंतच्या घटनाच आठवतात. वीस-बावीस वर्षांच्या स्नेहलताचा मेंदू तिला आता सहा-सात वर्षांची असेतोपर्यंतच्या घटनांचीच आठवण करून देत असतो, त्यानंतरचं तिला काही आठवत नसतं. थोडक्यात, शरीरानं तरुण असलेल्या स्नेहलताचं वागणं, बोलणं, चालणं आता एखाद्या बालिकेसारखंच होऊन बसतं. दुर्दैव हे, की स्वतःच्या आई-वडिलांनादेखील ती ओळखू शकत नाही, कारण मधल्या पंधरा वर्षांत त्या दोघांचीही चेहरेपट्टी बदललेली असते. काही काळानंतर, वैद्यकीय उपचार केल्यानंतर तिची गेलेली स्मृती परत येऊ शकेल, एवढा दिलासा डॉक्टर देतात.

दुर्दैवानं स्नेहलताच्या या दौर्बल्याचा फायदा घेऊन काही जण तिला इस्पितळातून पळवून नेऊन वेश्यागृहात विकतात. या वेश्यागृहात सोमशेखर नावाचा एक तरुण तिला पाहतो. उटी येथे शाळामास्तर म्हणून काम करणारा सोमशेखर ऊर्फ ‘सोमू’ हा मुळात सन्मार्गी तरुण असतो; पण एका ‘सर्वगुणसंपन्न’ मित्रानं बळेबळे त्याला वेश्येकडं आणलेलं असतं. एक ग्राहक म्हणून सोमूची स्नेहलताशी गाठ पडते. ‘मालकिणी’नं तिचं नाव आता ‘रेश्मी’ ठेवलंय. वयाशी विसंगत असलेलं रेश्मीचं वागणं-बोलणं पाहून सोमू बुचकळ्यात पडतो. तिला फसवून आणलं गेलंय हे तो ओळखतो. पुढल्या भेटीतच तो तिची सुटका करण्याची योजना आखतो. मालकिणीला घसघशीत मोबदला देऊन तिला फिरायला नेण्याच्या बहाण्यानं तो घेऊन जातो आणि तिच्यासह थेट उटी गाठतो.

सोमू आणि रेश्मी यांच्या आयुष्यातला एक वेगळा अध्याय सुरू होतो. एखाद्या लहान मुलीप्रमाणे तो तिचा सांभाळ करू लागतो. तिला काही कळत नसलं तरी सोमू आपली काळजी वाहणारा कुणीतरी आहे, याची जाणीव तिला होते. त्यामुळेच त्याच्याकडून सारे लाड ती पुरवून घेते. तोही कधी प्रेमानं, तर कधी रागावून तिला वळण लावण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्याविषयी त्याला शारीरिक आकर्षण नसतं असं नाही; पण त्या भावनेवर त्याची वात्सल्यभावना वरचढ ठरते.

इकडं स्नेहलताच्या आई-वडिलांनी वेगवेगळ्या माध्यमांतून तिचा तपास सुरू केलेला असतो. त्यात पोलिसांना ती उटी परिसरात असल्याचा सुगावा लागतो. पोलिस तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या बेतात असतानाच रेश्मीचा आजार बरा करणाऱ्‍या एका वैद्यबुवांची माहिती समजल्यावरून सोमू तिला त्यांच्याकडं नेतो. वैद्याच्या दिवसभराच्या उपचारानंतर ती एकदम बरी होते. त्याच वेळी पोलिसांच्या मदतीनं स्नेहलताचे आई-वडील तिच्यापर्यंत पोहोचतात. स्मृती पूर्ववत झाल्यानं ती आई-वडिलांना लगेच ओळखते. मात्र, अपघात झाल्यानंतरचा घटनाक्रम ती विसरून जाते. त्यामुळेच इस्पितळातून झालेलं अपहरण, सुटकेनंतर लाभलेली सोनूची सोबत यातलं काहीएक तिला आठवत नाही. सोनूमुळेच आपली मुलगी सुधारू शकली याची खात्री झाल्यानं रेश्मीचे वडील पोलिस ठाण्यातली तक्रार मागे घेतात.

रेश्मी पूर्णतः बरी झाली आहे, ती आता आई-वडिलांना ओळखू लागली असून, सायंकाळच्या गाडीनं ते सर्वजण मुंबईला जाणार असल्याचं सोमूला कळतं. धावतपळतच तो स्टेशन गाठतो. वाटेत ठेचकाळल्यानं मार लागलेला, चिखलानं माखलेला सोमू कसाबसा गाडीपाशी पोचतो. एका डब्यात खिडकीजवळ आईसोबत बसलेली रेश्मी त्याला दिसते. प्लॅटफॉर्मवर गर्दी असल्यानं तिचं त्याच्याकडं लक्ष नसतं. ‘रेश्मी... रेश्मी’ अशा हाका मारून तो तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतो. बऱ्‍याच प्रयत्नांनंतर ती त्याच्याकडं पाहते खरी; पण तिच्या नजरेत कसलीही ओळख दिसत नाही. ‘असेल कुणी वेडगळ’ या विचारानं ती तोंड फिरवते. सोमू जिवाचा आटापिटा करत, वारंवार हाक मारत तिला आठवण करून द्यायचा प्रयत्न करतो. तिचा काहीच प्रतिसाद मिळत नाही हे पाहून तिला खेळवताना माकडाप्रमाणे केलेल्या मुद्रा करून दाखवत, जमिनीवर कोलांटउड्या मारत तो तिला पुन्हा त्या दिवसांत नेऊ पाहतो; पण उपयोग शून्य.

जणू मधल्या काळात तिच्या आयुष्यात घडलेला तो घटनाक्रम तिच्या स्मरणपट्टीवरून कायमचा पुसला गेलेला असतो. गाडी सुटते. केविलवाणा सोमू मागं-मागं लंगडत, मुरगळलेला पाय फरशीवर घासत काही अंतर चालतो. खांबाला धडकून खाली पडतो. गाडी निघून जाते. सोमू एकटा मागे राहतो. पार्श्वभूमीवर त्यानंच तिच्यासाठी गायलेल्या अंगाईगीताचे सूर तरळत असतात - ‘सच्चा कोई सपना होता... मेरा कोई अपना होता... अनजाना सा, मगर कुछ पहचाना सा... हलका-फुलका शबनमी, रेशम से भी रेशमी... सुरमई अंखियों में नन्हा-मुन्ना एक सपना दे जा रे…’ अपघाताच्या धक्क्यानं स्मृती गमावून बसलेली स्नेहलता सुधारते खरी; पण तिला सुधारू पाहणाऱ्या सोमूला बसलेला धक्का तेवढाच जबर असतो. जवळपास चार दशकांपूर्वी येऊन गेलेला ‘सदमा’ आज लोकांना कितपत ‘ग्रेट’ वाटेल माहीत नाही. कथानकातले, हाताळणीतले कच्चे दुवे आता जाणवू शकतील; पण या चित्रपटाचा क्लायमॅक्स आजही तेवढाच हलवून सोडतो, यात शंका नाही.

(लेखक हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक व सुगम संगीताचे जाणकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com