बथ्थड व्यवस्थेचा बळी

कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर म्हणून सेवेत असलेला दीपांकर (पंकज कपूर) नोकरी सांभाळून गेली दहा वर्षं कुष्ठरोगावरची लस शोधण्यात गढलेला आहे.
बथ्थड व्यवस्थेचा बळी
Summary

कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर म्हणून सेवेत असलेला दीपांकर (पंकज कपूर) नोकरी सांभाळून गेली दहा वर्षं कुष्ठरोगावरची लस शोधण्यात गढलेला आहे.

‘जगातली दुसरी आणि भारतातली पहिलीच टेस्ट ट्यूब बेबी देणाऱ्‍या डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांना त्यांच्या शोधाचं ‘बक्षीस’ म्हणून कमालीची अवहेलना, अवमान, सरकारी समितीमार्फत चौकशी आणि शेवटी एका दुय्यम संस्थेत बदली यांसारख्या शिक्षा वाट्याला आल्या. जपानकडून व्याख्यानाचं निमंत्रण येऊनही पश्चिम बंगालच्या सरकारने त्यांना तिकडे जाण्यास परवानगी नाकारली. परिणामी वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षी या संशोधकाने आत्महत्या केली...’

‘अमेरिकेतल्या एका वैद्यक संस्थेत अलीकडेच झालेल्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत एका माणसाला डुकराचं हृदय यशस्वीपणे बसविण्यात आलं. भारतात २४ वर्षांपूर्वी अशीच शस्त्रक्रिया करू पाहणाऱ्‍या डॉ. धनीराम बरुआ यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. पुढे त्यांची सुटका झाली तरी त्यांच्यावरचा खटला अजून सुरूच आहे...’

शासकीय आणि सामाजिक अनास्थेचे बळी ठरलेल्या संशोधकांची ही प्रातिनिधिक उदाहरणं. प्रसिद्धी न मिळालेले असे आणखी कितीतरी बळी समाजाच्या सर्व थरांत आढळू शकतील.

‘एक डॉक्टर की मौत’ (१९९०) या तपन सिन्हा दिग्दर्शित चित्रपटात दाखविलेली एका संशोधक डॉक्टरची शोकांतिका याच प्रकारात मोडणारी. म्हटली तर काल्पनिक, म्हटली तर वास्तवाचं भीषण दर्शन घडविणारी. कुष्ठरोगावरची लस शोधण्यात आयुष्यातली दहा वर्षं घालविणारा, वैयक्तिक जीवन विसरून केवळ आणि केवळ याच संशोधनाला आपलं जीवितकार्य मानणारा आणि त्याबदल्यात शासन आणि समाज यांच्याकडून अनास्था, अवहेलना व अवमान वाट्याला आलेला डॉ. दीपांकर रॉय हा या शोकांतिकेचा नायक.

कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर म्हणून सेवेत असलेला दीपांकर (पंकज कपूर) नोकरी सांभाळून गेली दहा वर्षं कुष्ठरोगावरची लस शोधण्यात गढलेला आहे. घरातल्याच एका खोलीत त्याने स्वतःची प्रयोगशाळा तयार केली आहे. हे संशोधन प्राण्यांवर करायचं म्हणून त्याने प्रयोगशाळेत उंदीरही पाळले आहेत. त्यांची देखभाल तो जिवापाड करतो आहे. पत्नी सीमाची (शबाना आझमी) त्याला सर्वतोपरी साथ असली, तरी तो स्वतःच्या आरोग्याकडे, जेवण-खाण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ती वैतागलेली असते. यावरून दोघांमध्ये सतत कुरबुरी, धुसफूस सुरू असते. हे असं असूनही सीमाचा त्याला पूर्ण पाठिंबा असतो. रात्री उशिरापर्यंत जागून संशोधन करणारा, छोट्याछोट्या कारणांवरून चिडणारा, लोकांशी उर्मटपणे वागणारा हा ‘विक्षिप्त’ नवरा तिला प्रिय असतो. कारण त्याच्या बुद्धिमत्तेवर तिचा पूर्ण विश्वास असतो. त्याला प्रयोगशाळेतली सामग्री विकत घेता यावी म्हणून तिने स्वतःचे दागिने विकलेले असतात. याखेरीज तिने स्वतःला मूल होऊ दिलेलं नसतं. यामागे त्यागाबिगाची भावना नसते, तर मूल सांभाळणं ही केवळ स्त्रीची नव्हे, तर पुरुषाचीदेखील जबाबदारी आहे आणि दीपांकर त्यात सपशेल अपयशी ठरेल, याची तिला साधार भीती असते.

घरातून बऱ्‍यापैकी आश्वासक वातावरण असताना सार्वजनिक जीवनात मात्र दीपांकरला अज्ञान, अनास्था, क्षुद्र हेवेदावे, राजकारण यांचा सामना करावा लागतो. कॉलेजमधला स्टाफ आणि वरिष्ठ यांच्याकडून त्याला कायम हेटाळणी वाट्याला येत असते. हा अनुभव सार्वत्रिक असला तरी हे केवळ आपल्याच वाट्याला का यावं, हा प्रश्न त्याला छळत असतो. एका बाजूला हे, तर विज्ञानात रस आणि आस्था असलेला तरुण पत्रकार अमूल्य (इरफान खान) आणि डॉ. कुंडू (अनिल चटर्जी) अशा मोजक्या व्यक्तींना त्याच्याविषयी आपुलकी असते. दीपांकरला प्रसिद्धीचा सोस नसतो, उलट तिटकाराच असतो. तरीदेखील दहा वर्षांच्या अथक श्रमानंतर त्याचं संशोधन यशस्वी होतं आणि कुष्ठरोगावरची लस निर्माण झाल्याची बातमी टीव्ही, वृत्तपत्रांमध्ये त्याच्या नावासकट येते. इथून सुरू होतो त्याच्या सत्त्वपरीक्षेचा काळ. सरकारी नोकरीत असताना परवानगी न घेता संशोधन करणं, त्याला प्रसिद्धी देणं या ‘गैरकृत्या’बद्दल त्याला खुलासा मागण्यात येतो. दीपांकर सडेतोडपणे अधिकाऱ्‍यांना त्यांची जागा दाखवून देतो. यातून त्याचे शत्रू आणखी वाढतात. त्याच्या संशोधनातल्या एक-दोन बाबींचा विपर्यास करून त्याची खिल्ली उडविण्यात येते. मुळात हे संशोधनच बोगस असून, कुष्ठरोगावर इलाज होऊच शकत नाही, अशी भूमिका घेणारे महाभाग निघतात; तर काही दुढ्ढाचाऱ्‍यांना त्याच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातली आपली प्रतिष्ठा धोक्यात येईल अशी भीती वाटते. काहीजण निव्वळ मत्सरापोटी त्याला विरोध करतात. काही तरुण विद्यार्थी त्याचं व्याख्यान आयोजित करतात.

त्या ठिकाणीही हुल्लडबाजी करत त्याचं भाषण उधळून लावलं जातं. दीपांकर या सर्वांना पुरून उरतो. शेवटी सरकारी अधिकारी आकसाने कोलकात्यापासून दूर एका छोट्या गावातल्या इस्पितळात त्याची बदली करतात. नाईलाजाने दीपांकर तिथं रुजू होतो; मात्र पत्नी, घरातली प्रयोगशाळा, संशोधनाचं लेखन यांना मुकावं लागल्याने तो निराश होतो. लंडनच्या जॉन अँडर्सन फाउंडेशनकडून त्याला आलेलं आमंत्रण त्याचे वरिष्ठ अधिकारी दडवून ठेवतात. अखेर फाउंडेशनची महिला प्रतिनिधी दिपांकरच्या बदलीच्या गावी जाऊन त्याला भेटते आणि त्याच्या संशोधनाविषयी माहिती घेऊन जाते. उद्या ही बातमी फुटली तर प्रकरण अंगाशी येईल या भीतीपोटी दिपांकरची पुन्हा कोलकात्याला बदली केली जाते. मात्र आता त्याच्यामागे चौकशी समितीचं शुक्लकाष्ट लावलं जातं. दिपांकर त्याला तयार होतो आणि चौकशी समितीच्या सर्व आक्षेपांना उत्तरं देत सदस्यांच्याच अकलेचे वाभाडे काढतो.

आपल्यापैकी कितीजणांना मायक्रोबायोलॉजी, सेल्युलर बायोलॉजी माहीत आहे? मुळात तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्हाला तर कुष्ठरोगाच्या औषधांची तरी माहिती आहे का? तो प्रश्नांची सरबत्ती करतो. अर्थात त्याचा हा सात्विक संताप `उद्धटपणा’त मोडत असल्यानं समिती त्याचे सर्व खुलासे फेटाळते. जॉन अँडर्सन फाउंडेशनकडून आपल्याला निमंत्रण आलं असून तिथं शोधनिबंध वाचण्याची परवानगी मिळावी ही त्याची विनंतीदेखील `विदेशात भारताची बदनामी होऊ दिली जाणार नाही’ या कारणास्तव फेटाळली जाते. `याचा अर्थ मला इथंच संपविण्याचा तुमचा डाव आहे.

वास्तविक तुमच्यातली एकही व्यक्ती माझ्याशी वाद घालू शकत नाही, पण तुमच्या पद्धतीनं मी लढू शकत नाही. मी कबूल करतो की, मी कोणतीही लस बनवलेली नाही’, असं म्हणत दिपांकर चौकशी समितीसमोर पराभव मान्य करतो.

मोडून पडलेला दिपांकर घरी परत येतो. सीमा त्याला नोकरी सोडण्याचा सल्ला देते. त्यानं आपला शोधनिबंध फाऊंडेशनकडे पाठवून द्यावा असं डॉ. कुंडू सुचवतात. त्याच वेळी पत्रकार अमूल्य एका वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेली बातमी वाचून दाखवितो. विदेशातल्या दोन शास्त्रज्ञांनी कुष्ठरोगावरची लस शोधून काढल्याची ती बातमी असते. त्यात नमूद केलेल्या संशोधनाचे तपशील दिपांकरच्या शोधाशी मिळतेजुळते असतात. सीमा हे ऐकून सुन्न होते. दिपांकर शांतपणे ऐकत राहतो. बातमीतला अधिक तपशील अमूल्य वाचून दाखवितो, `कुष्ठरोगावरील लस शोधल्याचा एक दावा भारतातूनही करण्यात आला होता. पण त्यासंबंधीची कागदपत्रं मिळू शकली नाहीत. याशिवाय तेथील शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि आरोग्य खाते यांच्यात याबाबत एकमत आढळून आले नाही...’

रात्री अचानक जागी झालेली सीमा शेजारी दिपांकर दिसत नाही म्हणून प्रयोगशाळेत पाहायला जाते, तेव्हा तिथलं दृश्य बघून ती स्तंभित होते. सगळी उंदरं टेबलावर मरून पडलेली असतात. शेजारी दिपांकर शून्यात नजर लावून बसलेला. `मला त्यांना मारून टाकावं लागलं सीमा. अन्य कोणताही उपाय नव्हता. बिचारे कुष्ठरोगानं तडफडत होते...’ तो थंडपणे सांगतो.

दुसर्‍या दिवशी डॉ. कुंडू शुभसमाचार घेऊन दिपांकरकडे येतात. जॉन अँडर्सन फाउंडेशनच्या एमिलीनं दिपांकरला एकत्रित काम करण्यासाठी आमंत्रित केलेलं असतं. पत्र गहाळ होऊ नये यासाठी फाउंडेशननं ते डॉ. कुंडू यांच्या पत्त्यावर धाडलेलं असतं. `शेवटी माझं संशोधन चुकीचं नव्हतं तर...’ म्हणत दिपांकर विषादानं हसतो. पुढच्या दृश्यात दिपांकरला घेऊन विमान अवकाशात झेपावत असताना चित्रपट संपतो.

दिपांकरच्या भूमिकेतला पंकज कपूरचा अभिनय हा मनाला समृद्ध करणारा अनुभव आहे. त्याच्या अभिनयानं चित्रपटातला एकेक प्रसंग अक्षरशः उजळून निघतो. विशेषतः चौकशी समितीच्या प्रसंगात तर त्यानं कमाल केलीय. सीमाच्या भूमिकेत त्याला लाभलेली शबानाची साथही खूप मोलाची.

प्रख्यात बंगाली लेखक रमापद चौधरी यांच्या `अभिमन्यू’ या कथेवर स्वतः तपन सिन्हा यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. मूळ कथेचा शेवट कसा होता हे कळायला मार्ग नाही. चित्रपटाच्या शीर्षकावरून, नायक शेवटी आत्महत्या तर करणार नाही ना, अशी शंका प्रेक्षकांच्या मनात येणं स्वाभाविक होतं. पण तसं घडत नाही. `एनएफडीसी’ या सरकारी संस्थेची निर्मिती असल्यानं शेवट सकारात्मक दाखवावा अशी सूचना दिग्दर्शकाला केली असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार व हिंदी -मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com