esakal | Environment | काळ आपल्या बाजूने नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Air Pollution
काळ आपल्या बाजूने नाही!

काळ आपल्या बाजूने नाही!

sakal_logo
By
सुनीता नारायण saptrang@esakal.com

भारतात तीन दशकांपूर्वी आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली, तेव्हापासूनच आपल्याला आर्थिक प्रगतीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना होतीच. याचं कारण सरळ आहे. प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशात साहजिकच नैसर्गिक स्रोतांचा वापर अधिक होणार आणि हवा आणि जलप्रदुषणात भर पडणार. हे माहीत असण्याचं प्रमुख कारण म्हणजे आधीपासूनच श्रीमंत असलेल्या, आर्थिक उदारीकरणाचं धोरण आणि मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना हे कळून चुकलं होतं, की अधिक प्रदूषण करणाऱ्या आणि श्रमकेंद्रित उद्योगांच्या निर्यातीतच आपला अधिक फायदा आहे. १९९०च्या दशकाच्या मध्यावर मात्र सर्वांनाच पहिला धक्का बसला. दिल्लीची हवा अचानक खूप प्रदूषित आणि धुरकट झाली होती. वाहनसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे आपल्यावर ही वेळ आली. त्यानंतरच्या दोन दशकांत आपल्या जमीन, पाणी, हवा आणि अन्नाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाचे आपण साक्षीदार होतो. आणि त्यामुळे आरोग्यावर दिसून येणारे घातक परिणामसुद्धा अनुभवत होतो.

आर्थिक प्रगतीचाच हा परिपाक, हेही आपण जाणून होतो. शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचा तोल सांभाळण्याच्या मुद्द्यावरून वादविवाद, संघर्ष होतच होते; परंतु यासाठी ज्यांनी ठोस निर्णय घ्यायला हवेत, त्या सार्वजनिक संस्थाच दुर्बल आणि असहाय असल्यामुळे यावर कोणताही उपाय निघत नव्हता.

सर्वसमावेशक विकास

या ३० वर्षांनी आपल्याला अणखी एक गोष्ट लक्षात आणून दिली आहे, ती म्हणजे शाश्वत विकास तोपर्यंत शक्य नाही, जोपर्यंत तो सर्वांना परवडण्याजोगा आणि सर्वसमावेशक नाही. जोपर्यंत स्वच्छता सुविधा या स्वस्त आणि सर्वांपर्यंत पोचणाऱ्या नाहीत, तोपर्यंत नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होणार नाहीत. आपली वाहतूक व्यवस्था सुधारेपर्यंत आपल्याला स्वच्छ निळ्या आकाशाचा आणि मोकळ्या हवेचा उपभोग घेता येणार नाही. दोष आपल्या वाहनांपेक्षा वाहतूक व्यवस्थेत अधिक आहे.

हवामान बदलाच्या समस्येशी लढताना झाडं, पाणी ही पर्यावरणीय संपत्तीच आपल्याला तारणार आहे, हेही आता आपल्या लक्षात येतंय. आपल्याला आपला विकास सर्वसमावेशक करायचा आहे, जो काही निवडक लोकांसाठी फायदेशीर न ठरता सगळ्यांचे हित करणारा असेल. आता हे पाऊल सवडी, सोयीने उचलण्याजोगं राहिलेलं नाही, तर ती अत्यावश्यक गरज बनली आहे.

आज जणू काही जग पुन्हा होतं तिथेच येऊन एक वर्तुळ पूर्ण करत आहे. मुक्त व्यापार आणि उदारीकरण हे आता संरक्षणवादाकडे झुकत आहे. जागतिक व्यापारानं अनेक बाबतीतली जागतिक समीकरणं बदलून टाकली आहेत. चीनने तर जागतिक व्यापारात ‘न भूतो न भविष्यती’ अशी मुसंडी मारली आहे. जागतिक व्यापार संघटनेत चीनला सहभागी करून घेतल्यानंतरचे हे परिणाम. स्वस्त श्रमशक्ती आणि पर्यावरणीय किंवा सामाजिक आरोग्यासाठीचे कोणतेही निर्बंध स्वतःवर न घालून घेणं हे त्यांचं ‘ट्रम्प कार्ड’ होतं. बाकी सर्व देश या स्पर्धेत अगदी तळाशीच होते. पाश्चिमात्त्य अर्थव्यवस्थांनीच हे जागतिक व्यापाराचं विशिष्ट स्वरूप झुगारून दिलं आणि आता तेच त्यांना परत मिळवायचं आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

जागतिक व्यापार युद्धात आज चीन व अमेरिका हे दोन बडे देश परस्परांविरुद्ध उभे ठाकले आहेत. हवामान बदल आणि पर्यावरणीय सुरक्षा यावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. आज विकासाचे एखादे अभिनव प्रारूप राबवणारा देश जागतिक नेतृत्व करण्यासाठी गरजेचा आहे. पण अधिकाधिक आर्थिक प्रगती, अधिकाधिक हरितवायू उत्सर्जन आणि अधिकाधिक उत्पादन करणारा देश म्हणजेच विकसित देश ही व्याख्या बनलेली आहे. हे सर्व असूनही चीन नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या बाता करत आहे. हरितवायू उत्सर्जन कमी करू बघणाऱ्या सर्व उद्योगांना चीन आपल्या मुठीत ठेवून आहे. सौरऊर्जेपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत. २०६० पर्यंत आपला देश शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश असेल, (नेट झिरो) असंही ध्येय त्यानं ठेवलं आहे. हे म्हणताना कोळसा ऊर्जेवरील त्यांच्या अर्थव्यवस्थेचं अवलंबित्व कायम आहे.

पण हा मुद्दा काही केवळ चीनपुरता मर्यादित नाही, तर चीन आणि अमेरिकेमध्ये चालू असलेल्या तीव्र स्पर्धेचा आहे. यामुळे अन्य देशांना कोणाची ना कोणाची बाजू घेऊन स्पर्धेत उतरणं भाग आहे. आणि नेतृत्व करण्यासाठी आर्थिक प्रगती, अधिक उत्पादनक्षमता, अधिक उपभोग, अधिक व्यापार आणि उदीम हे गरजेचं आहे, हे आता सगळ्यांनाच कळून चुकलं आहे. आणि जुन्याच वाटेवर चालण्यासाठी हे नवं स्पष्टीकरण असू शकतं. आणि त्यामुळेच ‘ब्राऊन अजेंडा’चा पुन्हा उदय होण्याची शक्यता आहे. आज जग हवामान बदल आणि परिसंस्थांच्या सुरक्षेवर बोलत असलं, तरीही. आणि केवळ भारतातच नाही, तर पूर्ण जगभरात हेच होण्याची भीती आहे. एक फरक मात्र असेल. तो म्हणजे, गेल्या ३० वर्षांत केलेल्या सर्व चुका अशाच रेटून नेता आल्या. पण आता पुढील ३० वर्षे एवढी सोपी नाहीत. स्पर्धा काळाशी आहे. आणि तो आपल्या बाजूने नाही !

(सदराच्या लेखिका ‘सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हार्यनमेंट’ च्या प्रमुख आहेत. )

(अनुवाद : तेजसी आगाशे)

loading image
go to top