esakal | जलविवेकी अर्थव्यवस्थेची ‘फळे’
sakal

बोलून बातमी शोधा

Fruit

जलविवेकी अर्थव्यवस्थेची ‘फळे’

sakal_logo
By
सुनीता नारायण saptrang@esakal.com

आत्ता बसल्या बसल्या मी सहज बघते आहे, पेर फळाच्या झाडाकडे. हे झाड फळांच्या ओझ्याने अगदी जमिनीलगत वाकलं आहे. पन्नास वर्षांच्या या जुन्या बागेतील प्रत्येक झाडाचं किमान ५०-१०० किलो तरी वजन वाढतंच फळांच्या बहराच्या काळात ! मग माझी नजर जाते पेरू, प्लम्स (आलूबुखार),किनो, पीच अशा रसयुक्त फळांकडे. आणि हो, खजुराच्या झाडाकडेही. नाही नाही, मी काही इस्राईलला गेले नव्हते.

पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या फाझिलका जिल्ह्यातल्या अबोहार इथं मी गेले होते. आणि त्यानंतर राजस्थानमधील श्री गंगानगर या जिल्ह्यात गेले. राजस्थान कालवा याच प्रदेशात आहे. हाच कालवा ‘इंदिरा गांधी नहर’ म्हणूनही ओळखला जातो. नुसतं पाणी हे संपूर्ण जमिनीचं स्वरूप कसं बदलून टाकू शकतं, हे बघणं खूप आश्चर्यकारक आहे. राजस्थानमधील या वाळवंटी प्रदेशातली हिरवाई टिकवण्यासाठी ज्यांनी आपलं वैज्ञानिक ज्ञान वापरून, प्रसंगी धोका पत्करून मोठं योगदान दिलं, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. इंदिरा गांधी नहर जवळजवळ ४०० किलोमीटर दूरपर्यंत पसरलेला आहे. सतलज आणि बियास नद्यांचं पाणी याच्याद्वारे बिकानेर आणि जैसलमेरपर्यंत येतं. पण पाण्याचा हा वाहता प्रवास जसजसा लांबत जातो, तशी पाण्याची मागणीही वाढते.

समृद्धीबरोबरच पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे होणारे हा कालवा संघर्षही घेऊन येतो.पण त्यासाठी ‘जलविवेकी’ (वॉटर प्रुडन्ट) अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्याऐवजी हा कालवा जिथपर्यंत पोचतो त्या प्रदेशात भाताचं पीक घेतलं जात आहे. शेतीच्या वैविध्य आणि विस्ताराबाबत नुसतं बोललं जातं; पण गहू-तांदुळाच्या पिकांमधून आपण बाहेरच येत नाही.‘जलविवेकी अर्थव्यवस्था’ तयार करण्यासाठी तशी पूरक पिकं घेणंही गरजेचं आहे. पण सध्या तरी हे होताना दिसत नाही. मग या इतक्या मौल्यवान पाण्याचा जास्तीत जास्त आणि सुयोग्य वापर कसा करता येईल?

कृषी वनीकरणाची भूमिका यात महत्त्वाची आहे. हॉर्टीकल्चर बागायती शेतीमुळेदेखील हे साध्य होऊ शकतं. यामुळे सकस शेती करता येते, तसंच प्रभावी ठिबकसिंचनाच्या साहाय्याने पाण्याचा अतिवापर टाळता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आर्थिक प्रगती आणि रोजगारनिर्मितीही करणं सुलभ होऊ शकतं. फळझाडांमध्ये प्रथिनयुक्त रस तर असतोच; पण औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधनं तयार करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. त्यानंतर येतो खजूर. हे झाड क्षारयुक्त भूजलावरही वाढतं, त्याला कालव्याच्या पाण्याची गरज नसते.

परंतु माझ्या या दौऱ्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली- ती म्हणजे ही `फलक्रांती’. म्हणजे अजूनही एक काल्पनिकाच राहिली आहे. मी सर्वांत पहिली भेट दिली ती पंजाब कृषी विद्यापीठाच्या अबोहार येथील ‘डॉ.जे सी बक्षी रिजनल रिसर्च सेंटर’ला. तिथे फळझाडांची उत्पादकता कशी वाढवता आणि टिकवून ठेवता येईल, यावर वैज्ञानिक अहोरात्र संशोधन आणि मेहनत करत आहेत. फळझाडांच्या क्षारयुक्त आणि कीडरोधक प्रजाती शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी ते ‘टिश्यू कल्चर’चा वापर करत आहेत. येथे वाळवंटी भागांत वाढणारी फळांनी गच्च बहरलेली पेरची झाडं बघून आपण अचंबित होतो. याच ‘टिश्यू कल्चर’चा वापर करून वाढवलेलं खजुराचं झाडही मी पाहिलं. याच्या प्रत्येक रोपाची किंमत सुमारे ४ हजार ५०० रुपये आहे, आणि तरी शेतकऱ्यांना ते खरेदी करण्यास २ वर्षं थांबावं लागतं. राजस्थानात या झाडांना एवढी मागणी आहे, की शेवटी राज्य सरकारनं एक शेतकरी एकावेळी किती रोपे घेऊ शकतो, यावर बंधनं आणली. त्यानंतर मी भेट दिली ती स्वर्गीय कर्तारसिंग नरुला यांच्या शेताला. नरुला यांनी १९६० मध्ये श्री गंगानगरच्या दुष्काळी कोरड्या भागांत ‘किनो’ हे फळ पहिल्यांदा आणलं. तेव्हा कालवे काढण्याची कल्पना नवीनच होती. असं म्हणतात, की नरुला यांचा हा प्रयोग तत्कालिन पंतप्रधान जवारहरलाल नेहरूंना इतका आवडला होता, नरुला यांच्या ल्यालपूरच्या शेताला भेट द्यायची त्यांची खूप इच्छा होती. परंतु राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या निधनाची बातमी आल्यामुळे दौरा अर्धवट सोडून त्यांना परत जावं लागलं. आज नरुला यांचं हे शेत त्यांचं कुटुंब सक्षमरीत्या सांभाळत आहे. आज त्यांच्या शेतात तुम्ही नाव घ्याल ते लिंबूवर्गीय फळ बघायला मिळतं. साधारण याच काळात मुरब्बी राजकारणी बलराम जाखड यांनीही अबोहार येथे किनो फळांची शेती सुरू केली.

या सर्व लोकांना एक दूरदृष्टी होती. फक्त जास्तीतजास्त पाणी खर्ची पाडणाऱ्या भातशेतीऐवजी त्यांनी अधिक सकस शेती करता येईल, अशी फळझाडांची पिकं घेतली. यालाच ‘जलविवेकी’ दृष्टी म्हणता येईल. शाश्वत उत्पादकता निर्माण करण्यावर या सगळ्यांचा भर होता, कारण त्याचे फायदे त्यांना कळले होते. आज जाखड यांची शेती त्यांचे नातू, आणि शेतकरी नेते अजय जाखड सांभाळतात. उत्तम आणि विकसित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर लिंबूवर्गीय फळपिकांची निर्मिती कशी करता येते, हे इथे बघायला मिळालं. जाखड नर्सरी वर्षाला सुमारे दहा हजार रोपांचं उत्पादन करते, आणि मागणी त्याहूनही जास्त आहे.

बदलाला आणि प्रगतीला आपल्याला या क्षेत्रात भरपूर वाव आहे. आपल्याला माहीत आहे की आज जगाला नैसर्गिक उपायांची आणि पद्धतींची अधिक गरज आहे. नैसर्गिक स्रोतांच्या शाश्वत विकास आणि वापरावर आधारित समृद्धी आपल्याला निर्माण करायची आहे. कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून आपल्याला वृक्षाधारित संस्कृती निर्माण करायची आहे. परंतु तरीही अनेक अनुत्तरित प्रश्न मला भेडसावत आहेत. या फलक्रांतीसाठी आवश्यक असणारी एकजूट आणि इच्छाशक्ती कुठेतरी हरवली आहे. फळझाडं तर बघायला मिळाली, परंतु उत्पादनातली गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न कुठेच दिसत नाहीत. रस उत्पादनातही ते दिसून येत नाहीत. दुर्दैवानं अशी फलाधारित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कोणतंच ठोस पाऊल उचललं जात नाहीये. उलट, या कोरड्या वाळवंटी भागांत भातशेतीचंच प्रस्थ अधिक वाढताना दिसून येत आहे. शिवाय शाश्वत विकासाचा प्रश्न आहेच. आपल्याला माहीत आहे, की विविध रसायने आणि कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरून फळझाडं वाढवली जातात. यामुळे जगभरातल्या फळझाडं वाढवणाऱ्या भागांमध्ये ही प्रदूषकं निर्माण होण्याची समस्या कायम आहे. मग यासाठी अजून वेगळ्याप्रकारे काय करता येईल? हे प्रश्न जर बाजूला ठेवले, तर अबोहार आणि श्री गंगानगरच्या या भागांना मी दिलेली भेट ही माझ्यासाठी अविस्मरणीय आणि भविष्यातील सकारात्मक बदलांची माझ्या मनात आशा निर्माण करणारी ठरली. या दिशेनं आपली अर्थव्यवस्था जायला हवी आहे, जिथं शेतकरी, निसर्ग आणि पोषकद्रव्य या तीन घटकांना सर्वाधिक प्राधान्य असेल !

(सदराच्या लेखिका ‘सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायर्नमेंट’ च्या प्रमुख आहेत.)

(अनुवाद : तेजसी आगाशे)

loading image
go to top