माणूसपणाची नव्यानं ओळख

केंद्र सरकारनं मागच्याच वर्षी, कोरोना महासाथीला आटोक्यात आणण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता.
Mob
MobSaptarang

केंद्र सरकारनं मागच्याच वर्षी, कोरोना महासाथीला आटोक्यात आणण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. अगदी अनपेक्षितरीत्या मानवी जीवन ठप्प झालं, सर्व दैनंदिन कामांवरही बंधनं आली. रस्त्यांवर रहदारीचा आवाज नाही, माणसांची गर्दी नाही. जणू काही अख्खं जग शांत झालं. जे रोजच्या शहराच्या गोंगाटामध्ये जगत नाहीत, त्यांना ही शांतता म्हणजे नक्की काय होतं, हे समजणार नाही कदाचित. ही शांतता जणू ‘बधीर’ करणारी होती!

त्यानंतर एक वर्षाने हा आवाज पुन्हा साधारणपणे पूर्ववत झाला. पण हे जेव्हा घडलं, तेव्हा अनेकजण स्वतःला आणि कुटुंबाला जगवण्यासाठी संघर्ष करत होते. कोरोनानं अक्षरशः आपल्याला थकवलं. हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही संसर्ग होतच राहिला, रुग्ण वाढतच राहिले. लस आली, पुन्हा एकदा संपूर्ण टाळेबंदीसारख्या उपाययोजना करून झाल्या; पण परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली. लस उपलब्ध झाली तरीही जग सुटकेचा निःश्वास टाकू शकलेलं नाही. उलट चिंता आणि भीती वाढते आहे. आता आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. या आपत्तीने आपल्याला काय शिकवलं?

सामाजिकीकरण कमी झाल्याचा आपल्याला खरंच फायदा झाला की तोटा? आपण यामुळे अधिक चांगले माणूस बनलो, की परिस्थिती अजूनच बिघडली? यासारख्या अजून काही आपत्ती भविष्यात कोसळल्या तर आपण कितपत तयार आहोत? एखादी जागतिक आपत्ती कोसळलीच भविष्यात तर आपण तिला तोंड द्यायला पूर्वीपेक्षा आता सक्षम झालो आहोत का ?

मला वाटतं, नाही. परंतु मला असंही म्हणायचं नाही, की गेल्या वर्षात आपण काहीच शिकलो नाही किंवा अभिमान वाटावा, असं काहीही केलं नाही. उलट खूप काही शिकलोय आपण. आज मागे वळून पाहताना आपल्या डॉक्टर, परिचारिका, अन्य आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, महापालिका कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी केलेले अथक आणि निःस्वार्थ परिश्रम पाहून आपला ऊर अभिमानाने भरून यायला हवा. या सर्वांनी आघाडीला राहून कोरोनाची सर्वाधिक झळ सोसली. त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. या सर्वांचे आपण ऋणी आहोत. मन कृतज्ञतेने भरून येतं.

आपल्या वैज्ञानिकांनी एवढ्या कमी कालावधीत या रोगावरची लस विकसित केली, ही कौतुकास्पद कामगिरी आहे. हा म्हणजे मानवी बुद्धिमत्ता, चिकाटी आणि सृजनशीलतेचा परिपाक आहे, हे अमान्य करताच येणार नाही. जरी आपण आपल्या स्थलांतरित मजूर बांधवांसाठी काहीच करू शकलो नाही, तरी त्यांची वेदना आपल्याला जाणवली. अनेक स्वप्न डोळ्यात घेऊन ते ज्या शहरांमध्ये आले, त्या शहरांनीच जणू त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांचा त्रागा, भीती, अस्वस्थता यांच्या प्रतिमा आपल्या मनावर कोरल्या गेलेल्या आहेत. त्या अजूनही अस्वस्थ करतात.

त्यांच्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न झाले, त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी, त्यांचा ताप सुसह्य करण्यासाठी अनेक पातळ्यांवरून प्रयत्न झाले. आपण माणुसकी आणि सहानुभूती ही दोन अत्यंत महत्त्वाची मूल्ये अजून विसरलेलो नाही, याचेच हे द्योतक.

पण तरीही, गेल्या वर्षी झालेली पडझड आणि तोटे आपल्याला अजून पुढे जाऊनही जाणवतील. या महासाथीचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल, तर तो जगभरातल्या लहान मुलांना. त्यांच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेलाच खीळ बसली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अनेकांचे पालक जे शाळेची फीदेखील भरू शकत नव्हते, ती मुले आता शाळेत मिळणाऱ्या मधल्या वेळच्या जेवणालाही मुकली. हातात असलेल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ अनेक पालकांवर आली, आणि या मुलांना खूप प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. लहान मुलं ही पटकन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. असं असलं, तरीही जेव्हा जीवनमरणाचाच प्रश्न येतो आणि दैनंदिन पातळीवरच वेगवेगळे संघर्ष करावे लागतात, तेव्हा मात्र परिस्थिती असह्य होते. त्यांचं सगळं चिमुकलं जगच या महासाथीने हादरवून टाकलं. लवकरात लवकर त्यांचं भावविश्व पूर्ववत व्हावं आणि त्यांचं प्रौढपण तरी सुकर व्हावं यासाठी प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे.

उरलेल्या आपणा सर्वांसाठी मी असं म्हणेन, की हे वर्ष आपल्याला कडूगोड अनुभवांनी भरलेलं असं गेलं. आपली घरं आणि कुटुंब आपल्याला जी ऊब देत होती ( ज्यांना पुरेशी जागा उपलब्ध आहे त्यांच्याबद्दल इथे बोलत आहे) तीही पुरेशी पडत नव्हती. रस्त्यांवर आवाज नाही, मित्र आणि सहकाऱ्यांशी पूर्वीसारखी बोलाचाल नाही म्हणून आपल्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. जरी आपण नवी कौशल्ये आत्मसात केली, आपापल्या ‘स्पेस’मध्ये काम करण्यात आनंद शोधला आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जग प्रदूषित न करताही एकमेकांशी जोडलेले राहिलो तरीही आपण आपलं जुनं गोंधळाचं जीवन सोडायला अजूनही तयार नाही.

कोरोनाचा संपूर्ण समाजावर झालेला परिणाम थक्क करणारा आहे. हे मी लिहीत असताना, जगभरातल्या कोरोनाबाधितांचा आकडा १२ कोटी ४० लाखांवर पोचला आहे आणि यातले पाव टक्का रुग्ण तरी एकट्या अमेरिकेतच आहेत. भारतात मात्र एक ठाम समजूत झालेली दिसून येत आहे, की हा रोग म्हणजे श्रीमंतांचा आणि त्यांनाच परवडणारा आहे. आपल्या देशाने या विषाणूला तोंड देण्यासाठी उचललेली पावले कितीही तोटे झाले असले, तरीदेखील योग्य होती. लॉकडाऊनमुळे भीषणरीत्या वाढणारी रुग्णसंख्या थोडीतरी आटोक्यात आली. संसर्ग थोडा नियंत्रणात आला. देशाच्या कानाकोपऱ्यात लस आता पोचते आहे. अनेक श्रीमंत देशही अजून लसीकरणाची योग्य व्यवस्था बसवण्यासाठी धडपडत आहेत, हे लक्षात घेतलं तर याचं महत्त्व कळतं.

गरीबांचं जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी व्यापक प्रयत्न होणं मात्र अतिशय गरजेचं आहे. आपले नेते या कोरोना काळात काही मूलभूतच नियमांची पायमल्ली करत नाहीत ना, हे बघणंही आवश्यक आहे. आज लोक नियम धुडकावून लावत आहेत, दुर्लक्ष करताहेत त्याच एक मोठं कारण नेते आणि राजकारणी मंडळींचं प्रचारसभांदरम्यानचे वर्तन हेही आहे. लोक जर हेच बघत असतील, तर ते का नियम पाळतील?

काहीही असलं, तरी हे वर्ष खूप यातना देणारं; पण मनात नवीन आशा निर्माण करणारेही ठरलं. आशा हीच मानवजातीला जगवते. हा गुण आपण विसरलेलो नाही. आत्ताही नाही, कधीच नाही.

(लेखिका सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायर्न-मेंटच्या प्रमुख आणि पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)

(अनुवाद - तेजसी आगाशे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com