हिवाळा वाटे उदास, उदास !

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा गुदमरवून टाकणारी आणि कडाक्याची थंडी पडली आहे. दरवर्षी प्रदूषण वाढतंच आहे. या पुनरावृत्तीमुळे आपल्या पदरी निराशाच पडते आहे.
Pollution
PollutionSakal
Summary

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा गुदमरवून टाकणारी आणि कडाक्याची थंडी पडली आहे. दरवर्षी प्रदूषण वाढतंच आहे. या पुनरावृत्तीमुळे आपल्या पदरी निराशाच पडते आहे.

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा गुदमरवून टाकणारी आणि कडाक्याची थंडी पडली आहे. दरवर्षी प्रदूषण वाढतंच आहे. या पुनरावृत्तीमुळे आपल्या पदरी निराशाच पडते आहे. त्यात काहीही बदल नाही. कोणालाही याची पर्वा आहे, असंही दिसत नाही. परंतु, आपल्या मनातला हा सल आपल्याला स्वच्छ हवा मिळण्याचा आपला हक्क मिळवून देण्याच्या कामी यायला हवा. ही खंत अल्पजीवी ठरायला नको. यासाठी आता थेट कृतीची गरज आहे. एकमेकांवर दोषारोप करून मूळ मुद्द्यावरचे लक्ष फक्त विचलित होईल, याखेरीज काहीही साध्य होणार नाही आणि पुढचा हिवाळाही असाच जाईल.

म्हणून आता कालौघात पुढे जाताना, आपण तीन गोष्टी, किंवा प्रश्न म्हणू हवं तर लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला म्हणजे नोव्हेंबर हा नेहमी दिल्लीसाठी सर्वाधिक प्रदूषणाचा आणि गुदमरवणारा महिना का असतो? आणि याचं कारण काय? याला जबाबदार कोण? आपल्याला समस्येमागची परिस्थती नवीन नाही. दोन, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत काय केलं गेलं आहे आणि त्याचा काहीही फायदा का झाला नाही? तीन, प्रदूषकांच्या अशा विषारी वातावरणात आपल्याला श्वास घ्यावा लागू नये म्हणून काय करता येईल?

एक तर प्रदूषण स्थानिक पातळीवर होतंय की शेजारची राज्य याला कारणीभूत आहेत, हे समजण्यासाठी रॉकेट सायन्स येण्याची गरज नाही. अर्थात, ही दोन्ही कारणे एकाच वेळी असू शकतात. उदाहरणार्थ, या हिवाळ्याचंच उदाहरण घेऊ. दिवाळीच्या एक दिवस आधी ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ (सीएसई) मधील माझ्या सहकाऱ्यांनी हवेची गुणवत्ता पूर्वीपेक्षा चांगली असल्याची माहिती दिली. उशिरा झालेला पाऊस आणि वाऱ्याचा चांगला वेग ही त्यामागची कारणं आहेत, असं त्यांनी सांगितलं. मग दिवाळी जोरदार साजरी झाली, फटाके वाजवले गेले. वारे असेच वाहत राहिले असते, तर कदाचित या फटाक्यांमुळे झालेलं प्रदूषण किमान सहन करण्याजोगं ठरलं असतं. परंतु नेमक्या याच वेळी देशांत दोन चक्रीवादळं एकाच वेळी येऊन दाखल झाली होती. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात चक्रीवादळाच्या उलट दिशेने वाहणारे वारे निर्माण झाले. वाऱ्यामुळे दिवाळीतील प्रदूषणामुळे तयार झालेलं दूषित धुकं विखुरलं न जाता स्थानिक प्रदूषकांच्या जोडीनं ते हवेत साठत राहिलं. त्यानंतर शेजारच्या राज्यांमधून जंगलात लावलेल्या आगीमुळे येणारा धूरही हवेत मिसळला. पावसामुळे यावेळी शेतात कापणीही उशिरा झाली. गहू लावण्यासाठी आतुर असलेल्या शेतकऱ्यांनी लावणीसाठी आपलं शेत तयार करण्यासाठी एकाच वेळी, शेतात कचरा जाळला होता. त्यानं प्रदूषकांचं एक विषारी कॉकटेलच तयार झालं जणू ! त्यामुळे इथे आधी हे लक्षात घेतलं पाहिजे, की कोणताही एकच एक घटक या दूषित हवेसाठी पूर्णपणे जबाबदार नाही.

त्यामुळे त्याच्या टक्केवारीवरून वादविवाद करण्यात काही अर्थ नाही. आता, शहरातील वायू प्रदूषणाचे स्रोत काय आहेत? उत्सर्जन सूची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन प्रमुख अभ्यासशाखा आहेत. टक्केवारी वेगवेगळी असली, तरी वाहने, उद्योग आणि वीज प्रकल्प, आणि कचरा जाळल्यामुळे होणारा धूर आणि धूळ हेच मुख्य घटक स्रोत आहेत. हेदेखील स्पष्ट आहे, की उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या शेजारच्या जिल्ह्यांमधील प्रदूषकं दिल्लीत पसरतात. म्हणूनच प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांमध्ये परस्पर सहकार्याची गरज आहे. कृती आराखडा विकसित करण्यासाठी, आपल्याला या घटकस्त्रोतांची माहिती आवश्यक आहे.

दुसरं म्हणजे, काय केलं गेलं आहे आणि कोणताच उपाय यशस्वी का होत नाही? दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तसे बरेच प्रयत्न आत्तापर्यंत करण्यात आले आहेत. परंतु आता एका व्यापक आणि गतिमान, कृती योजनेची गरज आहे. यात प्रदूषणाच्या विशिष्ट स्त्रोतावर काम करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, वाहनांसंदर्भात नुकतेच तयार करण्यात आलेले नियम. जसे की, संकुचित नैसर्गिक वायूच्या (सीएनजी) संक्रमण, वाहन तंत्रज्ञान आणि इंधन ( बीएस-व्ही ) सुधारणा. ट्रकसारख्या प्रदूषण जास्त करणाऱ्या अवजड वाहनांवर ‘गर्दी कर’ आकारला जाईल, अशी व्यवस्था. आणि या अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी द्रुतगती मार्ग तयार करण्यात आले आहेत. याशिवाय सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी, मेट्रो रेल्वेचा चौथा टप्पा अंशतः मंजूर करण्यात आला असून, खासगी वाहतुकीची गरज कमी करण्यासाठी शेजारच्या शहरांना जोडण्यासाठी जलदगती रेल्वेची व्यवस्था होत आहे. दिल्लीतील शेवटचा कोळसा ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आला आहे; औद्योगिक क्षेत्रातही कोळशाचा वापर थांबत आहे.

मात्र शहरातील तथाकथित अनधिकृत भागात कोळशाचा वापर सुरूच आहे आणि शहराच्या हद्दीभोवती असलेल्या औद्योगिक भागात हजारो छोट्या बॉयलरमध्ये जाळला जात आहे यात शंका नाही. पुढच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांच्या जंत्रीमध्ये शिरण्याआधी आतापर्यंत जे काही केलं गेलं आहे, त्याचे परिणामही बघूया. गेल्या काही वर्षांत ‘समाधानकारक हवा’ असलेल्या दिवसांची संख्या वाढली आहे (२०१८ मध्ये १०१ वरून २०२० मध्ये १७४ पर्यंत ) आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अतिदूषित स्वरूपाची हवा असणाऱ्या दिवसांची संख्या कमी झाली आहे. (२०१८ मध्ये २८ वरून २०२० मध्ये २० दिवसांपर्यंत ). हे पुरेसे नाही, अर्थात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण किमान पुढे सरकतोय. आपली हवा स्वच्छ नाही; पण वर्षातले अनेक दिवस ती स्वच्छही असते. तथापि, प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणखी बरंच काही करणं आवश्यक आहे; जेणेकरून आपण पुन्हा सुरक्षितपणे श्वास घेऊ शकतो. वेगवान वाऱ्यांच्या मदतीशिवायही निरोगी राहण्याची आणि स्वतःला पुनरुज्जीवित करण्याची क्षमता हवेला आवश्यक आहे. अर्थात, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

(सदराच्या लेखिका ‘सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एन्व्हायर्न्मेंट’ च्या प्रमुख आणि पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)

(अनुवाद- तेजसी आगाशे )

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com