esakal | अपयशाची भीती - समज व गैरसमज 
sakal

बोलून बातमी शोधा

Fear

‘खरंच प्रयत्न न करता आपण कितीवेळा या अपयशाच्या भीतीमध्ये जगायचे? आणि चुकून अपयश आलेच, तर आपल्या जवळचे लोक आहेतच आपल्याला सांभाळून घ्यायला.’ अमेयसारखे आपण ही अपयशाची भीती बाळगून जगत असतो.

अपयशाची भीती - समज व गैरसमज 

sakal_logo
By
सुप्रिया पुजारी, लाईफ कोच

अमेय. आयुष्याच्या एका खडतर प्रवासामधून पदवीधर झालेला मुलगा. खूप कष्ट घेऊन तो एका खासगी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे. त्याची हुशारी, अनेक विषयातील सखोल माहिती घेण्याची कला, दुसऱ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणे असा त्याचा स्वभाव. दरवर्षी त्याच्या कामगिरीबद्दल त्याला बढतीची संधी मिळत होती. बढतीबद्दल एक अडथळा होता. तो म्हणजे पदव्युत्तर शिक्षण, ज्याची सोय व सुविधा कंपनीतर्फे करण्यात येणार होती. तो काही कारणास्तव ही संधी टाळत होता. त्याचे मित्र व घरातील लोक त्याच्या या निर्णयाने गोंधळून गेले. एक दिवस त्याच्या बॉसने या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्याला बोलावले. बराच काळ चर्चा केल्यानंतर अमेयला दोन पर्याय दिले गेले. एकतर पुढील वर्षात बढती घेणे किंवा आत्ता बदली स्वीकारणे. बदलीचा पर्याय स्वीकारणे शक्य नव्हते कारण नुकतेच त्याचे लग्न झाले होते व बायकोची नोकरी नवीन होती. त्याच्यासमोर बढतीशिवाय पर्याय राहिला नाही. तो स्वीकारला खरा, परंतु अमेय खूप अस्वस्थ झाला. एक दिवस त्याने याचा तोडगा काढायचे ठरविले. खूप काळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपल्यामध्ये एक भीती आहे. सखोल विचार केल्यामुळे त्याच्या लक्षात आले की बढतीसाठी कामगिरी बरोबरच पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. त्याचा पदवी मिळविण्याचा प्रवास खडतर होता. घरातून पाठिंबा नसल्याने सर्व शिक्षण स्वबळावर पूर्ण केले. ते पूर्ण करण्यात अनेक अडचणी आल्या, परिणामी अपयशाची भीती मनात बसली. ‘हेच अपयश पदव्युत्तर शिक्षणाच्या बाबतीतही येईल का?’ ही खरी भीती होती. ती त्याने त्याच्या बायकोसमोर व्यक्त केली. बायकोने अगदी सहजपणे उत्तर दिले, ‘एकदा अपयश आले म्हणून परत तसेच होईल असे नाही. आणि प्रयत्न केल्याशिवाय ही भीती जाणारही नाही.

अपयशाच्या भीतीने प्रयत्न न करणे योग्य नाही. अपयश आलेच तर काय होईल? एक अनुभव नक्की मिळेल.’ बायकोच्या या सहज बोलण्याने अमेयला एक नवीन दिशा मिळाली. त्याने स्वत-ला विचारले. ‘खरंच प्रयत्न न करता आपण कितीवेळा या अपयशाच्या भीतीमध्ये जगायचे? आणि चुकून अपयश आलेच, तर आपल्या जवळचे लोक आहेतच आपल्याला सांभाळून घ्यायला.’ अमेयसारखे आपण ही अपयशाची भीती बाळगून जगत असतो. ‘मला जमले नाही तर?’ किंवा ‘मी हरलो तर?’ हा विचार सतत येत असतो. मग तो एखादा निर्णय घ्यायचा असो वा एखादा विचार कृतीमध्ये आणायचा असो. अपयशाच्या भीतीने आपल्यामध्ये ‘मानसिक निष्क्रियता’ येते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अपयशाची भीती येणे स्वाभाविक आहे, परंतु एकदा आपल्याला ती भीती आहे व त्याचा उगम समजला की त्याला सामोरे जाऊन त्यावर मात करणे सोपे होते. 

या भीतीचे काही विशिष्ट समज-गैरसमज आहेत जे मुळापासून काढून टाकणे महत्त्वाचे आहे. 

गैरसमज १ - प्रयत्नांना फळ आले नाही, की ते ‘अपयशच’ असते. 
समज १ : एखादा प्रयत्न फसल्यास आपण त्याला ‘अपयश’ म्हणून लेबल लावतो. परंतु याला ‘अपयश’ म्हणावे की ‘परत प्रयत्न करण्याची संधी’ हे आपण ठरवावे. 

गैरसमज २. अपयशाची भीती येणे ‘चूक’ आहे. 
समज २ : अपयशाची भीती येणे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. ती आपल्यामध्ये आहे, हे लक्षात येताच त्यावर उपाय शोधणे अधिक उपयुक्त ठरते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गैरसमज ३ - अपयश हे कायमस्वरूपी आहे. 
समज ३ - ‘एकदा अपयश आले म्हणून कायम अपयशच येईल,’ हा विचार दिशाभूल करणारा आहे. एका अपयशामधून आपण काय शिकतो व त्याचे अंधानुकरण न करता नवीन दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास अपयश कायमचे टिकत नाही. 

गैरसमज ४ - अपयश येणे म्हणजे ‘एक पराभूत व्यक्ती’ म्हणून जगणे. 
समज ४ : एकदा अपयश आले की आपला स्वत-कडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो. आपणच स्वत-ला ‘एक पराभूत व्यक्ती’ असे संबोधतो. परिणामी आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपणच इतर लोकांना नकळत शिकवत असतो. 

या भीती बाबतीतले गैरसमज दूर करण्यासाठी, भीतीचा उगम व त्यावर उपाय आगामी लेखांमध्ये पाहू. लक्षात ठेवा, अपयशाची भीती येणार नाही, असे कधीच होणार नाही, परंतु तुमच्याकडे दोन मार्ग आहेत; स्वत-ला ओळखून अधिक विकसित करणे किंवा भूतकाळाचा बळी बनून राहणे. निर्णय तुमचा आहे! 

loading image
go to top