esakal | ध्येयापर्यंत पोचविणारे प्रगतिदर्शक म्हणजे नक्की काय?
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येयापर्यंत पोचविणारे प्रगतिदर्शक म्हणजे नक्की काय?

आयुष्यातील जवळपास प्रत्येक गोष्ट ध्येयाभोवती फिरत असते; ते आपल्या भविष्यातील सर्व योजना, आपल्या सर्व आशा, स्वप्ने आणि जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींचा दृष्टान्त देतात.

ध्येयापर्यंत पोचविणारे प्रगतिदर्शक म्हणजे नक्की काय?

sakal_logo
By
सुप्रिया पुजारी, लाइफ कोच

मागील लेखामध्ये आपण ध्येय कसे पूर्ण करायचे व त्याआधी ध्येयाचे ‘स्पष्ट रूप’ घेणे का महत्त्वाचे आहे, हे समजून घेतले. आज ध्येयाचे स्पष्ट रूप घेतले, तर उद्याचे ‘अस्पष्ट’ परिणाम व मार्ग ‘स्पष्ट’ होतील, याबद्दल शंका नाही. ध्येय आपल्या जीवनास दिशा देतात आणि दीर्घावधीसाठी प्रेरित राहण्यास मदत करतात. आयुष्यातील जवळपास प्रत्येक गोष्ट ध्येयाभोवती फिरत असते; ते आपल्या भविष्यातील सर्व योजना, आपल्या सर्व आशा, स्वप्ने आणि जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टींचा दृष्टान्त देतात. आता पुढील टप्पा म्हणजे ‘ध्येयपूर्तीचे नियोजन.’ ध्येय स्पष्ट झाल्यावर बरेच लोक कठोर परिश्रम करतात. परंतु, ते हवे तसे उपयुक्त ठरलेले दिसत नाहीत. योग्य नियोजन नसेल, तर दिशा चुकते आणि आपला वेळ, शक्ती व संसाधने वाया जातात. योग्य नियोजन तुम्हाला एक योग्य तसेच सर्व संसाधनांचा अनुकूल वापर करण्यास मदत करते. या नियोजनामध्ये अत्यंत महत्त्वाचा व पहिला टप्पा म्हणजे ‘प्रगतिदर्शक ठरविणे.’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ध्येयापर्यंत पोचविणारे प्रगतिदर्शक (माइलस्टोन्स) म्हणजे नक्की काय?
ध्येयाची स्पष्ट व्याख्या लक्षात घेऊन तिथपर्यंत पोचण्यासाठी लागणारे टप्पे म्हणजेच प्रगतिदर्शक. लक्ष केंद्रित आणि ट्रॅकवर राहण्यासाठी, ध्येयाकडे पोचण्यासाठी व आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी काही प्रगतिदर्शक आवश्यक असतात. आपले महत्त्वाचे टप्पे साजरे करणे, ही सर्वांत मोठी आंतरिक प्रेरक शक्ती आहे; जी आपणास ऊर्जित ठेवते आणि आपल्या उद्दिष्टांच्या जवळ नेते. तुम्हाला महत्त्वाचे वाटतील तितके प्रगतिदर्शक ठरवावे. काही लोकांना दीर्घकालीन (उदा. सहा महिन्यांतून एकदा तपासायचे) प्रगतिदर्शक योग्य वाटतात, तर काही लोकांना साप्ताहिक प्रगतिदर्शक योग्य वाटतात. तुमच्या ध्येयासाठी तुम्हाला योग्य वाटतील तितके प्रगतिदर्शक ठरवावेत. उदाहरणार्थ, माझे ध्येय जर ‘नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत ५० पुस्तके वाचणे’ असे असेल, तर माझे प्रगतिदर्शक मार्च २०२१ पर्यंत १५ पुस्तके, जून २०२१ पर्यंत पुढील १५, नोव्हेंबर २०२१ पर्यंत पुढील २० असे प्रगतिदर्शक ठरवू शकतो. प्रत्येक प्रगतिदर्शक जितका ‘स्पष्ट’ तितका चांगला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रगतीचे निरीक्षण
आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत की नाही, याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली प्रगती तपासायचे प्रगतिदर्शक अगदी सोपे साधन आहे. ध्येयाच्या प्रगतीची निश्चितता प्रगतिदर्शक ठरविते.

वेळेचे नियोजन
प्रगतिदर्शक आपल्या वेळेचे नियोजन करण्यास मदत करतो. आपला वेळ नक्की कुठे, किती व कशासाठी चालला आहे, तो वाया जात आहे का ध्येयासाठी सत्कारणी लागत आहे, याचा तपास होतो.

प्रगतिदर्शकाची मांडणी
काही कारणास्तव जर आपली प्रगती ठरविल्याप्रमाणे होत नसेल, तर आपल्याला पुढील प्रगतिदर्शकाची मांडणी बदलता येते व त्यानुसार आपल्या संसाधनांचे पुन्हा नियोजन करण्यास मदत होते.

संभाव्य अडथळे
प्रगतिदर्शक आपल्याला प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांवरील संभाव्य अडथळे वेळेआधी शोधण्यास व आधीच योग्य मार्ग काढण्यास मदत करते.

व्यवस्थापित ध्येयाचा अनुभव
आपले कितीही मोठे ध्येय असले, तरी लहान प्रगतिदर्शक ते व्यवस्थापनीय बनवितात. बऱ्याचदा ध्येय आपल्या आवाक्याबाहेरचे वाटते व त्याचे दडपण येते. आपण प्रगतिदर्शक ठरविले, तर तेच ध्येय आवाक्यात वाटते व आपला आत्मविश्वासही वाढतो.

आंतरिक प्रेरणा
एक प्रगतिदर्शक पार पडला, की आपल्याला आंतरिक प्रेरणा मिळते, आत्मविश्वास वाढतो व पुढच्या टप्प्याकडे आपण आणखी उत्साहाने व शक्तीने वाटचाल करतो. हीच आंतरिक प्रेरणा अंतिम ध्येयापर्यंत टिकविण्याचे काम प्रगतिदर्शक करतात.

लक्षात ठेवा, प्रत्येक प्रगतिदर्शक एक ‘ध्येय’ आहे. 
जितके प्रगतिदर्शक पार करून पुढे जाल, अंतिम ध्येय तुमचेच आहे.

loading image