esakal | ‘फसव्या विज्ञाना’ विरुद्धची संघर्षगाथा
sakal

बोलून बातमी शोधा

‘फसव्या विज्ञाना’ विरुद्धची संघर्षगाथा

गेल्या काही वर्षात विज्ञानाच्या नावाखाली फसवणुकीचे, दिशाभूल करण्याचे, लोकांना चुकीचा मार्ग दाखविण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. विज्ञानाचा, पुरातन संस्कृतीचा मुलामा देऊन या सर्व गोष्टी सांगण्यात येत असल्याने खरे विज्ञान बाजूला राहून खोट्या आणि अंधश्रद्धेकडे नेणाऱ्या गोष्टींकडे लोक ओढले जात आहेत.

‘फसव्या विज्ञाना’ विरुद्धची संघर्षगाथा

sakal_logo
By
सुरेंद्र पाटसकर

गेल्या काही वर्षात विज्ञानाच्या नावाखाली फसवणुकीचे, दिशाभूल करण्याचे, लोकांना चुकीचा मार्ग दाखविण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. विज्ञानाचा, पुरातन संस्कृतीचा मुलामा देऊन या सर्व गोष्टी सांगण्यात येत असल्याने खरे विज्ञान बाजूला राहून खोट्या आणि अंधश्रद्धेकडे नेणाऱ्या गोष्टींकडे लोक ओढले जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विज्ञानाच्या नावाखाली जो काळाबाजार चालू आहे त्याला छद्मविज्ञान किंवा फसवे विज्ञान असे म्हणता येऊ शकेल. या छद्मविज्ञानाकडे लोक कसे ओढले जात आहेत, छद्मविज्ञान म्हणजे नेमके काय, फसवे विज्ञान आणि विज्ञान यांतील फरक समजण्यासाठी फसव्या विज्ञानाची लक्षणे व त्याचे मानसशास्त्र समजण्याची गरज आहे. हे समजविण्याचे काम ‘फसवे विज्ञान, नवी बुवाबाजी’ या पुस्तकातून करण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखक प्रा. प. रा. आर्डे हे सांगली येथील हे भौतिकशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे ते सल्लागार संपादक आहेत. १९८९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकाचे डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर ते सहलेखक आहेत. छद्मविज्ञान हे अनर्थकारी कसे आहे याचा आढावा लेखकाने पुस्तकातून घेतला आहे. 

छद्मविज्ञान आपले आर्थिक नुकसान करू शकते, कधीकधी ते मृत्यूचे कारणही ठरते. अमेरिकेतील एका पाहणीनुसार तेथील साडेतीन लाखांहून अधिक जण हे छद्मविज्ञानाचा उपचार घेतल्याने मृत्यू पावले आहेत. अशा प्रकारचे सर्वेक्षण आपल्याकडे नाही किंवा जागतिक पातळीवरही एकत्रितपणे सर्वेक्षण झाल्याची माहिती उपलब्ध नाही. परंतु, अशी माहिती एकत्र केल्यास छद्मविज्ञानामुळे फसविल्या गेलेल्यांची संख्या किती महाप्रचंड असू शकेल,याचा अंदाज बांधता येऊ शकेल. आर्डे यांनी पुस्तकाची चार भागात मांडणी केली आहे. पहिला भाग विज्ञान आणि समाज यांच्यासंबंधांचा आहे. सोळाव्या शतकात गॅलिलिओ, न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी विज्ञानाला आकार कसा दिला आणि विज्ञानाच्या निर्मितीचा आढावा यात मांडला आहे. औद्योगिक क्रांतीनंतरचे आर्थिक आणि सामाजिक बदलही त्यात मांडले आहेत. विज्ञानाच्या सिद्धांताचा आपल्या सामाजिक विचारसरणीवरही कसा परिणाम झाला, असे  आर्डे यांनी उदाहरणांसह मांडले आहे. तसेच चंगळवादातून निर्माण झालेल्या विकासाच्या मॉडेलमुळे नुकसान कसे झाले आहे आणि नुकसान थांबविण्यासाठी नव्या रचनेची गरज कशी आहे हेही या भागात मांडण्यात आले आहे. 

दुसऱ्या भागात छद्मविज्ञानाचा विचार अधिक खोलात मांडला आहे. छद्मविज्ञान ओळखायचे कसे आणि छद्मविज्ञानाची मानसशास्त्राची सखोल मांडणी या भागात केली आहे. चमत्कारिक गोष्टींच्या आकर्षणातून या सर्वांची सुरुवात होते. छद्मविज्ञान हे लोकांच्या भावनेला हात घालते. विविध विश्वास प्रणालींपैकी कोणती आपल्याला मदत करू शकेल, आपल्याकडे ज्या शक्तीचा अभाव असतो आणि ज्या गोष्टी आपल्याबाबतीत घडाव्यात असे प्रकर्षाने वाटत असते, त्या गोष्टी कुणाकडून तरी घडून येतील, असे वाटावे, अशा प्रकारचे अतिरंजित दावे छद्मविज्ञान करते. छद्मविज्ञान माणसाची आध्यात्मिक भूक भागविण्याचा देखावा करते, काही वेळा जुना धर्म आणि नवविज्ञान या दोघांकडूनही उसन्या कल्पनांचा आधार घेते, असे स्पष्टीकरण या भागात देण्यात आले आहे. इजिप्तमधील पिरॅमिड, इंग्लंडमधील गव्हाच्या शेतातील वर्तुळाकार पॅटर्न अशी काही उदाहरणे लेखकाने दिली आहेत. टेलिपथी, फेंगशुई, हीलिंग ऊर्जा, रेकी, अॅक्युपंक्चर, होमिओपॅथी यांच्याबाबतीतही भ्रम पसरविणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात, असे आर्डे यांचे म्हणणे आहे.  

छद्मविज्ञानाच्या विविध प्रकारांची चिकित्सक मांडणी तिसऱ्या भागात केली आहे. मानवी आरोग्यापासून सामाजिक, मानसिक प्रश्नांपर्यंत आपली दिशाभूल करणाऱ्या विविध छद्मविज्ञानाच्या प्रकारांचा समाचार यात घेतला आहे. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी  आणि जागतिक पातळीवरील विचारवंतांनी केलेल्या संघर्षाचा वृत्तांत शेवटच्या चौथ्या भागात दिला आहे. ज्योतिषी किंवा भविष्याच्या आहारी गेल्यामुळे घडलेले अनेक प्रकार पुस्तकात देण्यात आले आहेत. त्यात जगाच्या अंताबाबतची यापूर्वीची भाकिते, अंकज्योतिषाच्या आहारी गेल्यामुळे म्यानमारच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, चिनी नागरिकांनी एका विशिष्ट वर्षात केलेले गर्भपात, अशी अनेक उदाहरणे आर्डे यांनी दिली आहेत.  

अभिनेत्री सरा पार्किन्सन, अॅपल या जगप्रसिद्ध ब्रँडचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे अनुभव आपल्याला मुळातून विचार करायला लावणारे आहेत. दोघांनाही वेगळ्या प्रकारचा कर्करोग झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया करून न घेता, इतर मार्गांचा अवलंब करत राहिले व दोघांचाही कर्करोग हाताबाहेर गेला व मृत्यूला सामोरे जावे लागले. योग्य वेळी उपचार केले असते, तर दोघांचे जीव वाचले असते, परंतु, छद्मविज्ञानाच्या मागे लागल्याने ही परिस्थिती ओढविल्याचे दिसून येते. अनेक सर्वसामान्य नागरिक, खेळाडू हेही कसे छद्मविज्ञानाला बळी पडले यांची उदाहरणे आर्डे यांनी दिली आहेत. प्रत्येक क्षेत्रानुसार छद्मविज्ञानाच्या प्रकारांची एक प्रातिनिधिक यादीच आर्डे यांनी इथं दिली आहे. 

विज्ञान आणि छद्मविज्ञान यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी खगोल वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी अशा कसोट्यांचा एक प्रश्नसंच तयार केला आहे. कोणतीही गोष्ट या वैज्ञानिक कसोटीला उतरते की नाही हे या प्रश्नांच्या साह्याने पाहणे सोपे पडते. या प्रश्नांचा उहापोह पुस्तकात केला आहे. चुंबक साधनांच्या बाजाराबद्दल एक स्वतंत्रप्रकरण लिहिले आहे. अॅक्युपंक्चर, परामानसशास्त्र, संमोहन, वास्तुशास्त्र यांतील चुकीच्या गोष्टी, धर्मग्रंथातील अंधश्रद्धा व भाकड विज्ञान आदी विषयांच्या माध्यमातून फसव्या विज्ञानाची व्याप्ती आर्डे यांनी प्रभावीपणे पोहोचवली आहे. विविध अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न मुळातून वाचण्यासारखे आहेत. 

छद्मविज्ञानाला फसायचे नसेल, तर विज्ञान आणि छद्मविज्ञान यातील फरक समजून घ्यायला हवा. तसेच छ्द्मविज्ञानाची भाषा समजून घ्यायला हवी. छद्मविज्ञानात विज्ञानाचा आभास आहे. हे लक्षात यायचे असेल तर विज्ञानाच्या मूलभूत नियमांची व सिद्धांताची ओळख सर्वसामान्यांना करून द्यायला हवी.

आधुनिक वैद्यकीय उपचारांत कधीकधी शस्त्रक्रिया अटळ असते. मात्र माणसाला आपल्या शरीराची चिरफाड करण्याची भीती वाटते याचा फायदा छद्मविज्ञानाचा वापर करणारे घेतात.  आमच्या औषधांचा दुष्परिणाम नाही, अशा जाहिराती हे फसव्या विज्ञानाचेच लक्षण आहे. महत्त्वाचे म्हणजे छद्मविज्ञानाचा असलेला सामाजिक, आर्थिक व राजकीय संबंध. या चक्रातून बाहेर पडायचे असेल, तर खऱ्या विज्ञानाची कास धरावीच लागेल. मानवी संस्कृतीचा इतिहास पाहिला तर आपल्या समजुतींची चिकित्सा करूनच आपण विकसित होत आलो आहोत. योग्य कारणासाठी संशय घेणे उपयोगी ठरते. 

जीवनाच्या सर्वक्षेत्रात बुवाबाजी शिरली आहे. विज्ञानाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. यातून बाहेर पडायचे असेल तर प्रत्येक गोष्ट शास्त्रकाट्यावर सिद्ध झाली पाहिजे, हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. या दृष्टीने पाऊल टाकण्यासाठी प्रा. आर्डे यांनी लिहिलेलं हे पुस्तक उपयोगी ठरू शकेल. 

Edited By - Prashant Patil

loading image