पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा दस्तावेज

सुरेंद्र पाटसकर
रविवार, 31 मार्च 2019

महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थीच येईल. मात्र, मग आपल्याला कशा प्रकारचा विकास अपेक्षित आहे? पर्यावरणपूरक विकास म्हणजे काय? आणि तो साधायचा कसा? "पर्यावरण बचाओ'च्या घोषणा द्यायच्या आणि रोजच्या जीवनात मात्र पर्यावरणालाच ओरबाडायचं, असं काहीसं आपलं शहरी आयुष्य झालं आहे.

महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थीच येईल. मात्र, मग आपल्याला कशा प्रकारचा विकास अपेक्षित आहे? पर्यावरणपूरक विकास म्हणजे काय? आणि तो साधायचा कसा? "पर्यावरण बचाओ'च्या घोषणा द्यायच्या आणि रोजच्या जीवनात मात्र पर्यावरणालाच ओरबाडायचं, असं काहीसं आपलं शहरी आयुष्य झालं आहे. असं असेल तर प्रश्न उरतो, की पर्यावरणपूरक विकासाच्या वाटेवर चालणार कोण? निसर्गस्नेही जीवन प्रत्यक्षात जगण्याचं, पर्यावरणपूरक वाटेवर चालण्याचं धाडस दाखवलं आहे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांनी.

अनेक दांपत्यं आपल्या सहजीवनाची पंचविशी, पन्नाशी मोठा गाजावाजा करून साजरी करतात. दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांनी आपल्या निसर्गस्नेही सहजीवनाची पंचविशी आपले अनुभव पुस्तकरूपानं जगासमोर मांडून वेगळ्या पद्धतीनं साजरी केली. शहरातलं जीवन सोडून, गावाकडे जाऊन 25 वर्ष राहणं ही काही साधीसोपी गोष्ट नाही. परंतु, या दांपत्यानं ती करून दाखवली आहे. त्यांनी स्वखुशीनं, विचारपूर्वक हा मार्ग निवडला असल्यानं त्यावरून चालणं त्यांना शक्‍य झालं. या मार्गावरून चालताना 25 वर्षांतले अनुभव त्या दोघांनी "स्वप्नामधील गावां... निसर्गस्नेही जीवनशैलीकडे' या पुस्तकातून मांडले आहेत. हे पुस्तक म्हणजे आत्मकथन आहे. इतरांना शिकवण्याचा बडेजाव त्यात नाही. कौटुंबिक सर्व नात्यांना जपत, नवी नाती निर्माण करत जगलेलं जीवन त्यांनी पुस्तकातून मांडलं आहेच; तसंच निसर्गस्नेही जीवन जगणाऱ्या दोन स्वतंत्र आणि एकमेकांना पूरक व्यक्तिमत्त्वांचं कथन पुस्तकात आहे. दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांनी मांडलेला त्यांच्या स्वप्नामधल्या गावाचा प्रवास आपल्यालाही सहजगत्या त्यांच्या गावात घेऊन जातो. अभियांत्रिकी पदविकेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिलीप कुलकर्णी यांनी पुण्यात काही काळ टेल्कोत नोकरी केली. त्याआधीपासून ते ग्रामायन, ग्राहक पंचायत या संस्थांमध्ये कार्यकर्ते म्हणून काम करत होते. हे सुरू असताना त्यांनी पर्यावरणविषयक लिखाणाला सुरवात केली होती. त्यानंतर विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) या संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून साधारण दहा वर्षं काम केले. पौर्णिमा यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे. या दोघांनाही पर्यावरणस्नेही जीवनाचा ध्यास होता. पर्यावरणविषयक जे लिखाण केलं, समस्यांना उत्तरं सुचवली, ती प्रत्यक्षात उतरवली नाहीत, तर आपण कोरडे पाषाण ठरू, आपलं वर्तन जर आपण जे सांगतो त्याच्या विरुद्ध असेल, उक्ती आणि कृती यात अंतर असेल, तर तो दांभिकपणा ठरेल, अशी भूमिका दिलीप कुलकर्णी यांनी मांडली. त्यामुळंच त्यांनी गावाकडे जाऊन पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्याला पौर्णिमा यांनी मनापासून साथ दिली. जे स्वप्न बघितलं होतं ते प्रत्यक्षात उतरवलं.

"जडणघडण', "अनुभव', "विश्‍लेषण', "कौटुंबिक', "सामाजिक', "आर्थिक बाबी आणि उद्या' अशा पाच विभागांत हे अनुभवकथन आहे. सुरवातीचे काही दिवस पंचनदी आणि नंतरची वर्षं कुडावळ्यातल्या मुक्कामाचे अनुभव सविस्तरपणे मांडले आहेत. गावात जाण्याचा निर्णय घेतला, तरी एकदम जाऊन राहणं शक्‍य नव्हते. त्याच्या पूर्वपीठिकेपासून या अनुभवकथनाला सुरवात होते. त्यानंतर चूल, देवराई, रानभाज्या, आम्रबोध, स्वप्नातली दिवाळी, नातं मातीशी अशा प्रकरणांतून पर्यावरणीय सजगता बाळगून दैनंदिन जीवनात खूप मोठी तडजोड न करतादेखील कसं छान जगता येतं, याची अनेक उदाहरणं दोघांनीही सोप्या भाषेतून उलगडली आहेत. चुलीबाबतचे अनेक गैरसमज त्यांनी दूर केले आहेत. आंब्याबाबतची माहितीही आपल्या डोळ्यात अंजन घालणारीच आहे.

घराच्या आसपास किंवा घरात येणारे किडे-मुंग्या, साप, पाली यांच्याबाबतचा वेगळा दृष्टिकोन "शं द्विपदे। शं चतुस्पदे।' या प्रकरणातून मिळतो. घराचा आणि निसर्गचा संबंधही दिलीप कुलकर्णी यांनी सुंदररित्या उलगडून दाखविला आहे. सर्वसामान्यपणे आपण जी जीवशैली आत्मसात करतो, त्यामुळे आपली "कार्बन फूटप्रिंट' वाढवतो. हे कमी करणं उद्दिष्ट असलं पाहिजे; पण हे तपासायचं कसं हे दिलीप यांनी "आमचं प्रगतिपुस्तक' या प्रकरणातून सांगितलं आहे. ते आचरत असलेला दिनक्रम किंवा जीवन हे निसर्गस्नेही आहे की नाही याचा उहापोह त्यांनी यात केला आहे. हे सगळं करत असताना काही बाबतींत त्यांना माघार घ्यावी लागली किंवा जगरहाटीच्या नियमानुसार बदल करावे लागले. याचीही प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर मोबाईलचं देता येईल. मोबाईल वापरणं हे निसर्गाची हानी करण्याचं उदाहरण आहे. परंतु, संपर्काची पत्रासारखी साधनं कमी होत गेल्यानं किंवा अनेकदा ती वेळेत मिळत नाहीत किंवा मिळतच नसल्यानं त्यांनी अत्यंत गरजेच्या वेळी संपर्कासाठी मोबाईलवापर सुरू केला. टीव्ही, संगणक, स्मार्ट फोन यांचा ते वापरच करत नाहीत. साधा मोबाईल, तोही अत्यंत गरजेच्या वेळी.

दिलीप आणि पौर्णिमा यांनी केलेलं वर्णन इतकं ओघवतं आहे, की समोर बसून आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय असंच वाटतं. अनेकदा त्यांना भेटायला, बघायला लोक जातात, तेव्हा वारंवार विचारल्या जाणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं शेवटी दिली आहेत. हे पुस्तक वाचण्यासाठी नसून यथायोग्य आचरणात आणण्यासाठी आहे, याचं स्मरण पुस्तकात जाणीवपूर्वक करून दिलं आहे. निसर्गपूरक जीवनाकडे जाण्याची प्रेरणा आपल्याला पुस्तक वाचून मिळेल हे मात्र नक्की.

पुस्तकाचं नाव : स्वप्नामधील गावां.. निसर्गस्नेही जीवनशैलीकडे
लेखक : दिलीप कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पानं : 212, किंमत : 200 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: surendra pataskar write book review in saptarang