माग एका 'हिंस्र ठोकळ्या'चा (सुरेंद्र पाटसकर)

सुरेंद्र पाटसकर surendra.pataskar@esakal.com
रविवार, 12 मे 2019

अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे....

अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे....

वरवर बघता तो धातूचा ठोकळा काही विशेष नव्हता. तळहातावर मावेल एवढाच त्याचा आकार; परंतु त्या छोट्याशा ठोकळ्यात अनेक काळीकुट्ट रहस्यं दडलेली आहेत. त्यांची माहिती मिळवणं शक्‍य झालं तर इतिहासातला एक अध्याय नव्यानं लिहावा लागेल. विज्ञानाच्या प्रगतीचं एक पानही त्यात जोडलं जाऊ शकतं आणि जो अंदाज वर्तवला जात आहे, त्यानुसार खरंच घडलं असतं तर वंशविच्छेदाचा आणखी एक महाभयंकर प्रकार प्रत्यक्षात आला असता. हा ठोळका आहे युरेनियमचा. जर्मनीचा क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलरच्या प्रयोगशाळेतील. अणुभट्टीसाठी तयार केलेला!
ही सर्व गोष्ट उघड व्हायला सुरवात झाली सहा वर्षांपूर्वी. मेरीलॅंड विद्यापीठातील असोसिएट रिसर्च प्रोफेसर टिमोथी कोएथ यांना सन 2013 मध्ये वाढदिवसाची एक अनोखी भेट मिळाली. एका छोट्याशा कापडी पिशवीत खाकी कागदात गुंडाळलेली एक वस्तू "कुरिअर'मार्फत त्यांच्याकडं आली. पिशवीतून बाहेर काढून त्या वस्तूभोवती गुंडाळलेला कागद त्यांनी हळूहळू बाजूला काढला. ती वस्तू बघताच त्यांचे डोळे विस्फारले गेले. तो एक धातूचा घनचौरस होता. तळहातावर मावणारा त्याचा आकार असला तरी त्याचं वजन बरंच होतं. त्या ठोकळ्याला आणखी एक कागद गुंडळलेला होता. त्यावर लिहिलं होतं ः ""टेकन फ्रॉम जर्मनी, फ्रॉम जर्मन रिऍक्‍टर हिटलर ट्राईड टू बिल्ड ः गिफ्ट फ्रॉम निनिंजर.'' टिमोथी यांना मिळालेल्या या धातूच्या ठोकळ्याचं वजन आहे दोन किलोग्रॅम आणि त्या चौरसाचा आकार आहे केवळ दोन इंच! ठोकळ्याला गुंडाळलेली चिठ्ठी वाचून टिमोथी शहारून गेले. त्यांच्या मनात विचार आला, की खरंच हा हिटलरच्या प्रयोगशाळेतील युरेनियमचा तुकडा आहे? असेल तर, जगानं आतापर्यंत न बघितलेला, नाझी तंत्रज्ञानाचा एक पुरावा त्यांच्या हातात होता.
टिमोथी यांनी या ठोकळ्याचा इतिहास शोधून काढायचं ठरवलं. यासाठी त्यांनी मिरिअर हायबर्ट यांची मदत घेतली. हायबर्ट या त्यांच्या संशोधनातील सहकारीच आहेत. सहा वर्षांच्या संशोधनानंतर मे 2019 मध्ये त्यांनी आपल्याकडील माहिती जगासमोर मांडली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरनं अणुभट्टी बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची बाब त्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. हिटलरला यश आलं असतं तर अमेरिकेच्याही आधी त्याच्या हाती अण्वस्त्रं असती आणि जगाचा इतिहास कदाचित पूर्णतः बदलून गेला असता.

नाझींची प्रयोगशाळा
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात जर्मन शास्त्रज्ञांनी अणुभट्टी बांधण्याचा प्रयत्न चालवला होता. पूंज यांत्रिकीमधील तज्ज्ञ आणि प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ वेर्मर हायसेनबर्ग हेही या त्यात सहभागी होते. जर्मनीतील हायगरलॉच या गावात अणुभट्टी तयार करण्यासाठीची प्रयोगशाळा उभारण्यात आली होती (सध्या या गावात प्रयोगशाळेच्या ठिकाणी संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे). त्या प्रयोगशाळेत युरेनियमचे दोन इंच लांबी-रुंदी-खोली असलेले 664 तुकडे एखाद्या झुंबराप्रमाणे गोलाकार रचनेत बसवण्यात आले होते. अणुभंजन (फिशन) नियंत्रित करण्यासाठी ही सर्व रचना "हेवी वॉटर'मध्ये ठेवण्यात आली होती; परंतु प्रयोग यशस्वी होण्यासाठी युरेनियमच्या आणखी 400 ठोकळ्यांची गरज होती. ते तुकडे जर्मनीत विविध ठिकाणी विखुरलेले होते. मात्र, नाझींना ते मिळवता आले नाहीत. त्यांनी सर्व शक्ती लावून ते ठोकळे मिळवले असते तर चालू स्थितीतील अणुभट्टी त्यांनी दुसरं महायुद्ध संपण्यापूर्वीच प्रत्यक्षात आणली असती, अशी माहिती टिमोथी कोएथ यांच्या संशोधनातून पुढं आली. अणुभट्टी उभारण्याचा नाझींचा कार्यक्रम विभाजित स्वरूपात; पण स्पर्धात्मक होता, तर त्याच काळातील अमेरिकेचा, जनरल लेस्ली ग्रोवेस यांच्या नेतृत्वाखालील मॅनहॅटन येथील कार्यक्रम केंद्रीभूत आणि सहयोगात्मक होता. थोडक्‍यात सांगायचं झालं तर, अणुभट्टीमध्ये युरेनियमच्या समस्थानिकावर प्रोटॉनचा मारा केला जातो, त्यातून अणुभंजन होऊन समृद्ध युरेनियम मिळतं. तर प्रोटॉनची साखळीप्रक्रिया सुरू राहून त्यातून ऊर्जा मिळते.

ठोकळ्याची सत्यता
आपल्याला मिळालेला ठोकळा युरेनियमचाच आहे का आणि तो नाझींच्या प्रयोगशाळेतीलच आहे का, हे तपासण्यासाठी कोएथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गॅमा रे स्पेक्‍टोमीटरचा वापर केला. त्यात हा ठोकळा निसर्गतः सापडणाऱ्या युरेनियम या किरणोत्सारी पदार्थाचाच असल्याचं सिद्ध झालं. म्हणजे इतर कोणत्या धातूवर युरेनियमचा थर दिलेला नव्हता. तसंच त्या युरेनियमचं अणुभंजनही झालेलं नव्हतं. म्हणजेच तो अणुभट्टीत वापरला गेलेला नव्हता. अणुभट्टीत तो वापरला गेला असता तर सिसियम-137 पासून निघालेले गॅमा किरण या ठोकळ्याला चिकटलेले आढळले असते. नाझींच्या प्रयोगशाळेसंबंधी मिळालेल्या कागदपत्रांतील वर्णनाच्या आधारेही खातरजमा करण्यात आली.

नाझींनी अणुभट्टी तयार केली होती?
अणुभट्टी उभारण्याच्या किती जवळ जर्मन शास्त्रज्ञ त्या वेळी पोचले होते, याचं उत्तर देता येणं अवघड आहे; परंतु आता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, अणुभट्टी कार्यान्वित होण्यासाठी त्यांना त्यांच्याकडं असलेल्या युरेनियपेक्षा 50 टक्के युरेनियम अधिक हवं होतं. हायगरलॉच येथील प्रयोगशाळेत त्यांनी युरेनियमचे आणखी 400 ठोकळे आणण्यात यश मिळवलं असतं तरी त्यांना त्यासाठी आणखी "हेवी वॉटर'ची गरज भासली असती, असं कोएथ यांना वाटतं. अमेरिकेच्या नॅशनल अर्काईव्हमधील कागदपत्रांच्या नोंदींमध्येही ईशान्य जर्मनीत युरेनियमचे अनेक ठोकळे दुसऱ्या महायुद्धानंतर मिळाल्याच्या नोंदी आहेत. नाझींनी हे सर्व जुळवून आणलं असतं तरी मोठा स्फोट घडवून आणण्यासाठी ते पुरेसं नव्हतं असंही कोएथ यांना वाटतं. नाझींनी अमेरिकेच्या आधी दोन वर्षं अणुकार्यक्रम सुरू केला असला, तरी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटपर्यंत जर्मनी अण्वस्त्रधारी होऊ शकला नाही, हे सत्य आहे.

उर्वरित ठोकळे कुठं आहेत?
या सगळ्या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नाझींच्या अणुभट्टीसाठी तयार केलेला एक ठोकळा कोएथ यांना मिळाला, उर्वरित 663 ठोकळे कुठं आहेत? किंवा नाझींच्या त्या प्रयोगातील किती तुकडे शिल्लक आहेत व कुठं आहेत?

उर्वरित ठोकळे कुठं आहेत, याची अचूक माहिती कोएथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळू शकली नाही. मात्र, जर्मनीच्या पाडावानंतर हायगरलॉच येथील प्रयोगशाळेतून ते तुकडे वेगवेगळ्या लोकांमार्फत अमेरिकेत पाठवले गेले, अशी माहिती मिळाली. त्यामुळे ते ठोकळे अजूनही अनेक घरांमध्ये अडगळीच्या खोल्यांत पडलेले असू शकतात, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, असं कोएथ यांना वाटतं. यातील काही ठोकळ्यांची माहिती त्यांना मिळाली आहे. ते ताब्यात घेऊन संशोधन करण्याचा कोएथ यांचा प्रयत्न आहे. जे 400 ठोकळे नाझींच्या प्रयोगशाळेत पोचले नाहीत, ते दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर युरोपांतील काळ्या बाजारांत विकले गेले असण्याचाही अंदाज वर्तवला जातो. मात्र, त्याबाबत कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही.
आणखी एका माहितीनुसार, जर्मनीच्या पाडावानंतर संयुक्त फौजांनी नाझींच्या प्रयोगशाळेतील सर्व वस्तू अमेरिकेतील मरे हिल्स परिसरातील मॅनहॅटन प्रकल्पात नेण्यात आल्या. येथील अणुबॉम्बच्या प्रकल्पात रॉबर्ट डी. निनिंजर हे त्या वेळी काम करत होते, अशीही माहिती कोएथ यांना मिळाली. निनिंजर यांच्याकडे युरेनियमचा ठोकळा होता, नंतर त्यांनी तो एका मित्राला दिला, असं निनिंजर यांच्या पत्नीनं कोएथ यांना सांगितलं. तो ठोकळा अनेकांकडं फिरल्यानंतर आता कोएथ यांच्याकडं आलेला असू शकतो. कोएथ यांना मिळालेल्या युरेनियमच्या ठोकळ्याचा माग मॅनहॅटन प्रकल्पापर्यंत जात असल्याचं आढळून आलं. म्हणजेच नाझींच्या आणि मॅनहॅटनमधील प्रयोगशाळेत काय झालं याची रहस्यं गायब असलेल्या ठोकळ्यांमधून उलगडू शकतात.

हान, स्ट्रॉसमन यांचं यश
जर्मन रसायनशास्त्रज्ञ ओट्टो हान आणि फ्रिट्‌झ स्ट्रॉसमन यांनी सन 1939 मध्ये युरेनियमवर न्यूट्रॉन्सचा मारा करून बेरियम प्राप्त करण्यात यश मिळवलं होतं. अणुभंजनाच्या या प्रकियेमुळे पदार्थविज्ञानात क्रांती झाली. त्याचा पुढचा टप्पा होता तो अणुभंजनानंतर युरेनियमचेच दोन अणू मिळवण्याचा किंवा समृद्ध युरेनियम मिळवण्याचा. युरेनियमच्या सर्व समस्थानिकांमध्ये अणुभंजन झाल्यानंतर एकसारखीच क्रिया घडत नाही. अमेरिकेतही त्या वेळी याच प्रकारच्या प्रकल्पावर काम सुरू होतं. एप्रिल 1945 मध्ये अमेरिकेत न्यू मेक्‍सिकोमध्ये अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली. नाझींनी अणुभट्टीच्या तंत्रज्ञानात किती प्रगती केली आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न मित्रराष्ट्रांच्या फौजांनी या चाचणीच्या आधी साधारणपणे तीन महिने केला होता.

मित्रराष्ट्रांच्या फौजा जर्मनीत घुसल्यानंतर त्यांना हायगरलॉच येथील गोपनीय प्रयोगशाळा मिळाली होती. मात्र, नाझींनी तेथून पळून जाताना प्रयोगशाळा नष्ट करण्याचा प्रयत्न केला व तीमधलं साहित्य जाळून टाकलं किंवा जवळपासच्या जमिनीत पुरून टाकलं. त्यात युरेनियमचे ठोकळेही पुरून टाकण्यात आले होते.

कोएथ यांनी युरेनियमचा हा ठोकळा सध्या आपल्या वैयक्तिक संग्रहात एका काचेच्या बरणीत ठेवला आहे. शिकागो विद्यापीठातील पहिल्या अणुभट्टीतील ग्राफाईटचा तुकडा, युरेनियमचा मारा केल्यामुळे तयार झालेली व अतिनील प्रकाशात चमकणारी व्हॅसलिन काच अशा अनेक वस्तू त्यांच्या वैयक्तिक संग्रहात आहेत.

"आर्य वंश हाच सर्वश्रेष्ठ असून त्यांच्या स्थानाला ज्यू आव्हान देतात; त्यामुळे ज्यू समाज, त्यांचा धर्म, त्यांची जीवनशैली यांचा समूळ नाश केल्याशिवाय जगाचं शुद्धीकरण होणार नाही,' असं हिटलरचं मत होतं. या नाझी विचारावरच त्यानं जर्मन सैन्य उभं केलं. तथाकथित नाझी अस्मितेच्या पुनरुत्थानासाठी झालेल्या दुसऱ्या महायुद्धात साधारणतः सहा कोटी लोक मारले गेले. अवघं जग विनाशाच्या छायेत आलं होते. जाळून, गॅस चेंम्बरमध्ये घुसमटवून, उपासमार घडवून आणि अनन्वित छळ करून 60 लाखांहून अधिक ज्यूंना हिटलरनं ठार केलं. हिटलरला अण्वस्त्रं बनवायची होती. जर अमेरिकेच्या अगोदर हिटलरच्या हाती अणुबॉम्ब आला असता, तर बहुतांश जग अणुसंहारात नष्ट झाले असतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: surendra pataskar write uranium cube to Nazi Germanys nuclear reactor program article in saptarang