मानवी वस्तूंचे जड झाले ओझे!

सुरेंद्र पाटसकर surendra.pataskar@esakal.com
Sunday, 10 January 2021

विज्ञानरंग
मानव दरवर्षी ३० अब्ज टन एवढ्या वजनाच्या वस्तू निर्माण करतो. दरवर्षी निर्माण होणाऱ्या अशा वस्तूंचा भार पृथ्वीला आता डोईजड होऊ लागला आहे.

संपूर्ण मानवजातीनं पृथ्वीवर आपला परिणाम केला आहे. त्याचे पुरावे आपल्याला सभोवताली दिसून येतात - जंगले नष्ट करून महामार्ग बांधले जात आहेत, शहरे लांबी-रुंदी व उंचीनेही विस्तारत आहेत. लक्षावधी मोटारींसाठी मार्ग तयार केले जात आहेत, प्लॅस्टिकचे प्रदूषण प्रत्येक परिसंस्थेत जागा पटकावून बसले आहे ... अशा किती तरी गोष्टी दाखवता येतील. या गोष्टी एवढ्या वाढल्या आहेत की मानवनिर्मित सर्व वस्तूंचे वजन हे पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीपेक्षा म्हणजे सर्व जीव-जंतू, प्राणी-पक्षी, वनस्पती यांच्यापेक्षा जास्त झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे. वस्तुमान नसलेला पदार्थच अस्तित्वात नाही. तर वजन म्हणजे गुरुत्वीय क्षेत्रानं त्या पदार्थावर लावलेले गुरुत्वबल. गुरुत्वाकर्षण सारखेच असेल तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते. आपण पृथ्वीवर कुठेही गेलो तरी आपले वजन एकसारखेच भरेल. परंतु, हेच वजन चंद्रावर वेगळे असेल, इतर कोणत्याही ग्रहावरही ते बदलेल. हाच नियम प्रत्येक वस्तूला लागू होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने २०१८ मध्ये एक अहवाल तयार केला होता, तो होता चंद्रावरील कचऱ्याबद्दलचा. त्या अहवालानुसार चंद्रावर एक लाख ८१ हजार ४३६ किलो एवढा कचरा गोळा झाला आहे. हा सगळा कचरा मानवनिर्मित आहे. त्यात यानांचे, उपकरणांचे तुकडे यांचा समावेश आहे. अपोलो-११ मोहिमेतील अंतराळवीर चंद्रावरून परत येताना तब्बल १०० वस्तू तेथेच सोडून आले होते. 

रशियाने तयार केलेला स्पुटनिक हा जगातील पहिला उपग्रह चार ऑक्टोबर १९५७ रोजी अवकाशात सोडण्यात आला. त्यानंतर विविध देशांनी शेकडो उपग्रह अवकाशात सोडले, त्याचबरोबर हजारो वस्तूंचा कचराही अवकाशात टाकला.  
सिमेंट-काँक्रिट हे आपल्या शहरांचे व गावांचे आधारस्तंभ आहेत. पृथ्वीवर सर्वाधिक वजनाची भर यांनीच घातली आहे. त्याखालोखाल पोलाद, वाळू, विटा, अॅसफाल्ट यांचा क्रम लागतो. वजनाच्या बाबतीत प्लॅस्टिकही मागे राहिलेले नाहीये.  
पृथ्वीवर मानव निर्मित वस्तूंची संख्या एवढी वाढली आहे की  २०२०च्या अखेरीस या वस्तूंचे वजन सर्व सजीवांच्या वजनापेक्षा (बायोमास) अधिक झाले आहे. इस्राईलमधील वाइजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधील संशोधकांनी याचा अभ्यास केला व त्याची माहिती नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध केली आहे. 

नव्या संशोधनानुसार २० व्या शतकाच्या सुरवातीला मानव निर्मित वस्तूंचे वजन पृथ्वीवरील `बायोमास` च्या वजनाच्या सुमारे तीन टक्के होते. ते आता २०२०च्या अखेरीस नैसर्गिक बायोमासपेक्षा जास्त म्हणजे १.१ टेराटन एवढे झाले आहे.  

वीस वर्षांत होईल दुप्पट
संशोधकांनी १९०० नंतर आतापर्यंत तयार केलेल्या प्रत्येक वस्तूच्या वजनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याची तुलना पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या वजनाशी केली. दररोजच्या वापरातील प्लॅस्टिकच्या वस्तूंपासून सिमेंट- काँक्रिटपर्यंतच्या गोष्टी आपण वापरतो. या वस्तूंचे वजन दर वीस वर्षांनी दुप्पट होत आहे. तर प्राकृतिक गोष्टींचे वजन कमी होत आहे. जंगले आणि सजीवांचा विनाश हे याचे प्रमुख कारण आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार केवळ प्लॅस्टिककच्या वस्तूंचे वजन सर्व जीव-जंतूंच्या वजनापेक्षा जास्त आहे. 

जमिनीवरील आणि समुद्रातील सर्व जीवांचे वजन ४ गिगाटन आहे, तर केवळ प्लॅस्टिकचे वजन ८ गिगाटन आहे. (एक गिगाटन म्हणजे एक हजार अब्ज किलो. तर एक टेराटन म्हणजे एक हजार गिगाटन) तसेच सर्व झाडे, वृक्ष, वनस्पती यांचे वजन ९०० गिगाटन आहे, तर सर्व इमारती, रस्ते आणि इतर बांधकामांचे वजन सुमारे अकराशे गिगाटन आहे. मानवनिर्मित वस्तूंध्ये रस्ते, घरे, मॉल, जहाजे, विमान, मोटारी, प्रिंटर, कप, स्मार्टफोन आणि आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. 

सध्याच्या वेगानेच मानवाने वस्तूंची निर्मिती कायम ठेवली तर, २०४० पर्यंत मानवनिर्मित वस्तूंचे वजन १.१ टेराटनांवरून ३ टेराटन एवढे होईल. याचा अर्थ असा आहे की माणूस दरवर्षी ३० गिगाटन वस्तूंची निर्मिती करत आहे. म्हणजेच पृथ्वीवरील ७.७ अब्ज मानवांच्या सरासरी वजना एवढ्या वजनाच्या नव्या वस्तू दर आठवड्याला तयार केल्या जातात. या सगळ्या संशोधनात मानवाने केलेले खाणींमधील उत्खनन गृहित धरलेले नाही. 

हे संशोधन आपले डोळे उघडणारे आहे. तसेच आपली जबाबदारी काय आहे हेही दाखवून देणारे आहे, असे मत या संशोधाचे सह लेखक रॉन मिलो यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आताच आपण जागे झालो नाही, तर येत्या काही वर्षांत आपण मोठ्या विनाशाच्या उंबरठ्यावर असू.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surendra Pataskar Writes about Human goods weight earth