सामाजिक अस्वस्थतेचे पर्व (१९६१ ते १९७०)

भारताच्या दृष्टीने साठचे दशक एका अर्थाने क्रांतिकारी बदलांचे दशक होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बदलांची नांदी घेऊन हे दशक आले.
pandit jawaharlal nehru
pandit jawaharlal nehrusakal
Summary

भारताच्या दृष्टीने साठचे दशक एका अर्थाने क्रांतिकारी बदलांचे दशक होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बदलांची नांदी घेऊन हे दशक आले.

भारताच्या दृष्टीने साठचे दशक एका अर्थाने क्रांतिकारी बदलांचे दशक होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बदलांची नांदी घेऊन हे दशक आले. विविध प्रकारची स्थित्यंतरे या कालावधीत झाली. देशाच्या प्रगतीची पायाभरणी करणारे दशक म्हणून याकडे पाहता येईल. आपल्या परराष्ट्र नीतीचा कसही याच कालावधीत लागला. चीनबरोबरील युद्धातील पराभवाची काळी किनार अनुभवली गेली. हरितक्रांतीची बीजेही या कालावधीत रुजण्यास सुरुवात झाली.

भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी १९६०च्या दशकात घडल्या. पोर्तुगिजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. १९ डिसेंबर १९६१ रोजी  भारतीय सेनेने  गोवा, दमण व दीव हा  पोर्तुगीज हिंदुस्थानातील  उर्वरित प्रदेश मुक्त केला.  दादरा व नगर हवेली  हा प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.

चीनबरोबरील युद्ध

उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव १९५०पासून वाढत होता. या तणावांची परिणती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली. हे युद्ध मॅकमोहन (१९६२) रेषेच्या क्षेत्रात झाले. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सीमाप्रश्न आणि तिबेटचा दर्जा या दोन प्रश्‍नांशी निगडीत आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. चीनचा दावा आहे की, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश (अरुणाचल प्रदेश) हा चीनचा भूप्रदेश आहे. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही.

तिबेट हे पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र होते, मात्र चीन त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला. ऑक्टोबर १९६२मध्ये चीनने भारताच्या‘ नेफा’ प्रांतावर आक्रमण केले.  चिनी लष्कराने पश्चिमेकडे आघाडी उघडून गलवान खोऱ्यातील १३ भारतीय ठाणी काबीज केली. तसेच, अक्साई चीनही ताब्यात घेतले. पंडित नेहरू यांनी ९ नोव्हेंबरला अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी दोन पत्रे पाठवून भारत-चीन सीमेवरील तणावाची कल्पना दिली आणि लष्करी मदत पाठवण्याची विनंती केली. नेहरूंनी मदतीसाठी इंग्लंडलाही विनंती केली. त्यामुळे पाश्चिमात्य गटांशी संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी चीनने भारत सीमेवरील व आत शिरलेले आपले सैन्य मागे घेण्याची एकतर्फी घोषणा केली. एवढ्या वर्षांनंतरही सीमावाद अद्याप सुटलेला नाही, अक्साई चीनवरील ताबाही चीनने सोडलेला नाही.

पंडित नेहरू ते इंदिरा गांधी

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. पं. नेहरू यांचे १९६४ मध्ये निधन झाले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांच्या कारकिर्दीत १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एक युद्ध झाले. सोव्हिएत युनियनने दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा लालबहादूर शास्त्रींनीच दिली. ताश्कंद येथे १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्रींचे निधन झाले. त्यानंतर १९६६ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे पंतप्रधापदाची सूत्रे झाली.

हरितक्रांतीची सुरुवात

भारताने स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून पावले टाकण्यास १९६०च्या दशकात सुरुवात केली होती. त्यात दोन महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. पहिली घटना म्हणजे हरितक्रांतीची सुरुवात. डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली १९६५ हरितक्रांतीची पाऊले टाकली गेली. त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. दुसरी घटना म्हणजे डॉ. व्हर्गिस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन (धवलक्रांती) मोठ्या प्रमाणावर वाढले.

मिझो बंड

भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझोबहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली. केंद्र सरकारने १९५४ मध्ये भाषावार प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या. मिझोंच्या नेत्यांनी स्वायत्त ‘मिझो’ प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली. १९५९मध्ये मिझोराम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला. या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लालडेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले. १९६१ मध्ये लालडेंगा यांनी ‘मिझो नॅशनल फ्रंट’या संघटनेची स्थापना केली. त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझोबहुल प्रांतांसाठी ‘ग्रेटर मिझोरम’ची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली. मार्च १९६६ मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने ‘स्वतंत्र मिझोराम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढले. १९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी आणि फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरामला घटकराज्याचा दर्जा देण्यात आला. लालडेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले.

नागालँडची निर्मिती

ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. काही सुशिक्षित नागा युवकांनी १९४६ मध्ये ‘नागा नॅशनल कौन्सिल’ या संघटनेची स्थापना केली. पुढे त्यांनी ‘नागालँड’ या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. त्यांचे नेतृत्व अंगामी झापू फिझो हे करत होते. १९५४ मध्ये ‘एनएनसी’ने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली. केंद्र सरकार आणि ‘एनएनसी’ यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. केंद्र सरकारने नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे ठरविले. नेफामधील नागाबहुल भाग आणि त्सुएनसाँगचा भाग एकत्र करून एक डिसेंबर १९६३ रोजी ‘नागालँड’ हे राज्य अस्तित्वात आले.

तिसरी पंचवार्षिक योजना (१९६१-१९६६) :

पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांचा अनुभव लक्षात घेऊन, तिसऱ्या योजनेत उद्योग व कृषीविकासाचे संतुलन साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडविणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगाराच्या संधींचा विस्तार हा मुख्य हेतू होता. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर तीन एकवार्षिक योजना (१९६६ ते १९६९) हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध यांमुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. चौथी पंचवार्षिक योजना १९६९पासून लागू करण्यात आली.

पाकिस्तानबरोबरील युद्ध

मार्च १९६५ नंतर कच्छ सीमेवरील पाकिस्तानी रेंजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. जनरल टिक्काखान याच्या नेतृत्वाखाली एक डिव्हिजन सीमेवर पोहचली. प्रथम भारतीय सीमा दलाची सरदार पोस्ट चौकी आणि त्यानंतर २४ एप्रिल १९६५ रोजी विगोकोट व बिअरबेट चौक्यांवर पाकिस्तानी सेनेने हल्ले चढवले. भारतीय लष्कराची एक डिव्हिजन सीमाभागात हलवण्यात आली. पाकिस्तानने घेतलेल्या चौक्यांवर हल्ले चढवून त्या परत घेण्यात आल्या. १६ मे १९६५ रोजी कारगिल क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने मर्यादित हल्ले चढवले. भारतीय सैन्याच्या १२१ इन्फन्ट्री ब्रिगेडने ते थोपवलेच, पण त्याशिवाय पॉइंट १३६२५ हा पाकिस्तानचा महत्त्वाचा मोर्चा जिंकला. पूर्वयोजनेनुसार जनरल अयुबखान यांनी घुसखोरीकरवी काश्मीरवर कब्जा करण्याची कारवाई एक ऑगस्टपासून सुरू केली. यासाठी एकूण तीस हजार भाडोत्री मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानी सैनिकांना गोळा करण्यात आले होते. घुसखोरीची माहिती मिळाल्यावर भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्याच्या ६८ माउंटन ब्रिगेडने उरी-पूँच रस्त्यावरील हाजीपीर खिंड जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. २४ ऑगस्टला कारवाई प्रारंभ करून ३० ऑगस्टपर्यंत अटीतटीच्या लढाईनंतर हाजीपीरवर कब्जा करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले. २० सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने युद्धविरामाचे आवाहन केल्यानंतर युद्ध संपले.

बँकांचे राष्ट्रीयीकरण

बँकिंग व्यवसायात खासगी क्षेत्राची मक्तेदारी होती. याला छेद देण्यासाठी सरकारने १९५५ मध्ये ‘इम्पिरिअल बँके’चे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी १९ जुलै १९६९ रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यांत अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शिअल बँक (युको बँक), युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश होता. याच बरोबर सुमारे ४०० संस्थानांना मिळणारा शाही भत्ता (प्रीव्ही पर्स) बंद केला गेला.

शालेय अभ्यासक्रम

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०मध्ये झाल्यानंतर सरकारने राज्यासाठी इयत्ता १ली ते ७ वी चा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या एस.टी.कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना १ जानेवारी १९६६ रोजी पुण्यात करण्यात आली. इयत्ता १० वी व १२ वी च्या शालान्त परीक्षा या मंडळामार्फत घेतल्या जातात.

कोठारी आयोग

डॉ.डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली १९६४ मध्ये आयोग नेमण्यात आला. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १०+२+३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. महाराष्ट्र राज्याने १०+२+३ ही शैक्षणिक रचना १९७२ मध्ये स्वीकारून १९७५ मध्ये दहावीची पहिली शालान्त परीक्षा घेतली.

अवकाश संशोधनाची सुरुवात

केरळमधील थुंबा येथे ‘थुंबा इक्विटोरियल लाँच सेंटर’ वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे १९६३ मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. १९६९ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या ‘रोहिणी-७५’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर अवकाश संशोधनासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली. इस्रोने आतापर्यंत ३६ देशांचे ३४६ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यात भारताच्या ४६ उपग्रहांचाही समावेश आहे.

यशस्वी हृदयशस्त्रक्रिया व जयपूर फूट

तमिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली ‘ओपन हार्ट शस्त्रक्रिया’ १९६२ मध्ये यशस्वी करण्यात आली. त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. ‘जयपूर फूट’च्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉ.प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने १९६८मध्ये कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. पाय दुमडणे, मांडी घालणे हे या कृत्रिम पायांमुळे शक्य झाले.

घटनाक्रम

१९६१

  • ४ मार्च : भारताची पहिली विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत नौदलात दाखल

  • १२ जुलै : पुण्यातील पानशेत धरण फुटले. सुमारे एक हजार जणांचा मृत्यू

  • १ सप्टेंबर : एनसीईआरटीची स्थापना

  • २ ऑक्टोबर : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना

  • १८ डिसेंबर : पोर्तुगिजांच्या ताब्यातून गोवा मुक्त

१९६२

  • १० फेब्रुवारी : विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना

  • १० ऑक्टोबर : भारत - चीन युद्धाला सुरुवात

  • २० ऑक्टोबर : काश्मीरमध्ये चीनची घुसखोरी, अक्साई चीनवर ताबा

  • २१ नोव्हेंबर : अरुणाचलमधून चीनचे सैन्य माघारी,

  • १९ डिसेंबर : दमण व दीवचा भारतात समावेश

१९६३

  • २१ नोव्हेंबर : भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे थुंबा येथून प्रक्षेपण

  • गोवंश विकसित करण्यासाठी इंडो-स्विस प्रकल्प केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मट्टुपेट्टी येथे सुरू

१९६४

  • फेब्रुवारी : नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडियाची पुण्यात स्थापना

  • ११ एप्रिल : भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट

  • २७ मे : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा पाच महिन्यांच्या आजारपणानंतर मृत्यू, गुलजारीलाल नंदा हे नऊ जूनपर्यंत हंगामी पंतप्रधान, त्यानंतर लालबहादूर शास्त्री नवे पंतप्रधान

  • १ जुलै : आयडीबीआय बँकेची स्थापना

  • २९ ऑगस्ट : विश्व हिंदू परिषदेची स्थापना

१९६५

  • १४ जानेवारी : भारतीय अन्न महामंडळाची स्थापना.

  • २६ जानेवारी : कलम ३४३(१)नुसार हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा

  • २९ मे : धनबाद कोळसा खाणीत अपघातात २७४ मृत्यू

  • ५ ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू.

  • ६ सप्टेंबर : भारतीय सैन्याचे लाहोरवर आक्रमण

  • ६-२२ सप्टेंबर : काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत-पाकिस्तान युद्ध झाले, ते २० सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने युद्धविरामाचे आवाहन केल्यानंतर संपले.

  • १ डिसेंबर : सीमांचे रक्षण करण्यासाठी विशेष दल म्हणून सीमा सुरक्षा दलाची स्थापना.

१९६६

  • ३ जानेवारी : ताश्कंद करारावर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्यात सहमती

  • ११ जानेवारी : पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कंदमध्ये निधन

  • १९ जानेवारी : इंदिरा गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे

  • २४ जानेवारी : एअर इंडियाचे मुंबईहून लंडनला जाणारे विमान माऊंट ब्लँकमध्ये कोसळले. ११७ जणांच्या मृत्यू, त्यात होमी भाभा यांचाही समावेश.

  • ६ जून : भारतीय रुपयाचे ५७ टक्क्यांनी अवमूल्यन करण्याचा इंदिरा गांधी मंत्रिमंडळाचा निर्णय

  • १९ जून : शिवसेनेची स्थापना

  • १ नोव्हेंबर : पंजाब, हरियाना या राज्यांची निर्मिती

  • १७ नोव्हेंबर : रीटा फारिया हिला मिस वर्ल्ड किताब, हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय

१९६७

  • २७ जानेवारी : बालभारतीची स्थापना

  • २७ मे : नक्षलवादी चळवळीला नक्षलबारीतून सुरू

  • ११ डिसेंबर : कोयनानगरमध्ये ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप, त्यात १७७ ते १८० जणांचा मृत्यू, २२७२ जखमी

१९६८

  • २९ फेब्रुवारी : पाँडेचेरीमध्ये ऑरोव्हिलोची स्थापना

  • १ एप्रिल : टाटा कन्सल्टन्सीची स्थापना

  • १२ एप्रिल : राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची निर्मिती

  • १२ एप्रिल : अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर भारत स्वाक्षरी करणार नसल्याची इंदिरा गांधी यांची घोषणा

१९६९

  • १४ जानेवारी : मद्रास राज्याचे नामकरण तमिळनाडू असे करण्यात आले.

  • १० मार्च : ‘सीआयएसएफ’ची स्थापना

  • १५ ऑगस्ट : भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) स्थापना

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट - एका गटाचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व मोरारजी देसाई यांच्याकडे

  • १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण

१९७०

  • ४ मार्च : महाराष्ट्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना

  • ७ सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com