esakal | अवकाशातही लष्कर दक्ष! (सुरेश नाईक)
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाशातही लष्कर दक्ष! (सुरेश नाईक)

सार  हे उपकरण रात्रीच्या अंधारातही भूभागाची चित्रे कशी घेऊ शकते हे समजावून घेऊ या. ऑप्टिकल कॅमेऱ्यामध्ये सूर्यप्रकाश वस्तूवर पडतो आणि परावर्तित झालेल्या किरणांद्वारा आपण वस्तूचे छायाचित्र घेऊ शकतो.

अवकाशातही लष्कर दक्ष! (सुरेश नाईक)

sakal_logo
By
सुरेश नाईक (srnaik39@gmail.com)

लष्करी आणि नागरी कारणासाठी वापरता येईल अशा उपग्रहांच्या मालिकेची सुरुवात इस्त्रोनं मागील आठवड्यात (ता. सात नोव्हेंबर) केली. ‘ईओएस -०१’हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आणि आणखी अन्य दोन प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलंय. श्रीहरीकोटा इथल्या शास्त्रज्ञांनी व त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य तंत्रज्ञांनी कोरोनाच्या धोक्याशी सामना करत सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून हे उद्दिष्ट पूर्ण केले. या प्रकल्पाचा वेध...

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर या इस्रोच्या अवकाशतळावरून उपग्रह प्रक्षेपणाच्या उत्साहवर्धक घटना अधून मधून देशातील जनतेला टीव्हीवर पाहायला मिळत होत्या; परंतु डिसेंबर २०१९ मधील ‘रिसॅट टू बीआरआय’ या मिशननंतर कोरोना जागतिक महामारीमुळं या अवकाशतळावरील हालचाली जवळजवळ थांबल्या होत्या; जणू दिवाळीच्या आगमनाचे स्वागत करीत, कोरोनाच्या निराशादायक वातावरणाला बाजूला सारत श्रीहरीकोटा पुन्हा एकदा दमदारपणे सक्रिय झाले आहे. ७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजून १२ मिनिटे या वेळी पीएसएलव्ही-सी४९ या यानाने ईओएस -०१ या आपल्या देशाच्या उपग्रहासह आणि बरोबर नऊ विदेशी उपग्रहांसहित दिमाखाने उड्डाण केले आणि सर्व उपग्रहांना २० कि.मध्ये एकामागून एक यशस्वीरीतीने त्यांच्या निर्धारित कक्षेत अचूकपणे प्रक्षेपित केले. उड्डाणाच्या आधी २६ तासांची उलटगणती (काउंट डाऊन) चालू होती. उड्डाणाची वेळ वास्तविक ३ वाजून २ मिनिटांची होती. परंतु त्या क्षणी हवामान खराब होते. नुसता बारीक पाऊस पडत असता तरी आपले यान उड्डाण करण्यास समर्थ होते; परंतु विजा चमकत होत्या. त्यामुळे उड्डाण पुढे ढकलणे भाग पडले. इस्रोचा बॅक प्लॅन तयार होता. पुढची ‘उड्डाण-विंडो’ ३-१२ ची होती. हवामान स्वच्छ झाले होते आणि उड्डाणाला गो संदेश मिळाला. या मोहिमेमधील उपग्रहांपैकी एक मुख्य उपग्रह भारताचा ईओएस-०१, लिथुआनिया देशाचा एक, लग्जमबर्गचे चार आणि अमेरिकेचे चार असे एकूण दहा होते. आत्तापर्यंत भारताने एकूण वेगवेगळ्या ३६ देशांचे एकूण ३२८ उपग्रह स्वतःच्या यानाद्वारे मायभूमीतून प्रक्षेपित करून १२३५ कोटी डॉलर्स कमावले आहेत. एकाच अग्निबाणाद्वारे १०४ उपग्रह सोडण्याचा वैश्‍विक विक्रमही भारताच्याच नावावर आहे. 

सात नोव्हेंबर रोजी झालेले उड्डाण हे ‘पीएसएलव्ही’ या अग्निबाणाचे ५१ वे उड्डाण होते. त्याने प्रक्षेपित केलेल्या भारताच्या ईओएस-०१ या उपग्रहामध्ये ‘सार’ हे उपकरण वापरण्यात आले आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे भू-निरीक्षण हे कोणत्याही हवामानात (आकाश मेघाच्छादित असतानाही) तसेच दिवस-रात्र करता येते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. शिवाय पृथ्वीपासून ५७५ कि.मी. इतक्‍या उंचीवर ध्रुवीय कक्षेत हा उपग्रह फिरत असताना पृथ्वीवरील २५ सें.मी. इतकी लहान वस्तूही तो ओळखू शकतो. हा उपग्रह रिसॅट (रडार इमेजिंग सॅटेलाईट) या साखळीतील आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सार  हे उपकरण रात्रीच्या अंधारातही भूभागाची चित्रे कशी घेऊ शकते हे समजावून घेऊ या. ऑप्टिकल कॅमेऱ्यामध्ये सूर्यप्रकाश वस्तूवर पडतो आणि परावर्तित झालेल्या किरणांद्वारा आपण वस्तूचे छायाचित्र घेऊ शकतो. ‘सार’ उपकरणाला सूर्यप्रकाशाची गरज पडत नाही. इमेजिंग रडार, रेडिओ वेव्हलेंग्थद्वारा ज्या भागाचे चित्रण करायचे आहे त्या भागावर स्पंदन लहरी सोडून त्याला ‘प्रकाशित’ करते. परावर्तित लहरींना रडारची अँटेना ग्रहण करते व त्यांना कंप्यूटरमध्ये स्ट्रो करण्यात येते. रडार चित्रामध्ये, प्रोसेसिंग करण्याआधी, परावर्तित झालेली फक्त एनर्जी दिसते. ‘सार’ उपकरण ‘एक्‍स-बॅंड’मधील रेडिओ वेव्हचा वापर करीत  असल्याने ते किरण ढगांना भेदून पृथ्वीपर्यंत पोचू शकतात; त्यामुळे हे उपकरण कोणत्याही हवामानात भूभागाची चित्रे घेऊ शकते. 

उपग्रहाची कार्यपद्धती 
या ६१५ किलो वजनाच्या उपग्रहाचं जीवितकार्य पाच वर्षांपर्यंत चालेल. तो दूर-संवेदक उपग्रह असून त्याची कक्षा ध्रुवीय (उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे) आहे. तो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा ९० मिनिटांत पूर्ण करतो. उपग्रहाच्या तुलनेत, पृथ्वी त्याच्या खालच्या बाजूला पश्‍चिमेकडून पूर्वेकडे अत्यंत कमी वेगाने फिरत असते. (२४ तासांत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा). उपग्रहावरील ‘सार’ उपकरणाच्या साह्याने, उपग्रह पहिल्या पृथ्वी प्रदक्षिणेत एका ठरावीक रुंदीच्या (उदा. ९० कि.मी.) पट्ट्यातील भागाची छायाचित्रे घेतो. ९० मिनिटांनंतर त्याची जेव्हा दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा सुरू होते तेव्हा पृथ्वी स्वतःभोवती काही अंशांनी फिरलेली असल्यामुळे, उपग्रह आधीच्या प्रदक्षिणेत व्यापलेल्या पुढच्या ९० कि.मी. पट्ट्याची छायाचित्रे घेऊ शकतो. अशा रीतीने ३-४ दिवसांच्या अवधीत सबंध पृथ्वीच्या पृष्ठभागाची छायाचित्रे उपग्रहाद्वारे मिळू शकतात.  या उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचे ग्रहण भू केंद्र (अर्थस्टेशन) करतात. डिजिटल किंवा रेडिओ ऊर्जेद्वारा मिळालेल्या माहितीचे प्रोसेसिंग करून छायाचित्रात किंवा नकाशात परिवर्तन करण्यात येते व ती माहिती संबंधित शास्त्रज्ञांकडे पुढील उपयोग करण्यासाठी सोपवली जाते. 

ईओएस-०१ चे उपयोग 
‘सार’ उपकरण बसविलेला अवकाशातील उपग्रह नागरी तसेच लष्करी उपयोगांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन बनलेले आहे. आर आय सॅट (रडार इमेजिंग सॅटेलाईट) श्रुंखला ही ‘इस्रो’ची पहिली, कोणत्याही हवामानात आणि दिवस-रात्र कार्यरत राहणारी उपग्रह पद्धती आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लष्करी उपयोग : वरील क्षमतेमुळे या उपग्रहांचा लष्करी सेवेसाठी खूप उपयोग होऊ शकतो. यापूर्वीचे उपग्रह ऑप्टिकल सेन्सर्स वापरत असल्याने ढगाळ हवामानामध्ये किंवा रात्री त्यांचा उपयोग करता येत नसे. २६ नोव्हेंबर २००८ च्या वेळेस मुंबईवर आतंकवादी हल्ले झाले तेव्हा आरआयसॅट-१ या पहिल्या उपग्रहाच्या विकसनाचे कार्य सुरू होते. परंतु मुंबईवरील हल्ल्यामुळे सीमेवरील सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आणि ती अधिक मजबूत करण्यासाठी इस्राईलकडून विकत घेतलेले ‘सार’ उपकरण वापरून इस्रोला ‘आरआयसॅट’ उपग्रह शक्‍य तितक्‍या लवकर म्हणजे एप्रिल २००९ मध्ये प्रक्षेपित करावा लागला. त्याचे रेझोल्यूशन १ मीटर होते. ‘इस्रो’ने त्याचे नामकरण आरआयसॅट-२ असे केले आणि त्याच्यापासून भारताची ‘आरआयसॅट’ उपग्रहांची अवकाशातली श्रुंखला सुरू झाली. शत्रूपक्षाच्या किंवा आतंकवाद्यांच्या समुद्रातील बोटींच्या हालचाली टिपण्यासाठी या उपग्रहांचा उपयोग होऊ शकतो. तसेच जमिनीवरील त्यांच्या व त्यांच्या युद्ध साहित्यांच्या हालचालीबद्दलही हे उपग्रह माहिती देऊ शकतात. 

एप्रिल-२००९ मध्ये विदेशी ‘सार’ उपकरणासह आरआयसॅट-२ चे प्रक्षेपण केल्यानंतर, ‘आरआयसॅट’ या पूर्णपणे स्वदेशी उपग्रहाचे प्रक्षेपण ‘पीएसएलव्ही’ या अग्निबाणाद्वारा श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या अवकाशतळावरून एप्रिल २०१२ मध्ये यशस्वीपणे करण्यात आले. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी ‘सार’ उपकरणाच्या विकसनाचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते आणि आरआयसॅट-१ उपग्रहामध्ये त्याचा वापर करून त्याची गुणवत्ता आणि विश्‍वसनीयता या दोन्ही गोष्टी सिद्ध केल्या होत्या. हे तंत्रज्ञान अत्यंत जटिल समजले जाते आणि त्याचे अत्यंत महत्त्वाचे उपयोग लक्षात घेता ‘आरआयसॅट-१’चे यश ही इस्रोची फार मोठी उपलब्धी होती. हा या श्रुंखलेतील २ रा उपग्रह होता. 

आरआयसॅट-२बी हा या मालिकेतील तिसरा उपग्रह मे २०१९ मध्ये यशस्वीपणे सोडण्यात आला. आरआयसॅट-१ या दुसऱ्या उपग्रहाचे आयुष्य संपुष्टात आले होते. त्यासाठी त्याची जागा भरून काढण्यासाठी २ बी उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे वैशिष्ट्य असे, की यावरील ‘सार’ या उपकरणाचे रेझोल्यूशन ०.५ मीटर इतक्‍या सूक्ष्म क्षमतेचे आहे. त्यानंतर या मालिकेतल्या चवथ्या उपग्रहाचे (आरआयसॅट-२बीआर१) प्रक्षेपण डिसेंबर २०१९ मध्ये यशस्वी रीतीने श्रीहरीकोटा येथून करण्यात आले. याचे मिशन आयुष्य पाच वर्षांचे आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो दोन वेगवेगळ्या रेझोल्यूशन मोड्‌समध्ये काम करू शकतो. १ मीटर आणि ०.५ मी. आयआरसॅट-२बीआर१ चे प्रक्षेपण ही पीएसएलव्ही या इस्रोच्या अत्यंत भरवशाच्या अग्निबाणाची ५० वी अवकाश झेप होती. 

नुकताच सोडण्यात आलेला ईओस-०१ (पूर्वीचे नाव आयआरसॅट-२बीआर२) हा या मालिकेतील ५ वा उपग्रह आहे. आयआरएसच्या नागरी सेवा : सूक्ष्म रेझोल्यूशनची क्षमता असणाऱ्या साधारणपणे सर्व दूर संवेदक उपग्रहांचा वापर दोन्ही प्रकारच्या उयोगासाठी (म्हणजे नागरी आणि लष्करी) करता येऊ शकतो; परंतु भारताचे काही उपग्रह केवळ लष्करी उपयोगासाठी वापरण्यात येत आहेत. सिव्हिलियन किंवा नागरी उपयोग कशा प्रकारचे असतात ते पाहुया आयआरएस उपग्रहांचा उपयोग समुद्र तसेच भूमीवर होऊ शकतो. 

समुद्रावरील उपयोग : माणसांमुळे मोठ्या प्रमाणात सांडण्यात आलेले तेल, रडार-इमेज ओळखू शकते व त्याबद्दलची माहिती उपग्रह पुरवू शकतो. तेलाच्या साठ्यापासून जी नैसर्गिक गळती होत असते त्याबद्दलची माहितीही उपग्रहापासून मिळू शकते. 

भूमीवरचे उपयोग : जमिनीचे मानचित्रण करता येते तसेच जमिनीचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जात आहे, याचाही नकाशा बनवता येऊ शकतो. याचे महत्त्व शेतकी आणि जंगलाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. पिकांच्या वाढीच्या प्रमाणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती या उपग्रहांकडून मिळालेल्या चित्रावरून मिळू शकते. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी उदा. भूकंप, महापूर, दुष्काळ आदी कोठे आणि कितपत नुकसान झाले आहे, याबद्दलची माहिती त्वरित मदत पोचवण्यास उपयोगी पडते. कोरोनाच्या आव्हानानंतरही इस्रोने ईओएस-०१ हा प्रकल्प पूर्ण केला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपग्रहनिर्मितीचे काम इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमधील प्रयोगशाळांमध्ये होते. मुख्य उपकरण (ज्याला पेलोड म्हणतात) ‘सार’ याची निर्मिती अहमदाबाद येथे, त्याची प्रणोदक प्रणाली वलाईमाला बेंगलोर येथे, त्याचा सांगाडा इंडस्ट्रीमध्ये, बाकीचे भाग आणि इंटिग्रेशन टेस्टिंग वगैरे इस्रोच्या बंगळुरू इथल्या स्पेस सेंटरमध्ये.   तसेच ‘पीएसएलव्ही’ रॉकेटची निर्मिती तिरुवनंतपुरम, श्रीहरीकोटा आणि जवळ ३०० हून अधिक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये होते. लक्षात घ्यायचा मुद्दा हा की यापैकी कोणतेही काम ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने होऊ शकत नाही. प्रत्येक प्रयोगशाळेत, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष यावे लागते. तेथे व्हर्च्युल काही शक्‍य नसते! याशिवाय देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ट्रान्सपोर्टेशन व शिपमेंट! या सर्वात मोठा ताण म्हणजे श्रीहरीकोटा येथे ३० दिवसांची लॉंच मोहीम! घड्याळाच्या काट्याच्या अचूकतेने सर्व गोष्टी चालायला हव्यात, त्याही इतके शास्त्रज्ञ, टेक्‍निशियन्स एका ठिकाणी प्रत्यक्ष जमून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाने कोरोनाच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीने घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पालन करून. आणि कोठेही गुणवत्तेशी बारीकशीही तडजोड न करता. अशाच प्रकारे देशासाठी झटत राहणारे ‘इस्रो’चे हे वैज्ञानिक व टेक्‍नीशियन्स नजीकच्या भविष्यकाळात पुढील तीन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करतील यात काही शंका नाही. पीएसएलव्हीद्वारे सीएमएस-०१, एएएलव्ही (स्मॉल सॅटेलाईट लॉंच व्हेईकल)द्वारे इओएस-०२ आणि जीएसएलव्ही-एफ१० द्वारे ईओएस-०३. हे तीन प्रकल्प आहेत.

loading image