'मृत्यू' एका अवकाश-स्थानकाचा (सुरेश नाईक)

सुरेश नाईक srnaik39@gmail.com
रविवार, 8 एप्रिल 2018

"द तियांगोंग-1' हे चीनचं अवकाशस्थानक 2 एप्रिल रोजी प्रशांत महासागराच्या विशिष्ट भागात कोसळलं. अवकाश-स्थानक कोसळण्याची स्थिती कशामुळं येते, त्यावर देखरेख कशा प्रकारे ठेवली जाते, या स्थानकांचं महत्त्व नक्की काय असतं आदी गोष्टींचा वेध.

"द तियांगोंग-1' हे चीनचं अवकाशस्थानक 2 एप्रिल रोजी प्रशांत महासागराच्या विशिष्ट भागात कोसळलं. अवकाश-स्थानक कोसळण्याची स्थिती कशामुळं येते, त्यावर देखरेख कशा प्रकारे ठेवली जाते, या स्थानकांचं महत्त्व नक्की काय असतं आदी गोष्टींचा वेध.

चीनचं अवकाश-स्थानक (स्पेस स्टेशन) "द तियांगोंग-1' (अर्थ : "स्वर्गीय महाल') सोमवारी (दोन एप्रिल) दक्षिण प्रशांत महासागराच्या क्षेत्रात सकाळी सव्वाआठ वाजता पृथ्वीच्या वायुमंडलात पोचलं. त्याचे जवळजवळ नव्वद टक्के भाग वातावरणात जळले गेले आणि दहा टक्के महासागरात कोसळले. महासागरात पडलेल्या या तुकड्यांचंच वजन आठशे ते नऊशे किलो एवढं होतं आणि ते तुकडे महासागरात शेकडो किलोमीटरच्या परिसरात पसरले असण्याची शक्‍यता आहे.

जमिनीवर कोणतीही हानी झाली नाही. एका छोट्या स्कूलबसच्या आकाराच्या, दोन खोल्या असलेल्या "तियांगोंग-1' स्पेस स्टेशनची लांबी 10.4 मीटर, व्यास 3.3 मीटर आणि वजन सुमारे 8.5 टन होतं. त्याच्या आतमध्ये 15 मीटर क्‍यूब एवढी जागा उपलब्ध होती- जिच्यात दोन अंतराळवीर आरामात राहू शकत होते. हे अवकाश-स्थानक 2011 मध्ये फक्त दोन वर्षांसाठी सोडण्यात आलं होतं. 2022 मध्ये कायमस्वरूपी अवकाश-स्थानक सोडण्याच्या प्रक्रियेतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याचा उपयोग अवकाशात मानवी; तसंच स्वयंचलित डॉकिंगचे प्रयोग करण्यासाठी झाला. हे अवकाश-स्थानक कार्यरत असताना अनेक चिनी अंतराळवीरांनी त्याच्यात मुक्काम करून बरेच प्रयोग केले. शिवाय
त्याच्यामध्ये एक शिक्षणवर्ग चालवला आणि त्याचं थेट प्रसारण चीनमधल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं.

कशामुळं कोसळलं अवकाश-स्थानक?
"तियांगोंग-1' अवकाश-स्थानकाशी मार्च 2016 पासूनच संपर्क तुटला होता आणि ते अवकाशात पृथ्वीभोवती अनियंत्रित स्वरूपात घिरट्या घालत होतं. ते भू-केंद्राच्या संपर्कात असेपर्यंत आणि त्याच्यामध्ये इंधन शिल्लक असेपर्यंत ते पूर्णपणे नियंत्रणात होतं. पृथ्वीजवळच्या कक्षेत थोड्या प्रमाणात का होईना, काही हवेचे परमाणू अस्तित्वात असतात. त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणामुळं अवकाशयान आपली कक्षा सोडून खाली यायला लागतं. त्याच्या कक्षेचा हा ऱ्हास भू-केंद्राद्वारे संदेश पाठवून दुरुस्त करता येतो. मात्र, एकदा का यानाशी संपर्क तुटला, की हा ऱ्हास भरून काढणं अशक्‍य होतं आणि हळूहळू ते यान खालीखाली यायला लागतं. अशा प्रकारे खाली येत ते पृथ्वीपासून सुमारे शंभर किलोमीटरच्या उंचीवर आल्यानंतर वातावरणाशी होणाऱ्या तीव्र घर्षणामुळं त्याचा नाश होतो. "तियांगोंग-1' अवकाश-स्थानकाशी चीनचा असलेला संपर्क 2016च्या जूनमध्ये तुटला. मे 2017मध्ये ते पृथ्वीपासून 218 मैल (350.83 किलोमीटर) उंचीवर होतं. तिथून खाली येतयेत अखेर दोन एप्रिलला त्याचा शेवट झाला.

अवकाश-स्थानक कसं असतं?
या प्रकारच्या अवकाश-स्थानकामध्ये अंतराळवीरांच्या राहण्याची सोय असते. पृथ्वीवरून अंतराळवीरांची आणि सामानाची ने-आण करण्यासाठी इतर अवकाशयानाशी जोडण्याची (डॉकिंग) सुविधा त्यांच्यामध्ये असणं आवश्‍यक असतं. ही स्थानकं साधारणपणे चारशे ते सहाशे किलोमीटर उंचीवरच्या कक्षेत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतात. या उंचीवर प्रत्येक दिवशी ती चौदा ते पंधरा प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यांच्या कामाचं स्वरूप अवकाशातल्या प्रयोगशाळेसारखं असतं. कारण त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण जवळजवळ शून्य आणि अतिस्वच्छ अशी स्थिती असते. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. उदाहरणार्थ, शून्य गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत दीर्घकाळ राहण्यामुळं मानवी शरीरावर होणारा परिणाम, पिकांचं उत्पादन, औषधांची निर्मिती, संयुक्त धातूंची निर्मिती इत्यादी. परग्रहांवर किंवा लघुग्रहांवर मानवी वसाहत स्थापन करण्यासाठी ज्ञान मिळवणं; तसंच पृथ्वीवरचं जीवनमान सुधारणं हे उद्देश या प्रयोगांमागं प्रामुख्यानं असतात.

इतर अवकाश-स्थानकं
सॅल्यूट- 1 (1971) ते सॅल्यूट- 7 (1991 पर्यंत अवकाशात) : (तत्कालीन) सोव्हिएत रशिया
स्काय लॅब (1973 ते 1979) ः नासा
मिर (1986 ते 2001) ः रशिया.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (1998 ते आजतागायत) ः नासा, युरोपीय अंतराळ संस्था, जाक्‍सा (जपान), आणखी काही देश.
तियांगोंग-2 (2016 ते आजतागायत) ः चीन

"स्काय लॅब'च्या कचऱ्यामुळं दंड
"स्काय लॅब' स्थानक (77 टन) हे 1979 मध्ये असंच संपर्क तुटल्यामुळं अनियंत्रितपणे पृथ्वीवर कोसळलं आणि त्याच्या तुकड्यांमुळं ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहराजवळ मोठ्या प्रमाणात कचरा पसरला. त्याबद्दल अमेरिकेला ऑस्ट्रेलियाला चारशे डॉलर दंड द्यावा लागला.

मृत यानांची "स्मशानस्थळं'
चिनी अवकाशशास्त्रज्ञांचा "तियांगोंग-1'वरचा ताबा सुटला होता आणि त्याचे जे भाग जळले नाहीत ते प्रशांत महासागरातल्या उपयोगात नसलेल्या दूरवरच्या भागात भिरकावले गेले. हे स्थानक पृथ्वीच्या वातावरणात कोणत्या ठिकाणी प्रवेश करेल याबद्दल अनिश्‍चितता होती; परंतु योगायोगाची गोष्ट म्हणजे हे अवकाश-स्थानक नियंत्रणाखाली असतं, तरी शास्त्रज्ञांनी त्याच जागी त्याला उतरवलं असतं. या "पाण्याखालील उपग्रहांच्या स्मशानस्थळा'चं नाव "पृथ्वीवरचा सर्वांत दुर्गम भाग' (पोल ऑफ इनॅक्‍सेबिलिटी) असं आहे.

पॉइंट नेमो ः मृत उपग्रहांच्या आणि यानांच्या "दफना'च्या दोन जागांपैकी एक आहे प्रशांत महासागराच्या मध्यभागी, न्यूझीलंडच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे चार हजार किलोमीटर अंतरावर. या भागाला "पॉइंट नेमो' असंही म्हणतात. हे नाव जुल्स वार्न या फ्रेंच विज्ञानलेखकाच्या कादंबऱ्यांतल्या ("ट्‌वेंटी थाऊजंड लीग्ज अंडर द सी'-1870 आणि "द मिस्टिरिअस आयलॅंड'-1874)) पाणबुडीच्या कप्तानाच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. लॅटिन भाषेत "नेमो' याचा अर्थ "कोणीही नाही' असाही होतो. हे ठिकाण निवडायचं कारण म्हणजे ते किनाऱ्यापासून सर्वांत दूर आहे, त्या भागात बोटी क्वचितच जातात. त्यामुळं कोसळणाऱ्या यानांच्या तुकड्यामुळं जीवितहानीची शक्‍यता नगण्य आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे मृत उपग्रहांचे आणि काही अवकाश-स्थानकांचे न जळलेले भाग इथं पडून आहेत. या भागात आतापर्यंत उतरलेलं सर्वांत मोठं स्थानक म्हणजे रशियाचं मिर हे स्थानक. त्याचं वजन एकशे वीस टन एवढं होतं. अतिभव्य, चारशे वीस टन वजनाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची इतिश्रीही 2024 मध्ये इथंच होईल.

अवकाशातली स्मशानकक्षा ः प्रशांत महासागरातली उपग्रह-दफनभूमी हे एकच विश्रांतीस्थान नाही. 36 हजार उंचीवरच्या विषुववृत्ताला समांतर पातळीत पृथ्वीभोवतीची कक्षा ही अत्यंत महत्त्वाची कक्षा आहे- कारण त्या कक्षेतले उपग्रह पृथ्वीच्याच (स्वत:भोवती फिरणाऱ्या) गतीनं आणि त्याच दिशेनं (पश्‍चिमेकडून पूर्वेकडं) फिरतात. त्यामुळं दोघांची तुलनात्मक गती शून्य असते. त्यामुळं पृथ्वीवरच्या कोणत्याही बिंदूवरून त्या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाकडे पाहिल्यास तो एका जागी स्थिर आहे, असं वाटतं. त्यामुळं या कक्षेला "भूस्थिर'कक्षा असं म्हणतात. भूस्थिर कक्षेतल्या उपग्रहांचे टीव्ही प्रसारण, टेलिफोन संदेश देवाणघेवाण यांसारखे अनेक महत्त्वाचे उपयोग आहेत. भूस्थिर कक्षेतल्या उपग्रहांचं उपयुक्त आयुर्मान संपत येतं, तेव्हा त्यामधलं उरलेलं इंधन वापरून त्याला दोनशे किलोमीटर वर ढकललं जातं. या कक्षेत सर्व मृत उपग्रह फिरत असतात. त्यामुळं उपग्रहांना कायमची विश्रांती देण्याचं हे दुसरं स्मशानस्थळ आहे.

प्रशांत महासागरातली उपग्रहांची दफनभूमी ही पृथ्वीजवळच्या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांसाठी वापरली जाते, तर दूरच्या कक्षेतल्या उपग्रहांसाठी अवकाशातल्या स्मशानकक्षेचा उपयोग करण्यात येतो.

"तियांगोंग -1'वर देखरेख
तियांगोंग- 1चं ट्रॅकिंग तीन प्रकारच्या साधनांद्वारे करण्यात येत होतं. पृथ्वीवर उपलब्ध असलेली रडार्स, टेलिस्कोप्स आणि अवकाशातली उपग्रहीय टेलिस्कोप्स यांच्या साह्यानं. ज्या वस्तूचं ट्रॅकिंग करायचं आहे, ती वस्तू रडारच्या बीममध्ये येते, तसं त्या वस्तूचं रडारपासूनचं अंतर आणि तिची दिशा याबद्दलची माहिती मिळू शकते. अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या रडारपासून मिळालेल्या माहितीचं संकलन करून त्या वस्तूचा मार्ग शास्त्रज्ञ ठरवू शकतात. ही क्रिया खूपच गुंतागुंतीची असते- कारण अवकाशात हजारो उपग्रह फिरत असतात. अशा परिस्थितीत कॉंप्युटरद्वारे मॉडेलिंगची मदत घ्यावी लागते. त्याशिवाय "तियांगोंग-1'वर सतत नजर ठेवण्यासाठी अमेरिकेच्या भूस्थिर कक्षेतल्या इन्फ्रारेड टेलिस्कोपचं साह्य घ्यावं लागलं.

Web Title: suresh naik write article in saptarang