अवकाशतळाच्या अंतरंगात... (सुरेश नाईक)

अवकाशतळाच्या अंतरंगात... (सुरेश नाईक)

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा (इस्रो) अवकाशतळ श्रीहरिकोटा इथं आहे. उपग्रहाचं प्रक्षेपण होण्याआधी अनेक घडामोडींचा साक्षीदार असलेला हा अवकाशतळ. इस्रोतर्फे शुक्रवारी शंभराव्या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं. त्या निमित्तानं या अवकाशतळासंबंधी माहिती.

श्री हरीकोटा. ‘चेन्नईपासून सुमारे शंभर किलोमीटर उत्तरेस असलेलं, बंगालच्या उपसागरातलं एक बेट. आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातल्या सुलूरपेट या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या बेटावरती मनुष्यवस्ती अगदी तुरळक आहे. इथं आहे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन स्पेस सेंटरमधला, उपग्रह सोडण्याचा अवकाशतळ. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा उत्कृष्ट अवकाशतळ. (केनेडी स्पेस सेंटर या अमेरिकेच्या अवकाशतळाचा पहिला क्रमांक आहे.) ध्रुवीय कक्षेत फिरणाऱ्या भारताच्या दूरसंवेदक (रिमोट सेन्सिंग) उपग्रहांचं प्रक्षेपण दक्षिणेला करायचं असतं. तिकडे हिंदी महासागर असल्यानं उड्डाणाच्या दृष्टीनं तो सुरक्षित टापू आहे. भारताचे दुसऱ्या प्रकारचे उपग्रह (कम्युनिकेशन्स आणि टीव्हीच्या प्रसारणासाठी लागणारे ‘इन्सॅट’ मालिकेचे) विषुववृत्तीय कक्षेत फिरतात. त्यांचं प्रक्षेपण पूर्वेकडे करायचं असतं. त्या दिशेला बंगालचा उपसागर असल्यानं तोही सुरक्षित भाग आहे. शिवाय पृथ्वी स्वत:भोवती पश्‍चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पूर्वेकडे प्रवास करणाऱ्या या अग्निबाणांना त्याचा फायदा होतो.

श्रीहरीकोटाचा हा अवकाशतळ १९७४पासून आतापर्यंत एकूण ६०हून अधिक अवकाशमोहिमांचा साक्षीदार आहे. यातल्या अनेक मोहिमांचा साक्षीदारच नव्हे, तर भागीदारही होण्याची संधी मला लाभली. कारण उपग्रहाचा गाभा समजल्या जाणाऱ्या ‘पेलोड’ नावाच्या उपकरणाच्या निर्मितीची जबाबदारी माझ्याकडं होती.

उपग्रहातल्या ‘पेलोड’ या उपप्रणालीचं महत्त्व
उपग्रहाचं जीवनकार्य करणाऱ्या त्यामधल्या सर्वांत महत्त्वाच्या उपकरणाला ‘पेलोड’ असं म्हणतात. इस्रोच्या अहमदाबाद इथल्या ‘स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर’ (सॅक) या केंद्राकडे उपग्रहांचं डिझाइन आणि त्यांची निर्मिती करण्याची जबाबदारी होती. ‘भास्कर-१’ हा इस्रोचा पहिलावहिला उपयोजित (ॲप्लिकेशन्स) उपग्रह. (त्याआधीचा ‘आर्यभट्ट’ हा उपग्रह वैज्ञानिक संशोधनासाठी होता.) या ‘पेलोड्‌स’च्या निर्मितीच्या विभागाचं उत्तरदायित्व, तत्कालीन संचालक प्रा. यशपाल यांनी, अगदी प्रारंभापासून (भास्कर- १पासून) माझ्याकडे सोपवलं.

उपयोजित उपग्रहमोहिमेत उपग्रहाच्या जीवितकाळापर्यंत पेलोडचं कार्य सुरळीतपणे होतं राहणं अत्यावश्‍यक असतं. समजा अग्निबाणानं आपलं काम उत्कृष्टपणे पार पाडून उपग्रहाला त्याच्या कक्षेत अचूकतेनं प्रक्षेपित केलं; उपग्रहाच्या इतर सर्व प्रणालींनीही आपापली कामं चोखपणे बजावली; परंतु ‘पेलोड’प्रणालीमध्ये त्रुटी निर्माण झाली, तर सबंध मोहीम पूर्णपणे अयशस्वी झाली, असं समजण्यात येतं आणि शेकडो कोटी रुपये, तसंच अनेक शास्त्रज्ञांची वर्षांची मेहनत व्यर्थ जाते.

अग्निबाण आणि उपग्रह यांचं एकत्रीकरण
सॅक, अहमदाबाद इथं ‘पेलोड’ पूर्णपणे तयार करायचा, त्याला ट्रकमधून बंगळूरला पाठवायचं. तिथल्या इस्रो सॅटेलाइट सेंटर (आयझॅक) या ठिकाणी उपग्रहाच्या बाकीच्या भागांचं डिझाइन आणि त्यांच्या निर्मितीचं काम होतं. आयझॅकमधे पेलोडचं उपग्रहाशी एकत्रीकरण करायचं. संपूर्ण उपग्रहाच्या सर्वांगीण चाचण्या करायच्या आणि नंतर त्याला श्रीहरिकोटाला पाठवायचं. अग्निबाणाचे सारे भाग तिरुअनंतपुरमहून श्रीहरीकोटा इथं पाठवण्यात येतात. तिथं अग्निबाणाचं एकत्रीकरण करून त्याच्या माथ्यावर उपग्रहाला बसवण्यात येतं. सर्व काही आलबेल आहे याची खात्री करून घेतल्यानंतर त्याला उड्डाणमंचावर स्थानापन्न करण्यात आल्यानंतर योग्य वेळी येणारा तो उलट-गणतीचा रोमांचक क्षण! ‘Lift-off’ (अग्निबाण उड्डाणमंच सोडून आकाशात झेपावतो ती क्रिया.) श्रीहरीकोटा इथून झालेल्या उड्डाणांचं टीव्हीवर थेट प्रसारण केलं जातं. अवकाशतळाच्या अंतरंगात जाऊन त्याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ या.

४५ दिवसांची उड्डाणमोहीम
उड्डाणाच्या निर्धारित दिवसाच्या सुमारे ४५ दिवस आधी शास्त्रज्ञांचे थवे आवश्‍यकतेप्रमाणं श्रीहरीकोटा इथं यायला लागतात. रोज २४ तास काम सुरू असतं. शास्त्रज्ञांचा मोठा समुदाय उड्डाणतळावर नेमून दिलेली आपापली कामं शांतपणे करण्यात मग्न असतो. प्रत्येक शास्त्रज्ञ रोज १२ तास काम करायच्या तयारीनंच आलेला असतो. वर लिहिल्याप्रमाणं अग्निबाणाचं एकत्रीकरण, त्याच्यावर उपग्रहाची स्थापना, प्रत्येक टप्प्यानंतरच्या समग्र चाचण्या इत्यादी क्रिया पूर्ण केल्या जातात. ठिकठिकाणी सुरक्षा अधिकारी दिसत असतात. त्यानंतर अत्यावश्‍यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही उड्डाणतळावर हजर राहण्याची परवानगी नसते. आता नियंत्रण कक्षातही हालचालींना सुरवात होते.

उड्डाणाचा दिवस
वातावरणात उत्साह जाणवत असतो. सकाळची न्याहरीसुद्धा खास असते! इडली, वडा, उपमा डोसा याशिवाय पोंगल, अप्पम, म्हैसूरपाक इत्यादी पदार्थ असतात. उड्डाणमंचापासून सुरक्षित अंतरावर नियंत्रण कक्ष आहे. इथं पन्नासहून अधिक शास्त्रज्ञ सातत्यानं समोरच्या मॉनिटरवर वेगवेगळे पॅरामीटर्स तपासत असतात.

उड्डाणाला हिरवा कंदील
वरिष्ठ शास्त्रज्ञांकडून उड्डाणाच्या तयारीसंबंधी आढावा (फ्लाइट रेडीनेस रिव्ह्यू) घेण्यात येतो. प्रत्येक शास्त्रज्ञाच्या जबाबदारीची उजळणी करण्यात येते. अग्निबाण आणि उपग्रह यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष तपासून ते समाधानकारक असल्याची खात्री झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशीच्या उड्डाणाची परवानगी दिली जाते.

तीस तासांची उलटगणती
‘गो अहेड’ दिल्यानंतर सुमारे तीस तासांच्या उलटगणतीला सुरवात होते. त्याच्यानंतर द्रवरूप प्रणोदक (प्रॉपेलंट) उपग्रहांच्या टाक्‍क्‍यांमध्ये भरण्याची आणि बॅटऱ्या चार्ज करण्याची क्रिया सुरू होते.

  •   ‘Lift-off’ च्या आधी पाच तास : जीपीएस आणि रेडिओसोनिक उपकरणांनी सज्ज असलेले बलून्स एकेक तासानं वरच्या वातावरणात उडवण्यात येतात आणि त्यांच्याद्वारे वाऱ्याची दिशा आणि त्याचा वेग यांची माहिती मिळत राहते.
  •   Lift-off ला दोन तास बाकी : मरीन आणि एअर ट्रॅफिक कमांडतर्फे संबंधित वातावरणाचा आणि समुद्राचा भाग उड्डाणासाठी रिकामा करण्याची सूचना देण्यात आलेली असते.
  •   एक तास बाकी : वाऱ्याविषयी अद्यावत मिळालेली माहिती अग्निबाणाच्या प्रणालीमध्ये प्रोग्रॅम केली जाते. त्याचा उपयोग अग्निबाणाच्या उड्डाणास विरोध करणाऱ्या शक्तींवर मात करण्यासाठी होतो.
  •   उड्डाणाला तीस मिनिटं बाकी : इंधनाच्या टाक्‍यांमधल्या बाष्पीभवनामुळं कमी झालेल्या प्रणोदकाला टॉप-अप करण्यात येतं. टाक्‍यांमध्ये हवेचे बुडबुडे राहू नयेत यासाठी हेलियम वायूला उच्च दाबाखाली इंजेक्‍ट करण्यात येतं.
  •   वीस मिनिटं बाकी : उपग्रहाची ‘पॉवर : ‘स्विच ऑन!’ नियंत्रण कक्षातले शास्त्रज्ञ डोळ्यांत तेल घालून उपग्रहाच्या हृदयाचे ठोके आणि अग्निबाणाची नाडी यांच्यावर नजर ठेवून असतात.
  •   पंधरा मिनिटं बाकी : उपग्रह आणि अग्निबाण यांच्या प्रोजेक्‍ट डायरेक्‍टरकडून अनुक्रमे ‘गो’ सिग्नल.
  •   दहा मिनिटं बाकी : संपूर्ण सिस्टिम संगणकांच्या हवाली. अग्निबाणाच्या वेगवेळ्या भागांकडून मिळालेल्या माहितीचं ग्रहण करून संगणकाद्वारे काही दोष उद्भवला आहे का याची तपासणी. आवश्‍यकता वाटल्यास संगणक या दहा मिनिटांत कोणत्याही क्षणी उड्डाण थांबवू शकतो.
  •   एक मिनिट बाकी : उलटगणती सेकंदांमध्ये चालू. आता नियंत्रण कक्षातलं वातावरण काहीसं तणावपूर्ण आणि उत्कंठावर्धक.
  •   उड्डाणाला एक सेकंद बाकी: lift-off: पुढच्या क्षणाला कानठळ्या बसवणारा आवाज आणि नारिंगी रंगाच्या ज्वाळांच्या लोटांमध्ये मोठ्या दिमाखात ‘लिफ्ट-ऑफ’चा तो रोमांचक आणि नियंत्रण कक्षातला हर्षपूर्ण क्षण!

व्हिजिटर्स गॅलरीतून पाहिलेलं उड्डाण
एक अनुभव : मला आठवतं, मी एकदा एका विद्यार्थ्यांच्या गटाला उड्डाण दाखवायला श्रीहरीकोटा इथं नेलं होतं. व्हिजिटर्स गॅलरीतून उड्डाण पाहण्याचा तो माझा एकच अनुभव होता. (बाकीची उड्डाणं नियंत्रण कक्षातून पाहिलेली). अग्निबाणानं आकाशात झेप घेतली तो क्षण- काही जण टाळ्या वाजवत होते, काहींच्या चेहऱ्यावर हसू होतं. काहींना उड्डाणाच्या तांत्रिक बाबी कळल्या नसतील; पण सर्व जण नक्कीच भारावून गेलेले मात्र दिसले. सर्वांना एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली होती, की आज आपण काहीतरी खूपच खास अनुभवलेलं आहे. काहींच्या डोळ्यात मी अश्रूही पाहिले... सूर्याकडं पाहिल्यानं होते का ते? का देशाबद्दलच्या अभिमानानं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com