तरुणांबाबतच्या प्रश्‍नांचा यथोचित ऊहापोह (सुरुची खाडिलकर)

सुरुची खाडिलकर
रविवार, 3 मार्च 2019

गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या कादंबऱ्या फारशा आवडत नाहीत. हळुवारपणे; परंतु कमी वेगानं चित्रीत केलेली कथानकंसुद्धा त्यांना कंटाळवाणी वाटतात. आजच्या युवा वाचकांना वास्तववादी, वेगवान, सर्वस्पर्शी, जागतिक संदर्भ आणि स्थानिक जाणिवा एकाच वेळी मांडणारी कादंबरी आवडते.

गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या कादंबऱ्या फारशा आवडत नाहीत. हळुवारपणे; परंतु कमी वेगानं चित्रीत केलेली कथानकंसुद्धा त्यांना कंटाळवाणी वाटतात. आजच्या युवा वाचकांना वास्तववादी, वेगवान, सर्वस्पर्शी, जागतिक संदर्भ आणि स्थानिक जाणिवा एकाच वेळी मांडणारी कादंबरी आवडते. बदललेल्या वेगवान आणि स्पर्धात्मक अशा आजच्या काळात या युवकाला मनोरंजनासोबत थोडं सहज मिळणारं प्रबोधनही आवडतं.
आजच्या काळातले हे बदललेले निष्कर्ष आपण डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या "बदल' या कादंबरीला लावल्यास ती बहुतांशी खरी उतरते. ही कादंबरी म्हणजे वेगवेगळ्या जातींमधल्या पाच मित्रांची एक गोष्ट आहे, जी वाचकाला एकाच वेळी जगण्याच्या अनेक परिमाणांवर विचार करायला लावते. असं करताना वाचक नकळतपणे कादंबरीतल्या विविध घटनांमध्ये स्वत:ला पाहू लागतो आणि आपल्याच वागण्याचं सामाजिक, भावनिक, तार्किक आणि सांस्कृतिक विश्‍लेषण करू लागतो. डॉ. जाखोटिया यांच्या लेखनाचं मोठं यश असं, की ते कोणतीही सक्ती न करता विवेकी पद्धतीनं वाचकांसमोर विविध प्रश्न उभे करतात आणि कादंबरीच्या वेगवान घटना आणि संवादांमधून त्यांची उत्तरंही देतात.

अनेक पात्रं आणि अनेक घटना मांडताना लेखक आपल्या लेखनाची लय कुठंही हरवत नाही. बुद्धिबळाच्या डावातल्या खेळ्या तो एकापाठोपाठ एक वेगानं खेळत जातो आणि वाचकाला गुंगवत जातो. असं करत असताना तर्काचा आधार घेत आजच्या युवकांना सातत्यानं भेडसावणारे प्रश्न तो बिनदिक्कतपणे उपस्थित करतो आणि त्यांची मनमोकळी चर्चा घडवून आणतो. यासाठी "विश्वबंधू' या हुशार आणि बहुआयामी पात्राचा चपखलपणे उपयोग या कादंबरीत करण्यात आला आहे. जाखोटिया हे उत्तम कवी असल्यानं त्यांनी काही ठिकाणी आपल्या स्वरचित कवितांचा अत्यंत खुबीनं वापर केला आहे. न्यूयॉर्क, मुंबई आणि सोलापूर अशा तीन अगदी भिन्न प्रकारच्या शहरांमध्ये कादंबरी घडत जाते नि म्हणून लेखकानं वेगवेगळ्या सामाजिक संदर्भांचं इथं चांगलं भान ठेवलं आहे.

सध्याच्या अत्यंत गढूळ झालेल्या सामाजिक वातावरणात युवावर्ग पुरता गोंधळलेला आहे. त्याची वैचारिक बैठक तितकी पक्की नसल्यानं आणि विवेकी मार्गदर्शनाची वानवा असल्यानं छोट्या छोट्या समस्यांनी तो गांगरून जातो. जाखोटिया हे स्वत: एक नामांकित व्यवस्थापकीय सल्लागार असल्यानं प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न या कादंबरीतही दिसून येतो. "भारताला पुढं न्यायचं असेल, तर आपल्याला सर्वसमावेशकतेनंच वाटचाल करावी लागेल. यासाठी आमची वैचारिक स्पष्टता महत्त्वाची. जात- धर्म- प्रथा- परंपरा आणि तत्सम गोष्टींतल्या भेदभावाचा आपण तयार केलेला एकूणच भूलभुलैया आपल्याला सर्वांगीण प्रगतीपासून रोखतो आहे. आपण भारतीय तर आहोत; पण एकजिनसी आहोत का, अनेक आव्हानं आपण स्वत:च निर्मिलेली आहेत. विज्ञान आणि विवेक, राष्ट्रभक्ती आणि वैश्विकता, प्रज्ञा आणि माणुसकी अशा बऱ्याच गोष्टींमधलं संतुलन आपण साधायला हवं,' असे मुद्दे जाखोटिया यांच्या या कादंबरीतून पानोपानी अधोरेखित होतात.

सर्व साहित्यिक मूल्यांवर ही कादंबरी चोख कामगिरी करते. ती वाचताना वाचक आपलं भान हरपून जातो. जाखोटिया सिद्धहस्त लेखक असल्याने ही कादंबरी मराठी लेखनक्षेत्रातला एक उल्लेखनीय प्रयत्न ठरेल. मोठा अनुभव गाठीशी असल्यानं जाखोटिया यांचं लेखन नेहमीच सशक्त वाटलं आहे. "बदल' ही कादंबरी त्यांच्या या सकसपणाची यथोचित साक्ष देते.

पुस्तकाचं नाव : बदल : एकविसाव्या शतकाची कादंबरी
लेखक : डॉ. गिरीश जाखोटिया
प्रकाशक : उज्ज्वल प्रकाशन, मुंबई
पानं : 366, किंमत : 360 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suruchi khadilkar write book review in saptarang