एक संवाद निसर्गाशी, स्वत:शी! (सुशेन जाधव)

सुशेन जाधव
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पर्यटन, निसर्ग आणि नातेसंबंधातले बारकावे टिपणं आणि ते लेखणीतून मांडणं प्रत्येकाला शक्‍य होत नाही. शक्‍य झाल्यास त्याची वाचनीयता टिकवणंही कठीण असतं. राधिका टिपरे यांच्या "आठवणीतील पाऊलवाटा' हे पुस्तक यास अपवाद ठरतं. पुस्तकातून त्या वाचकांचा निसर्गाशी संवाद घडवून आणतात.

पर्यटन, निसर्ग आणि नातेसंबंधातले बारकावे टिपणं आणि ते लेखणीतून मांडणं प्रत्येकाला शक्‍य होत नाही. शक्‍य झाल्यास त्याची वाचनीयता टिकवणंही कठीण असतं. राधिका टिपरे यांच्या "आठवणीतील पाऊलवाटा' हे पुस्तक यास अपवाद ठरतं. पुस्तकातून त्या वाचकांचा निसर्गाशी संवाद घडवून आणतात.

"इमली' या शेळ्या चारणाऱ्या मुलीनं सांगितलेल्या उपायानं लेखिकेचा आजारी मुलगा बरा होतो. यातून तिच्याशी लेखिकेचा संवाद वाढत जातो. टिपरे यांना बाग लावणं व ती वाढवणं याची आवड असल्याचं दिसतं. पानगळबाबत त्या म्हणतात : "एखादी दुसरी आठवण येताच जखमेवरची खपली निघावी तसं भळभळायला लागतं, त्यामुळंच की काय जाणे मला पानगळीचे दिवस अजिबात भावत नाहीत हेच खरं!' लेखिका मूळच्या कोल्हापूरच्या; पण विवाहानंतर त्या औरंगाबादला गेल्या. तिथं त्यांना वळवाचा पाऊस तीस वर्षांत तीन- चार वेळाच भेटला, याची खंत त्यांनी पुस्तकात व्यक्त केली आहे. पतीच्या कामानिमित्त कोकणात रोह्याजवळच्या धाटाव या छोट्याशा गावात राहायला गेल्या असताना त्यांना आदिवासी लोकजीवन पाहायला मिळालं. त्यांना निर्सगात फिरणं आणि त्याच्या सहवासात राहणं आवडत असल्यानं त्या बऱ्याचदा जंगल सफारी, गिर्यारोहण करण्यात रमलेल्या दिसतात. निसर्ग आणि माणूस यांची तुलना करताना टिपरे या गुलमोहराचं उदाहरण देतात. त्या म्हणतात : "स्त्रीचं आणि वृक्षाचं जगणं किती समांतर असतं नाही? रुजायचं, वाढायचं.. नंतर मुळापासून उखडलं जाऊन दुसरीकडच्या मातीत पुन्हा रुजायचं. माती कशीही असो, स्वत:च्या मुळांना घट्ट रोवायचं.'

लेखिका पक्ष्यांचं बारकाईनं निरीक्षण करत असल्याचं पुस्तकातल्या लेखांवरून जाणवतं. त्या जेव्हा स्वत:च्या नवीन बंगल्यात राहायला गेल्या, तेव्हा साळुंकीनं शटरच्या वळचणीला घरटं बनवायला सुरवात केल्याचं निरीक्षण त्यांनी पुस्तकात नोंदवलं आहे. लेखिकेला वेरुळ लेण्यांचा अभ्यासासाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. मात्र, पुढं त्या अभ्यासासंदर्भात पुस्तकात वाचायला मिळत नाही. एका लेखानिमित्त त्यांनी ठाण्यातल्या मानसोपचार रुग्णालयाला भेट दिली. तिथं त्यांना जोसेफ नावाचा रुग्ण भेटला. त्यानं लेखिकेला पत्राद्वारे जे सांगितलं आणि त्याबाबत डॉक्‍टरांनी दिलेलं स्पष्टीकरण याबाबत लेखात मांडलेले विचार वाचकालाही विचार करायला भाग पाडतात.

"मी हिमालयाची भक्ती करते, हिमालय माझ्यासाठी तीर्थस्थळ आणि मी वारकऱ्यांप्रमाणं त्याच्या भेटीला जाते,' या शब्दांत त्या हिमालयाविषयी प्रेम व्यक्त करतात. पती चंडीगडला रुजू झाले, तेव्हा त्यांनाही त्यांच्याबरोबर जावं लागलं. तिथं लेखिकेला विरंगुळा आणि दिलासा देणारं ठिकाण होतं ते म्हणजे त्यांच्या घरासमोरचं जॉगिंग पार्क. परदेशात स्थायिक झालेल्या मुलांना आपल्या आई-वडिलांच्या एकटेपणाविषयी काहीच कसं वाटत नाही असा प्रश्‍न त्या उपस्थित करतात. कपाट आवरताना टिपरे यांना मुलगा सारंग व मुलगी मेघन यांच्या लहानपणीच्या वस्तू दिसतात, त्या वस्तूंशी असलेल्या आठवणींत त्या काही काळ बुडून जातात. युक्रेन देशातली सून मरीना. तिची आई नीना ही एक चांगली विहीण असल्याचं त्या सांगतात. युक्रेन या देशातल्या शहरांत फिरताना लेखिकेचा चिमुकला नातू आर्यन त्यांना दुभाषक होऊन मदत करतो. एकूणच हे पुस्तक कोणत्याही लेखापासून वाचलं, तरी कंटाळा येत नाही. वाचकांनी सहज कुठंही, कधीही वाचावं असं हे पुस्तक.

पुस्तकाचं नाव : आठवणीतील पाऊलवाटा
लेखिका : राधिका टिपरे
प्रकाशक : कृष्णा प्रकाशन, पुणे (9371093245)
पृष्ठं : 229/ मूल्य : 260 रुपये

Web Title: sushen jadhav write book review in saptarang