आठवणींचा बहारदार कोलाज

साहित्याच्या खेळपट्टीवर ५० ते ६० वर्षांची प्रदीर्घ लेखंदाजी करून शिरीष कणेकर यांनी तब्बल तीन पिढ्यांना आपल्या शब्दसामथ्याने रिझवलं.
Dhol Tashe book
Dhol Tashe booksakal

साहित्याच्या खेळपट्टीवर ५० ते ६० वर्षांची प्रदीर्घ लेखंदाजी करून शिरीष कणेकर यांनी तब्बल तीन पिढ्यांना आपल्या शब्दसामथ्याने रिझवलं. कणेकरांची तरुण, देखणी आणि बहारदार लेखनशैली एकत्रित कोलाज स्वरूपात अनुभवायची असेल तर त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘ढोल ताशे’ पुस्तक आवर्जून वाचायला हवं.

पत्रकारिता, चित्रपट, संगीत, क्रिकेट आणि ललित लेखन क्षेत्रात तब्बल सहा दशकं सातत्याने लेखन करणारे शिरीष कणेकर आज आपल्यात नसले, तरी त्यांची पुस्तकं अजूनही आपल्याशी संवाद साधतात. तोही अगदी खट्याळ, मिश्कील आणि खुमासदार पद्धतीने.

साधी-सोपी अन् ओघवती भाषा, विषयापासून न भरकटता हाणलेले शालजोडीतले फटकारे, एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून एका क्षणात नकळत जमिनीवर आणण्याची किमया, शब्दांची चौफेर उधळण, अफाट स्मरणशक्ती, अचाट माहितीसंग्रह, दांडगा जनसंपर्क आणि नात्यांची सुरेल गुंफण, असा सारा मामला कणेकरांच्या नुकतंच प्रकाशित झालेल्या‘ढोल ताशे’ पुस्तकामध्ये जमून आला आहे.

‘ढोल ताशे’ पुस्तक म्हणजे कणेकरांचे अनुभव, कल्पनारंजन, हिंदी चित्रपट-संगीत, जुन्या पिढीतील गायक, अभिनेते-अभिनेत्री, क्रिकेट-क्रिकेटपटू, मित्रमंडळी, आई-वडील, आजी-पणजोबा-मुलगा आणि विनाकारण पडणारे प्रश्न यांची मिसळ आहे. जी कधी झणझणीत वाटते, तर कधी डोळ्यात पाणी आणते... पुस्तकात अजब निरीक्षणं त्यांनी नोंदवली आहेत.

एके ठिकाणी कपिल शर्माच्या निमित्ताने कॉमेडियन्सचा उल्लेख आहे. त्या वेळी ओघाने राहुल गांधी यांचं नाव येतं... ते खटकत नाही. कोणाचाही उपमर्द न करता लिखाणात असा खुसखुशीतपणा आणणं कणेकरच जाणोत. साधारण अडीचशे पानी पुस्तकातील त्यांच्या तब्बल ७३ लघुकथांत अशी रुचकर वाफाळलेली ‘कणेकरी’ तुम्हाला तरोताजा करते. पोटभर जेवणानंतर आपण तृप्तीचा ढेकर देतो ना अगदी तसाच फिल येतो.

पुस्तकाची सुरुवात कणेकरांच्या आवडीचा विषय असलेल्या क्रिकेट खेळाने होते. त्यांचा जाड चष्मेवाला मित्र आवेशाने बोलत असतो आजच्या क्रिकेट संघाबद्दल... काही खेळाडूंच्या निवडीबद्दल त्याला आक्षेप असतो. ‘अख्खा संघच बदलला’ अशा शीर्षकाची कथा वाचतानाच अंदाज येतो की, पुढे काय फटकेबाजी होणार आहे ते... कणेकरांची प्रत्येक कथा अवघ्या तीन पानांत आटपते. कुठेही पाल्हाळ नाही.

‘बाप’ नावाच्या कथेत वडील आणि मुलाच्या नात्यातील अनोखे बंध पाहायला मिळतात. पोरांच्या नशिबाला पडलेली भोकं जो आपल्या बनियनवर बाळगतो तो बाप, असं साधंसोपं गणित ते मांडतात. काही कथांत त्यांनी आपला जीवनप्रवासच उलगडला आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या अनेक मित्रांची मदत घेतलीय. काही कडू-गोड आठवणी मांडल्या आहेत. मग त्यात दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर आहेत.

पु. ल. देशपांडे, सी. डी. देशमुख, तलत मेहमूद, नौशाद, मदनमोहन, ओ. पी. नय्यर, महमद रफी, किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे, सचिन तेंडुलकर, शाहरूख खान, नाना पाटेकर, कंगना रानौत, पृथ्वी शाॅ इत्यादींचाही उल्लेख आहे. सर्वांच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार त्यांनी त्यांची मांडणी केली आहे.

आपल्या लाडक्या दिलीप कुमार यांच्यावर आणि क्रिेकेट खेळावर त्यांनी अगदी मनापासून लिहिलंय. चित्रपटावर विशेष प्रेम म्हणून त्यातील अनेक संवाद आपल्याला त्यांच्या कथांत दिसतात; पण त्याचा नेमका अर्थ तुम्हाला कणेकरांची लेखणीच समजावून सांगते, हेही एक वैशिष्ट्यच...

‘वो दिन कहाँ गये बता’ कथेत जुन्या हिंदी गीतांचा आढावा कणेकरांनी घेतला आहे. आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा त्यातून होतो. प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र यांची एक आठवण सांगताना कणेकर एके ठिकाणी म्हणतात, की त्यांनी लता मंगेशकर यांचा उल्लेख ‘एक चांगला टेपरेकॉर्डर, बाकी काही नाही’ असा केला होता.

कणेकर लता मंगेशकर आणि दिलीपकुमार यांचे परमभक्त. अर्थातच त्यांना ते काही पटलं नाही म्हणून त्यांनी आपल्या कथेत सलग १२ ते १५ गाण्यांची उदाहरणं देत ‘हाच तो चांगला टेपरेकॉर्डर’ असं एका ठिकाणी निक्षून सांगितलं आहे. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी एकट्या लतादीदींना तब्बल ३११ गाणी दिल्याचं सांगत त्यांनी दीदींची महती अधोरेखित केली आहे... लतादीदींविषयींचा त्यांचा आदर प्रस्तुत उदाहरणात प्रकर्षाने जाणवतो.

कणेकरांना हिंदी चित्रपट, संगीत आणि कलाकारांविषयी किती अगाध ज्ञान होतं हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं. अनेक गाजलेले चित्रपट आणि गाण्यांची पुनर्भूती त्यांनी आपल्याला करून दिली आहे. त्यांच्या अफाट माहितीसंग्रहाची झलक त्यातून जाणवते. एका कथेत एके ठिकाणी पूर्णिमा अर्थात मेहेरबानू महंमद अली नावाच्या एका सहनायिकेचा उल्लेख आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीची अप्सरा साक्षात मधुबाला हिच्या ‘बादल’ चित्रपटात सहनायिकेच्या भूमिकेत असलेल्या पूर्णिमाच्या वाट्याला तीन गाणी कशी आली, असा प्रश्न कणेकरांना सतावतो. आता ही पूर्णिमा कोण, तर अभिनेता इम्रान हाश्मी याची ती आजी आणि महेश भट यांची मावशी... हे आपल्याला माहीत असायचं काहीच कारण नाही; पण कणेकरांचं सूक्ष्म निरीक्षण त्यातून दिसतं.

असंच एक उदाहरण त्यांनी मधुबाला आणि वहिदा रहमान यांच्यामधील संवादाचं दिलं आहे. मधुबाला यांना एका असाध्य आजाराने ग्रासलं होतं, तेव्हा वहिदा रहेमान त्यांना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा, ‘खबरदार जर माझ्या युसुफला जाळ्यात ओढशील तर... आता लवकरच आमचं लग्न होणार आहे’ असं मधुबाला यांनी वहिदा यांना ठणकावून सांगितलं होतं म्हणे...

जेव्हा युसुफ म्हणजे दिलीप कुमार मधुबाला यांना अखेरच्या काळात भेटायला गेले होते तेव्हा त्या विषण्ण हसत म्हणाल्या होत्या, ‘आखिर आपको आपकी शहेजादी (म्हणजे सायराबानू) मिल ही गयी...’ अशी वदंता कानावर आली होती, असं कणेकर लिहीत असले, तरी तेव्हा परिस्थितीही तशीच होती, हे नाकारता येत नाही. कणेकरांचं असं चौफर माहितीजाल पुस्तकाच्या पाना-पानात आपल्यावर गारूड करत राहतं आणि आपण नकळत त्या काळात त्या ठिकाणी पोहचतो...

कशासंग्रह : ढोल ताशे

कथाकार : शिरीष कणेकर

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

पुष्ठसंख्या : २४९

किंमत : ३६० रुपये

sushil.amberkar@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com