भारताच्या ‘स्पिरीट’ची जगाला नशा!

भारतात बनलेल्या ‘इंद्री दिवाली कलेक्टर एडिशन २०२३’ला जगातील बेस्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला. दारू वाईट गोष्ट असू शकते; पण कोणत्याही क्षेत्रात नंबर एकचा किताब जिंकणं भारतीयांसाठी आजही मोठं अप्रूप आहे.
Spirit
Spiritsakal

भारतात बनलेल्या ‘इंद्री दिवाली कलेक्टर एडिशन २०२३’ला जगातील बेस्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला. दारू वाईट गोष्ट असू शकते; पण कोणत्याही क्षेत्रात नंबर एकचा किताब जिंकणं भारतीयांसाठी आजही मोठं अप्रूप आहे आणि त्याच पारड्यात तोलायचं झालं तर ‘इंद्री’ची स्तुती व्हायला हरकत नाही. जी गोष्ट प्रमाण मानली गेली ती प्रस्तुत करणं एवढ्याच शुद्ध हेतूने आपण त्याकडे पाहू. बाकी, ‘दारू पिना स्वास्थ्य के लिए हानिकारक है’ एवढं मात्र लक्षात असू द्या...

‘ती’ आली, तिने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं, अशी घडी काही दिवसांपूर्वी आली होती; पण आपण ती मिस केली. ‘ती’च्या जिंकण्याचं सेलिब्रेशन व्हायला हवं होतं, पण ते झालं नाही. आपण उत्सवप्रिय भारतीय एवढ्या मोठ्या विजयाचा उन्माद करायचं चक्क विसरूनच गेलो. नाही म्हणायला काही प्रमाणात कधी तरी आपल्या प्रत्येकाच्या जल्लोषात ‘ती’ सहभागी होत आलीय.

म्हणजे आपणच ‘ती’ला मानाचं निमंत्रण देतो, मोठ्या उत्साहात घरी आणतो, कमालीच्या आदराने ‘ती’ ग्लासात ओततो आणि ‘ती’चं गुणगान करत ‘एकच प्याला’ रिचवतो तेव्हाचा आनंद काय वर्णावा! ‘ती’च्या प्रत्येक घोटाबरोबर जालिम दुनियेचा कडवटपणा अमृततुल्य मानून घेणारा मद्यप्रेमी जेव्हा नशिल्या हिंदोळ्यावर स्वार होत ‘परग्रहा’वर पोहचतो ना तेव्हाचा त्याचा तृप्त समाधानी चेहरा कमालीचा गोजिरवाणा भासतो.

जणू काही ‘सुखी माणसाचा सदरा’ त्यालाच गवसलाय... मी बोलतोय ते एका मदिरेबद्दल. म्हणजेच मद्य किंवा दारूनामक (अ)पेयाबद्दल... भले मद्यात काही क्षण का होईना, जगाचं भान विसरून बेधुंदपणे जगायची हिंमत देण्याची ताकद असली, तरी ते आजही आपल्याकडे वर्ज्य मानलं जातं. सवतीच्या भाळी जसं परकेपणाचं दुःख असतं तशी वेदना जगातल्या कोणत्याही मदिरेच्या पोटी आजही आहे.

ते खरंही आहे, तरीही आज तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे शौकीन अतिसामान्यापासून उच्चभ्रूपर्यंत प्रत्येक वर्तुळात आहेतच... तर अशांसाठी एक गौरवास्पद बातमी काही दिवसांपूर्वी आली. भारतात बनवण्यात आलेल्या एका दारूने जगातील सर्व व्हिस्कींना मागे टाकत चक्क पहिला क्रमांक पटकावला. तिचं नाव, ‘इंद्री’.

आपल्या हरियाना राज्याची निर्मिती असलेला ‘इंद्री’ ब्रॅण्ड जागतिक मद्यपटलावर सध्या मान उंचावून उभा आहे. जगातले इतर सगळे अत्युच्च ब्रॅण्ड आज तिच्यासमोर पाणी भरताहेत... स्कॉच, बोर्बन्स आणि अमेरिकन, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन अन् ब्रिटिश सिंगल मॉल्टसह शंभरएक वेगवेगळ्या व्हिस्कींची चव चाखल्यानंतर ‘इंद्री’ सर्वोत्कृष्ट ठरली.

‘इंद्री’ची कथा सुरू होते १९९५ मध्ये. ‘पिकॅडली डिस्टिलरीज’ नावाच्या एका उद्योगसमूहाने हरियानातील एका छोट्या गावात जमीन खरेदी केली. त्या गावाचं नाव इंद्री. तिथे उसाचं पीक मोप येत असल्याने एक साखर कारखाना ‘पिकॅडली’ने सुरू केला. आज त्याच उद्योगसमूहाने गावाच्याच नावाने ‘इंद्री’ व्हिस्की लॉन्च केलीय.

‘पिकॅडली डिस्टिलरी’ यमुना नदीकाठी असल्याने हिमालयातील ताजं फेसाळतं पाणी अगदी सहज उपलब्ध होतं. व्हिस्की बनवण्यासाठी त्याचा खुबीने वापर केला गेला. व्हिस्कीची नजाकत ठरते ती पाण्याच्या आणि बार्ली (जवस) धान्याच्या दर्जावर. साहजिकच यमुनेचं पाणी जिरवलेली आणि बार्लीने परिपूर्ण असलेली ‘इंद्री’ व्हिस्की अनेकांच्या पसंतीस उतरतेय.

बोर्बन्स व्हिस्की, वाइन्स आणि शेरी बरीच वर्षं टाकून मुरवलेल्या लाकडांच्या पिंपांत मिसळून ती कमालीची चविष्ट झालीय म्हणे. थ्रीनी म्हणजेच, द थ्री वूड... तीन वेगवेगळ्या लाकडी पिंपांत टाकून ब्लॅक टी, ओक, व्हॅनिला आणि कॅरेमलमध्ये घोळवलेल्या अननसाची चव तिच्यात पेरण्यात आलीय. अशा प्रकारचं युनिक टेक्निक वापरण्यात आल्याने तिला आलेला सोनेरी तपकिरी रंग नजरेत भरतो, असं मद्य जाणकार सांगतात...

‘इंद्री’चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती आहे, ‘नॉन चिल फिल्टर्ड व्हिस्की.’ तिच्यात सगळे प्रोटिन, न्यूट्रिशियन्स, फॅट आणि ऑइल शाबूत आहे. बाजारात मिळणाऱ्या ९५ टक्के व्हिस्की ‘चिल फिल्टर्ड’ असतात. त्यातून प्रोटिन, न्यूट्रिशियन्स, फॅट आणि ऑइल काढून टाकलं जातं. व्हिस्कीचा अस्सल रंगही त्यामुळे निघून जातो. एखाद्या स्फटिकासारखी चकचकीत दिसते ती.

मग अशा ब्लेंडेड व्हिस्कीमध्ये अॅडिशनल कलर टाकला जातो; पण त्यामुळे तिचा जातिवंत गंध निघून जातो. ‘नॉन चिल फिल्टर्ड’मुळे व्हिस्कीचा सोनेरी तपकिरी गडद रंग शाबूत राहतो. गंधही मंत्रमुग्ध करतो. म्हणूनच पट्टीचे मद्यपटू तरंगविहार करायचं असेल तर ‘नॉन चिल फिल्टर्ड’ व्हिस्कीचा पर्याय सुचवतात.

‘इंद्री’ आपल्या देशात मात्र अजूनही सर्वत्र उपलब्ध नाही. पंजाब, दिल्ली, गोवा, मुंबई, बेंगळुरू इत्यादी ठिकाणच्या मदिरालयात ती मिळते; पण तीही शोधून काढावी लागते. इंग्लंड, स्कॉटलंड आणि अमेरिकेसारख्या देशांत मात्र ती सहज उपलब्ध आहे. एके काळी सिंगल मॉल्ट व्हिस्कीच्या दुनियेत परदेशांत भारतीय बनावटीच्या व्हिस्कीची नेहमी खिल्ली उडवली जायची.

आज मात्र जगातील मद्यप्रेमींना भारताने दिलेली एक अनमोल भेट म्हणून ‘इंद्री’कडे पाहिलं जातंय. ‘इंद्री’ची निर्मिती करण्यामागे भारत जगातील सर्वात उंची मद्य बनवू शकतो, एवढंच सिद्ध करायचं होतं. म्हणूनच तिच्या निर्मितीची प्रक्रिया जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं...

भारताच्या मद्यभरारीची सुरुवात झाली, ती ‘अमृत’मुळे. ती पहिली स्वदेशी सिंगल मॉल्ट व्हिस्की. बेंगळुरूच्या एका मराठी कुटुंबाच्या घरात तिचा जन्म झालाय. ‘अमृत’ नावाचा ब्रॅण्ड आज मद्याच्या दुनियेत भारताचं नाव रोशन करतोय. व्हिस्की भारतीय, पण ती नावाजली गेली परदेशात, असं काहीसं ‘अमृत’च्या बाबत झालं.

तोपर्यंत सारे मदिराभक्त स्कॉटलंडच्या स्कॉचमध्येच न्हाऊन निघायचे. साहेबांच्या देशातल्याच व्हिस्कीचं आपल्याकडच्यांनाही कोण अप्रूप होतं. एक पट्टीतले मद्यबहाद्दर अधे-मधे ‘अमृत’चे एखाद्-दोन प्याले घोळवायचे. ती असामी मला एकदा भेटली, एका गेट-टुगेदरमध्ये.

मी आपला माझ्या कंपूत शांतपणे आपला नेहमीचा टिपिकल ब्रॅण्ड नव्या उत्साहाने रिचवत होतो (हो, आपण सामान्य माणसं दारू रिचवतो आणि उच्चभ्रू ड्रिंक्स घेतात) तेव्हाच त्यांचं आगमन झालं. मला म्हणाले, कधी ‘अमृत’चा आनंद घेतला का? मला तेव्हा काहीच कळलं नाही. डिलक्स, सुप्रीम, स्पेशल, ब्लेंडेंड इत्यादी गोंडस लेबलांच्या पलीकडे कधी न गेलेला मी चमकलोच.

तेव्हा ते म्हणाले, ‘अमृत’ व्हिस्कीची चव घ्या. तिचा प्रत्येक प्याला एखाद्या कवितेप्रमाणे भासतो. प्रत्येक कडव्यात नवा आशय... नवी नशा. तर, अशा अमृत सिंगल माल्ट व्हिस्कीचा उगम नव्वदच्या दशकात मराठमोळ्या राधाकृष्ण जगदाळे यांच्या डिस्टिलरीत झालाय. त्यांनी त्यासाठी स्वत: बार्ली पिकवून घेतली होती म्हणे. पण, भारतातील सिंगल माल्ट म्हणून सुरुवातीला ती कोणाच्या घशाखाली उतरली नाही.

हळूहळू तिच्या चवीची अन् गंधाची ओळख झाली. तिचा हलकासा घोट मद्यप्रेमींच्या पंचेंद्रियांना सुखावू लागला. लंडनमध्ये ती रुळली आणि नंतर युरोपमध्ये तिने बाळसं धरलं तेव्हा कुठे तिला अवघ्या जगाने आपलंसं केलं. २०१० मध्ये जगभरातल्या मद्यगुरूंनी तिचा समावेश जगातल्या उत्तम व्हिस्कींमध्ये केला. त्याच पंक्तीत आता ‘इंद्री’ जाऊन बसलीय.

इंद्री एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ इंद्रिय. दारूमुळे पंचेंद्रियं जागरूक होतात म्हणे. असो... इंद्रीला याआधीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १०० पैकी तब्बल ९१ गुण मिळाले आहेत. दोन वर्षांतच तिनं चांगलं नाव कमावलंय. त्यासाठी फार कष्ट उपसावे लागतात. राजस्थानच्या बुंदी गावातील बार्ली उत्पादकांचा रोल ‘इंद्री’च्या यशात मोलाचा ठरतो.

सहा रांगांच्या लागवड पद्धतीचा वापर करून तिथे बार्लीचं उत्पादन घेतलं जातं. (जगात उच्च मानल्या जाणाऱ्या स्कॉटलंडची बार्ली दोन रांगांच्या लागवडीतून पिकवतात). बार्लीचं पीक हाताने काढलं जातं. केवळ उत्तम प्रतीची बार्ली पाण्यात बुडवून अंकुरित केली जाते. सुमारे आठवडाभर जंतुनाशक केल्यानंतर बार्ली ग्रीन माल्टमध्ये परावर्तित होते. ती भट्टीवर वाळवून विशिष्ट तापमानात भाजली जाते. त्यानंतर तिला धुरकट चव येते.

त्यानंतर अनेक प्रक्रियेतून जात व्हिस्की परिपक्व होते. दरम्यान तिची अद्वितीय चव वाढवली जाते. भारतीय तापमानाचाही त्यात महत्त्वाचा रोल आहे. स्कॉटलंडच्या तुलनेत आपल्याकडची व्हिस्की वेगाने मुरते, असं म्हटलं तरी चालेल. म्हणूनच ती एक प्रीमियम आणि किफायतशीर मानली जाते.

महाराष्ट्रात ती ५१०० रुपयांच्या आसपास मिळते, असं म्हणतात. सध्या ती भारतातील १९ राज्यं आणि जगातील १७ देशांमध्येच उपलब्ध आहे. ‘इंद्री’चं वैशिष्ट्य म्हणजे ती लाँच होऊन केवळ दोन वर्षं झाली आणि आतापर्यंत १४ हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार तिने पटकावले आहेत.

असो, एकंदरीत आपल्या संस्कृतीत आजही दारू वर्ज्य मानली जाते. कोणी कितीही दावे करत असले, तरी मद्य पिण्याचे फायदे कमी आणि तोटेच जास्त आहेत. मद्य म्हणजे चंगळवाद, दुष्कर्म आणि पाश्चिमात्यांच्या पापाचं अनुकरण मानलं जातं. पण, ब्रिटिशांनी दिलेला क्रिकेट खेळ जसा आपण मोठ्या मनाने आपलासा केला आणि त्यात महारथ मिळवली तशीच त्यांची व्हिस्कीतली मक्तेदारी मोडून काढली, याचंही सेलिब्रेशन व्हायला हरकत नसावी... मद्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही; पण भारताच्या ‘स्पिरीट’ची जगाला नशा झाली, हेही खरंच की!

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com