Yash Chopra
Yash Choprasakal

तू मेरी चांदणी....

असं म्हणतात, की दिवंगत निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी सिनेमांतून आपणा सर्वांना प्रेम करायला शिकवलं. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘किंग ऑफ रोमान्स’ ठरलेल्या यशजींविषयी...

असं म्हणतात, की दिवंगत निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी सिनेमांतून आपणा सर्वांना प्रेम करायला शिकवलं. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘किंग ऑफ रोमान्स’ ठरलेल्या यशजींविषयी...

आपण प्रत्येक जण कधी ना कधी तरी प्रेमात पडतोच. षोडशवर्षीय असतो तेव्हाच त्याची सुरुवात होते. हृदयात गिटार वाजत असते अन् प्रत्येक ‘फुलपाखरा’ने आपलाच परागकण टिपावा, असं वाटतं. असं का? तर त्याचं उत्तर लैला-मजनू, हिर-रांझा, वासू-सपना किंवा सोनी-महिवालही देऊ शकणार नाहीत.

गेला बाजार ‘कयामत से कयामत तक’मधले राज आणि रश्मीही नाही... अरे, प्रेम करायचं तर आपण का मरायचं? आपल्या प्रेमासाठी आपण लढायला हवं ना, असं काहीसं आम्हाला तेव्हा वाटायचं, पण त्या राज-रश्मीने पार गोंधळात टाकलं. ‘रोके कब रुकी है, मंज़िल प्यार की... ए मेरे हमसफर’ म्हणता म्हणता जीव गमावून बसतात... धाबे दणाणले की हो आमचे. प्रेम करावं की नको, असा यक्षप्रश्न पडला.

त्यानंतर आला दुसरा ‘प्रेम’वीर, ‘यही सच है, शायद मैंने प्यार किया’ असं म्हणत, पण तोही शेवटी प्रेमापोटी सर्वस्वाचा त्याग करून खडीच फोडताना दिसला. झाली ना पंचाईत... ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा प्रश्‍न तेव्हा आमच्यासारख्यांना पहिल्यांदा पडला. मग ‘हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी में...’ गाणं आपलं मानून आम्ही आमचा ‘प्रेमाचा सिलॅबस’ गुंडाळून टाकला आणि सो-कॉल्ड करियरवर लक्ष दिलं...

वयाच्या सोळाव्या वर्षी कोणाला माहीत होतं, की प्रेमाच्या गोंडस कप्प्यात खानदान की इज्जत, जाती-धर्माचा संघर्ष, उच्च-नीचतेचा बडेजाव आणि गरीब-श्रीमंतीतील चटके दडून बसलेत ते. फक्त रोमांच आणि रोमान्स एवढे दोनच शब्द गोड वाटायचे. आपल्याला बोट धरून कोण प्रेम शिकवत नाही.

ते प्रत्येक मनुष्यप्राण्यात उपजतच असतंच, पण जेव्हा त्यातलं सौंदर्य, नजाकत, सच्चेपणा, गांभीर्य, विश्वास, विरह, चलबिचल, द्वेष, मत्सर, हिंमत आणि त्याग अनुभवतो ना तेव्हाच त्याचा कस लागतो... प्रेम मोजणं आणि समजणं कठीण आहे. अशाच प्रेमाची महती आपल्या मनात बिंबवणारा एक बाप माणूस बॉलीवूडनामक इंडस्ट्रीत होऊन गेलाय. त्याचं नाव यश चोप्रा.

तब्बल २२ क्लासिक कलाकृतींचा कर्ताकरविता आणि वयाच्या ८० व्या वर्षीही ‘जब तक है जान’सारखा सच्च्या प्रेमाचा पट मांडणारा ‘किंग ऑफ रोमान्स.’ अखेरपर्यंत ते आपल्या सिनेमांत प्रेमाचा त्रिकोण मांडत आले. तीन बिंदू सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात, असं आपण शाळेत शिकलो होतो; पण यशजींनी ती व्याख्याच विसरायला लावली. कारण त्यांच्या सिनेमात असलेला प्रेमाचा त्रिकोण कधीच सरळ रेषेत नव्हता.

शाहरूख खाननेही त्यांना एका मुलाखतीत विचारलं होतं, ‘असले अतरंगी प्रेमपट का बनवता, ज्यात हिरो एका मुलीशी प्रेम करतो. मग दुसऱ्या मुलीच्याही तो प्रेमात पडतो... काही पटत नाही बाबा हे?’ त्यावर यशजींनी खूप छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, की प्रत्येक माणसाची सर्वात मोठी मनोकामना असते ते म्हणजे प्रेम... अधिकाधिक प्रेम करा. सर्वांवर करा. मी रोमँटिक फिल्म कधीच केल्या नाहीत, तर भावनिक नातेसंबंधांना नवा आयाम दिला.

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण प्रेमात पडत असतो. देवाने निसर्गानंतरची सर्वाधिक अप्रतिम निर्मिती कोणती केली असेल, तर ती म्हणजे महिला. मी तिचा आदर करतो. माझी जबाबदारी आहे की तिला पडद्यावर अधिक सुंदर दाखवयाचं, असं मी मानतो...

आता कळलं, स्वित्झर्लंडच्या बर्फात शिफॉनची साडी नेसून प्रचंड थंडीत लयबद्ध नाचणारी नायिका का इतकी हॉट दिसायची ते? यशजी असा हिवाळा कोळून प्यायले होते. म्हणूनच की काय, दात कराकरा वाजणाऱ्या थंडीतही पातळशी साडी नेसून तासनतास शूटिंग करूनही एकही नायिका हिरोसंग रोमान्स करताना गारठून जायची नाही. कारण यशजींच्या प्रेमपटांची ऊब तिलाही हवी हवीशी वाटायची.

यशजींच्या सिनेमात काम करण्यासाठी त्या काळी सर्वच जण देव पाण्यात ठेवायचे म्हणे. आजचा मिलेनियर स्टार अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’चं कोंदण कोणी दिलं असेल तर ते यशजींनी. ७० च्या दशकात अमिताभ बच्चन, सलीम-जावेद आणि यश चोप्रा असं डेडली कॉम्बिनेशन जुळून आलं होतं. त्यातून जन्माला आले ‘दिवार’ आणि ‘त्रिशूल’सारखे मास्टरपीस. तिथेच अमिताभ बच्चन यांचा सुपरस्टार पदाचा दौर सुरू झाला होता.

तुम्ही-आम्ही आपलं आयुष्य जगतो. यशजींनी ते वाचलं होतं, स्वतःचं आणि इतरांचंही. इतरांचं थोडं जास्तच. साहजिकच त्यांच्याकडे प्रेमकथांना लागणारा सारा दारूगोळा उपलब्ध होता. बस, एका ठिणगीची गरज होती. आईचा आशीर्वाद आणि खिशात दोनशे रुपये घेऊन यशजी लाहोरहून मुंबईत दाखल झाले ते दिग्दर्शक बनायला. सोबत होती मोठी स्वप्नं, आत्मविश्वास आणि प्रेमाची नशा.

एवढ्या शिदोरीवर मुंबईत संघर्ष करायला आलेले यश चोप्रानामक ‘प्यार का पुजारी’ आज प्रत्येक भारतीय रसिक प्रेक्षकांना प्रेम शिकवून गेले. यशजींनी भारताची संस्कृती, परंपरा, सभ्यता आणि महानता मोठ्या निगुतीने आपल्या प्रेमपटांतून जगभर पोहचवलीच नाही तर रोमान्सची एक नवीन परिभाषा लिहिली. जी आधी आपल्याला ७० च्या दशकात पडद्यावर फक्त दोन फुलांच्या मिलनातूनच दिसायची.

सिनेमाच्या ७० एमएम पडद्यावर प्रेम आणि रोमान्सचा अनोखा सिलसिला यशजींनीच सुरू केला. यशजींच्या प्रेमपटांची ताकद होती सर्वांगसुंदर संगीत, परफेक्ट कास्टिंग, सुंदरतेचा ध्यास, शिफॉनची साडी आणि निसर्गरम्य स्वित्झर्लंड. अशा रंग‘पंचमी’त दर्दी रसिक न्हाऊन निघाला नसता तरच नवल.

यशजींच्या प्रेमपटांचीही अनोखी कथा आहे. त्यांचे ‘नाखुदा’, ‘सवाल’, ‘फासले’ आणि ‘विजय’ हे सिनेमे रसिकांच्या पसंतीस उतरले नव्हते. थोडेसे नाराज झाले होते तेव्हा ते. ‘विजय’ रिलीज झाला तेव्हा आपल्या कारमधून मुंबईच्या रस्त्यावरून फिरताना त्यांना आपल्या काही चित्रपटांच्या होर्डिंगची रांग दिसली. ते पाहताच त्यांच्या लक्षात आलं की, आपले जवळपास सर्व सिनेमे मारधाडीचे आहेत. तो काळ केवळ ॲक्शनपटांचा होता.

प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हळूवार कथानकाचे चित्रपट मिसिंग होते. म्युझिकल रोमँटिक सिनेमांचं भवितव्य धोक्यात आल्याचं यशजींना जाणवलं. जर अॅक्शन हायलाईट होऊ शकते तर मग गाणं का नाही, असा विचार त्यांच्या मनाला शिवून गेला आणि तिथेच जन्माला आला ‘चांदनी’ सिनेमा. एक जातिवंत प्रेमकथा. तब्बल नऊ गाणी होती त्यात. सर्वच्या सर्व हिट, पण गोष्ट साधी नव्हती. तेव्हा ‘चांदनी’तील विनोद खन्नांच्या कास्टिंगला निर्माता आणि वितरकांचा विरोध झाला.

ॲक्शनपटाचा हिरो रोमँटिक नायक कसा रंगवणार, असा प्रश्न यशजींना विचारला गेला. ‘अनदर फ्लॉप इज कमिंग’चे ताशेरे ओढले गेले; पण यशजींनी हार मानली नाही आणि जनता-जनार्दनाच्या पुण्याईवर चित्रपट हिट झाला. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘चांदनी’ला गौरवण्यात आलं.

जुही चावलाचीही त्यात छोटी भूमिका होती. ती करायला कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती. अशा वेळी जुही पुढे आली. यशजींनी तेव्हा तिला आश्वासन दिलं होतं, ‘माझ्या आगामी चित्रपटात तुला नक्की प्रमुख भूमिका देईन.’ १९९३ मध्ये आलेल्या ‘डर’च्या निमित्ताने त्यांनी ते पाळलं आणि आणखी एक मास्टरपीस रसिकांना मिळाला.

खरं म्हणजे तेव्हा ‘चांदनी’ पाहून आमच्या ‘प्रेमाचा’ सिलॅबस पुन्हा सुरू झाला होता. ‘चांदनी’ पाहिल्यावर काही दिवसांनी पुन्हा प्रेमाची ठिणगी पेटली. ज्वानीच्या आगीची मशाल हाती आली, काजवा उडाला, किरकिर करणारे किडे रानात सुरात गाऊ लागले, दिलाचा दिलवर आणि जीवाचा जीवलग गवसला... पण प्रेमाची पाटी कोरीच होती. तेव्हाच ‘चांदनी’ रंगभरे बादल घेऊन आली. ‘अपने मेहबुबा से मिलने खाली हाथ नही आते’ असं सांगून प्रेम शिकवून गेली...

आमच्या भरकटलेल्या मनावर विसावलेल्या सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही. ‘तू मेरी चांदनी’ असे तीन शब्द तेव्हा ‘आय लव्ह यू’पेक्षा जहरी होते. आनंद बक्षी, शिव-हरी, यश चोप्रा, बर्फाच्छादित स्वित्झर्लंड आणि शिफॉनची साडी नेसलेली सुंदर श्रीदेवी, असं डेडली कॉम्बिनेशन पुन्हा जुळून आलं होतं. सोबतीला होत्या प्रेमाचा गोडवा मांडणाऱ्या पद्यपंक्ती. ज्या यशजींसाठी नेहमीच ‘मिडास टच’ म्हणून काम करत आल्यात. आठवा, ‘कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है...’ किंवा ‘तेरी आँखों की नमकीन मस्तियाँ...’

आपल्या ‘दाग’ सिनेमामध्ये दोन पत्नींमधला सामना करणाऱ्या हिरोची आपबिती मांडण्याची हिंमत यशजींनी केली होती. अॅक्शनपट देण्यातही त्यांचा हातखंडा असला तरी आपल्या प्रेमाचा त्रिकोण त्यांनी पुढे ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘डर’, ‘दिल तो पागल है’, ‘वीरझारा’ आणि ‘जब तक है जान’सारख्या चित्रपटांमध्ये कायम ठेवला. म्हणूनच म्हणावसं वाटतं, ‘यशजी नहीं भुलेंगे तुम्हे हम, जब तक है जान... जब तक है जान’!

sushil.amberkar@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com