

Balance Between Growth and Nature
esakal
हर्ष जोशी - saptarang@esakal.com
विकास आणि पर्यावरणविचार हे सनातन द्वैत मानण्याकडे आधुनिक जगताचा कल राहिलेला असून, एका आयामाची धारणा दुसऱ्यास मारक ठरते अशी इतिहासाची साक्ष असल्याने पर्यावरणपूरक विकासाची मध्यममार्गी संकल्पना हल्ली प्रचारात आलेली दिसते. विकासकेंद्री दृष्टीमुळे पर्यावरणाकडे डोळेझाक करण्याचे परिणाम भारत यंदाच्या उन्हाळ्यात भोगतो आहेच. या पेचावर मार्ग काढण्याचा एक दृष्टिकोन ‘हरित हिंदुत्व’ या पुस्तकातून दिलीप कुलकर्णी यांनी दिला आहे.
हिंदूबहुल असल्याने भारताने पूर्वापार स्वीकारलेलं विकासाचं प्रारूप आणि भारतीय सनातन तत्त्वज्ञान यांच्यातले नाते शोधण्याचा, प्रयत्न असं या पुस्तकाचं स्वरूप सांगता येईल. सोळाव्या शतकापासून वैज्ञानिक विचारपद्धतीचा उदय झाला आणि बायबल नाकारण्यापासून धर्मच नाकारण्यापर्यंत या पद्धतीची मजल गेल्याने मानवी वर्तनाचा ‘धर्म’ नावाचा नियंत्रक कोलमडून पडला. त्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक उच्छृंखल होत गेलं असं लेखकाचं प्रतिपादन आहे.