
रोहित शेट्टीच्या चित्रपटांत हवेत उडणाऱ्या गाड्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन होते खरे, पण प्रत्यक्षात या ‘दबंग’ गाड्यांनी भारतीय बाजारपेठेत चांगलाच जम बसविला. भारताचा वाहन बाजार जागतिक कंपन्यांसाठी महत्त्वाचा. म्हणूनच या कंपन्या दरवर्षी नवनवीन मॉडेल लॉन्च करण्यासाठी उत्सुक असतात. बाजारात दाखल होणारे नवीन मॉडेल आपल्याकडे असावे, अशी बहुतांश जणांची इच्छा असते. काही जण गाड्या अपग्रेड करतात, तर काही नव्याने खरेदी करतात. अशावेळी कुटुंबाचा आकार आणि गरज पाहून गाडीची निवड केली जाते. काहींना सेदान हवी असते, तर काहींना आलिशान. यातही आता एसयूव्ही श्रेणीही ग्राहकांना भावली आहे. स्पोर्टी लूक, ऐसपैस जागा, चांगला ग्राउंड क्लिअरन्स, दमदार वेग आणि आरामदायी अनुभवामुळे अगदी कमी काळात एसयूव्ही गाड्यांनी लोकप्रियता मिळवली आहे.