esakal | ती एक चिरंतन ज्योती 
sakal

बोलून बातमी शोधा

lata-mangeshkar

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि लता मंगेशकर या दोन व्यक्तींबरोबर अशा प्रकारे नाव जोडलं जाणं ही गोष्ट माझ्यासाठी अमूल्य आहे. दीदींना सरस्वती का म्हणतात, याचा प्रत्यय मला हे काम करताना आला.

ती एक चिरंतन ज्योती 

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी

वाऱ्याची एखादी झुळूक यावी, कुठल्या तरी फुलाच्या मंद सुगंध यावा आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित व्हाव्यात तसं लता मंगेशकर यांचं गाणं. एखादी लकेर येते आणि हृदयात असंख्य ज्योती पेटून जातात. लतादीदींच्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यांचं नवं गाणं नुकतंच सादर झालं आहे. हे गाणं आहे ‘स्वानंद.’ एलएम म्युझिकतर्फेच हे गाणं प्रकाशित झालं आहे. ते संगीतबद्ध केलं आहे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी. 

‘स्वानंद’ हे गाणं अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. बऱ्याच काळानंतर लतादीदींचं नवीन गाणं चाहत्यांना ऐकायला मिळतंय. अर्थात गाणं नवीन असलं, तरी रेकॉर्डिंग मात्र सहा वर्षांपूर्वीचं आहे. हे गाणं तयार झालं होतं; परंतु काही कारणांमुळं मागं राहिलं. आता ते डिजिटल माध्यमातून दीदींच्या चाहत्यांसाठी सादर झालं आहे. दीदी ज्या पद्धतीनं शब्दांच्या उच्चारापासून शब्दांतून केल्या जाणाऱ्या अभिनयापर्यंत गोष्टी करतात त्याचा प्रत्यय त्यातून घेता येतोच. दीदी आपल्या दैवी आवाजानं शब्दांमध्ये ज्या प्रकारे प्राण फुंकतात ते बघणं फार आनंदाचं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हे गाणं महत्त्वाचं आहे, कारण ते आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं. ही तब्बल पावणेदोनशे वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली कविता. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले होते. त्यातलं महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करणारी कविता म्हणजे दोन दिग्गजांमधला भावधागाच. हा भावधागा वैशाली सामंत यांनी आपल्या चालीतून अतिशय हळुवारपणे उलगडला आहे. साधी, तरीही आशयपूर्ण अशी ही चाल. ते लतादीदींनी गाणं हा आणखी महत्त्वाचा योग. हे गाणं नक्की ऐका. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साक्षात लतादीदींनी माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणं हा खरंच एक भाग्ययोग होता. ही कविता वाचली, तेव्हा ती गाऊ शकतील असं एकच नाव माझ्या डोळ्यांसमोर होतं, ते प्रत्यक्षात आलं याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि लता मंगेशकर या दोन व्यक्तींबरोबर अशा प्रकारे नाव जोडलं जाणं ही गोष्ट माझ्यासाठी अमूल्य आहे. दीदींना सरस्वती का म्हणतात, याचा प्रत्यय मला हे काम करताना आला. शब्दांच्या उच्चारांपासून इतर प्रत्येक गोष्टीपर्यंत त्यांचं काम म्हणजे परफेक्शनचा कळस आहे, याचा प्रत्यय देणारा हा अनुभव होता. लिजंडबरोबर काम करणं म्हणजे नक्की काय असतं हे मी साक्षात अनुभवलं. 
- वैशाली सामंत, संगीतकार 

loading image
go to top