
वंचितांचे सावरकर !
वंचितांना, अस्पृश्यांना प्रमुख प्रवाहात आणण्यात सावरकरांचे योगदान फार मोठे आहे. नुसते बोलून नाही तर कृतीने त्यांनी एक मोठे उदाहरण उभे केले आहे. हिंदू धर्मातील सप्तबंदीच्या बेड्या १) व्यवसायबंदी २) वेदबंदी ३) धर्मांतरबंदी ४) रोटीबंदी ५) बेटीबंदी ६) स्पर्श बंदी ७) सिंधू बंदीची.. या सर्व बेड्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत तोडल्या आणि सावरकरांनी अठरापगड जातींमध्ये एकवाक्यता आणली.
भारतातील अस्पृश्यांचा पहिला मंदिर प्रवेश रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात स्वा. सावरकरांनी घडवून आणला. दलित वस्तीत जाऊन दलितांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. शाळा-शाळांमध्ये दलित-सवर्ण मुले वेगवेगळी बसत. त्यांना कायदा करुन एकत्र बसण्यास भाग पाडले. दलित मुलांना वेद, गीता शिकवली. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. पंक्तीभेद मिटवण्यासाठी सहभोजनाचे कार्यक्रम पार पाडले. दलित वस्तीत जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वतः हातात झाडू, साबण घेऊन स्वच्छता मोहीम राबविली.
हेही वाचा: राणा अन् राष्ट्रवादी आमनेसामने; एकाच मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण
या कार्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे स्वतः आपल्या दीडशे साथीदारांसह दिनांक २१/२/१९३३ रोजी मुंबईमार्गे संध्याकाळच्या सुमारास रत्नागिरीत पोहचले. त्यांच्या सोबत पुप्पाला, राजभोज, डॉ. सावरकर, भाई बागल अशी मंडळी होती. ते मिरवणुकीने पतित-पावन मंदिरात आले. यावेळेला कर्मवीर अण्णा अर्थात विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले, “रत्नागिरीत सावरकरांनी केलेली कामगिरी प्रत्यक्ष पाहण्यास आपण आलेलो असून, अस्पृश्यतेच्या पुढे जाऊन जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करण्यासाठी आपण इतक्या निधड्या छातीने झटत असलेले पाहून मला आश्चर्य वाटते. ही विलक्षण मन:क्रांती रत्नागिरी सारख्या पुराणप्रिय असलेल्या नगरात झाली तरी कशी? त्याची किल्ली मला या आंदोलनाच्या धुरंदर वीरापासून, बॅरिस्टर सावरकरांपासून घ्यावयाची आहे.”
अस्पृश्यतेच्या राक्षसिणीचा पुतळा जाळला
दुसऱ्या दिवशी दिनांक २२/०२/१९३३ रोजी पतित-पावन मंदिराच्या प्रांगणात भुशाने भरलेला अस्पृश्यतेच्या राक्षसिणीचा पुतळा उभारण्यात आला होता. कर्मवीरांच्या साक्षीने सावरकर म्हणाले, “तुम्हास अस्पृश्यतेचा हा पुतळा जाळून त्या दुष्टरुढीचा रत्नागिरीपुरता तरी मृत्युदिन साजरा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रत्नागिरीने हा राष्ट्रीय प्रश्न आपल्यापुरता तरी सोडवलेला आहे. रत्नागिरी नगरी अस्पृश्यतेच्या पापापासून मुक्त झालेली आहे. आज या पुतळ्यास लागणारी आग सार्या देशभर कळो ! त्या आगीत हा पुतळा नव्हे तर तुमच्या अंतःकरणातील सात हजार वर्षाचा तो दुष्ट संस्कार देखील जळून खाक होवो”.
हा जन्मजात अस्पृश्यतेच्या राक्षसिणीचा पुतळा जळत असताना ढोल-ताशे याच बरोबर ‘हिंदू राष्ट्र की जय!’ असा घोष चालू होता. ब्राह्मणापासून अस्पृश्यांपर्यंत सुमारे पाच हजार लोकांचा समुदाय यावेळी उपस्थित होता. नंतर दानशूर भागोजी कीर यांनी बांधलेल्या भागेश्वर मंदिराच्या प्रांगणात आल्यावर भंगी मुलींनी "स्पृश्य हिंदू समाजाने देवालये सर्वांसाठी उघडी करावीत" यासाठी एक गीत सादर केले.
यावेळी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे उर्फ अण्णाभाऊंना १५०० सह्यांचे मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला. या सत्कारास उत्तर देताना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले, “रत्नागिरीतील सामाजिक परिवर्तनाची बारीक रीतीने पाहणी केली. ती वरून असे सांगतो की येथे घडत असलेली सामाजिक क्रांती खरोखरच अपूर्व आहे. सामाजिक सुधारणेचे कार्य मी जन्मभर करीत आलो. ते किती कठीण, किती किचकट! मी देखिल मधून मधून निरुत्साही व्हावे असे चेंगट! असे कार्य अवघ्या सात वर्षात रत्नागिरीसारख्या अगदी रेल्वे, टेलिफोनचे तोंड न पाहिलेल्या सोवळ्यांच्या बालेकिल्ल्यात व्हावे हे कौतुकास्पद आहे.
हेही वाचा: ...त्यावेळी त्यांनी आमचादेखील फोन उचलला नव्हता; फडणवीसांचा टोला
“आज तुम्ही हजारो लोक जन्मजात अस्पृश्यतेचे उच्चाटन करून जन्मजात जातीभेदाचे उच्चाटन करण्यास सजला आहात. आणि भंगी प्रभृती धर्मबंधूंबरोबर बेखटक, सहासन, सहपूजन, सहभोजन सारे सामाजिक व्यवहार प्रकटपणे करत असताना मी पाहत आहे याचा मला इतका आनंद झालेला आहे की, हे दिवस पाहण्यास मी जगलो हे ठीक झाले असे मला वाटते.
“मी कुणाचा भाट होऊ इच्छित नाही. पण ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या सात वर्षात ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली त्या सावरकरांचा किती गौरव करू असे मला झाले आहे. तुम्ही हजारो नागरिक, विशेषतः ही तरुण पिढी त्यांचेवर जो निस्सीम विश्वास ठेवीत आहात, तो मी कालपासून पाहात आहे. पण त्यात तुम्हा सर्व तरुणांमध्ये खरा तरुण जर कोण मला दिसत असेल तर तो निधड्या छातीचा वीर सावरकरच होय! मला असे म्हटल्यावाचून रहावत नाही की, बरे झाले हा अज्ञातवास आला. नाहीतर ही सामाजिक सेवा करण्यास ही स्वारी उरली असती की नाही हीच शंका आहे.
“त्यांनी चालवलेली ही क्रांतीची यशस्वी चळवळ पाहून मी इतका प्रभावी प्रसन्न झालो आहे की देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांसच द्यावे! कारण माझे अपुरे राहिलेले हेतू पुरवील तर हा वीरच पुरवील, असे मला वाटत आहे. सरकारने त्यांस या सामाजिक कार्यापुरते तरी सोडावे अशी खटपट सर्व स्पृश्यास्पृश्यांच्या नि सुधारकांच्यावतीने करावी असे श्री. राजभोजांचे नि माझे ठरलेलेच आहे.”
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वरील निवेदनावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामाजिक क्रांतीचा अवाका किती विस्तीर्ण होता हे समजून येते.
लेखक : पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने (देशभक्तकोशकार)
मोबाईल : ९८८१३७३५८५
Web Title: Swantatravir Sawarkar Birth Anniversary Special Article
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..