स्वप्नाची 'सुरेल' गोष्ट... (स्वप्ना दातार)

स्वप्ना दातार swapnadatar12@gmail.com
रविवार, 26 ऑगस्ट 2018

"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय.
उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही...

"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय.
उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही...

सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची कसलीच पार्श्वभूमी नसलेल्या घरात माझा जन्म झाला. माझ्या वडिलांचा शेतीचा आणि दूध-दुभत्याचा व्यवसाय होता. आई गृहिणी. एकत्र कुटुंब असल्यामुळं कामाचा व्याप खूपच मोठा. जुळी प्रिया आणि धाकटी क्षितिजा अशा आम्ही तिघी बहिणी. मुलींना अभ्यासाखेरीज एखादी कला अवगत असावी अशी आईची मनापासूनची इच्छा होती. आमच्या शाळेत "हुजूरपागा'मध्ये तेव्हा व्हायोलिन शिकवत असत. त्यामुळं आईची इच्छा सहज पूर्ण झाली आणि माझं व्हायोलिनशिक्षण सुरू झालं. माझ्या आत्याची मैत्रीण मीरा पटवर्धन यासुद्धा व्हायोलिन शिकवायच्या हे समजल्यावर तिथंही शिकवणी लावली. पुण्यात जोगेश्वरीच्या बोळात ही शिकवणी होती.

संगीताशी काहीही संबंध नाही, घरात कानावर संगीत पडेल आणि शास्त्रीय संगीताचा परिचय होईल अशी शक्‍यता नाही, केवळ आईनं सांगितलं म्हणून मी व्हायोलिन शिकू लागले होते; पण तुळशीबागेतच घर असल्यामुळं वर्षभर अनेक कीर्तनकार, भजनी मंडळं यांचे संस्कार आपोआप होत होतेच. दहावीनंतर मी
एसएनडीटीमध्ये बीएला कला शाखेत प्रवेश घेतला.
भाषा आणि वाचन चांगलं असल्यामुळं शाळेत असताना मी नाटकातही काम करत असे. कॉलेजमध्ये स्पर्धांमध्ये बक्षिसंही मिळाली. तेव्हा नाटकाच्या छंदापायी व्हायोलिन जरा मागंच पडलं. त्याच सुमारास पुणे विद्यापीठात "ललित कलाकेंद्र' सुरू होणार होतं. मग तिकडं प्रवेश घ्यायचा ठरला. "नाटक' या विषयांत डिग्रीसाठी अर्ज भरलेला वडिलांना आवडला नाही म्हणून मग व्हायोलिन वाद्यवादन या विषयात डिग्रीसाठी अर्ज भरला.

तिथं अतुलकुमार उपाध्ये गुरू म्हणून होते. त्यांच्याकडून अतिशय उत्तम असं शिक्षण मला तीन वर्षं मिळालं. तेव्हाही मूळ आवडीनुसार नाटकांत कामं करणं सुरू होतंच. बीए झाल्यावर माझं लग्न होऊन मी भोपाळला गेले. तिथं माझे गुरू वसंतराव शेवलीकर यांच्याकडं व्हायोलिन शिकण्याचा भाग्ययोग माझ्या नशिबात होता.
शेवलीकर गुरुजी म्हणजे गुरू कसा असावा, याचं मूर्तिमंत उदाहरणच. अत्यंत साधी राहणी, विद्यार्थ्यांविषयी कमालीचं प्रेम, कळकळ, आस्था आणि प्रसंगी मोफत मार्गदर्शन करण्याचा अखंड उत्साह. विद्यार्थ्यांच्या इतर शिक्षणाचं त्यांना इतकं कौतुक असे की त्या विद्यार्थ्याला ज्या वेळेला शक्‍य असेल त्या वेळेला त्याची शिकवणी घ्यायला गुरुजी सदैव तयार असत! आजही अशीच परिस्थिती आहे.
एखादा विद्यार्थी दोन दिवस आला नाही तर गुरुजी त्याच्या घरी जात, त्याची चौकशी करत, त्याची अडचण समजून घेत व ती दूर करून तो व्हायोलिन वाजवायला परत कसा येऊ शकेल, हे नक्की करून मगच घरी परत येत. विद्यार्थ्यांना सुरवातीलाच डेप्थ, लेंथ, विड्‌थ समजली पाहिजे असं ते नेहमी सांगत असत. आपल्याला किती खोलवर विचार करायचा आहे, याचा विद्यार्थ्याला अंदाज आला की मग तो आपोआप रियाज करायला लागतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

शेवलीकर सरांच्या घरी सलग तीन वर्षं मला शिक्षण घेता आलं आणि मी त्यांची मुलगीच झाले...खैरागड विद्यापीठातून मी एमए केलं. माझं सौभाग्यच मला भोपाळला घेऊन गेलं होतं...आज मी जे काही काम करू शकत आहे ते केवळ त्या शिक्षणामुळंच. नंतर वाढता संसार आणि अर्थार्जनासाठी मला पुण्यात यावं लागलं.
मुलींचं वसतिगृह हा माझा उपजीविकेचा व्यवसाय होताच. राहणाऱ्या मुलींची चहा-नाश्‍ता, जेवणाची सोय मी पाहत असे. त्याच काळात टिळक रस्त्यावर मी कपड्यांचं दुकानही चालवत होते. दोन लहान मुलांचं सगळं करून, मेसचे व्याप सांभाळून हे सुरू होतं. दुकानात बसून मी त्याच काळात डीएडही केलं. या सगळ्यात व्हायोलिन मात्र मागंच पडत होतं. मात्र, ते बंद पडू नये म्हणून तीन तीन शाळांमधून मी तासांवर व्हायोलिन शिकवायला जात असे. त्या मुलांना शिकवताना मला जो अपार आनंद आणि उत्साह मिळायचा तो मला हे बाकी सगळं करायला शक्ती देत होता हे नक्कीच.
बाकी गणेशोत्सव, लग्नसमारंभ, वास्तुशांत, सुवर्णमहोत्सव, अमृतमहोत्सव असे खासगीतले अनेक कार्यक्रम सहकलाकार म्हणून वाजवले, त्याची काही मोजदादच नाही; तरी पण काही ठळक नोंदवावेत असे आहेतच.

"व्हीयोलिना' नावाचा एक व्हायोलिन-वाद्यवृंद हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम करत असे. अंजली सिंगडेराव, वैशाली सप्रे, चारुशीला गोसावी, अविनाश द्रविड, अभय आगाशे, सचिन इंगळे असे माझ्याहून अनुभवी लोक त्यात होते. त्यांच्याबरोबर मी खूप कार्यक्रम केले. नरेंद्र चिपळूणकर या मित्रामुळं अरुण दाते यांना "शुक्रतारा' या कार्यक्रमात साथ करायची संधी मला मिळाली.
"चैत्राची नवलाई' हा दादा चांदेकर यांच्या रचनांचा कार्यक्रम वाजवताना डॉ. चैतन्य कुंटे याच्याशी ओळख झाली. "चैत्रवेल,' "मनरंगाचे आभाळ,' "रामदास पदावली,' ओंजळीत स्वर तुझेच' अशा चैतन्यच्याच रचनांचे कार्यक्रम करताना मी बरंच काही शिकत होते. "प्रभातगाणी'मुळं मास्टर कृष्णराव यांच्या संगीताचा अभ्यास झाला आणि राहुल देशपांडे याच्याशी मैत्र जमलं. मग राहुलच्या काही बैठकींना, गझलांच्या कार्यक्रमांना, तसंच ललित कला केंद्रातले माझ्याबरोबर असलेले समीर दुबळे, प्राची दुबळे,आभा वांबूरकर अशा मित्र-मैत्रिणींच्या कार्यक्रमांना साथीदार म्हणून मी वाजवत असे.

प्राची दुबळे मला "काब्येरकथा'च्या वेळी चंद्रकांत काळे यांच्याकडं घेऊन गेली आणि भाषेचा पोत, सौष्ठव, भाषिक अभिनय या कलागुणांना मी नव्यानं सामोरी गेले. सुचेता भिडे-चापेकर यांच्या नृत्यगंगेत, सुरेश तळवलकर यांच्या तालयात्रेत आणि तालसंकीर्तनात मी न्हाऊन निघाले. किती छान दिवस होते ते!
माझ्यावरच्या इतर जबाबदाऱ्या पूर्ण करून हे सगळे व्याप सांभाळणं ही एक तारेवरची कसरत होती आणि आपलं नाव आपणच टिकवलं पाहिजे, ही माझी माझ्याशीच चाललेली स्पर्धा होती. कारण, या मोठ्या कलाकारांबरोबर वाजवण्यासाठी माझं ज्ञान पुरेसं असलं तरी मला रियाजाला वेळ मिळायचा नाही. त्यामुळं परीक्षार्थी विद्यार्थी कसे परीक्षा आली की अभ्यास करतात तसा कार्यक्रमांच्या आधी लवकर पहाटे उठून मी अभ्यास करत असे! आज मागं वळून पाहताना मीच हे करत होते, यावर माझाच विश्वास बसत नाही; पण हे खरंच आहे.
दरम्यान काही चांगल्या गोष्टी घडल्या होत्या.
शेवलीकर सरांचा धाकटा मुलगा पुण्यात स्थायिक झाल्यामुळं सर वर्षातून दोनदा तरी पुण्यात मुक्कामी असायचे. त्यामुळं तो अभ्यास परत सुरू झाला होता. विख्यात व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम बाई यांचं पुण्यात पहिलं शिबीर झालं होतं, त्यांत मला सहभागी व्हायची संधी मिळाली होती. त्या शिबिरांत मी सगळ्यात शेवटच्या रांगेत बसून अभ्यास केला होता. कारण, मी पूर्ण वेळ व्हायोलिनवादक नव्हते; पण त्यामुळं पूर्ण वेळ व्हायोलिनवादक होण्याची इच्छा आता माझ्या मनात निर्माण झाली होती.

स्वतः जास्तीत जास्त वेळ संगीताच्या वातावरणात असायला हवं, या विचारानं मी माझं मुलींचं वसतिगृह फक्त संगीत शिकायला येणाऱ्या मुलींसाठीच मर्यादित केलं होतं. परिणामी, त्यांचा रोज पहाटे सुरू होणारा रियाज मलाही श्रवणाच्या संदर्भात फायदेशीर ठरत होता. मला आणि मुलींनाही एकमेकींच्या सहजीवनाचे अनेक सांगीतिक फायदे होत राहिले. तो बोनस होता. पूर्ण वेळ संगीत करणाऱ्या या मुली किंवा ईशान, कल्पेश, विभव, अनिरुद्ध यांसारखी काही मुलं - जी माझ्याकडं जेवायला येत असत- त्यांना पाहून, त्यांच्या गप्पा ऐकून मला माझी एक कमतरता सतत जाणवत राहायची व ती म्हणजे, हे सगळे आपलं घर-दार सोडून केवळ संगीत शिकण्याच्या ध्येयासाठी आहे त्या परिस्थितीत राहून रियाज करतात; मग आपण का नाही करू शकत?
मला ही जाणीव खूपच अस्वथ करत होती.
ही अस्वस्थता जाणलेल्या रवी जोशी या माझ्या जिवलग मित्रानं मला बजावलं ते असं ः ""सगळ्यात आधी मेस बंद कर, पोळपाटावर लाटणं घेऊन हात आडवा फिरवणं बंद कर आणि बो हातात घे. आता काही दिवस साथसंगतही थांबव आणि एकल वादनाची स्वप्नं पाहा...तुझ्या गुरुजींप्रमाणे क्‍लास घे...काही शिष्य तयार कर...व्हायोलिनशिवाय दुसरं काहीही करूच नकोस.'' त्यानं अशी ही "विनंती-वजा-धमकी' दिली आणि पाठपुरावाही केला.
मग हेही करून पाहायला हरकत नाही, असं ठरवून मी फक्त वसतिगृह सुरू ठेवलं. रोज रियाज सुरू केला. मग हळूहळू शाळेतल्या नोकऱ्याही बंद केल्या आणि आता पूर्णवेळ व्हायोलिन!
दहा-बारा वर्षांपूर्वी हा निर्णय घेऊन स्वतःसाठी वेळ मोकळा करून घेणं काहीसं अवघड होतं खरं; पण पाच-सहा तास रियाज करणं हा स्वानंदाचा शोध होता. मग संगीताचे अनेक कार्यक्रम- व्हायोलिन,
गायन ऐकणं, इतर वाद्यांचे कार्यक्रम प्रत्यक्ष किंवा ध्वनिमुद्रणं मिळवून ऐकणं-पाहणं, आपल्या वकुबानुसार त्यांचं विश्‍लेषण करणं, तज्ज्ञांकडून त्यांची मतं जाणून घेणं आणि आपल्या चुका तपासून दुरुस्त करणं...अनेक गुरू-मास्तर यासाठी करावेत...जुन्या कलाकारांची बैठक समजून घ्यावी..असं सुरू झालं. प्रवीण शेवलीकर, भावेकाका, चैतन्य कुंटे, राजीव परांजपे यांच्या निरपेक्ष मदतीनं मला हे शक्‍य झालं.
यथावकाश "गंगूबाई हनगल समारोह', "पार्सेकर समारोह (गोवा)' , "हिराई महोत्सव(चंद्रपूर)', "स्वरगंगा'(ठाणे) आदी महोत्सवांत माझ्या एकल वादनाचा कार्यक्रम सादर झाला. मित्र चारुदत्त फडके यांनी मला जर्मनीचं आमंत्रण दिलं, तर शर्वरी जमेनीस-निखिल फाटक यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दौरा झाला. गेल्या चार वर्षांत पोर्तुगाल, मोरोक्को, जर्मनी, ऑस्ट्रिया इथंही एकलवादनासाठी जाणं झालं. व्हायोलिन हे अमर्याद वाद्य आहे. ताल, अंग आणि सुरेलपणाचा उत्तम मेळ वादनात सादर करता येऊ शकतो. "बो'च्या साह्यानं गत अंगाचं, तर मिंडयुक्त वादनानं गायकी अंगाचं प्रदर्शन करता येतं. आपण जेवढा जास्त वेळ "डोळस' रियाजासाठी देऊ, तेवढं हे प्रदर्शन उत्तम सादर होतं. आता याचा अनुभव माझ्या पाठीशी होताच. पुढं संगीतविषयक वाचन, चिंतन, मनन आणि "सुधारित रियाज' अशीच घडी मी बसवून घेत राहिले. अधूनमधून घडी मोडलीच तर परत घालायची आणि आपल्या बुद्धीला धार लावत राहायची, असं करत गेले.

दरम्यान मी सुरू केलेल्या व्हायोलिनच्या क्‍लासेसचा या स्वतःला धार लावण्याच्या कामी खूपच उपयोग झाला आणि अजूनही होतो. पूर्वी शाळांमधून शिकवल्याचा फायदा आता होत होता. मुलांना शिकवायचं हे तर माझ्या आवडीचं काम होतं. शिवाय, आता वेगवेगळ्या वयोगटांतले शिष्य माझ्यासमोर होते. प्राथमिक ते माध्यमिक शाळेतले, कॉलेजमधले, इंजिनिअर-डॉक्‍टर-वकील, नोकरदार-व्यावसायिक, गृहिणी, सेवानिवृत्त...सगळेच हौशी. हळूहळू संख्या वाढत जायला लागली. मग त्यांच्या वयानुसार त्यांचे गट झाले. लहान मुलांवर मी जरा जास्त कष्ट घ्यायचं ठरवलं होतंच...त्यांना येत असलेली गोष्ट ते पुनःपुन्हा करून दाखवायला खूप उत्सुक असतात. हाच गुण रियाजात परिवर्तित करायचा...तेच तेच पुनःपुन्हा घोटून वाजवून पक्कं करायचं...जे मला माझ्या त्या वयात जमलं नाही तेच करून घ्यायचं...रोजच्या शाळेच्या स्पर्धेच्या धामधुमीतून त्यांना इथं एक "ठहराव' मिळायला हवा, आनंद मिळायला हवा...तेच तेच आणि तरीही वेगवेगळं असं काहीसं! स्वानुभवावर आधारित सर्वसमावेशक आणि नावीन्यपूर्ण शिक्षण त्यांना द्यायला हवं आहे, हे मला स्वच्छ समजलं होतं आणि अशी मुलं माझ्या प्रयोगशाळेत आनंदानं सहभागी झाली होती. ही नवीन पिढी खूप हुशार आहे, तिचा वेग आणि ऊर्जा प्रचंड आहे. या पिढीला अभ्यासाचा ताण न वाटता त्यातली मजा कळली तर ती झटकन आत्मसात करते; हेही मला जाणवत होतं. वह्या न आणता पाठांतरावर भर देऊन त्याचा जास्त फायदा होईल, हे या पिढीतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा मान्य होतं.

एका मे महिन्यात या एकाच वयोगटातल्या काही मुलांसाठी आमच्याच "परिवार' संस्थेत सलग 25 दिवसांच्या निवासी उन्हाळी शिबिराचं मी आयोजन केलं. गाणं, वादन, तबला असा "त्रिगुणात्मक' अभ्यास सुरू झाला. ईश्वरदादा, विभवदादा यांच्या तालमीत दिवस-रात्र एकत्र असलेली ही मुलं रियाजासोबत चोवीस तास संगीत या विषयाच्याच चिंतनात, निदिध्यासात व्यग्र होती. त्यांना काही गोष्टी सांगितल्या. पुस्तकं वाचायला लावली आणि त्यांच्या परिपक्व होण्याला या गोष्टीचा खूपच फायदा झाला. एकजिनसी तयारीच्या या मुलांनी शिबिर संपल्याच्या निमित्तानं शेवटच्या दिवशी जो कार्यक्रम सादर केला होता, त्यातच आजच्या "स्वरस्वप्न' या कार्यक्रमाची बीजं पेरली गेली होती.

मग यानंतर लगेचच दर महिनाअखेरीला एका कुणाच्या तरी घरी, गच्चीवर एक बैठक करायची, अशी संकल्पना मांडली. ज्या त्या सोसायटीतल्या आणि इतर श्रोत्यांसमोर मुलांचं व्हायोलिन एकल वादन, तबला साथसंगत आणि नंतर भोजन अशी मोठा खुमासदार योजना सुरू झाली...
आपण नेमके कुठं चुकतो? काय चांगलं वाजवलं? रियाज कुठं कमी पडला? चांगलं वाजवल्याबद्दल लोकांनी केलेलं कौतुक हे सगळं खूप परिणामकारक ठरतं आणि प्रगती करायला ती मुलं अधिक उत्सुक होतात. अर्थातच सगळ्या पालकांच्या सहमतीनं आणि सहकार्यानंच हे शक्‍य झालं. हा असा समृद्ध करणारा, रंगमंचाची भीती घालवणारा अनुभव आपल्या मुलाला/मुलीला मिळायला हवा, अशा विचारांना मान्यता देणारे पालक त्या पाल्यांना आणि पर्यायानं मलाही मिळाले आहेत, हे खूपच महत्त्वाचं.
आम्ही सगळे दर बुधवारी माझ्याच घरी भजन करतो. त्यातही मुलं एकेक अभंग तयार करून येतात. वाजवायची संधी, ऐकायची सुसंधी, टाळ-चिपळ्या हातात असल्यामुळं तालाचं ज्ञान, मराठी भाषेची समृद्धी आणि पुन्हा एकदा समूहानं-सामंजस्यानं सादर करायची सेवा...भजन ः एक साधी-सोपी, चांगली परंपरा; तीतून किती गोष्टी साध्य होतात...असा नाही तर तसा...विठ्ठल प्रसन्न होतोच! अशा "चमत्कारां'वर माझा विश्वास आहे! प्रत्येक विद्यार्थ्याला सांगीतिक पार्श्वभूमी लाभेल असं नाही; पण त्याच्याकडून करवून घेता आलं तर चमत्कार घडू शकतो, याचा अनुभव मी घेतला आहे.

अशा समूहवादनामुळं मुलांचा परस्परांवरचा विश्वास वाढला ही अजून एक मोठीच जमेची बाजू होती. आताच्या स्पर्धेच्या काळांत प्रत्येक जण "सोलो आर्टिस्ट' म्हणून काम करत राहू शकेल, अशी शक्‍यता खूपच कमी आहे. त्यासाठी तुम्हाला गॉडफादर असायला हवा. मात्र, अशा समूहवादनाच्या कार्यक्रमांतून तुम्ही स्वतःही आनंद लुटता आणि तो इतरांनाही वाटता, असं मला वाटतं. माझ्या आनंदप्रदायी प्रवासाची ही मुलं सहप्रवासी आणि साक्षीदारसुद्धा झाली. 10 ते 22 या वयोगटातल्या 15 मुलांनी "स्वरस्वप्न'चे 17 यशस्वी प्रयोग सादर केले आहेत. डॉ. एन. राजम, मकरंदबुवा रामदासी, अरविंद थत्ते, बुधादित्य मुखर्जी, विजय कोपरकर, रामदास पळसुले या गुणिजनांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांना.

"स्वरस्वप्न' हे मला पडलेलं स्वप्न आहे. त्यासाठी मला अनेकांची साथ लाभली. माझे आई-वडील, माझे गुरू हे माझा आधार आहेत. विभव, ईश्वर, दुर्गा, साई, प्रसाद, सुधीर, मनोज, तुषार, सत्यम, अबोली, श्रेया ही माझी मुलं (विद्यार्थी) आणि माझ्यामागं सदैव ठामपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या गुणी विद्यार्थ्यांचे पालक हे सगळेच मला लागेल ती सगळी मदत करतात. रवी-मेधा जोशी, चैतन्य-श्रुती कुंटे, निखिल-शर्वरी, संध्या धर्म, अनुराधा कुबेर, केदार भागवत,
चारुदत्त-अश्विनी फडके, आमोद-कल्पना कुलकर्णी, मिलिंद-माधवी तुळाणकर, कुंदन-शीतल रुईकर, शरद-स्वाती कापुस्कर असं मैत्र मला मिळालं आहे. अशी अनेक नावं आहेत; पण किती सांगणार? त्यांच्या सोबतीनं हा प्रवास पुढं सुरूच राहणार आहे. "जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय.
उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swapna datar write article in saptarang