Swasthyam 2023 : रसिकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2023

Swasthyam 2023: साऱ्या पंचक्रोशीत त्या हवेलीचा सुगंध दरवळू लागला. या ध्येयवेड्या माणसाची हवेली इतिहासात अजरामर झाली.

विदर्भातील लाडाच्या कारंजे गावात, असाच एक दिवस उजाडला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक गावकरी रस्त्यानं निघाला होता.

एक लहानसा उंटाचा तांडा समोरून येताना त्याला दिसला. सर्वांत समोरच्या उंटावरती एक रुबाबदार व्यापारी बसला होता. सर्वत्र सुगंधाची उधळण होत होती.

Swasthyam 2023 : रसिकता

सहज कुतूहल म्हणून त्या गावकऱ्यानं विचारलं, ‘कंच्या मालाचा व्यापार हाय म्हणायचा?’ व्यापाऱ्याचं लक्ष त्याच्याकडं गेलं. एवढा सुगंध दरवळत असताना हा माणूस विचारतोय? थोड्याशा फणकाऱ्यातच तो म्हणाला, ‘कस्तुरी आहे, कस्तुरी,’ कस्तुरीचं नाव ऐकताच गावकरी आनंदला. त्यानं पुढचा प्रश्न विचारला, ‘कसा भाव म्हणायचा?’

देणं ना घेणं, रिकामं विचारणं असं त्याला वाटलं. थोड्याशा नाराजीनंच त्यानं भाव सांगितला. गावकऱ्यानं पुन्हा पुढचा प्रश्न विचारला, ‘किती माल आहे म्हणायचा?’ आता अजब झालं होतं. व्यापाऱ्याचं डोकं गरगरु लागलं आणि तसाच उंट पुढं नेत तो म्हणाला, ‘मणभर, हाय मणभर.’ हे ऐकताच गावकरी म्हणाला, ‘एवढाच हाय व्हय, बरं घेतला, समदा माल घेतला.’

चला आमच्या घरी तिथंच माल उतरून घेऊ असं गावकरी म्हणताच ते सर्व उंट गावकऱ्याच्या मागोमाग चालू लागले. घराजवळ येताच उंटावरचा व्यापारी खाली उतरला.

गावकरी म्हणाला, ‘किती भाव झाला सांगा.’ व्यापाऱ्यानं हिशोब केला. गावकऱ्यानं घरातून पैशाची पोती बाहेर आणायला सांगितली. तो व्यापाऱ्याला म्हणाला ‘घ्या मोजून’ पैशाची चळत खाली जमिनीवरती ओतली आणि हिशोब पूर्ण झाला.

पैसे ताब्यात आल्यावर व्यापारी म्हणाला, ‘माल कुठं ठेवायचा?’ गावकरी म्हणाला, ‘ठेवायचा? ठेवायचा नाही, लगेच वापरून टाकायचा.’ आता हा एवढी महागडी कस्तुरी कशासाठी वापरणार? हा प्रश्न व्यापाऱ्यापुढं पडताच, गावकरी म्हणाला, ‘ती पलीकडं माती दिसती, त्या मातीत ओता, लय दिवसाची इच्छा होती, घराला कस्तुरीचा गिलावा करावा.’

कस्तुरी ताब्यात घेतली आणि गिलावा लावून सुंदर अशी हवेली तयार झाली. साऱ्या पंचक्रोशीत त्या हवेलीचा सुगंध दरवळू लागला. या ध्येयवेड्या माणसाची हवेली इतिहासात अजरामर झाली.

- प्रशांत सरुडकर

टॅग्स :vidarbhaBuy Home