समाजक्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरकर

समाजक्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर

अक्षय जोग

ब्रिटिशांची परदेशी शंृखला झुगारून देण्यासाठी झटणारे क्रांतिकारक सावरकर त्याच त्वेषाने ‘वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी’ या सात स्वदेशी शंृखला तोडण्यासाठीही अविरत झटताना दिसतात. त्यामुळे सावरकर केवळ क्रांतिकारकच नव्हते, तर ते समाजक्रांतिकारकही होते. एक कृतिशील विचारवंत होते. त्यामुळे सावरकर नुसते विचार मांडून थांबले नाहीत. अनेक समाजसुधारणेचे उपक्रम सावरकरांनी यशस्वी केले. सावरकर ‘अस्पृश्य’ शब्दाऐवजी ‘पूर्वास्पृश्य’ शब्दप्रयोग करायचे.

माजसुधारक व समाजक्रांतिकारक यातील फरक धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रात नोंदविलेला आहे. कीर म्हणतात, ‘‘सुधारक जुन्याच बांधकामाची पुनर्बांधणी करतो, तर क्रांतिकारक जुनी इमारत उद्ध्वस्त करतो व नव्याची उभारणी करतो.’’ सावरकर हे नुसते समाजसुधारक नव्हते, तर ते एक कृतिशील समाजक्रांतिकारकदेखील होते.

‘सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले, तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही’, ‘मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका,’ असे सांगणाऱ्या सावरकरांना आपल्या आयुष्यातील रोमहर्षक घटनेपेक्षा समाजसुधारणेचे कार्य किती महत्त्वाचे वाटत होते, याची प्रचिती येते. ब्रिटिशांची परदेशी शृंखला झुगारून देण्यासाठी झटणारे क्रांतिकारक सावरकर त्याच त्वेषाने ‘वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी’ या सात स्वदेशी शृंखला तोडण्यासाठीही अविरत झटताना दिसतात.

आपले सामाजिक विचार मांडण्यासाठी सावरकरांनी ‘संगीत उ:शाप’ हे नाटक, ‘जात्युच्छेदक निबंध’, ‘क्ष’ किरणे, ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ यांसारखे ग्रंथ तसेच कविता, कथा असे विविध वाङ्‍मयीन प्रकार हाताळले. सावरकर एक कृतिशील विचारवंत होते. त्यामुळे सावरकर नुसते विचार मांडून थांबले नाहीत. सहभोजन, मंदिरप्रवेश, पूर्वास्पृश्यांसह (सावरकरांच्या मते, पूर्वी त्यांना अस्पृश्य म्हणण्याची चूक/गुन्हा केला असेल; पण आता ती चूक/गुन्हा करू नये म्हणून सावरकर ‘अस्पृश्य’ शब्दाऐवजी ‘पूर्वास्पृश्य’ शब्दप्रयोग करायचे.) सर्व जातीच्या मुलांना शाळेतून एकत्र बसवणे, पूर्वास्पृश्यांसह सर्व जातीच्या लोकांसह घरोघरी दसरा व संक्रांतीला सोने व तीळगूळवाटप, बँकेकडून कर्ज घेऊन उभारलेला पूर्वास्पृश्यांचा बँड, १९२९ पासून सुरू केलेल्या अखिल हिंदू गणेशोत्सवातील भंगीबुवांचे कीर्तन, महिलांची प्रकट भाषणे असे अनेक समाजसुधारणेचे उपक्रम सावरकरांनी यशस्वी केले. यातीलच एक अभिनव उपक्रम म्हणजे अखिल हिंदू महिलांचा हळदीकुंकू समारंभ.

स्त्रियांमध्ये सुधारणेचा प्रसार करण्यासाठी सावरकरांनी १९२५ पासून हा उपक्रम हाती घेतला होता. कुटुंबातील एक स्त्री शिकली तर ते संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते, म्हणूनच कुटुंबातील एका स्त्रीच्या मनातून अस्पृश्यता गेली, तर त्या संपूर्ण कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या मनातून अस्पृश्यता नाहीशी होईल. म्हणून सावरकरांनी अस्पृश्यता-निवारणासाठी अखिल हिंदू महिलांचे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्याची कल्पना शोधून काढली.

पहिला हळदीकुंकू समारंभ १९२५ च्या चैत्रात शिरगाव येथे झाला. सावरकर काही काळ शिरगावच्या दामले यांच्या घरात वास्तव्यास होते; तेव्हा सावरकरांनी अखिल हिंदू स्त्रियांचे हळदीकुंकू करावे, असा आग्रह धरला. सवर्ण आणि त्यातही ब्राह्मणाच्या घरी पूर्वास्पृश्य स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलवायचे आणि स्वहस्ते त्यांना हळदी-कुंकू लावून त्यांची ओटी भरावयाची, ही गोष्ट त्या काळात रत्नागिरीसारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात पटणे कठीण होते. दामले यांच्या घरातील स्त्रिया या गोष्टीला मान्य होईनात. पूर्वास्पृश्य स्त्रियांना हळदीकुंकवाला आमंत्रण देण्यास कोणी सिद्ध होईना. शेवटी सावरकरांनी दामलेंच्या घरातील स्त्रियांशी तडजोड करून दामलेंनी पूर्वास्पृश्य स्त्रियांना केवळ निमंत्रण द्यायचे आणि त्यांच्या ओट्या भरणे, त्यांना हळदी-कुंकू लावणे हे सर्व सावरकरांच्या पत्नी माई सावरकर करतील, असे ठरले. यानुसार हळदीकुंकू समारंभ पार पडला. पूर्वास्पृश्य महिलांना स्पर्श करून त्यांच्या ओट्या भरणारी ही बाई आहे तरी कोण, हे पाहण्यासाठी स्त्रियांची खूप गर्दी झाली होती. माई सावरकर पूर्वास्पृश्य स्त्रियांच्या ओट्या भरीत होत्या. त्या वेळी जणू काही एखादी अद्भुत गोष्ट आपण पाहत आहोत, अशाप्रमाणे सर्वजणी माईंकडे पाहत होत्या. त्यांना कदाचित कल्पना नसेल, की आपण एका ऐतिहासिक आणि समाजक्रांतिकारक घटनेच्या साक्षीदार होत आहोत. सावरकरांनी हा समारंभ लपून-छपून वा गुप्तपणे केला नव्हता, उलट स्थानिक वर्तमानपत्रातून ठळकपणे या हळदीकुंकू समारंभाची वार्ता प्रसिद्ध केली होती. त्यामुळे सर्व जिल्हाभर या एका लहानशा घटनेने मोठी खळबळ उडवून दिली. (दामले, मो. वि., सावरकर स्मृती, प्रकाशिका : सौ सरोज मधुसूदन देसाई, रत्नागिरी, द्वितीय आवृत्ती, २०१२, पृष्ठ ४-५) भारतातील समाजक्रांतीच्या इतिहासातील ही एक महत्त्वपूर्ण घटना होती.

त्यानंतर (रत्नागिरीच्या) विठ्ठल मंदिरात हळदीकुंकू झाले. (गणेशोत्सवाच्या वेळेस) पूर्वास्पृश्य स्त्रिया धर्मशाळेत तेव्हा प्रथमच आल्या. मोठ्या पराकाष्ठेने साऱ्या रत्नागिरीतून पाच पालकांनी आपल्या मुलींना पूर्वास्पृश्य स्त्रियांस कुंकू लावण्यास परवानगी दिली. शेकडो स्त्रिया दुरून ते पाहत बसल्या. म्हणजे पहिल्या प्रयत्नाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला; पण सावरकरांकडे संयम आणि चिकाटी होती, त्यामुळे नाउमेद न होता ते प्रयत्न करत राहिले आणि त्याचा परिणाम १९२६ च्या मकर संक्रांत हळदीकुंकू समारंभात दिसून आला

या समारंभाला अध्यक्ष होते जनुभाऊ लिमये. अन्नपूर्णाबाई परांजपे यांनी निबंध वाचला आणि वीर सावरकरांचे भाषण झाले. त्यानंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समाजातील स्त्रियांनी सर्व जातींच्या महिलांना हाताने हळदीकुंकू लावले. त्यांना ऊस दिले. या समारंभाला सर्व जातींच्या ७००-८०० महिला उपस्थित होत्या.’ (समग्र सावरकर वाङ्‍मय, खंड १, पृष्ठ १११) १९२६ च्या गणेशोत्सवात पुण्यातील हिंदू महासभा नेते सिद्धेश्वरशास्त्री चित्राव रत्नागिरीला आले होते. रत्नागिरीतील हे हळदीकुंकू पाहून त्यांनी कौतुकाने तोंडात बोटे घातली होती. (रत्नागिरी हिंदुसभेचे पहिल्या पाच वर्षांचे प्रतिवृत्त- खंड १- १९२४ ते १९२८ : प्रकाशक : डॉ. म. ग. शिंदे, १९२९, पृष्ठ ३२)

१९२८ च्या गणेशोत्सव हळदीकुंकू समारंभात तर स्त्रियांची पूर्वास्पृश्य भगिनींस प्रसाद वाटण्यास, कुंकू लावण्यास इतकी अहमहमिका लागली की, कुंकवाचे करंडे वाट्यास येईनात. एक एक करंड्यावर पाच-पाच, सहा-सहा स्त्रियांनी काम भागवून घेतले. (उपरोक्त, पृष्ठ १२९) म्हणजे तीन वर्षांपूर्वी पहिल्या हळदीकुंकू समारंभात कोणी हळदीकुंकू लावण्यास कपाळ देईनात, बळेबळे कुंकू लावावे लागले, बऱ्याच स्त्रिया दुरून केवळ बघत होत्या; पण सहभागी झाल्या नाहीत, अशी अवस्था होती आणि तीन वर्षांनी इतका कायापालट झाला की, कुंकवाचे करंडे पुरे पडत नव्हते. (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत्त- खंड २- १९२९ ते १९३१ : प्रकाशक : अच्युत एकनाथ मलुष्टे, १९३७, पृष्ठ ९४-९५) आधी सावरकरांनी दामले कुटुंबीयांशी तडजोड करून सुरू केलेला हळदीकुंकू समारंभ नंतर मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. म्हणजे टप्प्याटप्प्याने सावरकरांनी समाजसुधारणा घडवून आणली होती.

कुठलीही सवाशीण म्हणजे नवरा हयात असलेली स्त्री हळदीकु़ंकू लावून घ्यायला शक्यतो नकार देणार नाही. या भावनेचा सावरकरांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी उपयोग करून घेतला आणि त्यात त्यांना यशदेखील मिळाले. एकदा का हळदीकु़ंकू समारंभाच्या निमित्ताने सर्व जातींच्या महिलांसोबत बसण्याची, बोलण्याची सवय सर्व महिलांच्या अंगवळणी पडली की टप्प्याटप्प्याने मनातील अस्पृश्यता नष्ट करण्यास सहजसोपे जाईल, हा या समारंभामागील सावरकरांचा हेतू होता. या उपक्रमात सावरकरांना त्यांच्या पत्नी माई सावरकरांनी अतिशय उत्तम साथ दिली.

सावरकरांच्या प्रेरणेने आणि भागोजीशेठ कीर यांच्या आर्थिक सहाय्यातून निर्माण झालेल्या पतितपावन मंदिरात सावरकरांनी २१ सप्टेंबर १९३६ या दिवशी महाराष्ट्रातील महिलांचे पहिले सहभोजन आयोजित केले होते. मनोरमाबाई देवरुखकर अध्यक्ष होत्या. सर्व जातीच्या पाऊणशेच्या वर महिला सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी स्पर्शबंदीच्या सोबत रोटीबंदीची बेडीदेखील तोडली. सर्व सहभागी महिलांची नावे ११ ऑक्टोबर १९३१ च्या ‘सत्यशोधक’ वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती.

सावरकरांचा समाजसुधारणेमागील दृष्टिकोन मानवतावादी होता. एका काव्यस्पर्धेसाठी सावरकरांनी वयाच्या १९ व्या वर्षी म्हणजे १९०२ मध्ये ‘बालविधवा- दुःस्थितीकथन’ ही वीस कडव्यांची कविता लिहिली होती. म्हणजे तरुण वयापासून सावरकरांना महिलांच्या, विशेषत: त्याकाळी असणाऱ्या बालविवाह, बालविधवा यांच्या दुःखाची जाणीव होती. देशस्वातंत्र्यावर, मातृभूमीच्या विरहावर काव्य रचणाऱ्या महाकवी सावरकरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून बालविधवांच्या दुःस्थितीचे कथनदेखील केले होते.

साठीच्या जरठांनो, विधुरांनो नव वधू खुशाल वरा।

लग्नाच्या अष्टदिनी विधवा परी अन्य ना वरी नवरा॥

हा न्याय कोण? कां हो विधवा-विधुरांत भेद हा असला?।

कसल्या अपराधाचा अबलांना क्रूर दंड हा बसला? ॥

विद्यादाना द्यावे शाला स्थापोनी प्रौढ विधवांते ।

अज्ञान सुविद्येने नष्टची अभ्रे अनेकविध वाते ॥

सावरकरांच्या सर्व नाटकातील स्त्री-पात्रे ही अबला नसून सबला, पराक्रमी, लढाऊ आणि साहसी तर आहेतच; पण तेव्हाची हानिकारक बंधने झुगारून देणारी, विवेकी आणि स्वतंत्र विचारांचीदेखील आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना महिलांसाठी अद्ययावत प्रसूतिगृह स्थापन करण्याची मागणी केली होती आणि त्याचा यशस्वी पाठपुरावाही केला होता.आजही समाजातील जातीपाती, भेदभाव, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी इतर थोर समाजसुधारक, समाजक्रांतिकारकांसोबत सावरकरांचे सामाजिक विचार आणि कार्यदेखील मार्गदर्शक ठरतील.

लेखक सावरकर संशोधक,

अभ्यासक, लेखक आणि वक्ते आहेत.

Web Title: Swatantryaveer Savarkar Social Revolutionary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SakalSavarkar
go to top