चाहत्यांना (?) चपराक

‘रोहितच्या पत्नीला मी स्टेडियमच्या स्टँडमध्ये बघतो तेव्हा तिच्यावर किती कमालीचं दडपण असतं हे प्रकर्षानं जाणवतं. मी विराटच्या पत्नीला बघतो तेव्हा तीसुद्धा केवढ्या दडपणाखाली असते हे कळून येतं.’
t20 world cup sourav ganguly over player family pressure
t20 world cup sourav ganguly over player family pressureSakal

- मुकुंद पोतदार

‘रोहितच्या पत्नीला मी स्टेडियमच्या स्टँडमध्ये बघतो तेव्हा तिच्यावर किती कमालीचं दडपण असतं हे प्रकर्षानं जाणवतं. मी विराटच्या पत्नीला बघतो तेव्हा तीसुद्धा केवढ्या दडपणाखाली असते हे कळून येतं.’

- सौरभ गांगुली, माजी कर्णधार (विश्वकरंडक टी-२० स्पर्धेला प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी दोन जून रोजी केलेलं भाष्य)

२०२०च्या आयपीएलमध्ये ‘चेन्नई सुपर किंग्ज्’चा संघ ‘कोलकता नाईट रायडर्स’विरुद्ध पराभूत झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची पाचवर्षीय मुलगी झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याबद्दल गुजरातच्या कच्छमधल्या मुंड्रा तालुक्यातल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आपला देश हा क्रिकेटरसिकांचा - नव्हे, क्रिकेटवेड्यांचाच म्हणू या - का...? कारण, वर उल्लेखिलेले दोन संदर्भ पाहिले तर खेळाकडं बघण्याची मतं अलीकडं किती टोकाची होत चालली आहेत आणि त्याचे परिणाम केवळ क्रिकेटपटूंवरच नव्हे तर, त्यांच्या कुटुंबीयांवरही किती प्रमाणात होत आहेत हे स्पष्ट होतं.

दादागिरी सप्रमाण सिद्ध करत भारतीय संघाच्या जगज्जेतेपदाचा पाया ज्यानं रचला, ज्यानं ‘बॉईज् इन ब्लू’ अर्थात् आपल्या क्रिकेटपटूंमध्ये विजिगीषुवृत्तीची बीजं रोवली त्या गांगुलीचं हे निरीक्षण विचारात टाकणारं आहे.

दुसऱ्या संदर्भाकडं वळताना आणखी चिंता निर्माण होते. सोशल मीडियाचा सोस फिटता फिटत नाही अशी एक पिढीच आता तयार झाली आहे आणि ती कोणत्याही पातळीला जाऊ शकते याचं (मुंड्रा तालुक्यातला अल्पवयीन मुलगा) हे प्रातिनिधिक उदाहरण मानावं लागेल. त्यामुळं धोनी-साक्षी यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पनाही करवत नाही.

या पार्श्वभूमीवर अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये संयुक्तरीत्या झालेल्या स्पर्धेतल्या भारतीय संघाचं टी-२० जगज्जेतेपद हे चाहत्यांना (?) भेट नव्हे तर, चपराक होय, असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरू नये. जेमतेम सहा महिन्यांपूर्वी भारताला मायदेशात वन-डे विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चीत व्हावं लागलं होतं.

तेव्हा विराट कोहली-के. एल. राहुल असे अव्वल फलंदाज तब्बल १६.१ षटकांच्या टप्प्यात एकही चेंडू सीमापार करू शकले नव्हते. त्या वेळी समोर ऑस्ट्रेलियानं भारतीय स्ट्रोकप्लेअरना चोक केलं होतं. या वेळी ज्यांच्यावर चोकर्सचा शिक्का बसला आहे अशा दक्षिण आफ्रिकेनं भारतावर कल्पनातीत दडपण आणलं होतं. त्यानंतरही भारत दडपण झुगारून देऊ शकला.

गांगुलीनं वरील भाष्य केल्यानंतर ‘संघानं दडपण न घेता मुक्तपणे खेळावं’ असा सल्ला त्यानं संघाला दिला होता. त्यानं २००३ मधल्या वन-डे विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीच उदाहरण दिलं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ दडपणालाच बळी पडला होता.

या वेळी संघावर प्रमाणाबाहेर दडपण येणार नाही याची दक्षता प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी घेतली. सन २००७ च्या वन-डे विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडीजमध्येच द्रविड यांच्या संघाची प्राथमिक फेरीतच गच्छंती झाली होती. त्यानंतर द्रविड यांना कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. या वेळी प्रशिक्षक म्हणून त्यांना विश्वकरंडकाचं यश गवसावं अशी सर्वांचीच सदिच्छा होती; पण सोशल मीडियामुळं #DoitforDravid हा हॅशटॅग ट्रेंडिंग बनला.

‘एव्हरेस्ट’चं उदाहरण

अखेर, द्रविड यांनीच अगदी सोप्या शब्दांत याचं खंडन केलं. ते साध्या-सोप्या भाषेत म्हणाले : ‘एक व्यक्ती म्हणून मी जो कुणी आहे त्याच्या हे अगदी विपरीत आहे...आणि माझ्या तत्त्वांच्याही विरोधात आहे हे. एखादी गोष्ट ‘कुणासाठी तरी करावी’ असं मानणाऱ्यांपैकी मी नव्हे, हे तुम्हालासुद्धा ठाऊक आहे.’

यानंतर द्रविड यांनी ‘एव्हरेस्ट’चं उदाहरण दिलं. जगातलं सर्वोच्च उंचीचं एव्हरेस्ट शिखर तीन वेळा सर करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या जॉर्ज मॅलरी यांच्याशी याचा संदर्भ आहे. ‘तुला ‘एव्हरेस्ट’वर चढाई का करायची आहे,’ अशा प्रश्नावर मॅलरी यांचे उद्गार होते : ‘ते तिथं आहे म्हणून...!’ (Because it''s there!) द्रविड यांनी हाच संदर्भ दिला. आणखी पुढं जात द्रविड यांनी नंतर ‘हा हॅशटॅग काढून टाकलात तर मी तुमचं कौतुकच करेन,’ असं सौम्य शब्दांत सांगत प्रसारमाध्यमांची एका अर्थानं खरडपड्डीच काढली.

आधुनिक व्यावसायिक क्रीडायुगात क्रीडापटूंवर मुळातच कमालीचं दडपण असते. त्यात अशा अवास्तव तुलनांमुळं भर पडते. त्यातच सोशल मीडियाची फोडणी दिली गेल्यानंतर सगळीच भट्टी बिघडू शकते. कर्णधार म्हणून द्रविड यांना जे साध्य झालं नाही, त्याची उणीव त्यांनी प्रशिक्षक म्हणून भरून काढावी, अशी कितीही सदिच्छा असली तरी ‘खेळात असं नसतं रे, बाबांनो’ असं कुणी कुणाला समजवायचं....?

दोन्ही निकषांवर त्या खेळाडूच्या यशापयशाचं मूल्यमापन होत असतं, ध्यानात घ्या...तर अशा द्रविडसरांनी त्यांच्या The Wall या टोपणनावाला साजेल अशी अभेद्य भिंत भारतीय संघाभोवती उभी केली. अंतिम सामन्यात तीन विकेट लवकर पडल्यानंतर अक्षर पटेल याला बढती देण्याची त्यांची चाल मास्टरस्ट्रोक ठरली.

मग आफ्रिकेचे फलंदाज टोलेबाजी करत असताना आपले गोलंदाज प्लॅन आणि त्यानुसार टप्पा विसरले नाहीत ते त्यामुळंच. यात जसप्रीत बुमरा याच्यापेक्षा हार्दिक पंड्या याची जास्त कसोटी होती. ‘आयपीएल’मध्ये ‘गुजरात टायटन्स’ ते ‘मुंबई इंडियन्स’ असा त्याचा स्विच प्रेक्षकांच्या पचनी पडला नव्हता. त्यामुळे त्याची हुर्यो उडवली गेली होती.

दुसरीकडं त्याच्या खासगी जीवनातही समस्या निर्माण झाल्या होत्या. एरवी, मैदानावर भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या पंड्या याला त्यामुळंच या यशानंतर आनंदाश्रू अनावर झाले. एक खेळाडू म्हणून त्यानं परिपक्वतेच्या पातळीवर मोठा टप्पा गाठला.

विराट कोहलीलाही द्रविडसरांनी पुरेपूर पाठबळ दिलं. ‘मोठी खेळी कोहलीच्या बॅटमधून लवकरच साकारण्याच्या मार्गावर आहे,’ असं सांगत त्यांनी दडपणाचा आणखी एक दरवाजा बंद करून टाकला.

विराटचं आजघडीचं स्थान पाहिल्यास त्याची बॅट किती तळपते याला महत्त्व होतं. त्यानं आपला क्लास प्रदर्शित केला. विराटनं या यशानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना पत्नी अनुष्का हिचा उल्लेख केला आहे. रोहितचासुद्धा पत्नी रितीकाबरोबरचा आणि मुलगी समायरा हिच्याबरोबरचा बाँड सुखद आहे.

विश्वकरंडक जिंकल्यानंतर बहुतेक खेळाडूंना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. त्याआधी अंतिम सामना सुरू असताना द्रविडसर पुरेपूर व्यक्त होत होते. त्यामुळं खेळाडूंना स्फुरण चढत होतं; मात्र, पकड ढिली होत असूनही एकही खेळाडू विचलित झाला नाही.

खेळात तुम्ही अपयशाचं भूत कसं गाडता यावर तुमचं स्थान अवलंबून असतं. चाहत्यांना प्रत्येक वेळी अपेक्षा सर्वोच्च कामगिरीचीच असते. ती बाळगणं गैर नाही; पण हार-जीत खिलाडूवृत्तीनं स्वीकारण्याचा मूलभूत उद्देश खेळाडूंशिवाय चाहत्यांनीही विसरता कामा नये. भारताच्या विजयानंतर मध्यरात्री पुण्यासारख्या शहरात क्रिकेटप्रेमींनी विजयोत्सव साजरा करताना उच्छाद मांडला होता.

‘जंटलमन्स गेम’ असं मूळ स्वरूप असलेलं क्रिकेट आता कितीही व्यावसायिक झालं तरी तत्त्वांचा भक्कम पाया बदलून चालणार नाही. रोहितनं अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्यासारखी पावलं टाकत विश्वकरंडक स्वीकारणं, तसंच टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यानं विंबल्डनच्या हिरवळीची जशी ‘चव चाखली’, त्याप्रमाणे केन्सिंग्टन ओव्हलवरचं ‘गवत चाखणं’ हे दोन क्षण आगळे ठरले.

‘आपली आणि आपल्या खेळाची पाळंमुळं घट्ट रोवलेली आहेत. आपले पाय जमिनीवर आहेत. यशानं हुरळून जाणार नाही आणि आता आपल्याला कशाचाही मोह नाही,’ हे आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या विराट, रोहित आणि रवींद्र जडेजा यांनी दाखवून दिलं.

रोहितच्या संघानं दडपणाला सकारात्मक पद्धतीनं सामोरं जाताना साकारलेलं जगज्जेतेपद खरं तर चाहत्यांनाच बोधप्रद ठरेल. ‘मैदानावर दडपण झेलताना आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहोत, यश मिळाल्यानंतरही आम्हाला इनिंग अकारण लांबवण्याचा मोह नाही,

आमचे पाय जमिनीवर असतील,’ असं सप्रमाण सिद्ध करत रोहितच्या चमूनं, ‘तुम्हीच अपेक्षांच्या बाबतीत वाहवत जाऊ नये अन् आमच्या यशाचा जल्लोष करतानाही भरकटू नये,’ अशी चपराकच चाहत्यांना दिली आहे.

त्यागाचं उदाहरण : सूर्या

अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव यानं घेतलेला डेव्हिड मिलर याचा झेल हा टर्निंग पॉइंट ठरला. याच सूर्यानं परमोच्च तंदुरुस्ती साध्य करण्यासाठी त्याग केला. गेल्या वर्षी त्याचं वजन ९३ किलोपर्यंत वाढलं होतं. त्यानंतर बंगळूरमधल्या ‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमी’त त्यानं आहारावर विशेष लक्ष दिलं.

पत्नी देविशा शेट्टी हिचाही त्याच्या आहारविषयक टीममध्ये समावेश होता. आठवड्याचा ब्रेक मिळूनही मुंबईला जायचं टाळत अकादमीतच मेहनत करण्यावर सूर्यानं भर दिला. यामुळंच मोक्याच्या क्षणी तो प्रसंगावधान राखू शकला आणि अविश्वसनीय असा झेल टिपू शकला. सूर्यासारखा त्याग प्रत्येक खेळाडूनं केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com