कमनशिबी ‘माया’

‘माया’ वाघीण आपला संसार फुलवण्यात अपयशी ठरली असली तरी तिच्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला कमालीची प्रसिद्धी मिळाली. ‘टुरिस्ट फ्रेंडली वाघीण’ अशी तिची ओळख होती.
MAYA Tiger
MAYA Tigersakal

- संजय करकरे

‘माया’ वाघीण आपला संसार फुलवण्यात अपयशी ठरली असली तरी तिच्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला कमालीची प्रसिद्धी मिळाली. ‘टुरिस्ट फ्रेंडली वाघीण’ अशी तिची ओळख होती. आज यू-ट्युबवर तिचे अनेक धाडसी व्हिडीओ बघायला मिळतात. आपल्या पिल्लांची पुरेपूर दक्षता घेणे आणि त्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यांना जंगलात मोकळे सोडणे मात्र तिच्या नशिबी नव्हतेच. पूर्ण वाढ होण्याआधीच तिची बरीच पिल्ले अन्य नर वाघांकडून मारली गेली. तिने पाच वेळा पिल्ले दिली; परंतु त्यातील दोनच आज जिवंत आहेत. इतर वाघिणींच्या तुलनेत ती काहीशी कमनशिबीच ठरली...

आपला कुटुंबकबिला लहानाचा मोठा करणे, आपल्या पिल्लांची पुरेपूर दक्षता घेणे आणि त्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सर्वदूर जंगलात पसरवणे ‘माया’ वाघिणीच्या नशिबी नव्हतेच. आपल्या संपूर्ण आयुष्यात तिने पाच वेळा पिल्ले दिली. त्यातील केवळ दोन नर पिल्ले आज जिवंत आहेत. तिसऱ्या बाळंतपणातील एक नर ‘सूर्या’ ताडोबाचे जंगल सोडून उमरेड करंडला अभयारण्यातील जंगलात गेला. सध्या त्याचाही नेमका ठावठिकाणा नाही.

जवळील प्रादेशिकच्या जंगलात तो गेला असल्याचा अंदाज आहे. चौथ्या बाळंतपणात ‘मटकासूर’ नावाच्या वाघापासून झालेले आणखी एक नर पिल्लू सध्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील देवाडा, जुनोना आणि मामला परिसरातील जंगलात दिसत आहे. म्हणजेच पहिल्या बाळंतपणात दोन, दुसऱ्या वेळेस तीन, तिसऱ्या वेळेस दोन, चौथ्या वेळेस चार आणि पाचव्या वेळी एक अशा साधारण बारापैकी केवळ दोनच पिल्ले जगली आहेत.

दुसऱ्या बाळंतपणातील एक पिल्लू मोठे होऊन आईपासून वेगळे झाल्याचे बघितले गेले. मात्र, पुढे त्याचाही पत्ता लागला नाही. पूर्ण वाढ होण्याच्या अगोदरच ‘माया’ची बहुतांश पिल्ले अन्य नर वाघांकडून मारली गेली. त्याउलट मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘कॉलरवाली’ वाघिणीच्या नशिबी कमालीचे ‘गोकुळ’ फुलल्याचे आपल्या लक्षात येईल. तिने आपल्या आयुष्यात २९ पिल्लांना जन्म दिला. त्यातील केवळ चारच मृत्युमुखी पडली. उर्वरित २५ पिल्ले मोठी होऊन संपूर्ण जंगलात पसरली. ‘माया’ मात्र त्या बाबतीत फारच कमनशिबी ठरली. त्याला कारणही तसेच होते.

अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पांढरपवनी, ताडोबा तलाव हा वन्यप्राण्यांनी समृद्ध असणारा महत्त्वपूर्ण भूभाग तिच्या ताब्यात असूनही तेथे सातत्याने नर वाघांचा वावर बघायला मिळाला. तिने २०१२ ते २३ पर्यंतचा एक दशकाहून अधिक काळ या सुंदर जंगलात घालवला. या काळात नामदेव, टायसन, बोबड्या, नरसिंम्हा, मटकासूर, गब्बर, ताला, बलराम, बजरंग, रुद्रा, मोगली इत्यादी ज्ञात असलेल्या नरांसोबत तिला सामोरे जावे  लागले.

कधी सौहार्दाने; तर काही वेळा जबरदस्तीने तिला सर्व नरांशी जुळवून घ्यावे लागले. २०२० मध्ये ती ‘मटकासूर’ या ताकदवान नराशी मिलन करत असताना दिसली. ‘ताला’ नावाच्या दुसऱ्या नराशीही मिलन करताना ती पाहिली गेली. त्यामुळे त्यावेळेस तिला झालेली पिल्ले नेमक्या कोणत्या नराची होती, यासाठी कदाचित त्यांची डीएनए चाचणीच करावी लागली असती.

बारकाईने विचार केला तर हे सारे ती केवळ आणि केवळ आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी करत असल्याचे लक्षात येते. मात्र, एवढे सारे करूनही तिला आपल्या पिल्लांना वाचवता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. शंतनू मोईत्रा यांनी संगीतबद्ध केलेल्या व तनवीर गाझी यांनी शब्दबद्ध केलेल्या पहिल्या ‘टायगर अँथम’मध्ये माया आणि तिचे एक पिल्लू अत्यंत सुंदर रीतीने चित्रबद्ध केले गेले आहे. गाण्याच्या ओळीही खूपच सुरेख आहेत.

साधारण तीन महिन्यांचे पिल्लू आईसोबत कसे गंमत-जंमत करते, तिच्या मागोमाग कसे जाते, लपाछपी करते, लुटूपुटूची लढाई कसे खेळते व या दोघांमधील उत्कट अन् प्रेमळ क्षण ‘नल्लामुथू’ या सुप्रसिद्ध फिल्ममेकरने कमालीचा सुंदर टिपला आहे. या चित्रफितीमध्ये दिसणारे हे अल्लड, निरागस पिल्लू नंतर एका नर वाघाकडून मारले गेल्याचे समजल्यावर आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याशिवाय राहत नाहीत.

आपल्या पिल्लांबाबत ‘माया’ दक्ष होती का, पिल्लांची ती खरोखरच काळजी घेत होती का, हा सुरुवातीच्या पहिल्या बाळंतपणावेळी पडलेला प्रश्न होता. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तोंडात पिल्ले धरून जाणारी ‘माया’ काही छायाचित्रकारांनी टिपली होती. त्यावेळेस तिने ही दोन लहान पिल्ले ताडोबा तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या पाझरच्या परिसरात ठेवली होती.

ही आई या पिल्लांना येथे सोडून पांढरपवनी तलावाच्या परिसरातच अधिक काळ घालवत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले होते. काही काळानंतर ही पिल्ले मृत्युमुखी पडल्याचेही लक्षात आले. अन्य प्राण्यांनी ही पिल्ले मारली, अशी चर्चा त्या वेळेस होती. पहिल्या बाळंतपणात बेफिकिरीने राहणारी ‘माया’ नंतर मात्र त्यानंतरच्या चारही बाळंतपणामध्ये रमली.

‘माया’ वाघिणीची पिल्लांसोबत असलेली सलगी, भावबंध, तिचे ममत्व, त्यांची घेत असलेली काळजी अनेकांनी अनुभवली, बघितली आणि टिपलीही. चंद्रपूरचा छायाचित्रकार अमोल बैस याने काढलेले एक चित्र चांगलेच गाजले. ‘माया’ रस्त्यावर बसली असून तिचे एक पिल्लू तिला मिठी मारत असल्याचे हे छायाचित्र आहे. या चित्राचे नंतर भारतीय टपाल खात्याने २९ जुलै २०१७ रोजी तिकीट प्रसिद्ध केले.

या काळात मी अनेक वेळा या वाघिणीला तिच्या पिल्लांसोबत पांढरपवनी, ताडोबा तलाव, जामुनझोरा व पाझर येथे बघितले. पिल्लांसोबत सुरू असलेली तिची मस्ती, त्यांच्यासोबतचा तिचा ओढा, त्यांना कायम स्वच्छ करणारी आणि काळजी घेणारी ‘माया’ मला अनुभवता आली.

११ ऑक्टोबर २०१८ मध्ये जंगलात फिरत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास काळा आंबा रोडवर ‘माया’ झोपलेली आम्ही बघितली. सकाळची वेळ आणि कोवळे ऊन अंगावर घेत ही महाराणी भर रस्त्यावर निवांत आडवी होऊन झोपली होती. थांबलेल्या सहा-आठ गाड्यांचा तिला कोणताही त्रास होत नव्हता. या वेळेस तिला दोन पिल्ले असल्याची माहिती होती. मात्र, जवळपास पिल्ले कुठेही दिसत नव्हती.

साधारण पंधरा-वीस मिनिटे जांभया आणि आळोखे-पिळोखे देत ती रस्त्यावरील गार मातीत निवांत पहुडलेली होती. त्यानंतर ती उठून बसली आणि उजव्या बाजूला असलेल्या जंगलात बारकाईने बघू लागली. कदाचित तिने बारीक आवाज केला असावा आणि बांबूतून सहा-सात महिन्यांची दोन पिल्ले तिच्याजवळ आली. या वेळेस पिल्लांच्या हावभावातून ती आईपासून दूर असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. पहिले नर पिल्लू आईला बिलगून गेले.

बसलेल्या अवस्थेतच ‘माया’ने अत्यंत प्रेमाने त्याचे तोंड, गळा आणि छातीकडील भाग चाटायला सुरुवात केली. हे सर्व सुरू असतानाच दुसरे पिल्लू काहीसे बिचकतच ‘माया’जवळ आले. त्यालाही पहिल्या पिल्लाप्रमाणेच ‘माया’ने व्यवस्थित चाटले. पहिल्या नर पिल्लाने मग खाली वाकून दूध प्यायला सुरुवात केली; पण अवघ्या एका मिनिटातच तो पुन्हा सरळ उठून बसला आणि आमच्या गाडीकडे थेट येऊ लागला.

‘माया’चा हा कौटुंबिक सोहळा साधारण पुढील अर्धा तास असाच सुरू राहिला. त्याच वेळेस काळा आंब्याच्या बाजूने दोन वनरक्षक व त्यांचे सहकारी सायकलीवरून येत होते. पायी चालणाऱ्या माणसांकडे पाहून ‘माया’ एकदम सावध झाली. पिल्लांनाही समोरून येणाऱ्या माणसांची चाहूल लागल्याने तीही अतिशय दक्ष होऊन त्यांच्याकडे बघू लागली. जंगलाचा अनुभव असलेल्या वनरक्षकांनी तेथेच काही काळ थांबून परत मागे जाणे पसंत केले.

त्यानंतर पुन्हा माया आपल्या पिल्लांमध्ये रमली. उन्हाचा थोडा त्रास जाणू लागल्यानंतर ती पिल्लांना घेऊन दाट जंगलात निघून गेली. त्यातील एक नर पिल्लू म्हणजे ‘सूर्या’ होता. या ‘सूर्या’ची गोष्ट मी यापूर्वीच आपल्या या सदरात सांगितली आहे. १२ मार्च २०२१ रोजी सायंकाळच्या फेरीत ‘माया’ला चार पिल्लांसह पांढरपनी तलावाच्या मागच्या बाजूला बघितले. ही पिल्ले साधारण सहा-सात महिन्यांची होती.

त्यातील एक पिल्लू आईपासून दूर राहणे पसंत करीत होते. ते नर पिल्लू होते. अन्य तिन्ही पिल्ले आईजवळ येऊन तिच्याकडून स्वच्छता करून घेऊन आजूबाजूला पसरली. जे पिल्लू सतत घाबरत होते, आई तसेच पर्यटकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होते, तेच पिल्लू आज देवाडा आणि जुनोना परिसरात दिसत आहे. आज ते पिल्लू ऐन वयात असून आपले बस्तान मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

‘माया’ आपला संसार फुलवण्यात अपयशी ठरली असली तरी तिच्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला कमालीची कीर्ती मिळाली. एक बेधडक वाघीण, टुरिस्ट फ्रेंडली वाघीण इत्यादींसह अनेक उपाध्या तिला या काळात मिळाल्या. आज जर आपण यू-ट्युबवर ‘माया’ या नावाने सर्च केले तर ताडोबातील अनेक व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतील. रानडुकराची शिकार, गव्याला लोळवणे आणि वेगाने धावून नर चितळ्याला गारद करतानाचे विस्मयकारक तिचे व्हिडीओ तिथे आहेत.

मुंबईतील युवा वन्यप्राणी छायाचित्रकार ऐश्वर्या श्रीधर हिने या वाघिणीवर ‘द क्विन ऑफ तारू’ नावाची फिल्म बनवली आहे. ऐश्वर्याने स्वतः तसेच अन्य वन्यप्रेमींच्या मदतीने तयार केलेली ही फिल्म ‘नॅशनल जिओग्राफी’वर प्रसारित झाली आहे. या फिल्ममध्ये ही वाघीण लहानपणापासून मोठी होतानाचे चित्रीकरण पाहायला मिळते. साधारण सहा वर्षे तिला ही फिल्म बनवण्यास लागले. सुमारे चार वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध वन्यजीव फिल्ममेकर सुबू नल्लामुथ्थू यांनी `माया`चा मागोवा घ्यायला सुरुवात केली. कसा अनुभव राहिला त्यांचा, जाणून घेऊ पुढील भागात...

(क्रमशः)

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com