Krishna Janmashtami : दहीहंडी साजरी करा पण जरा जपून...

take care while celebrating dahihandi on Krishna Janmashtami
take care while celebrating dahihandi on Krishna Janmashtami

गोकुळाष्टमी : दहीहंडी कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी भारतातील अनेक राज्यात विशेषतः उत्तरेकडील राज्यात होणारा सोहळा. पूर्वी दूध, दही, लोणी व इतरही खाद्यपदार्थ, कुत्रे, मांजरी यांच्यापासून संरक्षण म्हणून मडक्‍यात वा गोल भांड्यात घालून उंचावर म्हणजे जवळजवळ छतावरच टांगून ठेवत. खट्याळ व धाडसी कृष्णाने त्यावरही मार्ग शोधला होता तो दहीहंडीचा. जेव्हा घराघरांतील स्त्री व पुरुष शेतावर कामाला निघून जात तेव्हा श्रीकृष्ण व त्याची टीम दहीहंडी रचून मडकी फोडून त्यातील लोणी, दही वाटून खात. आजही श्रीकृष्णाची ही दहीहंडी साजरी केली जाते. 

दहीहंडी हा धार्मिक भाग जरी सोडला तरी त्यात व्यवस्थापनाची अनेक तत्त्वे दडलेली आहेत. दहीहंडीचा नीट अभ्यास किंवा निरीक्षण केल्यास बऱ्याच गोष्टी शिकता येतात. दहीहंडी हे टीमवर्कचे उत्तम उदाहरण. टीमवर्कमध्ये प्रत्येक जण महत्त्वाचा, प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची, प्रत्येकाने आपली भूमिका उत्तमरीत्या निभावण्याची शक्‍यता असेल, तरच टीमवर्क यशस्वी होते. दहीहंडीतही खालपासून वरपर्यंत उभ्या केलेल्या मानवी साखळीत एकाचा बेजबाबदारपणा खूप महागात पडतो.

दहीहंडीमध्ये वरच्या मडक्‍यात किंवा दोरीला लावलेले पैसे हे त्यात भाग घेतलेल्या सर्वांना समान वाटून द्यायचे असतात म्हणजेच यशाचे क्रेडिट फक्त स्वतःला न घेता संपूर्ण टीमला द्या, हा मेसेज त्यातून प्रतीत होतो. दहीहंडी फोडण्यात वरच्यांचा रोल महत्त्वाचा असला तरी तळाला असलेलेही तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून वरची फळी उभी असते म्हणजे टीम वर्कमध्ये विश्‍वास महत्त्वाचा, मग तो अगदी खालच्या पदावरच्या व्यक्तीपासून ते वरच्या थराच्या व्यक्तींपर्यंत. दहीहंडीत तयार होणारा मानवी पिरॅमिड अनेक वेळा कोलमडतो, दर वर्षी अनेक लोक जखमी होतात, पावसामुळे घसरतात, आपटतात पण पुन्हा पुढच्या वर्षी हिरिरीने, नव्या उत्साहाने भाग घेतातच, कारण धोका पत्करण्याची त्यांची तयारी असते व धोका पत्करतो तोच जीवनात पुढे जातो, हाही संदेश त्यातून मिळतो. टीमवर्कमध्ये शिस्तीला फार महत्त्व आहे. मग ती रणांगण लढायची लढाई असो वा एखादा सेमिनार, कॉन्फरन्स वा वर्कशॉप असो. नियोजित पद्धतीने काम होणे महत्त्वाचे. 

दहीहंडीतही या शिस्तीला महत्त्व आहे. खाली तळाचा गोल कोणी करायचा, मधला गोल कोणी करायचा, वरच्या भागात कमी वजनाची पण जास्त उंचीचे लोक ठेवायचे, कोणी कशा पद्धतीने उभे राहायचे हे सगळे शिस्तीत चाललेले असते. 

दहीहंडीचा सोहळा आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवतो ते म्हणजे यश मिळेपर्यंत उत्साह कायम ठेवून मेहनत करणे. कितीही वेळ लागो, कितीही कष्ट पडो पण दहीहंडी फोडलीच जाते. प्रत्येक वेळच्या अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने अधिक मेहनत करून, आपल्या उद्दिष्टाप्रती निष्ठा ठेवून यश पदरात पडतेच व ते आपण पाडून घेतलेच पाहिजे असेच जणू हे दहीहंडीत भाग घेणारे आपल्याला सुचवत असतात. 

आज दहीहंडीचे स्वरूप व्यापारी झाल्याने त्याचे मूळ स्वरूप हरवलंय. दहीहंडी मंडळांची संख्या वाढत चाललीय. 12 लाखापर्यंत बजेट असणारी मंडळी आहेत. त्यातील 5 ते 7 लाख तर वेशभूषेवर खर्च होतात. मुंबईसारख्या शहरात 250 दहीहंडी मंडळे आहेत. दहीहंडीत भाग घेण्याचे स्पिरीट, उत्साह केवळ पैसे कमवण्यासाठी असतो का, असे वाटावे अशी स्थिती आहे. राजकारणी मंडळी तर दहीहंडीकडे व्होट बॅंक म्हणून बघतात. जेवढी दहीहंडी उंच तेवढी व्होट बॅंक मोठी. ती सुद्धा तरुणांची. मित्रहो, दहीहंडीचे स्वरूप जरी आज व्यापारी झाले असले तरी त्यातून मिळणारी शिकवण म्हणजे टीमवर्कचे महत्त्व, कामावरची निष्ठा, यश मिळेपर्यंत मेहनत करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, शिस्त हे गुणच आपल्याला जीवनात यशोशिखर गाठण्यासाठी आवश्‍यक असतात हे शिकायला काय हरकत आहे? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com