श्रेष्ठ-कनिष्ठ नसते पण प्रतिभा असते!

poem
poem

मागील लेखात सूचित केलेल्या ‘प्रतिभा’ या संकल्पनेबद्दल थोडीफार चर्चा या लेखमालेच्या निमित्ताने घडली व त्यात काही मित्रांनी ‘प्रतिभा’ ही वाङ्‍मयीन क्षेत्रात बदनाम झालेली संज्ञा आहे, असे आवर्जून सांगितले. त्यासाठी अनेक कारणे आणि तर्क दिले गेले. त्याबद्दल थोडी चर्चा करणे आवश्यक वाटले म्हणून ती चर्चा करूनच पुढे जाऊ.

पाश्चात्त्य परंपरेत प्रतिभा (Genius) ही संकल्पना रोमँटिक सौंदर्यशास्त्राचे जनक Cassius Longinius यांनी त्यांच्या साधारणपणे तिसऱ्या शतकात लिहिलेल्या On the Sublime या ग्रंथात मांडल्याचे दिसते. प्राचीन काव्यशास्त्रातही ही संकल्पना अगदी सुरुवातीपासून उपस्थित असल्याचे दिसते. पाश्चात्त्य परंपरेच्या सुरुवातीच्या काळात श्रेष्ठ लेखनाचा सर्वोच्च गुण हा sublimity/उदात्तता मानला जात असे आणि अशा उदात्त निर्मितीचा एक महत्त्वाचा स्रोत genius हा मानला जात असे. याचप्रमाणे प्राचीन काव्यशास्त्रात प्रतिभा ही ईश्वरदत्त क्षमता मानली जात असे आणि म्हणून ती असाधारण आणि गुढरम्य असते, असेही मानले जात असे. या व अशा मान्यतांमुळे ही श्रेष्ठत्व मिरविणारी, उच्चभ्रूंना गौरवान्वित करणारी संकल्पना आहे, असेही मानले जात असे. यातून साहित्याकडे/कवितेकडे बघण्याचा ‘उदात्ततावादी’ दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो, असे काहींचे निरीक्षण आहे व त्याला त्यांचा आक्षेपही आहे.

आधीच्या पिढीतील महत्त्वाचे समीक्षक रा. भा. पाटणकर यांनी त्यांच्या ‘सौंदर्यमीमांसा’ या महत्त्वाच्या ग्रंथात ‘सौंदर्यविधानाचे स्वरूप’ या प्रकरणात naturalism (प्राकृतिकतावाद), intuitionism (प्रातिभ-ज्ञानवाद) आणि emotivism (भावनार्थवाद) या तीन दृष्टिकोनातून सौंदर्यभान, मूल्यभान आणि genius या संज्ञा आणि संकल्पनांची चर्चा आणि उपपत्तिसिद्धांत या प्रकरणात केलेली कल्पनाशक्ती (Imagination), चमत्कृतिशक्ती, प्रतिभा आणि स्फूर्ती इत्यादी संकल्पनांबद्दल जी चर्चा केली आहे, ती मुळातून वाचण्यासारखी आहे. पाटणकर यांच्या मते कलावंतात एक productive imagination (निर्मितीशील कल्पनाशक्ती) असते, असे गृहीत धरता येते तसेच कल्पनाशक्तीचे आणखी एक रूप कल्पिता येऊ शकते आणि ते म्हणजे reproductive imagination (पुनःप्रत्ययकारी कल्पनाशक्ती). या संज्ञांच्या अधिक खोलात न जाता असे म्हणता येते की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही नैसर्गिक क्षमता असतात. जसे कुणाच्या अंगी गायनाची तर कुणाच्या अंगी बौद्धिक कामे करण्याची. कुणाची नैसर्गिक वृत्ती ही विश्लेषणात्मक पद्धतीने विचार करण्याची असते तर कुणाची संश्लेषणात्मक पद्धतीने विचार करण्याची.

इथे एक गोष्ट आग्रहपूर्वक सांगितली पाहिजे की या क्षमतांत कोणतीही क्षमता तिच्या मूलभूत स्वरूपात दुसऱ्या कुठल्याही क्षमतेपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही. ती केवळ असते आणि ती नुसती असून भागत नाही तर त्या क्षमतेचा त्या व्यक्तीच्या ठिकाणी योग्य असा विकास व्हावा लागतो, त्या क्षमतेचा इतर अनेक क्षमतांशी संयोग होऊन एक गुणसमुच्चय कार्यरत व्हावा लागतो तेव्हाच कोणत्याही कलावंताच्या अंगी जन्मजात उपस्थित असलेली ही नैसर्गिक क्षमता कलानिर्मितीसाठी कामी येऊ शकते. तिचे नावच जर बदनाम झाले असेल तर आपण त्या नैसर्गिक क्षमतेला निर्मितीशील कल्पनाशक्ती, प्रातिभ-क्षमता, इत्यादी कुठलेही नाव देऊन ते सतत वापरून त्यास प्रतिष्ठाही मिळवून देऊ शकतो. परंतु वरील आक्षेपांमुळे ‘प्रतिभा नावाची गोष्ट अस्तित्वातच नसते. ती कलावंताला त्याच्या/तिच्या सभोवतालात उपस्थित सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परीवेशातून, वास्तवातून प्राप्त होते,’ असे म्हणणे हे अतिरेकी ठरेल.

या संदर्भात पूर्वी अति संक्षेपात मांडलेला एक मुद्दा पुन्हा मांडतो. तो आहे मेंदू विज्ञानाने केलेल्या अभ्यासाचा. हा अभ्यास असे सांगतो की आपल्या मेंदूत रंग, गंध, आकार आदी संवेदनांची काही विशिष्ट केंद्रं असतात. ते एकमेकांपासून काही अंतर राखून असतात आणि सामान्यतः ही केंद्रं स्वतंत्र असतात. परंतु, काही व्यक्तींच्या बाबतीत असे होते की मेंदूच्या या सामान्य वायरिंगमध्ये थोडा बदल दिसून येतो. ही केंद्रं एकमेकांशी काही अंशी मिसळून जातात. यामुळे काही व्यक्तींना आकडे बघून रंग आठवतात आणि रंग बघून गंध जाणवतो. या मानसिक स्थितीला सिनस्थिया म्हणतात. पूर्वी सिनस्थिया हा एक मानसिक आजार आहे, असे मानले जायचे. पूर्वी हजारात पंचेविसेक व्यक्तींत ही मानसिक स्थिती आढळून यायची. आता हे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. आता या स्थितीला आजार न मानता सिनास्थेटिक ॲबिलिटी मानले जाते.
अशी क्षमता असलेल्या व्यक्तींबद्दल हा अभ्यास असे सांगतो की अशा व्यक्तींत मेटॅफर (रूपक) वापरून बोलण्या-लिहिण्याची प्रवृत्ती इतर व्यक्तींपेक्षा जास्त दिसून येते. ही मंडळी उदाहरणं देऊन, प्रतिमा, प्रतीकं, रुपकं वापरून बोलण्यात निपुण असतात. ते म्हणींचा, सुभाषितवजा वाक्यांचा अधिक वापर करतात. कवी आणि लेखकांमध्ये ही मानसिक स्थिती आढळून येते, असे निरीक्षण आहे.

या अभ्यासाच्या आधारे असे निश्चित दाखवून देता येईल की आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा इतर कुठल्याही श्रेष्ठतेच्या पारंपरिक निकषांत न बसणाऱ्या वर्गांतून आलेल्या अनेक कवी/लेखकांच्या (मॅक्झिम गॉर्की, फ्योदोर दोस्तोयेवस्की, बहिणाबाई, नारायण सुर्वे इत्यादी) अंगी या नैसर्गिक प्रातिभ-क्षमता किंवा निर्मितीशील कल्पनाशक्ती असल्याने ही मंडळी उत्तम साहित्यनिर्मिती करू शकली.

परंतु, केवळ अंगी प्रतिभा असल्याने कुणी श्रेष्ठ लेखक/कवी होत नाही. त्या क्षमतेचा योग्य असा विकास व्हावा लागतो. साहित्य ही शेवटी कला असल्याने त्या कलेच्या इतर अंगांचा – अगदी त्यात गृहीत असलेल्या आणि गरज असलेल्या कौशल्याचाही अभ्यास आणि सराव असायला लागतो. किमान ज्या कलाप्रकारात कलावंत काम करतो किंवा करू इच्छितो त्या कलाप्रकाराचा इतिहास, तिची मूल्यव्यवस्था, तिच्या कलात्मक अंगांची माहिती हे सारे कलावंताकडे असलेच पाहिजे. मला कथा/कविता स्फुरते किंवा मला कथा/कविता लिहावीशी वाटते, एवढ्या भांडवलावर चांगली कथा/कविता लिहिता येत नाही, एवढे जरी लिहिणाऱ्याला कळले तरी खूप आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com