...व्यक्ती म्हणूनही समृद्ध झालो (तन्मय देवचके)

तन्मय देवचके tanmay.deochake@gmail.com
रविवार, 9 डिसेंबर 2018

मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे.

मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे.

संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी पूर्वजन्मीची पुण्याईच आहे, असं मी समजतो. सन 1947 मध्ये माझे आजोबा गोपाळराव देवचके यांनी नगरमध्ये "भारत' नावानं ब्रास बॅंड सुरू केला व आमच्या कुटुंबात संगीताची मुहूर्तमेढ रोवली गेली. ते उत्तम ट्रम्पेट वाजवत व की-बोर्डचीही उत्तम जाण त्यांना होती. त्यामुळे घरातही माझे बाबा व काका अनेक वाद्यं आपसूकच वाजवायचे. घरात इतर गोष्टींपेक्षा वाद्यांचंच प्रमाण जास्त असायचं. लहानपणी माझ्या हातात खेळण्यांच्या आधी की-बोर्ड आला, नीट बोलायच्याही आधी मी विविध गाणी वाजवायला लागलो. हे अतिशय नैसर्गिक प्रक्रियेनं सुरू होतं. मी वाद्यांशी खेळत होतो, याचं श्रेय माझे पहिले गुरू आजोबांना व वडील अभय देवचके यांना जातं. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता अतिशय संवेदनशीलतेनं त्यांनी हे सर्व हाताळलं व माझी त्यामधली रुची वाढवली. त्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षी मी हार्मोनिअमवादनाचा छोटासा; परंतु जाहीर कार्यक्रम करू शकलो. यामध्ये आणखी एका गोष्टीचा मोठा वाटा आहे व तो म्हणजे, आमच्या ब्रास बॅंडच्या तालमींचे माझ्यावर नकळतपणे होणारे संस्कार. त्या वेळी "कुहू कुहू बोले कोयलिया', "बोल रे पपीहरा' यांसारखी अनेक अवघड गाणी रोज कानावर पडत असत. त्याचे कुठंतरी खोलवर संस्कार झाले; परंतु हे सर्व अजाणतेपणी चाललं होतं. थोडा मोठा झाल्यावर बाबांनी हार्मोनिअमचं माझं शास्त्रशुद्ध शिक्षण नगरमधले प्रकाश शिंदे यांच्याकडं सुरू केलं. खरं सांगायचं तर, चित्रपटसंगीताची गोडी असल्यानं सुरवातीला रागांमध्ये किंवा बंदिशींमध्ये माझं मन रमेना. शिंदे सरांनी माझ्यावर चांगलीच मेहनत घेतली; पण माझ्यातल्या शास्त्रीय संगीताचा वणवा त्या वेळी नीट पेटला नव्हता! "दुर्दैवा'नं मी अभ्यासात हुशार होतो. त्यामुळे फार काही न करता दहावीमध्ये 85 टक्के मिळाले आणि माझी रवानगी शास्त्र शाखेकडं करण्यात आली.

इंजिनिअर किंवा डॉक्‍टर यांपैकी एक काहीतरी होण्यासाठी "केवळ चांगले मार्क्‍स पडले' म्हणून मी तिथं प्रवेश घेतला. This is not my cup of tea ही भावना ज्या वेळी माझ्या मनात जागृत झाली. त्या वेळच्या बायॉलॉजीच्या प्रॅक्‍टिकलमध्ये कापलेला तो उंदीर अजूनही माझ्या स्मरणात आहे. आणि मग, अतिशयोक्ती वाटेल; पण बारावीत ठरवून कमी पाडलेले गुण, संगीतक्षेत्रात येण्यासाठी आई-वडिलांशी केलेला संघर्ष (नगरसारख्या लहान गावात माझ्यासाठी त्या काळी त्यांनी घेतलेली भूमिका सुसंगतच होती) व त्यातून पुण्याच्या ललित कला केंद्रात बीए (हार्मोनिअम) विषयासाठी घेतलेला प्रवेश असं काहीसं नाट्यमय वळण घेत; थोडासा उशिरा का होईना; पण योग्य ठिकाणी मी येऊन पोचलो. ललित कला केंद्रामधला प्रवेशपरीक्षेतला किस्सा मला अजूनही आठवतो. परीक्षक म्हणून त्या वेळी प्रमोद मराठे, आरती अंकलीकर-टिकेकर व विभागप्रमुख सतीश आळेकर सर होते.
नगरमध्ये ज्यांना प्रत्यक्ष पाहणं दुरापास्त होतं, अशा कलाकार मंडळींना परीक्षक म्हणून पाहून आधीच

माझी अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे ख्यालाचा मुखडा काही केल्या समेवर येईना. विलंबित एकतालामधल्या दहाव्या मात्रेच्या "तिरकिट'ची मी चातकासारखी वाट पाहत होतो आणि त्या वेळीच प्रसंगावधान राखत मराठे सरांनी "आता ख्याल थांबव आणि तुला जे येतंय ते वाजवून दाखव' अस म्हणून सर्वांची त्या प्रसंगातून शिताफीनं सुटका केली. गुलाम अली यांनी गायिलेल्या एका गझलेनं मला त्या वेळी तारलं. एका मुलानं त्याच्या रद्द केलेल्या ऍडमिशनमुळं व "याचा (म्हणजे माझा) हात बरा आहे' या दोन गोष्टींवर ललित कला केंद्रात माझी निवड झाली व खऱ्या अर्थानं माझा शास्त्रीय संगीताचा प्रवास सुरू झाला. "ललित'मुळेच मी प्रमोद मराठे यांच्याशी व गांधर्व महाविद्यालयाशी जोडला गेलो आणि हाच माझ्या आयुष्यातला "टर्निंग पॉइंट' ठरला असं म्हणता येईल. पुण्यात शनिवार पेठेतल्या गांधर्व महाविद्यालयाच्या जुन्या वास्तूत माझं वास्तव्य असलेली ती सात वर्षं माझ्या स्मरणात सदैव राहतील. रियाज, शिस्त, संयम, आर्थिक नियोजन या सगळ्याचेच संस्कार मराठे सरांनी तिथं माझ्यावर कळत-नकळत केले. अतिशय सौम्य पद्धतीनं; परंतु अतिशय खोलवर ते संस्कार रुजले. मला आठवतंय, मराठे सर पहाटे पाच वाजता विद्यालयात येत व रोज कमीत कमी सहा-सात तास रियाज चालायचा. रियाजाची धग - जी केवळ गुरूच आपल्या शिष्यांपर्यंत पोचवू शकतो - ती मराठे सरांनी अतिशय समर्थपणे माझ्यापर्यंत पोचवली. जणू काही एका नवीन विश्वातच मी आलो होतो. विद्यालयाच्या वास्तूत "रियाज-श्रवण-गुणिजनांचा सहवास-रियाज' अशा पद्धतीनं मी कधी शास्त्रीय संगीताच्या सागरात बुडालो काही कळलंच नाही. सुदैवानं त्या वेळी माझ्याकडं मोबाइल नव्हता; पर्यायानं सोशल मीडियामुंळं चित्त विचलित होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे संगीत या विषयावर अधिक बळ एकवटता आलं. मराठे सरांनी व परिणिता मराठे वहिनींनी दिलेले आर्थिक नियोजनाचे धडे अजूनही आयुष्यात कामी येत आहेत. बॅंकेत खातं उघडण्यापासून ते पैशाचा योग्य वापर हा कलाकारी पेशामधला बऱ्यापैकी दुर्लक्षित घटक माझ्या मनावर अत्यंत प्रभावीपणे त्यांनी बिंबवला, तसंच विद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मोठमोठ्या कलाकारांचा सहवासही मला लाभला. त्यांचं व्यक्तिमत्त्व व त्यांची कला जवळून अनुभवता आली आणि त्यामुळेच की काय, विद्यालयाच्या वास्तव्यादरम्यान माझी सांगीतिक नजर व व्यक्तिमत्त्व यांच्यात एखादी जादूची कांडी फिरवली गेल्यासारखा आमूलाग्र बदल झाला. याचं पूर्ण श्रेय मराठे सरांना व गांधर्व महाविद्यालयाला जातं.

सुरेश तळवलकर यांचं त्या काळी सुदर्शन रंगमंच इथं दर महिन्याला तीन दिवसांचं शिबिर होत असे. एके दिवशी तिथं लेहरावादन करण्यासाठी कुणी हार्मोनिअमवादक उपलब्ध नसल्यामुळे मला तिथं जाण्याची संधी मिळाली व तोच माझ्यासाठी भाग्याचा क्षण ठरला. संगीतविश्वातल्या एका वेगळ्या विचारप्रवाहाशी माझा परिचय झाला आणि त्याच निमित्तानं मला माझ्या पुढील सांगीतिक वाटचालीसाठी तळवलकर गुरुजींच्या रूपानं एक आदर्श मार्गदर्शक लाभले. गुरुजींबरोबरच्या अनेक वर्षांच्या सहवासातून केवळ लय आणि तालशास्त्रच नव्हे, तर संपूर्ण संगीताकडंच पाहण्याची एक वेगळी व सशक्त दृष्टी मला मिळाली. उल्हास कशाळकर यांचंही मार्गदर्शन मला मिळालं. विविध रागांची स्वरूपे, तसंच आवर्तन भरताना पाळायची व्यवधानं अशा महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. खर सांगायचं तर, आजवर मी ज्या कलाकारांना संगत केली त्या सर्वांनाच मी माझा गुरू समजतो. त्यांच्याबरोबर संगत केलेल्या मैफलींमधून, सहवासातून मी अनेक गोष्टी शिकलो आणि याच जोरावर माझी पुढील वाटचाल सुरू आहे. हार्मोनिअममुळे मला दिग्गज कलाकारांना जवळून अनुभवता आलं, याबद्दल मी स्वतःला खरोखरीच खूप भाग्यवान समजतो.
झाकीर हुसेन, किशोरी आमोणकर यांना मी संगत केलेले क्षण आयुष्यभर जपून ठेवण्यासारखे आहेत. या दोघांच्या कलेविषयी मी काय बोलणार; परंतु त्यांच्या सोबत स्टेज शेअर करायला मिळणं यापेक्षा अधिक भाग्याचं काय असू शकतं? आजवर ज्या ज्या कलावंतांना मी संगत केली आहे, त्यांच्यामुळंच मी माझ्या आजच्या या सांगीतिक टप्प्यावर आहे. त्यांनी वेळोवेळी माझ्या चुका पोटात घातल्या, प्रसंगी पुढं जाण्यासाठी प्रेमाचे सल्ले दिले. यामुळेच आजचा हा टप्पा यशस्वीपणे पार पडल्याची भावना माझ्या मनात आहे. संगतीतूनच, परकायाप्रवेश म्हणजे काय हेदेखील शिकायला मिळालं. एखादा नट हा जसा त्याला दिलेल्या भूमिकेशी एकरूप होतो व त्या व्यक्तिरेखेत प्रवेश करतो, तसंच काहीसं हार्मोनिअमची संगत करताना गायकांच्या वा वादकांच्या सांगीतिक विचारांशी तादात्म्य पावणं याची मजा अनुभवता आली. यातून वाढणारी वैचारिक समृद्धी ही केवळ शब्दातीत! हार्मोनिअमवादनाच्या निमित्तानं जगभरातल्या छोट्या गावापासून ते मोठ्या शहरांना मी भेट देऊ शकलो. तिथली निसर्गस्थळं, संस्कृती जवळून पाहू शकलो. विविध भाषा बोलणारे मित्र गोळा करू शकलो. खऱ्या अर्थानं "बारा गावचं पाणी पिणं' म्हणजे काय हे मला यानिमित्तानं अनुभवता आलं. या सगळ्यामुळे केवळ सांगीतिकच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे.

मुळात संगीत हे मी पॅशन म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. आजवर कार्यक्रमांच्या निमित्तानं ज्या परदेशवाऱ्या झाल्या, पुरस्कार मिळाले, जगभरातल्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये कला सादर करण्याची संधी मिळाली, ते सर्व माझ्या सांगीतिक प्रवासाला लाभलेले सोनेरी विसाव्याचे क्षण आहेत. त्यामुळे माझा प्रवास अधिक सुखकर होत आहे व उमेदही वाढत आहे.

हार्मोनिअमच्या साथसंगतीसोबतच, आता "हार्मोनिअम सोलोवादन' हाही माझ्या पुढील वाटचालीचा महत्त्वाचा सोबती आहे. आजवर गुरुजनांकडून जे काही शिकलो, श्रवण केलं आणि सहवासातून जे काही उमगलं आणि रियाजातून जे साधलं, ते व्यक्त करण्यासाठी हार्मोनिअम सोलो हाही आता मला जवळचा मार्ग वाटतो आहे. माझ्या सोलोच्या सध्याच्या प्रयत्नांना गुरुजनांचेही आशीर्वाद मिळत आहेत. त्यामुळे आपण योग्य दिशेनं चालल्याचं समाधानही मला आहे.

आपल्याला मिळालेली विद्या शेअर करणं हे मला मनापासून आवडतं. त्यातून पुनःप्रत्ययाचा आनंद मला मिळतो. "एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं' या ओळीचा प्रत्यय मला बऱ्याचदा येतो, तसेच आपल्याला मिळालेली विद्या ही पुढील पिढीपर्यंत सढळ हातानं पोचवली पाहिजे, असे संस्कार असल्यामुळे कर्तव्याची प्रबळ भावना माझ्या मनात आहे. त्यामुळे देशातल्या, तसेच परदेशातल्या विद्यार्थ्यांसोबतचा वेळ हा आता माझ्या कार्यक्रमेतर दिनचर्येचा अविभाज्य भाग झाला आहे.
"संगीत कशासाठी करायचं?' असं पंडित भीमसेन जोशी यांना एकदा विचारण्यात आलं होतं.
त्यावर त्यांचं अतिशय मार्मिक उत्तर होतं. ते म्हणाले होते ः "स्वतःला विसरण्यासाठी'.
एक संगीतसाधक म्हणून माझी ईश्वराकडं एकच प्रार्थना आहे...असे स्वतःला विसरण्याचे अनेक क्षण माझ्या आयुष्यात येवोत आणि हार्मोनिअम या विषयाची अखंड साधना माझ्या हातून घडत राहो!

Web Title: tanmay deochake write article in saptarang