असाध्य ते साध्य, करिता सायास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social for Action

असाध्य ते साध्य, करिता सायास...

ग्रामीण महिलांना अर्थार्जन सुलभ व्हावे यादृष्टीने १९९२ पासून ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ संस्थेअंतर्गत ‘कौशल्य विकसन’ केंद्राच्या माध्यमातून विविध कौशल्याधिष्टित व रोजगारभिमुख प्रशिक्षण कोर्सेस सुरू केले. यामध्ये शेळीपालनापासून ते संगणक टॅली ९ पर्यंत ३२ विविध व्यवसायांची प्रशिक्षणे तसेच दैनंदिन व जीवन व्यवहार कौशल्य प्रशिक्षणे यांचा समावेश होता. आजपर्यंत कौशल्य विकसन केंद्रांतर्गत तीन हजारहून अधिक लाभार्थींनी विविध प्रशिक्षणांचा लाभ घेतला असून, त्यातीलअनेक महिला व्यवसायात यशस्वी झाल्या आहेत.

२०१२ मध्ये पालकांच्या आग्रहाखातर उत्कर्ष विद्यालयात पाचवीचा वर्ग सुरू केला. या नवीन विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत सामील करून घेण्यासाठी शिरस्त्याप्रमाणे संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. या गाठीभेटीत काही महिला क्षमता असलेल्या, गरजू पण योग्य मार्गदर्शन नसल्याने किंवा घरातून विरोध असल्याने चाचपडत आहेत असे संस्थेच्या लक्षात आले. तत्कालीन गरजेनुसार या महिलांना न्याय देण्यासाठी थोड्या दीर्घ मुदतीची योजना आखणे आवश्यक होते. त्यानुसार ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ संस्थेअंतर्गत प्रथम दहा ते बारा माता पालकांना एकत्रित करून त्यांच्या प्राथमिक गरजेनुसार आदर्श पालकत्वासाठी ‘लालन पालन’ हा अभ्यासगट सुरू केला. वर्षभर हा उपक्रम चालवून, गटातील महिलांमध्ये एकमेकींविषयी व संस्थेविषयी विश्वास निर्माण करून , त्यांच्या क्षमता जाणून घेतल्या आणि उद्योजकता विकास प्रशिक्षणांमधून व्यवसायासाठी त्यांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांची मानसिकता तयार केली. संस्थेने या गटाची ओळख ‘सखी सहेली’ या नावाने करून, त्यांच्यासाठी दिवाळीचा फराळ बनवण्याची प्रशिक्षण आयोजित करून, त्यातील एकीला मार्केटिंगसाठी मार्गदर्शन केले.

संस्था ‘उंबरठा न ओलांडणाऱ्या’ स्त्रीच्या प्रतिमेला छेद देत होती. दिवाळीच्या खाद्यपदार्थांनंतर संस्थेने चटपटीत स्नॅक्स बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले. या नंतरची पायरी मात्र कसोटीची होती. जत्रेत उभे राहून तयार खाद्यपदार्थ विकण्याची, संस्थेच्या माध्यमातून १९८२ पासून गरजू महिलांना अर्थार्जन व्हावे म्हणून सांगोल्याच्या अंबिका देवी यात्रेत ‘भेळ व वडापाव’ विक्रीचा स्टॉल चालवला जातो. ‘सखी सहेली’ गटाने या स्टॉलमध्ये सहभागी होण्याची तयारी केली आणि २०१९ च्या यात्रेत ‘सखी सहेली’गटाने एका आठवड्यात अडीच लाख रुपयांच्या खाद्यपदार्थ विक्रीचा विक्रम नोंदवला. या यशामुळे त्यांच्या कुटुंबांचा विरोध मावळला. ‘सखी सहेली’ गटाच्या महिलांची हिंमत वाढली आणि त्यांनी दररोज चार ते आठ या वेळात ‘खाऊ कट्टा’ सुरू केला. अल्पावधीत येथील स्नॅक्स देखील सांगोल्यात लोकप्रिय झाले व तडाखेबंद विक्री होऊ लागली. ‘सखी सहेली’गट आज उन्हाळी पदार्थांपासून उकडीचे मोदकांपर्यंत उत्तम प्रतीच्या सर्व खाद्यपदार्थांची विक्रमी विक्री करत आहेत. प्रत्येकीला मदतनीस ही नेमावे लागले आहेत.

पहिलीपासून पृथ्वीराज व त्याचा धाकटा भाऊ ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उत्कर्ष विद्यालयाचे विद्यार्थी. पृथ्वीराज सातवी मध्ये गेला आणि त्याचं कुटुंब एका अनपेक्षित धक्क्याने विदीर्ण झाले. एका माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांना अचानक अपंगत्व आले. नोकरी करता येईना म्हणून कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांनी पुस्तके व स्टेशनरी विक्रीचे दुकान सुरू केले. पृथ्वीराज मोठा मुलगा असल्याने जबाबदारी समजून घेऊन तो या दुकानात वडिलांसोबत काम करू लागला. दुकानात साहित्य विक्रीची किंमत ठरवून विक्री करणे गिर्‍हाईकांना समाधानी राखणे तसेच हिशोब ठेवणे ही कामे तो करू लागला सोबत आई मदतीला होतीच. पण वडिलांची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागली, दुकानात बसणे त्यांना अवघड झाले आणि ते परावलंबी झाल्यामुळे त्यांच्या शुश्रुषेसाठी एक माणूस गरजेचा झाला. आता दुकानाची सर्व जबाबदारी एकट्या पृथ्वीराजवर पडली. शाळेतील सर्व तासांना कटाक्षाने वेळ काढून उपस्थित राहण्याचा त्याने निश्चय केला कारण खाजगी शिकवणी लावून त्याला वेळ आणि पैसे देणे अशा दोन्ही गोष्टी त्याच्यादृष्टीने अशक्य होत्या. त्यामुळे शिक्षकांनी त्याच्यासाठी वेळापत्रक आखले आणि पृथ्वीराज ने एसएससी बोर्ड दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के मार्क मिळवले. ‘पुढे काय करणार आहेस?’ असे त्याला विचारल्यावर तो नि:शब्द झाला. डोळ्यात पाणी तरळले. त्याला हळू हळू बोलते करून त्याचे मनोगत जाणून घेतले. या बुद्धिमान मुलाने नेव्हीमध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. संस्थेच्या सर्व महिला कार्यकर्त्या अस्वस्थ झाल्या होत्या कारण पृथ्वीराजला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यासाठी संस्थेने देणगीदारांचा शोध घेतला आणि पुण्यातल्या डॉ. मंदाकिनी पानसरे यांनी संस्थेच्या माध्यमातून पृथ्वीराज नेव्हल इंजिनिअर होईपर्यंत त्याच्या शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्चाचा भार उचलला.

अकरावी व बारावीचा अभ्यास पृथ्वीराजने खाजगी शिकवणी न लावता केला. व बारावीच्या चांगल्या गुणांमुळे त्याला सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. पृथ्वीराज म्हणतो, " दहावीनंतर मी शाळा सोडली, तरी उत्कर्ष विद्यालयाची माया आणि छाया माझ्यावर आहे.’

सांगोल्याच्या दुष्काळग्रस्त, पुरुषप्रधान संस्कृतीत, कुटुंब विस्कटू न देता स्त्रीच्या सबलीकरणाचे अवघड शिवधनुष्य गेली ४५ वर्षे समाजातील दानशूर लोकांनी केलेल्या अर्थसहाय्यामुळे "माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान" संस्था पेलू शकली आहे. ७० टक्के खेड्यांनी बनलेल्या आपल्या देशाची प्रगती ग्रामीण स्त्रीच्या सबलीकरणाविना अशक्य आहे. त्यासाठी संस्थेला ग्रामीण भागातील महिलांचे ‘सखी सहेली’सारखे अनेक यशस्वी गट तयार करावयाचे आहेत. तसेच पृथ्वीराजसारखे अनेक गुणवान विद्यार्थी उत्कर्ष विद्यालयात आहेत. त्यांच्या जिद्दीला कष्टांना, बुद्धीला जाणून आर्थिक अडचण न येऊ देता त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी समाजातील अनेक हितचिंतक व दानशूर देणगीदारांच्या सामूहिक मदतीची संस्थेला गरज आहे.

अशी करा मदत संस्थेला...

‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक : ८६०५०१७३६६

Web Title: Team Sfa Writes About Impossible To Achieve

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Team SFAAchieve