esakal | ... आणि वाचला एका गर्भवतीचा जीव !

बोलून बातमी शोधा

Dr Ashok Belkhode
... आणि वाचला एका गर्भवतीचा जीव !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा वेबसाइट स्वरूपात नवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा करणारे डॉ. अशोक बेलखोडे व त्यांच्या साने गुरुजी रुग्णालय व रुग्णालयातील उपक्रम, सोयीसुविधा याविषयी आपण माहिती घेतली आहे. किनवटसारख्या ग्रामीण भागात रुग्णांसाठी हा उपक्रम वरदान ठरलाय त्याबद्दल...

गोष्ट आहे २०१७ मधली. डॉ. अशोक बेलखोडे एका महिलेचे सिझेरियन करीत होते. त्या वेळी फोन खणाणला, त्यांनी दुर्लक्ष केले, रिंगटोन बंद झाली. पुन्हा रिंग वाजली, सिझेरियन करून, बाळ बाहेर काढत असल्याची नेमकी तीच वेळ होती. डॉक्टरांच्या मनात बाळ व्यवस्थित रडले पाहिजे, बाळाने व्यवस्थित श्‍वास घेतला पाहिजे, यासाठी पटापट काय केले पाहिजे याचे विचारचक्र चालू असतानाच ही रिंग पुन्हा वाजली. पुन्हा दुर्लक्ष केले, रिंग बंद झाली. ऑपरेशन सुरूच होते चार – पाच मिनिटांत पुन्हा रिंग वाजली लगेच कट झाली. डॉक्टरांनी आलेल्या नंबरवर पुन्हा उलट कॉल करण्यास सहकाऱ्यांना सांगितले.

सहकारी त्या नंबरवर फोन करत होते, पण फोन व्यस्त येत होता. डॉक्टरांनी सहकऱ्यांना जाऊ दे नंतर पाहू असे सांगून, आपले काम सुरूच ठेवले. ऑपरेशन पूर्णत्वाकडे चालले होते. बाहेरून मॅनेजर फोनवर बोलत मध्ये आला, डॉक्टर ऑपेरशनच करत आहेत असे तो कोणाला तरी सांगत होता. डॉक्टर फोन उचलत नाही हे पाहून त्यांनी मॅनेजरला फोन केला होता. तो फोन गावातील एका डॉक्टरीण बाईचा होता.

खूप अस्वस्थ व काळजीचा असा त्यांचा सूर होता. डॉकटर इथेच आहेत, तेही ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत, ऑपरेशन करत आहेत, तसेच भूलतज्ज्ञही हजर आहेत, असे त्यांना कळल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. सर मी, एक पेशंट घेऊन येत आहे, तिलाही सर्जरी लागेल असे त्या डॉक्टरीण बाईंनी सांगितले. स्वतः डॉक्टर व भूलतज्ज्ञही हजर आहेत म्हणजे ताबडतोब इलाज होऊ शकतो ही वस्तुस्थिती त्या डॉक्टर मॅडमचा बराचसा ताण कमी करून गेली.

ॲनेस्थेसिस्ट म्हणजे भूलतज्ज्ञ वेळीच हजर असणे हे भाग्याचेच, तो क्षण तसाच होता. २५ वर्षांपूर्वी डॉ. अशोक बेलखोडे जेव्हा किनवटला आले, तेव्हा कुणीही भूलतज्ज्ञ इकडे येण्यास तयार नव्हता. विशेष म्हणजे भूल द्यायच्या वेळेस सुद्धा भूलतज्ज्ञ यांचा येण्यासाठी नकार मिळत असे. किनवट बद्दलची भीती, दूरवरचे अंतर व दळणवळणाच्या गैरसोयी हा मुख्य प्रश्‍न होता. मग डॉ. अशोक बेलखोडे स्वतःच नांदेडला जाऊन दोन महिने राहून भूल देणे शिकले व किनवट येथे इमर्जन्सीमध्ये भूल देऊ लागले. डॉक्टरांची पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे व डॉक्टर भूल देणारा, तज्ज्ञ नाही पण कामापुरता का होईना भूलतज्ज्ञ म्हणून भूमिका बजावू लागल्यामुळे अनेक स्त्रियांची त्यांच्या अवघड बाळंतपणात यशस्वी सुटका होऊ लागली. ही बाब किनवट परिसरात पसरली व स्त्रियांसाठी एक आश्‍वासक वातावरण तयार झाले. यापूर्वी अवघड बाळंतपण असेल, तर १५० कि.मी. वर असलेल्या नांदेडला जाऊन महिनाभऱ्यासाठी किरायाची खोली घेऊन, सर्व निस्तरून बाई बाळाला घेऊन परत यायची. डॉक्टरांच्या साने गुरुजी रुग्णालयातील सेवेमुळे सर्वसामान्यांना खूप दिलासा मिळाला. पुढे इमर्जन्सीच्या वेळी डॉक्टरांवर स्वतः भूल देऊन सीझर किंवा अपेंडिक्सचे ऑपरेशन करण्याची वेळ आली व या दोन्ही भूमिका यशस्वी पार पाडत गरजू लोकांना साने गुरुजी रुग्णालयाच्या वतीने मदत झाली.

मधल्या काळात किनवटचेच भूमिपुत्र असलेले एक डॉक्टर भूल देण्याचे प्रशिक्षण घेऊन आले. थोडे बरे दिवस आले असे वाटत असतानाच ते पुन्हा पुढील शिक्षणासाठी नाशिकला गेले व किनवटच्या ऑपरेशन्सला भूलतज्ज्ञ गैरहजेरीची बाधा जडू लागली. दरम्यानच्या काळात आदिलाबादच्या सुविधा वाढू लागल्या व तेथील भूलतज्ज्ञ कधी कधी येऊ लागले. आदिलाबादचे भूलतज्ज्ञ उपलब्ध होतीलच याची पूर्ण शाश्‍वती बऱ्याच वेळा नसायची. ऐन अडचणीच्या वेळी एखादा रुग्ण अवघड अवस्थेत मनावर दगड ठेवून पुढे पाठवावा लागे. आताही कधी कधी असे होतेच, पण त्या दिवशी म्हणजे २०१७ च्या ६ नोव्हेंबरला डॉक्टर, सर्जन व भूलतज्ज्ञ असे एकत्र व ऑपरेशन थेटरमध्ये हा योगायोग आजच्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी मोलाचा क्षण ठरणार होता.

त्या डॉक्टरीणबाई पाच मिनिटाच्या अवकाशात रुग्ण नातेवाइकांसह साने गुरुजी रुग्णालयात दाखल झाल्या. रुग्णाचे नाव अविधा (बदलेले नाव) स्ट्रेचरवर निपचित पडली होती. उठून बसली की चक्कर येत होती. सहा महिन्यांची गरोदर होती. एकदम कपडा चालू झाला होता, खूप कपडा गेला होता. ब्लड प्रेशर ८० पर्यंत खाली आले होते अशा वेळेला वैद्यकीय प्रशिक्षणाप्रमाणे प्लासेंटा प्रिव्हिया (बाळ वरच्या बाजूला व वार खालच्या बाजूला) म्हणजे बाळ बाहेर येण्याआधी खूप रक्तस्राव होणार आणि बशीच्या आकाराची वार ने रस्ता अडवून ठेवल्याने बाळ अडकणार अशी अवस्था. अशावेळी सिझेरियनसारखे ऑपरेशन करून बाळासोबतच नाळ व वार बाहेर काढून रक्तस्राव थांबविणे हाच उपाय. दुसरा उपायच नाही.

डॉ. अशोक बेलखोडे हे नातेवाइकांना सर्व अत्यंत पोटतिडकीने समजाऊन सांगत होते. बाईला वाचवायचे असेल तर ताबडतोब ऑपरेशन हाच उपाय आहे. व तो आता होऊ शकतो त्यासाठी तुमचा होकार पाहिजे आहे. दुसरा उपाय नाही. पेशंट दुसरीकडे पोहोचू सुद्धा शकणार नाही असे सांगूनही नातेवाईक म्हणजे नवरा, सासू, सासरे विचार करू लागले त्यांनाही काही सुचेना. डॉक्टरांना मागून भूलतज्ज्ञ डॉक्टर हळूच कानात सांगू लागले. सर, “उनकी इच्छा नही, रिस्क क्यों लेते?” त्यांचेही म्हणणे बरोबरच. पण दुसरा उपायही नाही हेही तेवढेच खरे. डॉक्टर मात्र सुन्न. रुग्णाला आणलेल्या डॉक्टरीणबाईंनी दणका हाणला नातेवाइकांवरती गरजल्या, “तुम्ही डॉक्टरांना संमती दिल्याशिवाय कसं होणार? नाही तर पेशंटला उचला घेऊन जा कुठेही, ती आंबाडी घाटापर्यंतही (१५ मिनिटांवरील अंतर) पोहोचणार नाही मग तुम्हाला कळेल,” असे रागावून म्हणल्यावर नातेवाईक तयार झाले, पाया पडू लागले. तिला वाचवा म्हणू लागले.

डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता बाईला टेबलवर घेतले, भूलतज्ज्ञांनी भूल दिली. डॉक्टरांनी व सहकारी स्टाफनी ऑपरेशन चालू केले. चार ते पाच मिनिटांत गर्भाशयाची पिशवी उघडली वर - प्लासेंटा बाळासह बाहेर काढला, सहा - साडेसहा महिन्यांचे बाळ आधीच मृत झाले होते. पाचव्या सहाव्या मिनिटांला रक्तस्राव थांबला. पोटावरील टाके घेऊन ऑपरेशन पूर्ण केले. खूप मोठ्या आत्मिक समाधानाची अनुभूती डॉक्टर, भूलतज्ज्ञ व सर्व सहकारी अनुभवत होते. भूलतज्ज्ञ व डॉक्टर एकमेकांना धन्यवाद देत होते. एकमेकांना ग्रेट म्हणत होतो. डॉक्टर यांनी भूलतज्ज्ञांना विचारले पेशंट कसा आहे? त्यांनी ठीक आहे, पण रक्त लावावे लागेल असे सुचविले. डॉक्टर त्या डॉक्टरीण बाईला जागवीत तिच्याशी बोलले व तिचे आभार मानले. तिचा जीव वाचविण्याची संधी दिल्याबद्दल!

लॅब टेक्निशियनला बोलावून घेतले व ताबडतोब हिमोग्लोबीन करायला लावले, ते ४ ग्रॅम भरले. सर्व एकमेकांकडे आश्‍चर्याने पाहू लागले ही तपासणी आधी केली असती, तर आपण ऑपरेशनही केले नसते. पण आता ते सर्व पार पडले. सर्व जण थोडे हादरलेही पण जीव वाचविल्याचे समाधान होते. डॉक्टर बाहेर आले नवऱ्याला हकीकत सांगितली, ताबडतोब रक्त आणावयास सुचविले. बाईच्या जिवाचा धोका टळला हे ऐकून त्याने सुस्कारा सोडला. सोबतच्यांना रक्त आणायला पाठविले. तिला वाचविण्याच्या प्रयत्नातील महत्त्वाचा व पहिला टप्पा पूर्ण झाला. रुग्णाला तिच्या रूममध्ये आणून ठेवले पुढचा उपचार सुरू झाला. सर्वांसाठी तो आश्‍चर्याचा व आनंदाचा धक्का होता. सात-आठ तासांत नांदेडहून (१५० कि.मी.) स्पेशल गाडी करून दोन बॉटल रक्त आणले. तोपर्यंत बाईची प्रकृती स्थिरावणे सुरू झाले होते. लागोलाग रक्तही लावण्यात आले. तिची जगण्याची शाश्‍वती वाढली. तिला जगू देण्यासाठी आवश्यक असलेला तिचा जीव वाचविण्याची संधी डॉक्टरांना मिळाल्याबद्दल डॉक्टरांनी पूर्ण कुटुंबाचे आभार मानले.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या ओ.पी.डी.च्या वेळी एक वयस्क काका बाहेर ताटकळत तास, दीड तास उभे होते. कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारणा केली. डॉ. साहेबांना भेटायचे आहे एवढेच ते म्हणत होते. कर्मचाऱ्यांनीही रुग्णांव्यतिरिक्त त्यांना फारसा वाव दिला नाही. त्यांनीही काही आततायीपणा केला नाही. रुग्ण संपत आल्यावर ते मध्ये आले आणि त्यांनी चक्क डॉक्टरांचे पाय धरले. सोडता सोडवेना डॉक्टरांनी त्यांना धरून उभे केले. त्यांच्या अश्रुधारा डॉक्टरांच्या पायावरही पडत होत्या. डॉक्टरांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना काही विचारण्याच्या आत ते सांगू लागले “मी काल ऑपरेशन केलेल्या मुलीचा मोठा बाप आहे.” मी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गायनिक ओ.टी.मध्ये परिचराचे काम करतो. मी असे पेशंट बरेचदा बघितले आहे. तुम्ही काय केले याची कल्पना माझ्या कोणत्याही नातेवाइकाला जेवढी आहे त्यापेक्षा कितीतरी पट मला आहे. म्हणून मी पहिल्यांदा तुमचे दर्शन घेण्याचे ठरविले. तुम्ही हिंमत केली नसती, तर आमची मुलगी आज अशी पाहायला मिळाली नसती. मी आता मुलीला भेटायला जातो. तुमच्या सारखे देव डॉक्टर आहेत. देवाचे रूपच आहेत, म्हणुन मी तुम्हाला पाहायला, भेटायला व आभार मानायला आलो आहे.” या त्याच्या बोलण्याने डॉक्टर अंतर्बाह्य हलले.

रुग्ण महिलेची प्रकृती सुधारू लागली. जवळपास तिसऱ्या दिवशी तिला उठून बसविले. बसल्याबरोबर तिचे हात डॉक्टरांच्या पायाकडे गेले. डॉक्टरांनी तिला तिचा हात धरून उभे केले. थरथरत ती उभी राहिली. डॉक्टरांच्यातील “बाप” जागा झाला. तिचे डोके डॉक्टरांनी छातीवर टेकवत डोक्यावरून हात फिरवीत तिला चलण्याचे बळ देण्यास प्रेरित केले. खरे तर तिच्यामुळे डॉक्टरांच्या कामाचे व जगण्याचे, बळ वाढल्याचे डॉक्टर स्वतः अनुभवत होते. काही दिवसांत तिला डिस्चार्ज दिला, जाताना कुटुंबातील लोकांनी डॉक्टरांचा शाल देऊन सत्कार तर केलाच शिवाय साने गुरुजींची प्रतिमा भेट देऊन हे बहुमोलाचे सेवाकार्य साने गुरुजी रुग्णालयाने चालूच ठेवावे असा संदेशही दिला. साने गुरुजी रुग्णालय हे समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीवर उभे आहे. त्यासाठी गरज आहे सामूहिक मदतीची !

अशी द्या देणगी...

‘भारत जोडो युवा अकादमी’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. रुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध- उपचारांचा व शस्त्रक्रियांचा खर्च मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘भारत जोडो युवा अकादमी’च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ‘भारत जोडो युवा अकादमी’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या साने गुरुजी रुग्णालयाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटण वर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

प्रकल्प कर्करोगाच्या उपचारांसाठी...

रुग्णसेवेचा उद्देशाने उभारलेली "भारत जोडो युवा अकादमी" ही संस्था केवळ रुग्ण तपासणी व उपचार केंद्र अशी मर्यादित न राहता विज्ञान , शिक्षण - प्रशिक्षण, आरोग्य व संशोधन सारख्या विविध क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जोमाने कार्यरत आहे. डॉ. अशोक बेलखोडे आणि त्यांचे सहकारी शंभर बेड्सचे सुसज्ज सर्व सोयी - सुविधा युक्त विशेष रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी किनवट शहरालगत असलेल्या एमआयडीसीत मुख्य रस्त्याला त्यांनी लागूनच जागा मिळविली आहे. त्याचबरोबर रुग्णालयाला सर्वात जास्त गरज आहे ती, म्हणजे कर्करुग्णांसाठी आवश्यक असलेल्या पॅलिएटिव्ह केअर युनिटची दहा बेड्सचे पॅलिएटिव्ह केअर युनिट उभे करण्यासाठी भौतिक साधने, यंत्रसामग्री व वैद्यकीय साहित्यावर होणारा खर्च जास्त आहे. त्यासाठी निधी संकलन करण्याचे काम सुरु आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६