
रुग्णालयासाठी हवी लोकांची भरघोस साथ...!
‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडींगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते.
या सदरामधून यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या आदिवासी बहुल भागात "भारत जोडो युवा अकादमी" या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा करणारे डॉ. अशोक बेलखोडे व त्यांच्या साने गुरुजी रुग्णालय व रुग्णालयातील उपक्रम , सोयी - सुविधा याविषयी आपण माहिती घेतली होती. तसेच किनवट परिसरात साने गुरुजी रुग्णालय तेथील रुग्णांना उपचारासाठी कसे वरदान ठरले याविषयी माहिती घेतली.
या दोन्ही लेखांमुळे महाराष्ट्रातून ‘भारत जोडो युवा अकादमी’ संस्थेसाठी आर्थिक मदतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पण रुग्णसेवेच्या उद्देशाने उभारलेली ‘भारत जोडो युवा अकादमी’ ही संस्था केवळ रुग्ण तपासणी व उपचार केंद्र अशी मर्यादित न राहता विज्ञान , शिक्षण - प्रशिक्षण , आरोग्य व संशोधन सारख्या विविध क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जोमाने कार्यरत आहे. डॉ. अशोक बेलखोडे आणि त्यांचे सहकारी शंभर बेड्सचे सुसज्ज सर्व सोयी - सुविधा युक्त विशेष रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी किनवट शहरालगत असलेल्या एमआयडीसीत मुख्य रस्त्याला लागूनच जागा मिळविली आहे. त्याचबरोबर रुग्णालयाला सर्वात जास्त गरज आहे, ती म्हणजे कर्करुग्णांसाठी आवश्यक असलेल्या पॅलिएटिव्ह केअर युनिटची. दहा बेड्सचे पॅलिएटिव्ह केअर युनिट उभे करण्यासाठी भौतिक साधने, यंत्रसामग्री व वैद्यकीय साहित्यावर होणारा खर्च जास्त आहे. त्यासाठी निधी संकलन करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ‘भारत जोडो युवा अकादमी’ला आणखी मदतीची आवश्यकता आहे. त्याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व खाजगी कंपन्यांनी मदतीसाठी पुढे यावे असे या लेखाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या काळात साधारण मे महिन्यात सानेगुरुजी रुग्णालयात एका बाईला तिच्या दोन मुलींनी दवाखान्यात आणले. बाईला चालणेही मुश्कील होते, चालले की खूप दम लागायचा म्हणून मुलींनी दोन्ही बाजूंनी आधार देत तिला आणून पलंगावर झोपविले. डॉ. अशोक बेलखोडे यांनी तिला तपासले, दम लागतो म्हटल्यावर डॉक्टरांच्या मनात कोरोना डोकावला, हृदयविकारही असू शकतो असेही त्यांना वाटले. पण पांढऱ्या फटक व निस्तेज चेहऱ्याकडे पाहिल्यावर अंगात रक्त कमी असावे असे डॉक्टरांना प्रकर्षाने जाणवले. शरीराच्या कोणत्या भागातून रक्त जाते का ? असे विचारले असता सांगितलेले उत्तर धक्कादायक होते. अंतर्गत तपासणी केली असता गर्भाशयात मोठी गाठ असल्यामुळे ते मोठे झाले आहे (फायब्रॉईड) असे निदान झाले.
रक्तस्त्राव सुरूच होता. त्वरित रक्त तपासणी केली असता तिचे हिमोग्लोबीनअत्यंत कमी भरले. आदिवासी, अशिक्षित लोक व कुटुंबीय स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष करतात याची डॉक्टरांना सातत्याने जाणीव होणारा प्रसंग होता. डॉक्टरांनी त्या महिलेची सोनोग्राफी करून घेतली, सोनोग्राफीत गर्भाशयाचा
आकार वाढलेला व आत चार से.मी. व्यासाची गाठ दिसून आली. या महिलेला बरे करूनच पाठवायचे असे डॉ. अशोक बेलखोडे यांनी ठरविले. त्यांनी तिच्या मुलींशी चर्चा केली. शस्त्रक्रियेसाठी त्यांची तयारी नव्हती पण डॉक्टरांनी त्यांना निर्वाणीच्या शब्दांत सांगितले की जर ऑपरेशन केले नाही तर तिच्या तेराव्याची तयारी करावी लागेल. महिला व नातेवाइकांचे योग्य समुपदेशन करून, डॉक्टरांनी त्या महिलेला रुग्णालयात भरती करून घेतले. दोन दिवस रक्त वाढीचे इंजेक्शन देऊन, तीन चार बाटल्या रक्त दिले तेव्हा त्या महिलेचे हिमोग्लोबीन हळुहळू वाढले.
त्यानंतर तिच्यावर ऑपरेशन केले. एका अत्यंत गरीब, आदिवासी, दुर्लक्षीत, गरजू महिलेला आपल्या ज्ञान व कौशल्याचा उपयोग करून देत मदत केल्याचा आनंद डॉ. बेलखोडे अनुभवत होते. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच्या सकाळी राऊंड घेतांना त्या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करताना तिच्या चेहऱ्यावरील समाधान व हास्य डॉ. बेलखोडे यांना दिसून आले आणि किनवट मधील मागील २६ वर्षांच्या वास्तव्यात साने गुरूजी रूग्णालयातील अगदी असेच समाधान देणारे अनेक प्रसंग चित्रफिती सारखे डॉक्टरांच्या डोळ्यापुढे येऊन गेले.
किनवट हा असाच सर्व दृष्टीने दुर्लक्षित असा प्रदेश आहे. कुण्या बाईचे रक्तस्राव झाल्यामुळे तर दुसऱ्या एका बाईचे बाळंतपणात अजून कुणाचे तरी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झालेले आहेत. आजार अगदी शेवटच्या थराला जाईपर्यंत अंगावर काढले जातात. महिलांसारखेच अनेक पुरूषही आहेत, वयोवृद्ध आहेत, लहान मुले आहेत, आदिवासी भागातील सर्व जनता आधुनिक वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहिली आहे कारण या सर्व वैद्यकीय सोयी सुविधांची येथे कमतरता आहे. पुढील उपचारांसाठी जिल्ह्याला पाठवायचे म्हटले तरी दीड-दोनशे किलोमीटर जावे लागते व ते न परवडण्यासारखे आहे.
रोज नव- नवीन शोध लागलेल्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची फळे या वंचितांना चाखता आली पाहिजे असा ध्यास ‘भारत जोडो युवा अकादमी’ द्वारे संचालित साने गुरूजी रूग्णालय परिवाराने घेतला आहे. भारत जोडो युवा अकादमी या संस्थेने साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प किनवट येथे उभारण्याचे नियोजन केले आहे. साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल १०० खाटांच्या या प्रकल्पाला निधीची आवश्यकता आहे. हॉस्पिटलच्या पहिल्या टप्याचे काम समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरू झाले आहे आत्तापर्यंत १२ हजार चौरस फुटाचे बांधकाम झाले आहे. यासाठी संस्थेला एम.आय.डी.सी. येथे पाच एकर जागा निःशुल्क मिळाली आहे.
कशी कराल संस्थेला मदत...
‘भारत जोडो युवा अकादमी’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही सरकारी अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. रुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध- उपचारांचा व शस्त्रक्रियांचा खर्च मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर "भारत जोडो युवा अकादमी" च्या उपक्रमाची माहिती मिळेल.
समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती - तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन "भारत जोडो युवा अकादमी" या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या साने गुरुजी रुग्णालयाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक - ८६०५०१७३६६.
Web Title: Team Sfa Writes About Lots Of People For The Hospital
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..