
‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. या वेबसाईटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त परिसरात ग्रामीण आणि शेती विकासासाठी एकात्मिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या व महिला सशक्तीकरण, रोजगाराभिमूख कौशल्याधिष्टित प्रशिक्षण, महिला व कुटुंबाचे राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मित्र फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची माहिती....
‘मित्र’चा अर्थ आहे ‘मिशन ऑफ इंटिग्रेटेड ट्रेनिंग ऑन रुरल अँड अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट''. ग्रामीण आणि शेती विकासासाठी एकात्मिक प्रशिक्षण उपक्रम राबविणे हे संस्थेचे ध्येय आहे. मित्र फाउंडेशन ही संस्था गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास समाज, मुले, महिला आणि वंचितांच्या कायदेशीर हक्कांसाठी सतत संघर्ष करत असून, त्यांना योग्य न्याय देण्यासाठी लोकशाही पद्धतीने योगदान देत आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित करण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व गुण वाढविण्यासाठी मित्र फाउंडेशन ही संस्था बार्शी तालुक्यातील कृषी पदवीधर असलेल्या रविकिरण काटकर या तरुणाने सामाजिक जाणिवेतून आपल्यासारख्या समविचारी व समवयस्क तरुण मित्रांना घेऊन स्थापन केली. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजासाठी, शेतीवर आधारीत व इतर रोजगाराच्या संधी निर्माण करून, त्यांना विशेषत: आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे ही या संस्थेचे उद्दिष्टे आहेत.
‘मित्र फाउंडेशन ’मार्फत ग्रामीण भागातील महिला, अल्पभूधारक शेतकरी आणि अपंगांना कृषी क्षेत्रावर आधारीत व लघु उद्योगाशी निगडीत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना व्यवसायासाठी पतपुरवठा केला जातो. त्याचबरोबर समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला विशेषत: महिलांना, उत्पादनक्षम आणि शाश्वत उपजीविकेसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी व चालविण्यासाठी संसाधने उपलब्ध करून दिली जातात. विविध वित्तीय व आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचा आधार घेऊन, व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येते. विश्वासार्हता हा संस्थेचा मूळ आधार आहे.
संस्थेच्या विश्वस्त मंडळाचा असा विश्वास आहे की, समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास महिला या बँक कर्जास पात्र आणि विश्वासार्ह आहेत. लहान व अल्प मुदतीच्या कर्जांमुळे वंचित व्यक्तींच्या जीवनात खूप फरक पडू शकतो. संस्थेच्या तत्त्वांनुसार कर्ज हा मूलभूत मानवी हक्क असून , गरिबांना दान किंवा देणगी देण्याऐवजी कर्ज दिल्यास त्यांची जीवनशैली बदलली जाऊ शकते आणि त्यांच्यामध्ये लपलेली उद्योजकतेची भावना जागृत करता येते.
आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना त्यांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी मदत देण्याऐवजी संस्थेने त्यांना पैसे कसे कमवायचे हे शिकवले. संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना व घटकांना कर्ज देऊन , स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या ज्यामुळे त्यांना स्वत:साठी उत्पन्नाचा मार्ग निर्माण करता आला.
‘मित्र फाउंडेशन'' बार्शी, माढा व करमाळा या दुष्काळी तालुक्यांमधील ग्रामीण भागात कार्यरत असून , आजमितीस संस्थेमार्फत १५० महिला बचत गट व ४६५ संयुक्त द्येयता समूह स्थापन झालेले आहेत. नाबार्ड आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून संस्थेने आजमितीस विविध बचत गट व संयुक्त द्येयता समुहातील दोन हजार तीनशे पंधरा महिलांना शेतीवर आधारित व्यवसायासाठी, कापड व्यवसाय, हॉटेल, अन्न - प्रक्रिया उद्योग, स्थावर मालमत्ता खरेदी , किरकोळ दुकाने , बांधकाम व्यवसाय व सेवा क्षेत्राशी निगडीत व्यवसायांसाठी १४ कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे. या कर्जातून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांनी विविध व्यवसाय व स्वयंरोजगार सुरु केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.
महिला सक्षमीकरण बरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही संस्थेमार्फत राबविले जातात. यामध्ये पर्यावरण संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, सेंद्रिय शेती, आर्थिक साक्षरता, जल संवर्धन, साक्षर भारत अभियान, ग्राहक साक्षरता इ. उपक्रम संस्था राबवत आहे. शेती क्षेत्रात रासायनिक खतांच्या वापरामुळे आरोग्यावर दूषित परिणाम होऊन, किशोरवयीन मुली , महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी व इतर घटकांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे कार्यक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षण साहित्य, बी - बियाणे वाटप, कृषी अवजारे व साधने वाटप, गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण इत्यादी घटकांवर होणारा खर्च जास्त आहे.
बार्शी, माढा, करमाळा परिसरातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांना व समाजातील इतर घटकांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्याकरिता तसेच व्यवसायभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबविण्यासाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.
कशी कराल मदत...
‘मित्र फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला सरकारी पातळीवरचे कुठलेही अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘मित्र फाउंडेशन’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन ‘मित्र फाउंडेशन’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.
अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक : ८६०५०१७३६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.