esakal | श्रीकांतला झाला ‘पुंगीवाला परीसस्पर्श’
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikant and Renutai

श्रीकांतला झाला ‘पुंगीवाला परीसस्पर्श’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. मागील रविवारी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास’ या संस्थेची माहिती घेतली. या भागात ही संस्था उपेक्षितांसाठी कशी वरदान ठरली त्याचा वेध...

शाळेसमोरच्या पटांगणात बसून मुलांसह रेणूताई व सहकारी यांच्या गप्पा चालल्या होत्या. अचानक एक चाळिशीची व्यक्ती आत आली. हा कोण नवीन पाहुणा, म्हणून उत्सुकतेनं सर्वांनी पाहिलं, तर समोर उभी असलेली ती भारदस्त व्यक्ती म्हणाली, “काय आई, विसरलीस मला? एवढी विसरलीस? तो आवाज ऐकला आणि लख्खकन रेणूताईंना श्रीकांतचा चेहरा आठवला, श्रीकांत रेणूताईंना शेवटचा भेटला त्यालादेखील आता वीसेक वर्षं होऊन गेली असतील; पण आवाजात बदल नाही. आवाज तसाच दमदार, आपलं म्हणणं ठासून मांडणारा. मात्र रेणूताईंसमोर उभा असलेला चाळिशीचा श्रीकांत आणि वीस वर्षांपूर्वी रिमांड होममधून नोकरीसाठी बाहेर पडून गुजरातेत गेलेला कोवळा, विशीचा श्रीकांत यांच्यात जमीन-आस्मानचा फरक होता. रेणूताईंना आठवत होता गोरापान, सोनेरी रंगाकडे झुकणाऱ्या दाट पिंगट केसांचा, तशाच पिंगट डोळ्यांचा हसरा, विलक्षण देखणा श्रीकांत. पण आता ती कोवळीक संपली होती. डोक्यावरचे केस कमी झाले होते. पोट सुटलेलं दिसत होतं. डोळ्यांना गॉगलनं झाकून टाकलं होतं. आवाज मात्र तोच होता. तस्साच ‘पुंगीवाला’ नाटकातल्या पुंगीवाल्यासारखा !

रिमांड होमच्या शुष्क वातावरणात तिथल्या मुलांनी सादर केलेलं ‘पुंगीवाला’ हे नाटक एक चमत्कारच होता. रंगमंचावर उभं कसं राहावं, हे शिकण्यापासून या मुलांची सुरुवात होती. मात्र या सर्वांत बाजी मारली ती श्रीकांतनं ! श्रीकांतचं व्यक्तिमत्त्व ‘पुंगीवाला’ या भूमिकेला पूरक होतं. शिवाय, त्याचा आवाजही चांगला होता. गरज होती ती मेहनतीची. रेणूताई व त्यांच्या सहकाऱ्यांना शंका होत्या, श्रीकांत हे आव्हान कसं पेलेल याविषयी. पण एकदा नाटकात काम करायचं ठरल्यावर त्यानं त्या भूमिकेत अक्षरश: जीव ओतला. श्रीकांत पुंगीवालाची भूमिका अक्षरश: जगला. श्रीकांतची एंट्री प्रेक्षकांतून होत असे. रंगीबेरंगी पोशाख केलेला हसरा श्रीकांत, धीटपणे सगळ्यांकडे बघत रंगमंचावर यायचा तेव्हा त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत होत असे. ‘पुंगीवाला’ या नाटकाचे अनेक प्रयोग रेणूताईंनी केले. त्या प्रयोगांना नामवंत मंडळी हजर असायची. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी तर संपूर्ण नाट्यप्रयोगाची व श्रीकांतची तोंड भरून स्तुती केली होती.

श्रीकांतमधला सभाधीटपणा, कलाकाराचे गुण या सर्वांची जाणीव रेणूताईंना या वेळी झाली. श्रीकांतला मात्र या वाटेकडे जाणे अवघड नव्हे, तर अशक्य होते. श्रीकांतच्या घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांच्या व्यसनाधीनतेनं आणि त्यामुळे झालेल्या अकाली मृत्यूनं श्रीकांत, तीन भावंड आणि आई आर्थिक अडचणींना कितीतरी वर्षं सामोरे जात होते. कर्जाचा डोंगर आणि आईचं अपुरं उत्पन्न याचा परिणाम सर्वांवरच झाला होता. या सर्व परिस्थितीची खरी झळ बसली ती श्रीकांतला. श्रीकांत शाळा बुडवून इकडेतिकडे भटकत राहायचा. वाईट संगतीला लागून वाया गेला होता, तसंच तो व्यसनाधीनतेकडे झुकला होता. श्रीकांत रिमांड होममध्ये आला तोच यामुळे. आला तेव्हा आठवीदेखील पास झाला नव्हता. हळूहळू ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास’ या संस्थेत राबविण्यात येणाऱ्या दहावीच्या वर्गात सहभागी झाला आणि नंतर तर तो एकदम त्या वर्गाचा आदर्श विद्यार्थी झाला. सोबतीला संस्थेद्वारे यंत्रांचं यांत्रिक प्रशिक्षण चालूच होतं. श्रीकांतची आई, त्याचे भाऊ त्याची ही प्रगती बघून अचंबित व्हायचे. त्यांना ‘वाया गेलेला’ श्रीकांत परिचित होता. श्रीकांतमध्ये झालेला हा बदल त्यांना स्वप्नवत होता.

हा श्रीकांतचा वैयक्तिक प्रवास झाला. त्यातल्या ‘पुंगीवाला’ या नाटकातल्या नायकाच्या भूमिकेचा परीसस्पर्श तर नाकारताच येणार नाही. या यशस्वी वैयक्तिक प्रवासाच्या वर्णनातली श्रीकांतच्या व्यक्तिमत्त्वाची रेणूताईंच्या दृष्टीने आणखी एक बाजू म्हणजे, श्रीकांत अतिशय सहृदय मुलगा होता. संस्थेत आल्यावर, काही दिवसांनी तो तिथं रुळला. त्याची वयानं लहानमोठ्या अशा अनेक मुलांशी मैत्री झाली. त्यातून श्रीकांतला कठोर परिस्थितीचे आकलन होण्यास मदत झाली. रिमांड होममध्ये लहान मुलांना मोठी मुलं कमालीचा त्रास देत. हा त्रास अनेक स्तरांवर चालत असे.कितीतरी मुलं या छळानं उद्ध्वस्त होत.

श्रीकांतने अशा अनेक मुलांना अत्यंत संवेदनशीलतेनं सांभाळले. त्यांच्यावर प्रेम केले. त्यांचे संरक्षण केले. रेणूताई त्या वेळच्या रिमांड होममधील दोन मुलांविषयी सविस्तर सांगतात, की बादल हा लहान, नाजूक, अबोल आणि शांत असा मुलगा होता; पण तो ‘दादा लोकांच्या’ (मोठ्या मुलांच्या) हातातलं खेळणं बनला होता. बादल संस्थेत आला तेव्हा केवढा आनंदी होता ! थोड्याच दिवसांत तो सतत भेदरलेला आणि रडवेला दिसू लागला. हसणे तर तो पार विसरूनच गेला होता. त्याचे डोळे कुठल्याही क्षणाला अश्रू ओघळतील इतके तुडुंब भरलेले असायचे. श्रीकांतला हे जाणवलं, तोपर्यंत तो मोठा झाला होता. त्याच्या बरोबरीच्या मुलांना हे सर्व करताना तो बघत होता. त्या वेळी रिमांड होमच्या अधीक्षकांशी श्रीकांतने जवळीक साधली. त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. बरोबरीच्या मुलांशी तो बोलत राहिला. भांडण नाही, तंटा नाही. सामोपचाराने प्रश्‍न सोडवत राहिला. त्याला त्यात यश मिळत गेले. श्रीकांतने, बादलला वाचवलं. केवढी मोठी कामगिरी ! रिमांड होममध्ये राहून आपल्या गोड बोलण्यानं त्यानं हे साध्य केलं. पुढे श्रीकांत दहावी झाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक छोटा कोर्स त्यानं पूर्ण केला. श्रीकांत घरी गेला. त्याला नोकरी लागली. लग्न झालं. त्याला एक मुलगा झाला. त्याच्या आईनं हे सगळं बघितलं. तिच्या चिंता दूर झाल्या. रेणू गावस्कर यांच्या ‘एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुले, रिमांड होममधील मुले व शाळाबाह्य मुले आज जीवनात यशस्वी झालेली आहेत. या सर्व यशस्वी मुलांवर रेणूताईंचे ‘स्वप्नांचे शिलेदार’ हे ‘सकाळ - प्रकाशन’चे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व शाळाबाह्य मुलांच्या समस्यांचा आवाका लक्षात घेऊन व त्यांना आवश्यक असणाऱ्या मदतीची गरज समजून घेऊन कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे साधारणपणे अडीच एकराची जमीन ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ संस्थेला देणगीदाराच्या माध्यमातून मिळाली आहे. या जागेवर मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, अनौपचारिक शाळा, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अशा अनेक वास्तू उभारायच्या आहेत. सध्या कुडाळ वसतिगृह व शाळा बांधकाम प्रकल्पाचे काम निधीअभावी अपूर्ण स्थितीत आहे. रेणूताईंना इथे एकीकडे शिक्षण घ्यायला येणाऱ्या व दुसरीकडे संस्थेत राहाणाऱ्या अशा मुलांचं एक सुंदर घर निर्माण करायचे आहे. यासाठी एकलव्य न्यासाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. समाजाच्या क्रियाशील पाठिंब्याशिवाय वंचित मुलांच्या विकासाचे ध्येय गाठणे अवघड आहे. कुडाळचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी रेणूताई व त्यांचे सहकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत.

‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ ही संस्था दानशूर व्यक्तींच्या देणगीवर उभे आहे. त्यासाठी गरज आहे सामूहिक मदतीची !

समाजाच्या शिक्षण व आरोग्याचा वसा

‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६