esakal | ध्यास मैदान गाजवणारे घडवण्याचा....
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiraditya English Medium School

ध्यास मैदान गाजवणारे घडवण्याचा....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण व आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करणाऱ्या व विद्यार्थ्यांना ऑलिंपिक स्तरावरील दर्जेदार खेळाडू म्हणून तयार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘आनंद शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्था’ या संस्थेविषयी...

कोल्हापूर जिल्ह्यातल्या काळजवडे येथील ‘आनंद शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्थे’ची स्थापना सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील गुणवंत व हरहुन्नरी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं २००७ मध्ये २८ फेब्रुवारीला झाली. स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत काही कमी पडू नये, यासाठी पन्हाळा पश्चिम भागातील काही महाविद्यालयीन मित्रांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याकरिता या संस्थेची स्थापना केली आहे.

मुख्यतः पन्हाळा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला. या परिसरामध्ये असणारं घनदाट जंगल व आर्थिक मागास तसंच इतर समुदायांतील लोकवस्त्यांमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण, विविध खेळांचं व क्रीडा प्रकारांचं शिक्षण, इंग्रजी भाषेचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेनं आपलं काम सुरू केलं. प्रथम भाडे तत्त्वावर असलेल्या इमारतीमध्ये वर्गखोल्या सुरू करून, विद्यार्थी वर्गाकडून अवाजवी शुल्क न घेता शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं. जंगलात राहणाऱ्या या दऱ्याखोऱ्यांतील ही मुलं शिकून मोठी व्हावीत, या लोकांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी संस्थेनं ज्‍योतिरादित्‍य इंग्लिश मीडियम स्कूल, बाजार भोगाव या ठिकाणी प्रथम शाळा सुरू केली. ज्या वर्गाला शिक्षणाचा गंधदेखील नाही, अशा डोंगरकपारीत राहणाऱ्या पालकांची समजूत काढून, त्यांच्या मुलांना रोज शाळेत आणून, त्यांना शिकवून शिक्षित करण्याचं शिवधनुष्य संस्थेनं उचललं आहे.

काळजवडे येथील प्रकाश पाटील या तरुणाच्या कल्पनेतून संस्थेची वाटचाल सुरू आहे. २००७ मध्ये ग्रामीण भागातील लोकांची समजूत काढून, इंग्रजी भाषेचं तसंच विविध खेळांचं व क्रीडा प्रकारांचं शिक्षण कसं व किती महत्त्वाचं आहे हे पटवून देऊन, विद्यार्थ्यांना दररोज तीस किलोमीटर अंतरावरून शाळेत आणणं व परत घरी सुखरूप नेऊन सोडणं, याखेरीज सर्व विद्यार्थ्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य, दप्तर, पुस्तकं व वह्या मोफत देऊन विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं जणूकाही वेडच या तरुणांना लागलं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडणारा पाऊस, त्यामुळं शिक्षणापासून वंचित राहणारी मुलं, रस्ते व वाहतूक दळणवळणाच्या साधनांचा अभाव, शैक्षणिक जनजागृतीचा अभाव व मुलींनी शिकून काय करायचं ही मानसिकता... मुलींना फक्त चूल आणि मूल एवढंच करायचं आहे असा पारंपरिक रीतिरिवाज, तसंच आर्थिक मागासलेपण इत्यादी गोष्टींमुळं पन्हाळा पश्चिम भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं.

आनंद शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्थेनं ही समस्या ओळखून, ही उणीव भरून काढली आहे. संस्थेनं जंगलामधील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याकरिता पावसाळ्यामध्ये स्वतः नदीवर साकव बांधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली असून, विद्यार्थ्यांना नदी, नाले, ओढे यावरून शाळेत आणून, विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शैक्षणिक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेमध्ये आजमितीस १३२ विद्यार्थी शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकूण १८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेतील शिक्षकांचा पगार व मानधन देण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील हे स्वतः शेती व दुग्धव्यवसाय करून, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातील सर्व रक्कम शिक्षकांच्या मानधनावर खर्च करतात. सध्या संस्थेमध्ये पहिली ते बारावीपर्यंत विज्ञान, कला व वाणिज्य या तीन शाखांची मान्यता असून, पुढील काळात संस्था उच्च शिक्षणाचीही सोय करणार आहे.

संस्थेचं उद्दिष्ट स्पष्ट असल्यामुळं, समाजातील काही दानशूर व्यक्ती व संस्थांनी संस्थेच्या कार्यास हातभार लावून समाजातील आर्थिक व मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मदत केली आहे. विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञानाच्या जगामध्ये कुठंही कमी पडू नये व विद्यार्थ्यांना माहिती व तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करण्यासाठी इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीनं संस्थेला देणगीस्वरूपात चार संगणक दिले आहेत. ज्‍योतिरादित्‍य इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयानं २०१२ पासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये राजस्थान, बंगळूर, पुणे व दिल्ली या ठिकाणी झालेल्या नॅशनल मेंटल मॅच परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे.

सह्याद्रीच्या रंगांतून गोठणे, कोलीक, मानवड, काळजवडे, पोबरे, पाटपन्हाळा, माळापुडे, पेंडागळे, सावर्डी व करंजफेन ही गावं जंगलातील दूर-दूर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पोट भरण्यासाठी जगण्याची लढाई करण्याची प्रवृत्ती या समुदायांमध्ये असल्यानं शिक्षणाचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. अशा समुदायांच्या जंगलवाटा पायदळी तुडवून संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील रहिवाशांच्या बैठका घेतल्या, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या या वर्गातील मुलांना पालकांनी शाळेत जाण्याची संमती दिली; पण कोणत्याही खर्चाची ऐपत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या मुला-मुलींनी फक्त शाळेत यावं हाच उद्देश असल्यानं, एक-दोन-तीन इथपासून आता ही जंगलातील पोरं एबीसीडी गिरवताना दिसत आहेत. त्यांना घरातून आणण्यापासून शैक्षणिक खर्च, येण्या-जाण्याचा खर्च, असा सर्व खर्च संस्था करत आहे.

प्रत्येक महिन्याला संस्थेचं संचालक मंडळ व स्वतः संस्थापक अध्यक्ष आपल्या उत्पन्नातून हा खर्च भागवत आहेत. बाजार भोगावपैकी मोताईवाडी येथील एका शेतकऱ्यानं संस्थेस जमीन दान करून संस्थेच्या कार्यास हातभार लावला आहे. तसंच, संस्थेचं कार्य पाहून राज्य सरकारनं संस्थेस बंदिस्त प्रेक्षागृहाचा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ऑलिंपिक स्तरावरील दहा (गेम) क्रीडा प्रकारांची अद्ययावत सुविधा निर्माण करण्याचं सध्या कार्य सुरू आहे. यामध्ये कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, दहा मीटर, पंचवीस मीटर रायफल रेंज, चेस, बास्केटबॉल, कबड्डी, आर्चरी व टेनिस इत्यादी खेळांच्या पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यात येत आहेत. तसंच, संस्थेनं भाडेतत्त्वावर काही जमीन घेतली असून, संस्था ४०० मीटरचा ट्रॅक रग्बी फुटबॉल ग्राउंडसाठी विकसित करत आहे.

संस्थेचे सदस्य दीपक पाटील रग्बी कोच असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर रग्बी टीम तयार होत असून, जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात आहे. सध्या संस्थेकडं एक एकर मालकीची जमीन, तसंच दहा एकर भाडेतत्त्वावरील जमीन असून, यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता सर्व प्रयत्न केले जात आहेत. एक उच्चदर्जाचं शैक्षणिक व क्रीडा संकुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता संस्थेनं कंबर कसली आहे. ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये असलेलं बौद्धिक कौशल्य, शारीरिक कौशल्य यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

संस्थेला बंदिस्त प्रेक्षागृह या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ऑलिंपिक स्तरावरील दहा (गेम) क्रीडा प्रकारांची अद्यावत सुविधा असलेलं क्रीडा संकुल निर्माण करावयाचं आहे. क्रीडा संकुलाचं काम प्रगतिपथावर आहे. परंतु क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा व विविध क्रीडा प्रकारच्या अद्यावत सोयी-सुविधांचा खर्च अफाट आहे आणि काम पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

अशी करा मदत...

'आनंद शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्था'' या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळं संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ''सोशल फॉर अॅक्शन'' या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ''आनंद शैक्षणिक सामाजिक सेवाभावी संस्था'' या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ''आनंद शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्था'' या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन, ''डोनेट नाऊ'' या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी व्हाट्सअॅप क्रमांक :- ८६०५०१७३६६

- टीम SFA support@socialforaction.com

loading image