मन, मनगट आणि मेंदूचा विकास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Training

मन, मनगट आणि मेंदूचा विकास!

‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात ये.....णाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्थां व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ ही क्राउड फंडींगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. आजच्या भागात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका या दुष्काळग्रस्त परिसरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. संजीवनी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी एकत्र येऊन महिला व तिच्या कुटुंबाच्या विकासासाठी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान'' ही संस्था सुरू केली त्याविषयी...

विवाहानंतर म्हणजे १९७३ मध्ये डॉ. संजीवनी केळकर पुण्याहून सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात आल्या. तेंव्हा त्यांच्या हातात एमबीबीएसची पदवी होती, पण ग्रामीण भागातील लोकांच्या वेदनांची त्यांना फारशी ओळख नव्हती. डॉ.केळकर सांगोल्यात येण्यापूर्वी सांगोला तालुक्यात एकही महिला डॉक्टर नव्हती. त्यामुळे पुरुष डॉक्टरांकडे न जाणाऱ्या महिला डॉ. केळकर यांच्या दवाखान्याची पायरी चढू लागल्या.

आपल्या आजाराचं नेमकं निदान होतंय हे हळूहळू तालुक्यातल्या स्त्रियांना कळू लागलं आणि सांगोला तालुक्यातल्या महिलांशी डॉ. केळकर यांचं वैद्यकीय व्यवसायापलीकडचं नातं जुळलं. ग्रामीण भागातील महिला डॉ. केळकर यांच्याकडे मनही मोकळं करू लागल्या. रुग्ण म्हणून येणाऱ्या स्त्रियांपैकी प्रत्येकीलाच काही ना काही घरगुती समस्या आहेत, हे डॉक्टरांच्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळे शारीरिक आजारपणातून बरे करण्याबरोबरच या महिलांना मानसिक हिंमत देण्याचीदेखील गरज आहे, हा विचार डॉक्टरांच्या मनात येऊ लागला. आपणच या स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव तीव्र होऊ लागली.

सांगोल्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेच्या स्थापनेची मुळं इथूनच रुजू लागली होती. १९७८ साली संस्थेच्या अंतर्गत पहिला उपक्रम सुरू झाला ‘महिला सहविचार केंद्र‘ या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांमध्ये प्रथमच चर्चा, विचारांची देवाण घेवाण मैत्रिणींच्या भूमिकेतून होऊ लागली. एकमेकींना स्त्रीचे भाव विश्व समजू लागले. पुढे सर्वांच्या विचार विनिमयामधून ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी संस्कार वर्ग असावा असा विचार पुढे आला. प्रथम संस्कार वर्ग सुरू करण्यात आला. संस्कार वर्गानंतर मुलांसाठी बालवाडी सुरू करावी असे ठरले. याच केंद्रातील काही महिलांनी पोस्टाद्वारे बालवाडी शिक्षिका प्रमाणपत्राचा कोर्स पूर्ण केला. बालवाडी बालक मंदिराच्या अर्थसाहाय्यासाठी संस्थेअंतर्गत एक चॅरिटी शो घेतला या शोच्या माध्यमातून बावीस हजार रुपयांचा निधी उभा राहिला.

या निधीच्या मदतीने १९८३ मध्ये डॉ. केळकर हॉस्पिटलमध्येच एका खोलीत बालक मंदिर सुरू झाले. छोट्यांना चांगल्या सवयी, संस्कार बालक मंदिरातून देण्यात येत होते. मात्र बालवाडीनंतर या मुलांच्या शिक्षणाचे पुढे काय ? या प्रश्नानं या मुलांचे पालक बेचैन झाले. पालकांच्या आग्रहामुळे पहिलीचा पहिला वर्ग १९८४ मध्ये सुरू झाला, आणि शिक्षण म्हणजे '' मन, मनगट, मेंदू या तिन्हीचा विकास करून माणूस घडविणारी प्रक्रिया’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन सांगोल्यात उत्कर्ष विद्यालय सुरू झाले. आज सांगोल्यात ही एक आदर्श शाळा म्हणून उभी आहे. पालकांच्या आग्रहामुळे नंतर एकएक नवीन वर्ग वाढत गेला. आज ही शाळा दहावीपर्यंत असून , शाळेतील विद्यार्थी संख्या एक हजारहून अधिक आहे.

दुष्काळ ग्रस्त सांगोला तालुक्यातील ग्रामीण समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन महिला व कुटुंबाच्या विकासासाठी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था म्हणजे एक चळवळ असून , संस्थेमार्फत ग्रामीण महिलांचे सबलीकरण, आरोग्यरक्षण , कौशल्य विकसन केंद्र , आर्थिक स्वावलंबन , पर्यावरण साक्षरता असे उपक्रम राबविले जातात.

संस्थेकडून ग्रामीण भागात २००५ पासून दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाची कामे राबविली जातात. संस्थेमार्फत सांगोला तालुक्यातील संगेवाडी, वाटंबरे ,गार्डी या गावांमध्ये पाणी अडविण्यासाठी बंधारे, ओढा खोलीकरण , वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविल्यामुळे ही गावे पाणीदार झाली आहेत. मागील ४३ वर्षांच्या संस्थेच्या प्रवासातील एकूण लाभार्थींची संख्या पन्नास हजारापेक्षा अधिक आहे. संस्थेमार्फत सांगोला तालुक्यातील २४ गावांमध्ये शंभर महिला बचत गट चालविले जातात. या बचत गटामार्फत महिलांना विविध प्रशिक्षणे देऊन , पतपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्थेकडून उत्कर्ष विद्यालय ही शाळा चालवली जाते. शाळेतील पाचवी ते दहावीच्या तुकड्यांना शासकीय अनुदान मिळत नाही. शिवाय शाळेतील पंचवीस टक्के विद्यार्थी आसपासच्या खेड्यातील असून , कमी उत्पन्न गटातील आहेत. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक शुल्क देऊ शकत नाहीत. परिणामी शिक्षकांचे मानधन व शाळेतील भौतिक साधनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

तसेच संस्थेकडून ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणासाठी व आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी "कौशल्य विकसन केंद्र" चालविले जाते. या कौशल्य विकसन केंद्र अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना कौशल्याधिष्टित व रोजगाराभिमुख विविध प्रशिक्षण कोर्सेस राबविले जातात. यामध्ये फॅशन डिझायनिंग , टॅली ईआरपी , संगणक प्रशिक्षण , ब्युटिशियन ट्रेनिंग, इंग्रजी संभाषण कला, आकाश कंदील व राख्या तयार करणे आदी कोर्सेसचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील महिलांना अशा रोजगारभिमुख कोर्सेसचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे महिला स्वतःचा व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या स्वालंब झाल्या आहेत. आत्तापर्यंत संस्थेमार्फत ग्रामीण भागातील जवळपास चार हजार महिलांना प्रशिक्षण दिले आहे त्यातील किमान दोन हजार महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. संस्थेला " कौशल्य विकसन केंद्र " अंतर्गत अधिका - अधिक महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करावयाचे आहे. त्यासाठी भौतिक साधनांचा व इतर खर्च मोठा आहे. आणि हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत....

‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही सरकारी अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती,माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक :- ८६०५०१७३६६