‘यशोधन’ला गरज मोठ्या मदतीची...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
Yashodhan Trust
Yashodhan TrustSakal

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी व क्राउड फंडिंगसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ ही नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाईल. ‘यशोधन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेबद्दल आपण माहिती घेतली होती. ‘यशोधन ट्रस्ट’साठी आर्थिक मदतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पण संस्थेला इतर खर्च सोडून केवळ अनाथ - बेघर व मनोरुग्णांच्या आरोग्य तपासणी व औषध - उपचारांचा वार्षिक खर्च पाच लाख रुपये आहे. त्यामुळे ‘यशोधन ट्रस्ट’ ला अजून ही मदतीची आवश्यकता आहे.

पुण्यावरून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाटा जवळ वेळे गावाच्या हद्दीत समाजातील अनाथ, बेघर वयोवृद्ध, मनोरुग्ण लोकांसाठी ‘यशोधन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे संचलीत गजानंत निवारा केंद्र आहे. वाई तालुक्यातील रवी बोडके या तरुणाने, समाजाने नाकारलेल्या लोकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी ‘यशोधन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. रस्त्यावरून या अनाथांना व मनोरुग्णांना उचलून आणायचे, स्वच्छ करायचे, डॉक्टरांकडे उपचारांसाठी न्यायचे असा दिनक्रम सुरु झाला. काही दिवस अशा लोकांना निवारा केंद्रात ठेवून त्यांची योग्य सर्वप्रकारची काळजी घेऊन, काही दिवसांनी संस्थेमार्फ़त अशा अनाथ, बेघर लोकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना आप-आपल्या कुटुंबात सुरक्षित पोहोचविले जाते. तसेच मानसिक रुग्णांना पुढील उपचारांसाठी मनोरुग्णालयात दाखल केले जाते. अशा मनोरुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन, कुटुंबाच्या ताब्यात दिले जातात. सध्या ५५ अनाथ- बेघर- मनोरुग्ण इथं आहेत.

पण हे काम करताना यातील खूप मोठं आव्हान म्हणजे महिलांना सांभाळणे. पुरुषांना सांभाळताना कमी अडचणी असतात. पण महिलांच्या समस्या वेगळ्या असतात. मानसिक आजाराने ग्रस्त महिलांची काळजी घेताना त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या अडचणी याबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते. अशा महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रवी बोडके यांना त्यांची पत्नी सोनाली यांची खूप मदत होते.

अशीच एक ६५ वर्षीय वयोवृद्ध मनोरुग्ण महिला पोलिसांच्या मदतीने कोरोना काळात ‘यशोधन ट्रस्ट’ मध्ये दाखल झाली. ही महिला तिच्या गावी आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने राहत होती. आयुष्यभर काबाडकष्ट करून तिने प्रपंच केला होता. दोन मुले आणि नवरा असे तिचे कुटुंब सर्व ठीक चालले होते. पण अचानक या महिलेच्या डोक्यावर परिणाम होऊन, ती महिला मनोरुग्णांसारखी वागू लागली. नवऱ्याने दवाखान्यात नेण्याऐवजी अंधश्रद्धेपोटी देवऋषीला दाखविले , देवऋषीने भूतबाधा झाली म्हणून अंगारा व धुपारा दिला. पण दिवसेंदिवस या महिलेची अवस्था बिकट होत गेली. कुटुंबातील लोक अखेर कंटाळले. नवरा व मुले तिच्याकडे लक्ष देत नव्हते. अशातच एके दिवशी ही महिला घरातून निघून गेली, रस्त्यावर राहू लागली आणि एक दिवस रात्री ती रस्त्याच्या कडेला झोपली असताना एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी रवी बोडके यांच्याशी संपर्क करून त्या महिलेला ‘यशोधन ट्रस्ट’ मध्ये भरती केले. या महिलेवर झालेल्या शारीरिक अत्याचारापेक्षा तिच्या मनावर झालेला मानसिक आघात खूप मोठा होता. जेवताना सुद्धा ही महिला सतत रडत असे. या महिलेला बोलतं करून, तिच्याशी संवाद साधून तिचे आयुष्य पूर्ववत करण्यासाठी रवी बोडके व ‘यशोधन ट्रस्ट’ कडून प्रयत्न केले जात आहेत. अशा स्वरुपाच्या केसेस लक्षात घेऊन ‘यशोधन ट्रस्ट’ कडून महिलांसाठी वेगळा कक्ष सुद्धा बांधण्यात येत असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

आजपर्यंत ‘यशोधन ट्रस्ट’च्या माध्यमातून अनेकांना झाली आहे, अनेक अनाथ - बेघर व मनोरुग्णांना हक्काचा निवारा मिळाला आहे. आज "यशोधन ट्रस्ट" च्या मालकीच्या जागेत गजानंत निवारा केंद्र सुरु आहे. काही वयोवृद्धांना पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडलेले असते, अशा वयोवृद्धांनाही ‘यशोधन ट्रस्ट’च्या माध्यमातून निवारा दिला जातो. तसेच कालांतराने त्यांच्या मुलांना किंवा नातेवाइकांना भेटून त्यांचे समुपदेशन करून अशा वयोवृद्धांना परत त्यांच्या कुटुंबांत पाठविले जाते. काही नातेवाईक परत नेण्यासाठी तयार होतात तर काही तयार होत नाहीत. अशा वेळी असे वयोवृद्ध लोक यशोधन ट्रस्ट संचालित निवारा केंद्रात शेवटपर्यंत सांभाळले जाते. निवारा केंद्रातील एखाद्या वयोवृद्धांचे निधन झाले तर , संस्थेकडून संबंधित मुलांना व नातेवाइकांना कळविले जाते. परंतु काही मुले अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत अशा वेळी संस्थेकडूनच अंत्यसंस्कार केले जातात. ‘यशोधन ट्रस्ट’ द्वारे माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम केले जात आहे. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. संस्थेला सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. आपण ही या कार्याला देणगीरूपाने हातभार लावू शकतो.

संस्थेला कशी कराल मदत

‘यशोधन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. संस्थेचा दिवसाला होणारा खर्च खूप मोठा आहे. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर अॅक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या , सीएसआर कंपन्या व परदेशी -भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन यशोधन ट्रस्ट च्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

समाजाचा प्रतिसाद उत्साहवर्धक

सकाळ सोशल फाउंडेशन अंतर्गत ‘सोशल फॉर अॅक्शन’ या क्राउड फंडिंगच्या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे ‘माहेर’ या स्वयंसेवी संस्थेची माहिती मदतीच्या आवाहनासहित समाजभान सदरात दिनांक ३० मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अभियानांतर्गत ‘माहेर’ संस्थेसाठी जमा झालेल्या काही लाखांच्या देणगीची रक्कम धनादेश स्वरूपात ‘माहेर’ संस्थेच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या संचालिका मृणाल पवार. माहेर संस्थेचे समाजसेवक विक्रम भुजबळ , माहेर प्रकल्पातील वात्सल्यधाम प्रकल्प प्रमुख शर्ली अँथोनी व एच. आर. प्रमुख गौस सय्यद उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क - ८६०५०१७३६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com