त्याचे पायच बनले हात...

मुंबईच्या एका अनाथाश्रमाच्या माध्यमातून राजेश पिल्ले साधारण तो चौदा-पंधरा वर्षांचा असताना संस्थेत दाखल झाला.
Rajesh Pillai
Rajesh PillaiSakal
Summary

मुंबईच्या एका अनाथाश्रमाच्या माध्यमातून राजेश पिल्ले साधारण तो चौदा-पंधरा वर्षांचा असताना संस्थेत दाखल झाला.

दिव्यांगांना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगता आलं पाहिजे यासाठी त्यांना सक्षम केलं पाहिजे, तसंच त्यांचं शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, वैवाहिक सर्वांगीण पुनर्वसन करण्यासाठी त्यांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन, अपंगांच्या व दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या कोल्हापूरमधील ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ या संस्थेविषयी....

जन्मतःच खांद्यापासून दोन्ही हात नसलेला, आई-वडिलांचं छत्र हरवलेला व कुणाचाही आसरा नसलेला एक तरुण ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ संस्थेच्या निवासी प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणात व दैनंदिन जीवनात आपल्या दोन्ही पायांचा व बोटांचा योग्य वापर करून, मोठ्या कष्टाने इंजिनिअरिंगची पदवी घेतो आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळवतो.

मुंबईच्या एका अनाथाश्रमाच्या माध्यमातून राजेश पिल्ले साधारण तो चौदा-पंधरा वर्षांचा असताना संस्थेत दाखल झाला. राजेश दिव्यांग असणं व निराधार असणं ही संस्थेच्या दृष्टीने मोठी समस्या नव्हती, कारण ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ ही संस्था दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणारी होती. खरी समस्या होती ती त्याच्या वर्तनाविषयी, कारण तो एक असभ्य वर्तन करणारा, व्यसन करणारा किशोरवयीन मुलगा होता. पण, हळूहळू संस्थेच्या ‘घरौंदा’ या वसतिगृहातील प्रेमळ आणि शिस्तबद्ध वातावरणात तसेच संस्थेचे अध्यक्ष पी. डी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनामुळे व त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे राजेशच्या वर्तनात बदल होऊन,त्याचं व्यक्तिमत्त्व हळूहळू बदललं. स्वतःच्या पायांनी व पायांच्या बोटांच्या मदतीने आपली दैनंदिन कामं कशी करावी यासाठी संस्थेकडून राजेशला प्रोत्साहन देण्यात आलं, तसंच पायांच्या बोटांनी लिहणं, संगणक चालविणं अशा बाबींसाठी मार्गदर्शन करण्यात आलं.

संस्थेच्या समर्थ विद्यालयातून तो दहावी पास झाला. कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात त्याने अकरावीला प्रवेश घेतला खरा; पण त्याला यश काही साथ देत नव्हतं. संस्थेच्या लक्षात आलं की, राजेशला औपचारिक शिक्षणापेक्षा तांत्रिक कौशल्याधिष्ठित शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन अपयशाने निराश न होता राजेशने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयटी (माहिती तंत्रज्ञान पदविका) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी संस्थेकडून मार्गदर्शनाबरोबरच बरेच प्रयत्न करण्यात आले आणि अखेर राजेशला प्रवेश मिळाला.

संस्थेतून महाविद्यालयात जाणं-येणं कठीण होऊ लागलं म्हणून संस्थेमार्फत महाविद्यालय परिसरात राजेशची राहण्याची सोय करण्यात आली. दोन्ही हात नसल्याने हाही अभ्यासक्रम राजेशच्या दृष्टीने अडथळ्यांची शर्यतच ठरला; पण संस्थेने राजेशला त्याच्या मनात विश्वास व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. संस्थेच्या पाठिंब्यामुळे नेटाने पुढे जात राजेश इंजिनिअरिंग डिप्लोमा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन, कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाला.

येथेही वाट बिकटच होती; पण राजेश ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ संस्थेचा मुलगा होता. नसलेल्या हातांसाठी दुःख न करता त्यानं प्रयत्न सुरू ठेवले. संस्थेच्या नियमित आर्थिक मदतीने सर्व अडचणींवर मात करून, पायानेच लिहू शकणाऱ्या या तरुणाने बीई पदवी मिळविली आणि आता तो बेंचमार्क आयटी सोल्यूशन्स या कंपनीत ज्युनिअर सिस्टम अडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. राजेशसारख्या अनेक दिव्यांग मुलामुलींना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ ही संस्था विशेष प्रयत्न करत आहे.

दिव्यांगांना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी त्यांना सक्षम केलं पाहिजे, तसंच त्यांचं शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, वैवाहिक सर्वांगीण पुनर्वसन करण्यासाठी त्यांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन, अपंगांच्या व दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुनर्वसन कार्यासाठी डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजूक व रजनी करकरे-देशपांडे या समविचारी मैत्रिणींनी मिळून १९८४ मध्ये ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजूक यांच्या दोन्ही पायांना पोलिओमुळे वयाच्या १६ व्या वर्षी अपंगत्व आलं. मोठ्या जिद्दीने आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने स्वतःच्या पायावर उभं राहून, त्यांनी यशस्वी गायिका म्हणून नावलौकिक मिळवला. समाजात आपल्यासारखंच शारीरिक व्यंग, अपंगत्व असलेले असंख्य दिव्यांग लोक आहेत आणि त्यांना प्रोत्साहनाची व मदतीची गरज आहे, हे ओळखून अपंगांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी रजनी करकरे-देशपांडे यांच्या सहकार्याने त्यांनी ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ संस्थेचं कार्य सुरू केलं. सुरुवातीला संस्थेच्या माध्यमातून संस्थेकडे येणाऱ्या अपंगांच्या व दिव्यांगांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वैद्यकीय मदत, कृत्रिम साधनं व अवयव बसवून देणं अशा स्वरूपाचं काम सुरू झालं. त्यानंतर संस्थेच्या कार्याचा विस्तार झाला. त्यातूनच ‘घरोंदा - वसतिगृह तथा पुनर्वसन केंद्र’ या प्रकल्पाची निर्मिती झाली.

‘घरोंदा - वसतिगृह तथा पुनर्वसन केंद्र’ : कोल्हापूरपासून ९ किलोमीटर अंतरावर हुपरी-मुडशिंगी रोडवर उंचगाव पूर्व येथे शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैद्यकीय पुनर्वसनाच्या मुख्य हेतूने ‘घरोंदा’ या मोफत निवासी प्रशिक्षण वसतिगृहाची संस्थेच्या माध्यमातून निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पात अपंग-दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण, अडथळाविरहित भौतिक सुविधा, सकस आहार, वैद्यकीय मदत व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया, कृत्रिम साधनं, माहिती-तंत्रज्ञान सुविधा, व्यक्तिमत्त्व व कौशल्यविकासासाठी आवश्यक विशेष उपयुक्त उपक्रम, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी या विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळा, तसंच काळाची गरज ओळखून सर्व आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या निवासी प्रकल्पात बहुसंख्य ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी आहेत.

‘समर्थ विद्यामंदिर’ : दिव्यांग बालकांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून, सन २००० मध्ये संस्थेने बालवाडी ते ८ वी व ‘समर्थ विद्यालय’ ९ वी ते १० वी ही अपंग व सर्वसामान्य मुलांसाठी समावेशक शाळेची निर्मिती केली आहे. या शाळेत समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेतात. शाळेत शासन नियमानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम राबवला जातो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा; संगीत, साहित्य, नृत्य, नाट्य अशा विविध विषयांची ओळख व आवड निर्माण व्हावी यासाठी पूरक उपक्रमांचं आयोजन केलं जातं.

व्यवसाय प्रशिक्षण केंद्र : दिव्यांगांच्या पुनर्वसनकार्यात औपचारिक शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा शिक्षणाची फारशी आवड अथवा गती नसल्याने काही दिव्यांग व्यक्ती शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा व्यक्तींसाठी व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेने २०१६ मध्ये संस्थेच्या ‘हॅन्डिहेल्प वेल्फेअर फाउंडेशन’ उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिलाई प्रशिक्षण केंद्र व सिंधुदुर्ग येथे ‘लाजवाब काजूप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र’ सुरू केलं.

या माध्यमातून १५० हून अधिक दिव्यांग व्यक्तींना इथे संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध विभागांनुसार प्रशिक्षण देण्यात येतं. यामध्ये

१. निर्माण विभाग : व्हीलचेअर्स, वॉकर्स, कुबड्या, पोर्टेबल कमोडस् इ. साधनं तयार करणे.

२. सुतारकाम विभाग : ऑफिस, घर व शाळेसाठी लागणारं फर्निचर तयार करणे व फॅब्रिकेशनची कामं.

३. कौशल्य प्रशिक्षण केंद्र (शिलाई व हस्तकौशल्ये विभाग) असे भाग आहेत.

‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ संस्थेच्या माध्यमातून गेल्या ३७ वर्षांत शेकडो दिव्यांग विद्यार्थ्यांना व व्यक्तींना शिक्षण - कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण देऊन, तसंच त्यांना रोजगाराची संधी देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यात आलं आहे. संस्थेच्या ‘घरोंदा’ या निवासी वसतिगृहात, तसंच समर्थ विद्यालयात राजेश पिल्लेसारखे अनेक गुणवंत दिव्यांग विद्यार्थी व व्यक्ती शिक्षण-प्रशिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे. संस्थेला भौतिक साधनांसाठी, संगणक कक्षासाठी, इतर उपकरणांसाठी व शैक्षणिक प्रशिक्षण व साहित्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

कशी कराल मदत...

‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन , ‘हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. या अभियानाच्या माध्यमातून पाच हजार व त्यापुढील देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावं पुढील भागात प्रसिद्ध केली जातील.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com